1.
विहीणबाईची करणी बघा मग बंधूला लेक मागा
विहीण मागते थोड थोड नवर्या बाळाला कंठी तोड
त्या ग कंठीच सोन फिक्क बंधु कंगण्या जोग रुप
त्या ग कंगण्या पडल्या काळ्या बंधु आणा हो वेलबाळ्या
वेलबाळ्याला बाजूबंद चोळी पातळ मला दंड
त्या ग पातळाची निरी निरी रुतते माझे पोटी
बंधू आणा हो लाल लाल दाटी
लाल लाल दाटीचा पिवळा सर
बंधु लावा वो वर भिंग
2. अहो अहो विहीणबाई
आमचे मागणे काही नाही
आमचे मागणे थोडे थोडे
नवर्या मुलीला पैंजणतोडे
पैंजण जोडव्यांची हौस फार
नवर्या मुलीला चद्रहार
चंद्रहाराची हौस मोठी
नवर्या मुलीला चिंचपेटी
चिंचपेटीला मोती थोडे
नवर्या मुलीला हत्तीघोडे
हत्तीघोडयावर बसती
गावाकडे दोघे जाती
आई पाहते खिडकीतून
बाप पाहतो दारातून
भाऊ पहातो ओटयावरुन
हरणी गेली कडल्यातून
ज्याची होती त्यान नेली
आमची माया वाया गेली
3.
विहीणबाई, विहीणबाई, राग मनातला सोडा गोरी गोरी वरमाय
तिचे नाजुक पिवळे पाय
गव्हा तांदळान भरल्या कोठया
खोबर्या नारळान मी भरीते ओटया
खणा नारळान मी भरीते ओटया
विहीणबाई राग मनातला सोडा
जेवण झाल्यावर हात चोळते साखरीन
दात कोरते लवंगान
घंगाळी रुपये तुम्ही घाला
विहीणबाई राग मनातला सोडा
रेशमी पायघडयावरुन मिरवा
विहीणबाई राग मनातला सोडा
मोठया लोकांचा नवरदेव सासरी रुसला
कंठी गोफासाठी जानोसी बसला
नवरदेवाच्या जोरावर सवाष्णी मागती जानोसा
चिरेबंदी वाडा त्यात जोडीनी हो बसा