Last modified on 20 जून 2013, at 15:04

ज्ञानेश्वरी / अध्याय पहिला / संत ज्ञानेश्वर

ॐ नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या।
जय जय स्वसंवेद्या, आत्मरुपा ॥१॥

देवा तूंचि गणेशु, सकलमति प्रकाशु।
म्हणे निवृत्ति दासु, अवधारिजो जी ॥२॥

हें शब्दब्रह्म अशेष, तेचि मूर्ति सुवेष।
तेथ वर्णवपु निर्दोष, मिरवत असे ॥३॥

स्मृति तेचि अवयव, देखा अंगिकभाव।
तेथ लावण्याची ठेव, अर्थशोभा ॥४॥

अष्टादश पुराणे, तीचि मणिभूषणे।
पदपद्धती खेवणे, प्रमेयरत्नांची ॥५॥

पदबंध नागर, तेचि रंगाथिले अंबर।
जेथ साहित्यवाणे, सपूर उजाळाचे ॥६॥

देखा काव्यनाटका, जे निर्धारिता सकौतुका।
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका, अर्थध्वनी ॥ ७॥

नाना प्रमेयांचि परी, निपुणपणे पाहता कुसरी।
दिसती उचित पदे माझारी, रत्नें भली ॥ ८॥

तेथ व्यासादिकांच्या मति, तेचि मेखळा मिरवती।
चोखाळपणे झळकती, पल्लवसडका ॥ ९॥

देखा षड्दर्शने म्हणिपती, तेचि भुजांची आकृती ॥
म्हणऊनि विसंवादे धरिती, आयुधे हाती ॥ १०॥

तरी तर्क तोचि परशु, नीतिभेदु अंकुशु।
वेदांतु तो महारसु, मोदकाचा ॥ ११ ॥

एके हाति दंतु, जो स्वभावता खंडितु।
तो बौद्धमत संकेतु, वार्तिकांचा ॥ १२ ॥

मग सहजे सत्कारवादु, तो पद्मकरु वरदु।
धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु, अभयहस्तु ॥ १३ ॥

देखा विवेकमंतु सुविमळु, तोचि शुंडादंडु सरळु।
जेथ परमानंदु केवळु, महासुखाचा ॥ १४ ॥

तरी संवादु तोचि दशनु, जो समताशुभ्रवर्णु।
देवो उन्मेषसुक्ष्मेक्षणु, विघ्नराजु ॥ १५ ॥

मज अवगमलिया दोनी, मीमांसा श्रवणस्थानी।
बोधमदामृत मुनी, अलि सेविती ॥ १६ ॥

प्रमेयप्रवाल सुप्रभ, द्वैताद्वैत तेचि निकुंभ।
सरिसे एकवटत, इभ मस्तकावरी ॥ १७ ॥

उपरि दशोपनिषदे, जिये उदारे ज्ञानमकरंदे।
तिये कुसुमे मुगुटी सुगंधे, शोभती भली ॥ १८ ॥

अकार चरणयुगुल, उकार उदर विशाल।
मकार महामंडल, मस्तकाकारे ॥ १९ ॥

हे तिन्ही एकवटले, तेथ शब्दब्रह्म कवळले।
ते मियां गुरूकृपा नमिले, आदिबीज ॥ २० ॥

आतां अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थकला कामिनी।
ते शारदा विश्वमोहिनी, नमिली मियां ॥ २१ ॥

मज हृदयी सद्गुरू, तेणे तारिलो हा संसारपूरु।
म्हणऊनि विशेष अत्यादरू, विवेकावरी ॥ २२ ॥

जैसे डोळ्यां अंजन भेटे, मग दृष्टीसी फांटा फुटे।
मग वास पाहे तेथ प्रकटे, महानिधी ॥ २३ ॥

का चिंतामणी जालया हाती, सदा विजयवृत्ति मनोरथी।
तैसा मी पूर्णकाम निवृत्ती, ज्ञानदेवो म्हणे ॥ २४ ॥

म्हणोन जाणतेनो गुरू कीजे, तेणे कृतकार्य होईजे।
जैसे मूळसिंचने सहजे, शाखापल्लव संतोषती ॥ २५ ॥

का तीर्थे जिये भुवनी, तिये घडती समुद्रावगहनी।
ना तरी अमृतरसास्वादनीं, रस सकळ ॥ २६ ॥

तैसा पुढतपुढती तोची, मियां अभिवंदिला श्रीगुरूचि।
जे अभिलषित मनोरुची, पुरविता तो ॥ २७ ॥

आता अवधारा कथा गहन, जे सकळां कौतुका जन्मस्थान।
की अभिनव उद्यान, विवेकतरूचे ॥ २८ ॥

ना तरी सर्व सुखांची आदि, जे प्रमेयमहानिधी।
नाना नवरससुधाब्धि, परिपूर्ण हे ॥ २९ ॥

की परमधाम प्रकट, सर्व विद्यांचे मूळपीठ।
शास्त्रजाता वसिष्ठ, अशेषांचे ॥ ३० ॥

ना तरी सकळ धर्मांचे माहेर, सज्जनांचे जिव्हार।
लावण्यरत्नभांडार, शारदियेचे ॥ ३१॥

नाना कथारूपे भारती, प्रकटली असे त्रिजगती।
आविष्करोनी महामती, व्यासाचिये ॥ ३२॥

म्हणोनी हा काव्यां रावो, ग्रंथ गुरुवतीचा ठावो।
एथुनि रसां आला आवो, रसाळपणाचा ॥ ३३॥

तेवींचि आइका आणिक एक, एथुनि शब्दश्री सच्छास्त्रिक।
आणि महाबोधि कोवळीक, दुणावली ॥ ३४॥

एथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले।
आणि सौभाग्य पोखले, सुखाचे एथ ॥ ३५॥

माधुर्यी मधुरता, शृंगारी सुरेखता।
रूढपण उचितां, दिसे भले ॥ ३६॥

एथ कळाविदपण कळा, पुण्यासी प्रतापु आगळा।
म्हणऊनि जनमेजयाचे अवलीळा, दोष हरले ॥ ३७॥

आणि पाहता नावेक, रंगी सुरंगतेची आगळीक।
गुणां सगुणतेचे बिक, बहुवस एथ ॥ ३८॥

भानुचेनि तेजें धवळले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळले।
तैसे व्यासमती कवळले, अवघे विश्व ॥ ३९॥

