भारत की संस्कृति के लिए... भाषा की उन्नति के लिए... साहित्य के प्रसार के लिए

ज्ञानेश्वरी / अध्याय तेरावा / संत ज्ञानेश्वर

Kavita Kosh से
यहाँ जाएँ: भ्रमण, खोज

॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ त्रयोदशोऽध्यायः - अध्याय तेरावा,।
। क्षेत्रक्षेत्रज्ञयोगः।

आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, सकळ विद्यांचें अधिकरण,
तेचि वंदूं श्रीचरण, श्रीगुरूंचे ॥ १ ॥
जयांचेनि आठवें, शब्दसृष्टि आंगवे,
सारस्वत आघवें, जिव्हेसि ये ॥ २ ॥
वक्तृत्वा गोडपणें, अमृतातें पारुखें म्हणे,
रस होती वोळंगणें, अक्शरांसी ॥ ३ ॥
भावाचें अवतरण, अवतरविती खूण,
हाता चढे संपूर्ण, तत्त्वभेद ॥ ४ ॥
श्रीगुरूंचे पाय, जैं हृदय गिंवसूनि ठाय,
तैं येवढें भाग्य होय, उन्मेखासी ॥ ५ ॥
ते नमस्कारूनि आतां, जो पितामहाचा पिता,
लक्ष्मीयेचा भर्ता, ऐसें म्हणे ॥ ६ ॥


श्रीभगवानुवाच।
इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते।
एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥ १॥


तरी पार्था परिसिजे, देह हें क्षेत्र म्हणिजे,
जो हें जाणे तो बोलिजे, क्षेत्रज्ञु एथें ॥ ७ ॥


क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत।
क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ञानं मतं मम ॥ २॥


तरि क्षेत्रज्ञु जो एथें, तो मीचि जाण निरुतें,
जो सर्व क्षेत्रांतें, संगोपोनि असे ॥ ८ ॥
क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें, जाणणें जें निरुतें,
ज्ञान ऐसें तयातें, मानूं आम्ही ॥ ९ ॥


तत् क्षेत्रं यच्च यादृक्च यद्विकारि यतश्च यत्।
स च यो यत्प्रभावश्च तत् समासेन मे श्रुणु ॥ ३॥


तरि क्षेत्रज्ञु जो एथें, तो मीचि जाण निरुतें,
जो सर्व क्षेत्रांतें, संगोपोनि असे ॥ ८ ॥
क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें, जाणणें जें निरुतें,
ज्ञान ऐसें तयातें, मानूं आम्ही ॥ ९ ॥


ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक्।
ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः ॥ ४॥


एक म्हणती हें स्थळ, जीवाचेंचि समूळ,
मग प्राण हें कूळ, तयाचें एथ ॥ २७ ॥
जे प्राणाचे घरीं, अंगें राबती भाऊ चारी,
आणि मना ऐसा आवरी, कुळवाडीकरु ॥ २८ ॥
तयातें इंद्रियबैलांची पेटी, न म्हणे अंवसीं पाहाटीं,
विषयक्षेत्रीं आटी, काढी भली ॥ २९ ॥
मग विधीची वाफ चुकवी, आणि अन्यायाचें बीज वाफवी,
कुकर्माचा करवी, राबु जरी ॥ ३० ॥
तरी तयाचिसारिखें, असंभड पाप पिके,
मग जन्मकोटी दुःखें, भोगी जीवु ॥ ३१ ॥
नातरी विधीचिये वाफे, सत्क्रिया बीज आरोपे,
तरी जन्मशताचीं मापें, सुखचि मवीजे ॥ ३२ ॥
तंव आणिक म्हणती हें नव्हे, हें जिवाचेंचि न म्हणावें,
आमुतें पुसा आघवें, क्शेत्राचें या ॥ ३३ ॥
अहो जीवु एथ उखिता, वस्तीकरु वाटे जातां,
आणि प्राणु हा बलौता, म्हणौनि जागे ॥ ३४ ॥
अनादि जे प्रकृती, सांख्य जियेतें गाती,
क्षेत्र हे वृत्ती, तियेची जाणा ॥ ३५ ॥
आणि इयेतेंचि आघवा, आथी घरमेळावा,
म्हणौनि ते वाहिवा, घरीं वाहे ॥ ३६ ॥
वाह्याचिये रहाटी, जे कां मुद्दल तिघे इये सृष्टीं,
ते इयेच्याचि पोटीं, जहाले गुण ॥ ३७ ॥
रजोगुण पेरी, तेतुलें सत्त्व सोंकरी,
मग एकलें तम करी, संवगणी ॥ ३८ ॥
रचूनि महत्तत्त्वाचें खळें, मळी एके काळुगेनि पोळें,
तेथ अव्यक्ताची मिळे, सांज भली ॥ ३९ ॥
तंव एकीं मतिवंतीं, या बोलाचिया खंतीं,
म्हणितलें या ज्ञप्ती, अर्वाचीना ॥ ४० ॥
हां हो परतत्त्वाआंतु, कें प्रकृतीची मातु,
हा क्षेत्र वृत्तांतु, उगेंचि आइका ॥ ४१ ॥
शून्यसेजेशालिये, सुलीनतेचिये तुळिये,
निद्रा केली होती बळियें, संकल्पें येणें ॥ ४२ ॥
तो अवसांत चेइला, उद्यमीं सदैव भला,
म्हणौनि ठेवा जोडला, इच्छावशें ॥ ४३ ॥
निरालंबींची वाडी, होती त्रिभुवनायेवढी,
हे तयाचिये जोडी, रूपा आली ॥ ४४ ॥
मग महाभूतांचें एकवाट, सैरा वेंटाळूनि भाट,
भूतग्रामांचे आघाट, चिरिले चारी ॥ ४५ ॥
यावरी आदी, पांचभूतिकांची मांदी,
बांधली प्रभेदीं, पंचभूतिकीं ॥ ४६ ॥
कर्माकर्माचे गुंडे, बांध घातले दोहींकडे,
नपुंसकें बरडें, रानें केलीं ॥ ४७ ॥
तेथ येरझारेलागीं, जन्ममृत्यूची सुरंगी,
सुहाविली निलागी, संकल्पें येणें ॥ ४८ ॥
मग अहंकारासि एकलाधी, करूनि जीवितावधी,