कां सुक्षेत्रीं बीज घातले, ते आपुलेयापरी विस्तारले।
तैसे भारतीं सुरवाडले, अर्थजात ॥ ४०॥

ना तरी नगरांतरी वसिजे, तरी नागराचि होइजे।
तैसे व्यासोक्तितेजे, धवळित सकळ ॥ ४१॥

कीं प्रथमवयसाकाळीं, लावण्याची नव्हाळी।
प्रकटे जैसी आगळी, अंगनाअंगी ॥ ४२॥

ना तरी उद्यानी माधवी घडे, तेथ वनशोभेचि खाणी उघडे।
आदिलापासोनि अपाडे, जियापरी ॥ ४३॥

नाना घनीभूत सुवर्ण, जैसे न्याहाळितां साधारण।
मग अलंकाती बरवेपण, निवाडु दावी ॥ ४४॥

तैसे व्यासोक्ती अळंकारिले, आवडे ते बरवेपण पातले।
ते जाणोनि काय आश्रयिले, इतिहासी ॥ ४५॥

नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं, सानीव धरुनी आंगी।
पुराणे आख्यानरूपे जगीं, भारता आली ॥ ४६॥

म्हणऊनि महाभारतीं जे नाही, ते नोहेचि लोकी तिहीं।
येणे कारणे म्हणिपे पाहीं, व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ४७॥

ऐसी सुरस जगीं कथा, जे जन्मभूमि परमार्था।
मुनि सांगे नृपनाथा, जनमेजया ॥ ४८॥

जे अद्वितीय उत्तम, पवित्रैक निरुपम।
परम मंगलधाम, अवधारिजो ॥ ४९॥

आता भारतीं कमळपरागु, गीताख्यु प्रसंगु।
जो संवादिला श्रीरंगु, अर्जुनेसी ॥ ५०॥

ना तरी शब्दब्रह्माब्धि। मथिलेया व्यासबुद्धि।
निवडिले निरवधि, नवनीत हे।। ५१॥

मग ज्ञानाग्निसंपर्के, कडसिलें विवेके।
पद आले परिपाकें, आमोदासी ॥ ५२॥

जे अपेक्षिजे विरक्ति, सदा अनुभविजे संतीं।
सोहंभावे पारंगती, रमिजे जेथ ॥ ५३॥

जे आकर्णिजे भक्ती, जें आदिवंद्य त्रिजगतीं।
ते भीष्मपर्वीं संगती, सांगीजैल ॥ ५४॥

जें भगवद्गीता म्हणीजे, जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे।
जे सनकादिकीं सेविजे, आदरेसीं ॥ ५५॥

जैसे शारदियेचे चंद्रकळे-, माजीं अमृतकण कोंवळे।
तें वेंचती मवाळें, चकोरतलगें ॥ ५६॥

तियापरी श्रोतां, अनुभवावी हे कथा।
अति हळुवारपणे चित्ता, आणूनियां ॥ ५७॥

हे शब्देविण संवादिजे, इंद्रियां नेणता भोगिजे।
बोलाआधि झोंबिजे, प्रमेयासी ॥ ५८॥

जैसे भ्रमर परागु नेती, परी कमळदळे नेणती।
तैसी परी आहे सेविती, ग्रंथी इये ॥ ५९॥

का आपुला ठावो न सांडिता, आलिंगिजे चंद्रु प्रकटता।
हा अनुरागु भोगितां, कुमुदिनी जाणे ॥ ६०॥

ऐसेनि गंभीरपणे, स्थिरावलेनि अंत:करणे।
आथिला तोचि जाणे, मानूं इये ॥ ६१॥

अहो अर्जुनाचिये पांती, जे परिसणया योग्य होती।
तिहीं कृपा करून संतीं, अवधान द्यावे ॥ ६२॥

हे सलगीं म्यां म्हणितले, चरणां लागोनि विनविलें।
प्रभू सखोल हृदय आपुलें, म्हणऊनियां ॥ ६३॥

जैसा स्वभावो मायबापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा।
तरी अधिकचि तयाचा, संतोष आथी ॥ ६४॥

तैसा तुम्हीं मी अंगीकारिलां, सज्जनीं आपुला म्हणितला।
तरी सहज उणें उपसाहला, प्रार्थूं कायी ॥ ६५॥

परी अपराधु तो आणिक आहे, जें मी गीतार्थ कवळुं पाहें।
ते अवधारा विनवूं लाहें, म्हणऊनियां ॥ ६६॥

हे अनावर न विचारितां, वायांचि धिंवसा उपनला चित्ता।
येर्हावीं भानुतेजीं काय खद्योता, शोभा आथी ॥ ६७॥

का टिटिभू चांचूवरी, माप सूये सागरी।
मी नेणतु त्यापरी, प्रवर्तें येथ ॥ ६८॥

आइका आकाश गिंवसावे, तरी त्याहूनि थोर होआवें।
म्हणऊनि अपाडु हें आघवें, निर्धारिता ॥ ६९॥

या गीतार्थाची थोरी, स्वयें शंभू विवरी।
जेथ भवानी प्रश्नु करी, चमत्कारोनी ॥ ७०॥

तेथ हरू म्हणे नेणिजे, देवी जैसें का स्वरूप तुझें।
तैसें नित्यनूतन देखिजे, गीतातत्व ॥ ७१॥

हा वेदार्थसागरू, जया निद्रिताचा घोरू।
तो स्वयें सर्वेश्वरू, प्रत्यक्ष अनुवादला ॥ ७२॥

ऐसें जें अगाध, जेथ वेडावती वेद।
तेथ अल्प मी मतिमंद, काय होय ॥ ७३॥

हें अपार कैसेनि कवळावे, महातेज कवणें धवळावे।
गगन मुठीं सुवावे, मशके केवीं ॥ ७४॥

परी एथ असे एक आधारु, तेणेचि बोलें मी सधरु।
जे सानुकूळ श्रीगुरु, ज्ञानदेवो म्हणे ॥ ७५॥

येर्हनवीं तरी मी मुर्खू, जरी जाहला अविवेकु।
तरी संतकृपादीपु, सोज्वळु असे ॥ ७६॥

लोहाचे कनक होये, हे सामर्थ्य परिसींच आहे।
की मृतही जीवित लाहे, अमृतसिद्धी ॥ ७७ ॥

जरी प्रकटे सिद्धसरस्वती, तरी मुकया आथी भारती।
एथ वस्तुसामर्थ्यशक्ति, नवल कायी ॥ ७८॥

जयातें कामधेनू माये, तयासी अप्राप्य काही आहे।
म्हणऊनि मी प्रवर्तों लाहे, ग्रंथी इये ॥ ७९॥

तरी न्यून ते पुरतें, अधिक ते सरते।
करून घ्यावे हें तुमते, विनवीतु असे ॥ ८०॥

आता देईजो अवधान, तुम्हीं बोलविल्या मी बोलेन।
जैसे चेष्टे सूत्राधीन, दारुयंत्र ॥ ८१॥

तैसा मी अनुग्रहीतु, साधूंचा निरोपितु।
ते आपुला अलंकारितु, भलतयापरी ॥ ८२॥

तंव श्रीगुरू म्हणती राहीं, हे तुज बोलावे न लगे कांही।
आता ग्रंथा चित्त देईं, झडकरी वेगा ॥ ८३॥

या बोला निवृत्तिदासु, पावूनि परम उल्हासु।
म्हणे परियेसा मना अवकाशु, देऊनियां ॥ ८४॥

        धृतराष्ट्र उवाच।
       धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः।
       मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ॥ १॥

तरी पुत्रस्नेहे मोहितु, धृतराष्ट्र असे पुसतु ॥
म्हणे संजया सांगे मातु, कुरुक्षेत्रींची ॥ ८५॥

जें धर्मालय म्हणिजे, तेथ पांडव आणि माझे।
गेले असती व्याजें, झुंजाचेनि ॥ ८६॥

तरी तिहीं येतुला अवसरीं, काय किजत असे येरयेरीं।
तें झडकरी कथन करी, मजप्रती ॥ ८७॥

       संजय उवाच।
       दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा।
       आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ॥ २॥

तिये वेळी तो संजय बोले, म्हणे पांडवसैन्य उचलले।
जैसें महाप्रळयीं पसरले, कृतांतमुख ॥ ८८॥

तैसे तें घनदाट, उठावले एकवाट।
जैसें उसळले कालकूट, धरीं कणव ॥ ८९॥

ना तरी वडवानलु सादुकला, प्रलयवाते पोखला।
सागर शोषूनि उधवला, अंबरासी ॥ ९०॥

तैसे दळ दुर्धर, नाना व्यूहीं परिकर।
अवगमले भयासुर, तिये काळीं ॥ ९१॥

तें देखिलेयां दुर्योधनें, अव्हेरिले कवणे माने।
जैसें न गणिजे पंचाननें, गजवटांते ॥ ९२ ॥

     पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम्।
     व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥ ३॥

मग द्रोणापासी आला, तयाते म्हणे हा देखिला।
कैसा दळभारु उचलला, पांडवांचा ॥ ९३॥

गिरिदुर्ग जैसे चालते, तैसे विविध व्यूह संभवते।
हे रचिले आथि बुद्धिमंते, द्रुपद्कुमरें ॥ ९४॥

जो का तुम्हीं शिक्षापिला, विद्या देऊनी कुरुठा केला।
तेणे हा पाखरिला, देखदेख ॥ ९५॥

        अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि।
        युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ: ॥ ४॥

आणिकही असाधारण, जे शस्त्रास्त्रीं प्रवीण।
जे क्षात्रधर्मीं निपुण, वीर आहाती ॥ ९६॥

जे बळें प्रौढी पौरुषें, भीमार्जुनांसारिखे।
ते सांगेन कौतुकें, प्रसंगेचि ॥ ९७॥

एथ युयुधानु सुभटु, आला असे विराटु।
महारथी श्रेष्ठु, द्रुपद वीरु ॥ ९८ ॥

        धृष्टकेतुश्चेकितान: काशिराजेश्च वीर्यवान।
        पुरुजित् कुंतिभोजश्च शैब्यश्च नरपुंगव: ॥ ५॥

       युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान्।
       सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथ: ॥ ६॥

चेकितान धृष्टकेतु, काशिश्वरु विक्रांतु।
उत्तमौज नृपनाथु, शैब्य देख ॥ ९९ ॥

हा कुंतिभोजु पाहे, एथ युधामन्यु आला आहे।
आणि पुरुजितादि राय हे, सकळ देखे ॥ १००॥

हा सुभद्रहृदयनंदनु, जो अपरु नवा अर्जुनु।
तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु, देखे द्रोणा ॥ १०१॥

आणिकही द्रौपदीकुमर, के सकळही महारथी वीर।
मिती नेणिजे अपार, मीनले आथि ॥ १०२ ॥

        अस्माकं तु विशिष्टा ये तान् निबोध द्विजोत्तम।
        नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते ॥ ७॥

        भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समिंतिंजय:।
        अश्वत्थामा विकर्णश्च सोमदत्तिस्थैव च ॥ ८॥

आतां आमुचां दळीं नायक, जे रूढ वीर सैनिक।
ते प्रसंगे आइक, सांगिजती ॥ १०३॥

उद्देशें एक दोनी, जायिजती बोलोनी।
तुम्हीआदिकरूनि, मुख्य जे जे ॥ १०४॥

हा भीष्मु गंगानंदनु, जो प्रतापतेजस्वी भानू।
रिपुगजपंचाननु, कर्ण वीरु ॥ १०५ ॥

या एकेकाचेनि मनोव्यापारें, हे विश्व होय संहरे।
हा कृपाचार्य न पुरे, एकलाचि ॥ १०६॥

एथ विकर्ण वीरु आहे, हा अश्वत्थामा पैल पाहें।
याचा अडदरु सदा वाहे, कृतांतु मनीं ॥ १०७॥

समितिंजयो सोमदत्ति, ऐसे आणिकही बहुत आहाती ॥
जयाचिया बळा मिती, धाताही नेणे ॥ १०८॥

       अन्ये च बहव: शूरा मदर्थे त्यक्तजीविता:।
       नानाशस्त्रप्रहरण: सर्वे युद्धविशरद: ॥ ९॥

जे शस्त्रविद्यापारंगत, मंत्रावतार मूर्त।
हो कां जे अस्त्रजात, एथूनि रूढ।। १०९॥

हे अप्रतिमल्ल जगीं, पुरता प्रतापु अंगी।
परी सर्व प्राणें मजचिलागी, आराइले असती ॥ ११०॥