वहाविलें बुद्धि, चराचर ॥ ४९ ॥
यापरी निराळीं, वाढे संकल्पाची डाहाळी,
म्हणौनि तो मुळीं, प्रपंचा यया ॥ ५० ॥
यापरी मत्तमुगुतकीं, तेथ पडिघायिलें आणिकीं,
म्हणती हां हो विवेकीं, कैसें तुम्ही ॥ ५१ ॥
परतत्त्वाचिया गांवीं, संकल्पसेज देखावी,
तरी कां पां न मनावी, प्रकृति तयाची ? ॥ ५२ ॥
परि असो हें नव्हे, तुम्ही या न लगावें,
आतांचि हें आघवें, सांगिजैल ॥ ५३ ॥
तरी आकाशीं कवणें, केलीं मेघाचीं भरणें,
अंतरिक्ष तारांगणें, धरी कवण ? ॥ ५४ ॥
गगनाचा तडावा, कोणें वेढिला केधवां,
पवनु हिंडतु असावा, हें कवणाचें मत ? ॥ ५५ ॥
रोमां कवण पेरी, सिंधू कवण भरी,
पर्जन्याचिया करी, धारा कवण ? ॥ ५६ ॥
तैसें क्षेत्र हें स्वभावें, हे वृत्ती कवणाची नव्हे,
हें वाहे तया फावे, येरां तुटे ॥ ५७ ॥
तंव आणिकें एकें, क्षोभें म्हणितलें निकें,
तरी भोगिजे एकें, काळें केवीं हें ? ॥ ५८ ॥
तरी ययाचा मारु, देखताति अनिवारु,
परी स्वमतीं भरु, अभिमानियां ॥ ५९ ॥
हें जाणों मृत्यु रागिटा, सिंहाडयाचा दरकुटा,
परी काय वांजटा, पूरिजत असे ? ॥ ६० ॥
महाकल्पापरौतीं, कव घालूनि अवचितीं,
सत्यलोकभद्रजाती, आंगीं वाजे ॥ ६१ ॥
लोकपाळ नित्य नवे, दिग्गजांचे मेळावे,
स्वर्गींचिये आडवे, रिगोनि मोडी ॥ ६२ ॥
येर ययाचेनि अंगवातें, जन्ममृत्यूचिये गर्तें,
निर्जिवें होऊनि भ्रमतें, जीवमृगें ॥ ६३ ॥
न्याहाळीं पां केव्हडा, पसरलासे चवडा,
जो करूनियां माजिवडा, आकारगजु ॥ ६४ ॥
म्हणौनि काळाची सत्ता, हाचि बोलु निरुता,
ऐसे वाद पंडुसुता, क्षेत्रालागीं ॥ ६५ ॥
हे बहु उखिविखी, ऋषीं केली नैमिषीं,
पुराणें इयेविषीं, मतपत्रिका ॥ ६६ ॥
अनुष्टुभादि छंदें, प्रबंधीं जें विविधें,
ते पत्रावलंबन मदें, करिती अझुनी ॥ ६७ ॥
वेदींचें बृहत्सामसूत्र, जें देखणेपणें पवित्र,
परी तयाही हें क्षेत्र, नेणवेचि ॥ ६८ ॥
आणीक आणीकींही बहुतीं, महाकवीं हेतुमंतीं,
ययालागीं मती, वेंचिलिया ॥ ६९ ॥
परी ऐसें हें एवढें, कीं अमुकेयाचेंचि फुडें,
हें कोणाही वरपडें, होयचिना ॥ ७० ॥
आतां यावरी जैसें, क्षेत्र हें असे,
तुज सांगों तैसें, साद्यंतु गा ॥ ७१ ॥


महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च।
इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचराः ॥ ५॥
इच्छा द्वेषः सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः।
एतत्क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम् ॥ ६॥


तरि महाभूतपंचकु, आणि अहंकारु एकु,
बुद्धि अव्यक्त दशकु, इंद्रियांचा ॥ ७२ ॥
मन आणीकही एकु, विषयांचा दशकु,
सुख दुःख द्वेषु, संघात इच्छा ॥ ७३ ॥
आणि चेतना धृती, एवं क्षेत्रव्यक्ती,
सांगितली तुजप्रती, आघवीची ॥ ७४ ॥
आतां महाभूतें कवणें, कवण विषयो कैसीं करणे,
हें वेगळालेपणें, एकैक सांगों ॥ ७५ ॥
तरी पृथ्वी आप तेज, वायु व्योम इयें तुज,
सांगितलीं बुझ, महाभूतें पांचें ॥ ७६ ॥
आणि जागतिये दशे, स्वप्न लपालें असे,
नातरी अंवसे, चंद्र गूढु ॥ ७७ ॥
नाना अप्रौढबाळकीं, तारुण्य राहे थोकीं,
कां न फुलतां कळिकीं, आमोदु जैसा ॥ ७८ ॥
किंबहुना काष्ठीं, वन्हि जेवीं किरीटी,
तेवीं प्रकृतिचिया पोटीं, गोप्यु जो असे ॥ ७९ ॥
जैसा ज्वरु धातुगतु, अपथ्याचें मिष पहातु,
मग जालिया आंतु, बाहेरी व्यापी ॥ ८० ॥
तैसी पांचांही गांठीं पडे, जैं देहाकारु उघडे,
तैं नाचवी चहूंकडे, तो अहंकारु गा ॥ ८१ ॥
नवल अहंकाराची गोठी, विशेषें न लगे अज्ञानापाठीं,
सज्ञानाचे झोंबे कंठीं, नाना संकटीं नाचवी ॥ ८२ ॥
आतां बुद्धि जे म्हणिजे, ते ऐशियां चिन्हीं जाणिजे,
बोलिलें यदुराजें, तें आइकें सांगों ॥ ८३ ॥
तरी कंदर्पाचेनि बळें, इंद्रियवृत्तीचेनि मेळें,
विभांडूनि येती पाळे, विषयांचे ॥ ८४ ॥
तो सुखदुःखांचा नागोवा, जेथ उगाणों लागे जीवा,
तेथ दोहींसी बरवा, पाडु जे धरी ॥ ८५ ॥
हें सुख हें दुःख, हें पुण्य हें दोष,
कां हें मैळ हें चोख, ऐसें जे निवडी ॥ ८६ ॥
जिथे अधमोत्तम सुझे, जिये सानें थोर बुझे,
जिया दिठी पारखिजे, विषो जीवें ॥ ८७ ॥
जे तेजतत्त्वांची आदी, जे सत्त्वगुणाची वृद्धी,
जे आत्मया जीवाची संधी, वसवीत असे जे ॥ ८८ ॥
अर्जुना ते गा जाण, बुद्धि तूं संपूर्ण,
आतां आइकें वोळखण, अव्यक्ताची ॥ ८९ ॥
पैं सांख्यांचिया सिद्धांतीं, प्रकृती जे महामती,
तेचि एथें प्रस्तुतीं, अव्यक्त गा ॥ ९० ॥
आणि सांख्ययोगमतें, प्रकृती परिसविली तूंतें,
ऐसी दोहीं परीं जेथें, विवंचिली ॥ ९१ ॥
तेथ दुजी जे जीवदशा, तिये नांव वीरेशा,
येथ अव्यक्त ऐसा, पर्यावो हा ॥ ९२ ॥
तऱ्ही पाहालया रजनी, तारा लोपती गगनीं,
कां हारपें अस्तमानीं, भूतक्रिया ॥ ९३ ॥
नातरी देहो गेलिया पाठीं, देहादिक किरीटी,
उपाधि लपे पोटीं, कृतकर्माच्या ॥ ९४ ॥
कां बीजमुद्रेआंतु, थोके तरु समस्तु,
कां वस्त्रपणे तंतु-, दशे राहे ॥ ९५ ॥
तैसे सांडोनियां स्थूळधर्म, महाभूतें भूतग्राम,
लया जाती सूक्ष्म, होऊनि जेथे ॥ ९६ ॥
अर्जुना तया नांवें, अव्यक्त हें जाणावें,
आतां आइकें आघवें, इंद्रियभेद ॥ ९७ ॥
तरी श्रवण नयन, त्वचा घ्राण रसन,
इयें जाणें ज्ञान-, करणें पांचें ॥ ९८ ॥
इये तत्त्वमेळापंकीं, सुखदुःखांची उखिविखी,
बुद्धि करिते मुखीं, पांचें इहीं ॥ ९९ ॥
मग वाचा आणि कर, चरण आणि अधोद्वार,
पायु हे प्रकार, पांच आणिक ॥ १०० ॥
कर्मेंद्रियें म्हणिपती, तीं इयें जाणिजती,