पतिव्रतेचे हृदय जैसे, पतीवांचूनि न स्पर्शे।
मी सर्वस्व या तैसे, सुभटांसी ॥ १११॥

आमुचिया काजाचेनि पाडें, देखती आपुलें जीवित थोकडें।
ऐसे निरवधि चोखडे, स्वामिभक्त ॥ ११२॥

झुंजती कुळकणी जाणती, कळे कीर्तीसी जिती।
हे बहु असो क्षात्रनीती, एथोनियां ॥ ११३॥

ऐसें सर्वापरी पुरते, वीर दळी आमुतें।
आतां काय गणूं यांतें, अपार हे ॥ ११४॥

         अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम्।
         पर्याप्तं त्विदमेषां बलं भीमाभिरक्षितम् ॥ १०॥

वरी क्षत्रीयांमाजि श्रेष्ठु, जो जगजेठी गा सुभटु।
तया दळवैपणाचा पाटु, भीष्मासी पैं ॥ ११५॥

आतां याचेनि बळें गवसलें, हें दुर्ग जैसे पन्नासीलें।
येणे पाडे थेंकुले, लोकत्रय ॥ ११६॥

आधींच समुद्र पाहीं, तेथ दुवाडपणा कवणा नाहीं ॥
मग वडवानळु तैसेयाही, विरजा जैसा ॥ ११७॥

ना तरी प्रलयवह्नि महावातु, या दोघां जैसा सांघातु।
तैसा हा गंगासुतु, सेनापति ॥ ११८॥

आतां येणेंसि कवण भिडे, हे पांडव सैन्य कीर थोडें।
ओइचलेनि पाडे, दिसत असे ॥ ११९॥

वरी भीमसेन बेथु, तो जाहला असे सेनानाथु।
ऐसें बोलोनि हे मातु, सांडिली असे ॥ १२०॥

         अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः।
         भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥ ११॥

मग पुनरपि काय बोले, सकळ सैनिकांते म्हणितलें।
आता दळभार आपुलाले, सरसे करा ॥ १२१॥

जिया जिया अक्षौहिणी, तिये तिये आरणी।
वरगण कवणकवणी, महारथिया ॥ १२२॥

तेणे तिया आवरिजे, भीष्मातळीं राहिजे।
द्रोणाते म्हणिजे, तुम्हीं सकळ ॥ १२३॥

हाचि एकु रक्षावा, मी तैसा हा देखावा।
येणें दळभारु आघवा, साचु आमुचा॥ १२४॥

       तस्य सनरयन् हर्षं कुरुवृद्धः पितामहः।
       सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान् ॥ १२॥

या राजाचिया बोला, सेनापति संतोषला।
मग तेणे केला, सिंहनादु ॥ १२५॥

तो गाजत असे अद्भुतु, दोन्ही सैन्यांआंतु।
प्रतिध्वनि न समातु, उपजत असे ॥ १२६॥

तयाचि तुलगासवे, वीरवृत्तिचेनि थावें।
दिव्य शंख भीष्मदेवें, आस्फुरिला ॥ १२७॥

ते दोन्ही नाद मिनले, तेथ त्रैलोक्य बधिरभूत जाहलें।
जैसें आकाश कां पडिलें, तुटोनियां ॥ १२८॥

घडघडीत अंबर, उचंबळत सागर।
क्षोभलें चराचर, कांपत असे ॥ १२९॥

तेणें महाघोषगजरें, दुमदुमताती गिरिकंदरें।
तंव दलामाजि रणतुरें, आस्फारिलीं ॥१३०॥

        ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानकगोमुखः।
        सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ॥१३॥

उदंड सैंघ वाजतें, भयानकें खाखाते।
महाप्रळयो जेथें, धाकडांसी ॥ १३१ ॥

भेरी निशाण मांदळ, शंख काहळा भोंगळ।
आणि भयासुर रणकोल्हाळ, सुभटांचे ॥ १३२॥

आवेशें भुजा त्राहाटिती, विसणैले हांका देती।
जेथ महामद भद्रजाती, आवरती ना ॥ १३३॥

तेथ भेडांची कवण मातु, कांचया केर फिटतु।
जेणें दचकला कृतांतु, आंग नेघे ॥ १३४॥

एकां उभयतांचे प्राण गेले, चांगांचे दांत बैसले।
बिरुदांचे दादुले, हिंवताती ॥ १३५॥

ऐसा अद्भुत तूरबंबाळु, ऐकोनि ब्रह्मा व्याकुळु।
देव म्हणती प्रळयकाळु, ओढवला आजि ॥ १३६॥

ऐसी स्वर्गीं मातु, देखोनि तो आकांतु।
तंव पांडवदळा आंतु, वर्तलें कायी ॥ १३७॥

हो कां निजसार विजयाचे, कीं ते भांडार महातेजाचे।
जेथ गरुडाचिचे जावळिये, कांतले चार्ही ॥ १३८॥

        ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ।
        माधवः पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः ॥ १४॥

की पाखांचा मेरु जैसा, रहंवरु मिरवितसे तैसा।
तेजें कोंदटलिया दिशा जयाचेनि ॥१३९॥

जेथ अश्ववाहकु आपण, वैकुंठीचा राणा जाण।
तया रथाचे गुण, काय वर्णूं ॥ १४०॥

ध्वजस्तंभावरी वानरु, तो मूर्तिमंत शंकरु।
सारथी शारङधरु, अर्जुनेसीं ॥ १४१॥

देखा नवल तया प्रभूचें, प्रेम अद्भुत भक्तांचे।
जे सारथ्य पार्थाचें, करीतु असे ॥ १४२॥

पाईकु पाठीसीं घातला, आपण पुढां राहिला।
तेणें पांचजन्यु आस्फुरिला, अवलीळाचि।। १४३॥

        पांचजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनंजयः।
        पौंड्रं दध्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदरः ॥ १५॥

परी तो महाघोषु थोरु, गाजत असे गंहिरु।
जैसा उदैला लोपि दिनकरु, नक्षत्रांते ॥ १४४॥

तैसें तुरबंबाळु भंवते, कौरवदळी गाजत होते।
ते हारपोनि नेणों केऊते, गेले तेथ ॥ १४५॥

तैसाचि देखे येरें, निनादें अति गंहिरे।
देवदत्त धनुर्धरे, आस्फुरिला ॥ १४६॥

ते दोनी शब्द अचाट, मिनले एकवट।
तेथ ब्रह्मकटाह शतकूट, हों पाहत असे ॥ १४७॥

तंव भीमसेनु विसणैला, जैसा महाकाळु खवळला।
तेणें पौंड्र आस्फुरिला, महाशंखु ॥ १४८॥

         अनंतविजयं राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः।
         नकुलः सहदेवश्चं सुघोष्मणिपुष्पकौ ॥ १६॥

तो महाप्रलयजलधरु, जैसा घडघडिला गंहिरु।
तंव अनंतविजयो युधिष्ठिरु, आस्फुरित असे ॥ १४९॥

नकुळें सुघोषु, सहदेवे मणिपुष्पकु।
जेणें नादें अतंकु, गजबजला असे ॥ १५०॥

        काश्यश्च परमेश्वासः शिखंडी च महारथः।
        दृष्टद्युम्नो विराटश्च सातकिश्चापराजितः ॥ १७॥

        द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वेशः पृथिवीपते।
        सौभद्रश्च महाबाहुः शंखान् दध्मुः पृथक् पृथक् ॥ १८॥

तेथ भूपती होते अनेक, द्रुपद द्रौपदेयादिक।
हा काशीपती देख, महाबाहु ॥ १५१॥

तेथ अर्जुनाचा सुतु, सात्यकि अपराजितु।
दृष्टद्युम्नु नृपनाथु, शिखंडी हन ॥ १५२॥

विराटादि नृपवर, जे सैनिक मुख्य वीर,
तिहीं नाना शंख निरंतर, आस्फुरिले ॥ १५३॥

तेणें महाघोषनिर्घातें, शेषकूर्म अवचिते।
गजबजोनि भूभारातें, सांडूं पाहती ॥ १५४॥

तेथ तिन्हीं लोक डंडळित, मेरु मांदार आंदोळित।
समुद्रजळ उसळत, कैलासवेरी ॥ १५५॥

         स घोषो धार्त्रराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत्।
         नभश्च पृथिवींश्चैव तुमुलो व्यनुनादयन् ॥ १९॥

पृथ्वीतळ उलथों पाहत, आकाश असे आसुडत।
तेथ सडा होत , नक्षत्रांचा।। १५६॥

सृष्टि गेली रे गेली ॥ देवां मोकळवादी जाहली।
ऐशी एक टाळी पिटिली, सत्यलोकीं, १५७ ॥

दिहाचि दिन थोकला, जैसा प्रलयकाळ मांडला।
तैसा हाहाकारु उठिला, तिन्हीं लोकीं ॥ १५८॥

तंव आदिपुरुषु विस्मितु, म्हणे झणें होय पां अंतु।
मग लोपला अद्भुतु, संभ्रमु तो ॥ १५९॥

म्हणोनि विश्व सांवरले, एर्हतवीं युगांत होतें वोडवले।
जै महाशंख आस्फुरिले, कृष्णादिकीं ॥ १६०॥

तो घोष तरी उपसंहरला, परी पडिसाद होता राहिला ॥
तेणें दळभार विध्वंसिला, कौरवांचा ॥ १६१॥

तो जैसा गजघटाआंतु, सिंह लीला विदारितु।
तैसा हृदयातें भेदितु, कौरवांचिया ॥ १६२॥

तो गाजत जंव आइकती, तंव उभेचि हिये घालिती।
एकमेकांते म्हणती, सावध रे सावध ॥ १६३॥

         अथ व्यवस्थितान् दृष्टवा धार्तराष्ट्रानं कपिध्वजः।
         प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः ॥ २०॥

तेथ बळें प्रौढीपुरते, जे महारथी वीर होते।
तिहीं पुनरपि दळातें, आवरिलें ॥ १६४॥

मग सरिसपणें उठावले, दुणावटोनि उचलले।
तया दंडी क्षोभलें, लोकत्रय ॥ १६५॥

तेथ बाणवरी धनुर्धर, वर्षताती निरंतर।
जैसे प्रलयांत जलधर, अनिवार का ॥ १६६॥

तें देखलिया अर्जुनें, संतोष घेऊनि मने।
मग संभ्रमे दिठी सेने, घालितसे ॥ १६७॥

तंव संग्रामीं सज्ज जाहले, सकळ कौरव देखिले।
मग लीला धनुष्य उचलिले, पंडुकुमरें ॥ १६८॥

          हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते।
          अर्जुन उवाच - सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥ २१।

ते वेळीं अर्जुन म्हणतसे देवा, आतां झडकरी रथु पेलावा।
नेऊनि मध्यें घालावा, दोहीं दळां ॥ १६९॥

         यावदेतान् निरिक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान्।
         कैर्मया सह योद्धव्यस्मिन् रणसमुद्यमे ॥ २२॥

         योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागतः।
         धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकिर्षवः ॥ २३॥

जंव मी नावेक, हे सकळ वीर सैनिक।
न्याहळीन अशेख, झुंजते जे ॥ १७०॥

एथ आले असती आघवे, परी कवणेंसी म्यां झुंजावे।
हे रणीं लागे पहावें, म्हणऊनियां ॥ १७१॥

बहुतकरुनि कौरव, हे आतुर दुःस्वभाव।
वाटिवांवीण हांव, बांधिती झुंजीं ॥ १७२॥

झुंजाची आवडी धरती, परी संग्रामी वीर नव्हती।
हे सांगेन रायाप्रती, काय संजयो म्हणे, १७३॥

                संजय उवाच: एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत।
                सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ॥ २४॥

आइका अर्जुन इतुकें बोलिला, तंव कृष्णें रथु पेलिला।
दोहीं सैन्यामाजि केला, उभा तेणें ॥ १७४॥


        भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम्।
        उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति ॥ २५॥

        तत्रापश्यत् स्थितान् पार्थः पितृनथ पितामहान्।
        आचार्यान् मातुलान् भ्रातृन् पुत्रान् पौत्रान् सखींस्थता ॥ २६॥

        श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि।
        तान् समीक्ष स कौंतेयः सर्वान् बन्धूनवस्थितान् ॥ २७॥

जेथ भीष्माद्रोणादिक, जवळिकेचि सन्मुख।
पृथिविपति आणिक, बहुत आहाति ॥ १७५॥

तेथ स्थिर करूनि रथु, अर्जुन असे पाहतु।
तो दळभार समस्तु, संभ्रमेसी ॥ १७६॥

मग देवा म्हणे देख देख, हे गोत्रगुरु अशेख।
तंव कृष्णा मनीं नावेक, विस्मो जाहला ॥ १७७॥