आइकें कैवल्यपती, सांगतसे ॥ १०१ ॥
पैं प्राणाची अंतौरी, क्रियाशक्ति जे शरीरीं,
तियेचि रिगिनिगी द्वारीं, पांचे इहीं ॥ १०२ ॥
एवं दाहाही करणें, सांगितलीं देवो म्हणे,
परिस आतां फुडेपणें, मन तें ऐसें ॥ १०३ ॥
जें इंद्रियां आणि बुद्धि, माझारिलिये संधीं,
रजोगुणाच्या खांदीं, तरळत असे ॥ १०४ ॥
नीळिमा अंबरीं, कां मृगतृष्णालहरी,
तैसें वायांचि फरारी, वावो जाहलें ॥ १०५ ॥
आणि शुक्रशोणिताचा सांधा, मिळतां पांचांचा बांधा,
वायुतत्त्व दशधा, एकचि जाहलें ॥ १०६ ॥
मग तिहीं दाहे भागीं, देहधर्माच्या खैवंगीं,
अधिष्ठिलें आंगीं, आपुलाल्या ॥ १०७ ॥
तेथ चांचल्य निखळ, एकलें ठेलें निढाळ,
म्हणौनि रजाचें बळ, धरिलें तेणें ॥ १०८ ॥
तें बुद्धीसि बाहेरी, अहंकाराच्या उरावरी,
ऐसां ठायीं माझारीं, बळियावलें ॥ १०९ ॥
वायां मन हें नांव, एऱ्हवीं कल्पनाचि सावेव,
जयाचेनि संगें जीव-, दशा वस्तु ॥ ११० ॥
जें प्रवृत्तीसि मूळ, कामा जयाचे बळ,
जें अखंड सूये छळ, अहंकारासी ॥ १११ ॥
जें इच्छेतें वाढवी, आशेतें चढवी,
जें पाठी पुरवी, भयासि गा ॥ ११२ ॥
द्वैत जेथें उठी, अविद्या जेणें लाठी,
जें इंद्रियांतें लोटी, विषयांमजी ॥ ११३ ॥
संकल्पें सृष्टी घडी, सवेंचि विकल्पूनि मोडी,
मनोरथांच्या उतरंडी, उतरी रची ॥ ११४ ॥
जें भुलीचें कुहर, वायुतत्त्वाचें अंतर,
बुद्धीचें द्वार, झाकविलें जेणें ॥ ११५ ॥
तें गा किरीटी मन, या बोला नाहीं आन,
आतां विषयाभिधान, भेदू आइकें ॥ ११६ ॥
तरी स्पर्शु आणि शब्दु, रूप रसु गंधु,
हा विषयो पंचविधु, ज्ञानेंद्रियांचा ॥ ११७ ॥
इहीं पांचैं द्वारीं, ज्ञानासि धांव बाहेरी,
जैसा कां हिरवे चारीं, भांबावे पशु ॥ ११८ ॥
मग स्वर वर्ण विसर्गु, अथवा स्वीकार त्यागु,
संक्रमण उत्सर्गु, विण्मूत्राचा ॥ ११९ ॥
हे कर्मेंद्रियांचे पांच, विषय गा साच,
जे बांधोनियां माच, क्रिया धांवे ॥ १२० ॥
ऐसे हे दाही, विषय गा इये देहीं,
आतां इच्छा तेही, सांगिजैल ॥ १२१ ॥
तरि भूतलें आठवे, कां बोलें कान झांकवे,
ऐसियावरि चेतवे, जे गा वृत्ती ॥ १२२ ॥
इंद्रियाविषयांचिये भेटी-, सरसीच जे गा उठी,
कामाची बाहुटी, धरूनियां ॥ १२३ ॥
जियेचेनि उठिलेपणें, मना सैंघ धावणें,
न रिगावें तेथ करणें, तोंडें सुती ॥ १२४ ॥
जिये वृत्तीचिया आवडी, बुद्धी होय वेडी,
विषयां जिया गोडी, ते गा इच्छा ॥ १२५ ॥
आणी इच्छिलिया सांगडें, इंद्रियां आमिष न जोडे,
तेथ जोडे ऐसा जो डावो पडे, तोचि द्वेषु ॥ १२६ ॥
आतां यावरी सुख, तें एवंविध देख,
जेणें एकेंचि अशेख, विसरे जीवु ॥ १२७ ॥
मना वाचे काये, जें आपुली आण वाये,
देहस्मृतीची त्राये, मोडित जें ये ॥ १२८ ॥
जयाचेनि जालेपणें, पांगुळा होईजे प्राणें,
सात्त्विकासी दुणें, वरीही लाभु ॥ १२९ ॥
कां आघवियाचि इंद्रियवृत्ती, हृदयाचिया एकांतीं,
थापटूनि सुषुप्ती, आणी जें गा ॥ १३० ॥
किंबहुना सोये, जीव आत्मयाची लाहे,
तेथ जें होये, तया नाम सुख ॥ १३१ ॥
आणि ऐसी हे अवस्था, न जोडतां पार्था,
जें जीजे तेंचि सर्वथा, दुःख जाणे ॥ १३२ ॥
तें मनोरथसंगें नव्हे, एऱ्हवीं सिद्धी गेलेंचि आहे,
हे दोनीचि उपाये, सुखदुःखासी ॥ १३३ ॥
आतां असंगा साक्षिभूता, देहीं चैतन्याची जे सत्ता,