तो आपणयां आपण म्हणे, एथ कायि कवण जाणे।
हें मनीं धरिले येणें, परि कांही आश्चर्य असे ॥ १७८॥

ऐसी पुढील से घेतु, तो सहजें जाणे हृदयस्थु।
परि उगा असे निवांतु, तिये वेळीं ॥ १७९॥

तंव तेथ पार्थु सकळ, पितृपितामह केवळ।
गुरू बंधु मातुळ, देखता जाहला ॥ १८०॥

इष्टमित्र आपुले, कुमरजन देखिले।
हे सकळ असती आले, तयांमाजि ॥ १८१॥

सुहृज्जन सासरे, आणिकही सखे सोईरे।
कुमर पौत्र धनुर्धरें, देखिले तेथ ॥ १८२॥

जयां उपकार होते केले, कां आपदीं जे राखिले।
हे असो वडील धाकुले -, आदिकरुनि ॥ १८३॥

ऐसे गोत्रचि दोहीं दळीं, उदित जालें असे कळीं।
हें अर्जुने तिये वेळीं, अवलोकिलें ॥ १८४॥

        कृपया परयाऽऽविष्टो विषीदन्नमब्रवीत।

तेथ मनीं गजबज जाहली, आणि आपैसी कृपा आली।
तेणें अपमानें निघाली, वीरवृत्ति ॥ १८५ ॥

जिया उत्तम कुळींचिया होती, आणि गुणलावण्य आथी।
तिया आणिकींते न साहति, सुतेजपणें ॥ १८६॥

नविये आवडीचेनि भरें, कामुक निजवनिता विसरे।
मग पाडेंविण अनुसरें, भ्रमला जैसा ॥ १८७॥

कीं तपोबळें ऋद्धी, पातलिया भ्रंशे बुद्धी।
मग तया विरक्ततासिद्धी, आठवेना॥ १८८॥

तैसें अर्जुना तेथ जाहले, असतें पुरुषत्व गेले।
जें अंतःकरण दिधले, कारुण्यासी ॥ १८९॥

देखा मंत्रज्ञु बरळु जाये, मग तेथ कां जैसा संचारु होये।
तैसा तो धनुर्धर महामोहें, आकळिला ॥ १९०॥

म्हणऊनि असता धीरु गेला, हृदया द्रावो आला।
जैसा चंद्रकळीं सिंपिला, सोमकांतु ॥ १९१॥

तयापरी पार्थु, अतिस्नेहें मोहितु।
मग सखेद असे बोलतु, अच्युतेसी ॥ १९२॥

        दृष्ट्वेनं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थिताम्।।२८॥

        सीदन्ती मम गात्राणि मुखं च परिशुष्यति।
        वेपथुश्च शरीरे मे रोमाहर्षश्च जायते ॥ २९॥

        गांडीवम् स्त्रंसते हस्तात् त्वक् चैव परिदह्यते।
        न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ॥ ३०॥

तो म्हणे अवधारी देवा, म्यां पाहिला हा मेळावा।
तंव गोत्रवर्गु आघवा, देखिला एथ ॥ १९३॥

हे संग्रामीं अति उद्यत, जाहाले असती कीर समस्त।
पण आपणपेयां उचित, केवीं होय ॥ १९४॥

येणें नांवेंचिं नेणों कायी, मज आपणपें सर्वथा नाहीं।
मन बुद्धी ठायीं, स्थिर नोहे ॥ १९५ ॥

देखें देह कांपत, तोंड असे कोरडें होत।
विकळता उपजत, गात्रांसी ॥ १९६ ॥

सर्वांगा कांटाळा आला, अति संतापु उपनला।
तेथ बेंबळे हातु गेला, गांडीवाचा ॥ १९७ ॥

तें न धरताचि निष्टलें, परि नेणेंचि हातोनि पडिले।
ऐसे हृदय असे व्यापिलें, मोहें येणें ॥ १९८ ॥

जें वज्रापासोनि कठिण, दुर्धर अतिदारुण।
तयाहून असाधारण, हें स्नेह नवल ॥ १९९ ॥

जेणे संग्रामी हरू जिंतिला, निवातकवचांचा ठावो फेडिला।
तो अर्जुन मोहें कवळिला, क्षणामाजि ॥ २०० ॥

जैसा भ्रमर भेदी कोडें, भलतैसें काष्ठ कोरडें।
परि कळिकेमाजीं सापडें, कोवळियें ॥ २०१ ॥

तेथ उत्तीर्ण होईल प्राणें, परीं ते कमळदळु चिरूं नेणे।
तैसे कठीण कोवळेंपणे, स्नेह देखा ॥ २०२ ॥

हे आदिपुरुषाची माया, ब्रह्मेयाहि नयेचि आया।
म्हणऊनी भुलविला ऐकें राया, संजयो म्हणे ॥ २०३ ॥

अवधारीं मग तो अर्जुनु।देखोनि सकळ स्वजनु।
विसरला अभिमानु, संग्रामींचा ॥ २०४ ॥

कैसी नेणों सदयता, उपनली येथे चित्ता।
मग म्हणे कृष्णा आता, नसिजे एथ ॥ २०५ ॥

माझें अतिशय मन व्याकुळ, होतसे वाचा बरळ।
जे वधावे हे सकळ, येणें नांवे ॥ २०६ ॥

         निमितानि च पश्यामि विपरीतानि केशव।
         न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥ ३१ ॥

या कौरवां जरी वधावें, तरी युधिष्ठिरादिक कां न वधावे।
हे येर येर आघवे, गोत्रज आमुचे ॥ २०७ ॥

म्हणोनि जळो हें झुंज, प्रत्यया न ये मज।
एणें काय काज, महापापें ॥ २०८ ॥

देवा बहुतं परीं पाहता, एथ वोखटें होईल झुंजतां।
वर काहीं चुकवितां, लाभु आथी ॥ २०९ ॥

         न काङक्षे विजयं कृष्ण न च राज्य सुखानि च।
         किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा ॥ ३२ ॥

         येषामर्थे काङक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च।
         ते इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥ ३३ ॥

तया विजयवृत्ती कांही, मज सर्वथा काज नाहीं।
एथ राज्य तरी कायी, हें पाहुनियां ॥ २१० ॥

यां सकळांते वधावे, मग जे भोग भोगावे।
ते जळोत आघवे, पार्थु म्हणे ॥ २११ ॥

तेणें सुखेविण होईल, तै भलतेही साहिजेल।
वरि जीवितही वेंचिजेल, याचिलागीं ॥ २१२ ॥

परीं यासी घातु कीजे, मग आपण राज्य भोगिजे।
हे स्वप्नींही मन माझे, करूं न शके ॥ २१३ ॥

तरी आम्ही का जन्मावें, कवणालागीं जियावें।
जें वडिलां यां चिंतावें, विरुद्ध मनें ॥ २१४ ॥

पुत्रातें इप्सी कुळ, तयाचें कायि हेंचि फळ।
जे निर्दाळिजे केवळ, गोत्र आपुले ॥ २१५ ॥

हें मनींचि केवि धरिजे, आपण वज्राचेयां बोलिजे।
वरी घडे तरी कीजे, भले एयां ॥ २१६ ॥

आम्हीं जें जें जोडावें, तें समस्तीं इहीं भोगावें।
हे जीवितही उपकारावें, काजीं यांचां ॥ २१७ ॥

आम्ही दिगंतीचे भूपाळ, विभांडूनि सकळ।
मग संतोषविजे कुळ, आपुलें जें ॥ २१८ ॥

तेचि हे समस्त, परी कैसें कर्म विपरीत।
जे जाहले असती उद्यत, झुंजावया ॥ २१९ ॥

अंतौरिया कुमरें, सांडोनियां भांडारें।
शस्त्राग्रीं जिव्हारें, आरोपुनी ॥ २२० ॥

ऐसियांते कैसेनि मारुं, कवणावरी शस्त्र धरूं।
निज हृदया करूं, घातु केवीं ॥ २२१ ॥

          आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहः।
          मातुलः श्वशुराः पौत्राः श्यालाः संबंधिनस्तथा ॥ ३४॥

हे नेणसी तूं कवण, परी पैल भीष्म द्रोण।
जयांचे उपकार असाधारण, आम्हां बहुत ॥ २२२ ॥

एथ शालक सासरे मातुळ, आणी बंधु कीं हें सकळ।
पुत्र नातू केवळ, इष्टही असती ॥ २२३ ॥

अवधारीं अति जवळिकेचे, हे सकळही सोयरे आमुचे।
म्हणोनि दोष आथि वाचे, बोलतांचि ॥ २२४ ॥

         एतान्न हन्तुमिछामि घ्नतोऽपि मघुसूदन।
         अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं न महीकृते ॥ ३५ ॥

हे वरी भलतें करितु, आंताचि एथें मारितु।
परि आपण मनें घातु, न चिंतावा ॥ २२५ ॥

त्रैलोक्यींचे अनकळित, जरी राज्य होईल एथ।
तरी हें अनुचित, नाचरें मी ॥ २२६ ॥

जरी आज एथ ऐसें कीजे, तरी कवणांचा मनीं उरिजे।
सांग मुख केवीं पाहिजे, तुझे कृष्णा ॥ २२७ ॥

          निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन।
          पापनेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः ॥ ३६ ॥

जरी वधु करूनी गोत्रजांचा, तरी वसौटा होऊन दोषांचा।
मज जोडलासि तूं हातींचा, दूरी होसी ॥ २२८ ॥

कुळहरणीं पातकें, तिये आंगीं जडती अशेखें।
तयें वेळी तूं कवण कें, देखावासी ॥ २२९ ॥

जैसा उद्यानामाजीं अनळु, संचरला देखोनि प्रबळु।
मग क्षणभरी कोकिळु, स्थिर नोहे ॥ २३० ॥

सकर्दम सरोवरु, अवलोकूनि चकोरु।
न सेवितु अव्हेरु, करूनि निघे ॥ २३१ ॥

तयापरी तूं देवा, मज झकों न येसी मावा।
जरी पुण्याचा वोलावा, नाशिजेल ॥ २३२ ॥

          तस्मान्नार्हा वयं हन्तुम् धार्तराष्ट्रान्स्वबांधवान्।
          स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥ ३७ ॥

म्हणोनि मी हें न करीं, इये संग्रामीं शस्त्र न धरीं।
हें किडाळ बहुतीं, परीं दिसतसे ॥ २३३ ॥

तुझा अंतराय होईल, मग सांगें आमचें काय उरेल।
तेणें दुःखे हियें फुटेल, तुजवीण कृष्णा ॥ २३४ ॥

म्हणावूनि कौरव हे वधिजती, मग आम्हीं भोग भोगिजती।
हे असो मात अघडती, अर्जुन म्हणे ॥ २३५ ॥

          यद्यप्यते न पश्यंति लोभोपहृतचेतसः।
          कुलक्षयकृतंदोषं मित्रद्रोहे च पातकम् ॥ ३८ ॥

          कथं ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम्।
          कुलक्षयकृतम् दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥ ३९ ॥

हे अभिमानपदे भुलले, जरी पां संग्रामा आले।
तर्हीि आम्हीं हित आपुलें, जाणावें लागे ॥ २३६ ॥

हें ऐसें कैसें करावें, जे आपुले आपण मारावे।
जाणत जाणतांचि सेवावें, कालकूट ॥ २३७ ॥

हां जी मार्गीं चालतां, पुढां सिंह जाहला अवचितां।
तो तंव चुकवितां, लाभु आथी ॥ २३८ ॥

असता प्रकाशु सांडावा, मग अंधकूप आश्रावा।
तरी तेथ कवणु देवा, लाभु सांगे ॥ २३९ ॥

का समोर अग्नि देखोनी, जरी न वचिजे वोसंडोनी।
तरी क्षणा एका कवळूनि, जांळू सके ॥ २४०॥

तैसे दोष हे मूर्त, अंगी वाजों असती पहात।
हें जाणतांही केवीं एथ, प्रवर्तावें ॥ २४१ ॥

ऐसें पार्थ तिये अवसरीं, म्हणे देवा अवधारीं।
या कल्मषाची थोरी, सांगेन तुज ॥ २४२ ॥

           कुलक्षये प्रणश्यंति कुलधर्माः सनातनः।
           धर्मे नष्टे कुलं कृत्सनमधर्मोऽभिभवत्युत ॥ ४० ॥

जैसें काष्ठें काष्ठ मथिजे, येथ वन्हि एक उपजे।
तेणें काष्ठजात जाळिजे, प्रज्वळलेनि ॥ २४३ ॥

तैसा गोत्रींची परस्परें, जरी वधु घडे मत्सरें।
तरी तेणें महादोषें घोरें, कुळचि नाशे ॥ २४४॥

म्हणवूनि येणें पापें, वंशजधर्मु लोपे।
मग अधर्मुचि आरोपे, कुळामाजि ॥ २४५ ॥

             अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यंति कुलस्त्रियः।
             स्त्रीसु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः ॥ ४१ ॥

एथ सारासार विचारावें, कवणे काय आचरावें।
आणि विधिनिषेध अघवे, पारुषति ॥ २४६ ॥

असता दीपु दवडीजे, मग अंधकारीं राहाटिजे।
जे उजूंचि का आडळिजे, जयापरी ॥ २४७ ॥

तैसा कुळीं कुळक्षयो होय, तये वेळी तो आद्य धर्मु जाय।
मग आन कांहीं आहे, पापांवाचुनि ॥ २४८ ॥

जैं यमनियम ठाकती, तेथ इंद्रियें सैरा विचरती।
म्हणवूनि व्यभिचार घडती, कुळस्त्रियांसी ॥ २४९ ॥

उत्तम अधमीं संचरती, ऐसे वर्णावर्ण मिसळती।
तेथ समूळ उपडती, जातिधर्म ॥ २५० ॥

जैसी चोहटाचिया बळी, पाविजे सैरा काऊळीं।
तैसीं महापापें कुळीं प्रवेशती ॥ २५१ ॥

           संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च।
           पतंति पितरि ह्येषां लुप्तपिंडिदकक्रियाः ॥ ४१॥

मग कुळा देखा अशेखा, आंणि कुळघातका।
येरयेरा नरक, जाणें आथी ॥ २५२ ॥

देखें वंशवृद्धि समस्त, यापरी होय पतित।
मग मग वोवांडिती स्वर्गस्थ, पूर्वपुरुष ॥ २५३ ॥

जेथ नित्यादि क्रिया ठाके, आणि नैमित्तिक पारुखे ।
तेथ कवणा तिळोदकें, कवण अर्पी ॥ २५४ ॥

तरी पितर काय करिती, कैसेनि स्वर्गीं बसती।
म्हणोनि तेही येती, कुळापासी ॥ २५५ ॥

जैसा नखाग्रीं व्याळु लागे, तो शिखांत व्यापी वेगें।
तेवी आब्रह्म कुळ अवघें, आप्लविजे ॥ २५६ ॥

          दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः।
          उत्साद्यंते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वतः ॥ ४३ ॥

          उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन।
          नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥ ४४ ॥

          अहो वत महत् पापं कर्तुं व्यवसिता वयमं।
          यद् राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥ ४५ ॥

देवा अवधारी आणिक एक, एथ घडे महापातक।
जै संगदोषें हा लौकिक, भ्रंशु पावे ॥ २५७ ॥

जैसा घरीं आपुला, वानिवसे वन्ही लागला।
तो आणिकांही प्रज्वळिला, जाळुनि घाली ॥ २५८ ॥

तैसिया तया कुळसंगती, जे जे लोक वर्तती।
तेही बाधु पावती, निमित्तें येणें ॥ २५९ ॥

तैसें नाना दोषें सकळ, अर्जुन म्हणे तें कुळ।
मग महाघोर केवळ, निरय भोगी ॥ २६० ॥

पडिलिया तिये ठायीं, मग कल्पांतीही उगंडु नाही।
येसणें पतन कुळक्षयीं, अर्जुन म्हणे ॥ २६१ ॥

देवा हें विविध कानीं ऐकिजे, परि अझुनिवरी त्रासु नुपजे।
हृदय वज्राचें हें काय कीजे, अवधारी पां ॥ २६२ ॥

अपेक्षिजे राज्यसुख, जयालागीं तें तंव क्षणिक।
ऐसे जाणतांही दोख, अव्हेरू ना ॥ २६३ ॥

हे वडिल सकळ आपुले, वधावया दिठी सूदले।
सांग पां काय थेकुलें, घडले आम्हा ॥ २६४ ॥


     यदि मामप्रतीकारमशस्त्रतं शस्त्रपाणयः।
     धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तनं मे क्षेमतरं भवेत् ॥ ४६ ॥

आतां यावरी जें जियावें, तयापासूनि हें बरवे।
जे शस्त्र सांडूनि साहावे, बाण त्यांचे ॥ २६५ ॥

तयावरी होय जितुकें, तें मरणही वरी निकें।
परी येणें कल्मषें, चाड नाहीं ॥ २६६ ॥

ऐसें देखोनि सकळ, अर्जुनें आपुलें कुळ ।
मग म्हणे राज्य तें केवळ, निरयभोगु ॥ २६७ ॥

     संजय उवाचः
     एवमुक्तवार्जुन: संख्ये रथोपस्य उपाविशत्।
     विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥ ४७ ॥

ऐसें तिये अवसरीं, अर्जुन बोलिला समरीं।
संजयो म्हणे अवधारी, धृतराष्ट्रातें ॥ २६८ ॥

मग अत्यंत उद्वेगला, न धरत गहिंवरू आला।
तेथ उडी घातली खालां, रथौनियां ॥ २६९ ॥

जैसा राजकुमरु पदच्युतु, सर्वथा होय उपहृतु।
कां रवि राहुग्रस्तु, प्रभाहीनु ॥ २७० ॥

ना तरी महासिद्धीसंभ्रमें, जिंतला त्रासु भ्रमे।
मग आकळुनि कामें, दीनु कीजे ॥ २७१ ॥

तैसा तो धनुर्धरु, अत्यंत दुःखें जर्जरु।
दिसे जेथ रहंवरु, त्यजिला तेणें ॥ २७२ ॥

मग धनुष्यबाण सांडिले, न धरत अश्रुपात आले।
ऐसें ऐके राया तेथ वर्तलें, संजयो म्हणे ॥ २७३ ॥

आता यावरी तो वैकुंठ्नाथु, देखोनि सखेद पार्थु।
कवणेपरी परमार्थु, निरुपील ॥ २७४ ॥

ते सविस्तर पुढारी कथा, अति सकौतुक ऐकतां।
ज्ञानदेव म्हणे आतां निवृत्तिदासु ॥ २७५ ॥

॥ प्रथम अध्याय समाप्त ॥