तिये नाम पंडुसुता, चेतना येथें ॥ १३४ ॥
जे नखौनि केशवरी, उभी जागे शरीरीं,
जे तिहीं अवस्थांतरी, पालटेना ॥ १३५ ॥
मनबुद्ध्यादि आघवीं, जियेचेनि टवटवीं,
प्रकृतिवनमाधवीं, सदांचि जे ॥ १३६ ॥
जडाजडीं अंशीं, राहाटे जे सरिसी,
ते चेतना गा तुजसी, लटिकें नाहीं ॥ १३७ ॥
पैं रावो परिवारु नेणे, आज्ञाचि परचक्र जिणे,
कां चंद्राचेनि पूर्णपणें, सिंधू भरती ॥ १३८ ॥
नाना भ्रामकाचें सन्निधान, लोहो करी सचेतन,
कां सूर्यसंगु जन, चेष्टवी गा ॥ १३९ ॥
अगा मुख मेळेंविइण, पिलियाचें पोषण,
करी निरीक्षण, कूर्मी जेवीं ॥ १४० ॥
पार्था तियापरी, आत्मसंगती इये शरीरीं,
सजीवत्वाचा करी, उपेगु जडा ॥ ४१ ॥
मग तियेतें चेतना, म्हणिपे पैं अर्जुना,
आतां धृतिविवंचना, भेदु आइक ॥ १४२ ॥
तरी भूतां परस्परें, उघड जाति स्वभाववैरें,
नव्हे पृथ्वीतें नीरें, न नाशिजे ? ॥ १४३ ॥
नीरातें आटी तेज, तेजा वायूसि झुंज,
आणि गगन तंव सहज, वायू भक्षी ॥ १४४ ॥
तेवींचि कोणेही वेळे, आपण कायिसयाही न मिळे,
आंतु रिगोनि वेगळें, आकाश हें ॥ १४५ ॥
ऐसीं पांचही भूतें, न साहती एकमेकांतें,
कीं तियेंही ऐक्यातें, देहासी येती ॥ १४६ ॥
द्वंद्वाची उखिविखी, सोडूनि वसती एकीं,
एकेकातें पोखी, निजगुणें गा ॥ १४७ ॥
ऐसें न मिळे तयां साजणें, चळे धैर्यें जेणें,
तयां नांव म्हणें, धृती मी गा ॥ १४८ ॥
आणि जीवेंसी पांडवा, या छत्तिसांचा मेळावा,
तो हा एथ जाणावा, संघातु पैं गा ॥ १४९ ॥
एवं छत्तीसही भेद, सांगितले तुज विशद,
यया येतुलियातें प्रसिद्ध, क्षेत्र म्हणिजे ॥ १५० ॥
रथांगांचा मेळावा, जेवीं रथु म्हणिजे पांडवा,
कां अधोर्ध्व अवेवां, नांव देहो ॥ १५१ ॥
करीतुरंगसमाजें, सेना नाम निफजे,
कां वाक्यें म्हणिपती पुंजे, अक्षरांचे ॥ १५२ ॥
कां जळधरांचा मेळा, वाच्य होय आभाळा,
नाना लोकां सकळां, नाम जग ॥ १५३ ॥
कां स्नेहसूत्रवन्ही, मेळु एकिचि स्थानीं,
धरिजे तो जनीं, दीपु होय ॥ १५४ ॥
तैसीं छत्तीसही इयें तत्त्वें, मिळती जेणें एकत्वें,
तेणें समूह परत्वें, क्षेत्र म्हणिपे ॥ १५५ ॥
आणि वाहतेनि भौतिकें, पाप पुण्य येथें पिके,
म्हणौनि आम्ही कौतुकें, क्षेत्र म्हणों ॥ १५६ ॥
आणि एकाचेनि मतें, देह म्हणती ययातें,
परी असो हें अनंतें, नामें यया ॥ १५७ ॥
पैं परतत्त्वाआरौतें, स्थावराआंतौतें,
जें कांहीं होतें जातें, क्षेत्रचि हें ॥ १५८ ॥
परि सुर नर उरगीं, घडत आहे योनिविभागीं,
तें गुणकर्मसंगीं, पडिलें सातें ॥ १५९ ॥
हेचि गुणविवंचना, पुढां म्हणिपैल अर्जुना,
प्रस्तुत आतां तुज ज्ञाना, रूप दावूं ॥ १६० ॥
क्षेत्र तंव सविस्तर, सांगितलें सविकार,
म्हणौनि आतां उदार, ज्ञान आइकें ॥ १६१ ॥
जया ज्ञानालागीं, गगन गिळिताती योगी,
स्वर्गाची आडवंगी, उमरडोनि ॥ १६२ ॥
न करिती सिद्धीची चाड, न धरिती ऋद्धीची भीड,
योगा{ऐ}सें दुवाड, हेळसिती ॥ १६३ ॥
तपोदुर्गें वोलांडित, क्रतुकोटि वोवांडित,
उलथूनि सांडित, कर्मवल्ली ॥ १६४ ॥
नाना भजनमार्गी, धांवत उघडिया आंगीं,
एक रिगताति सुरंगीं, सुषुम्नेचिये ॥ १६५ ॥
ऐसी जिये ज्ञानीं, मुनीश्वरांची उतान्ही,
वेदतरूच्या पानोवानीं, हिंडताती ॥ १६६ ॥
देईल गुरुसेवा, इया बुद्धि पांडवा,
जन्मशतांचा सांडोवा, टाकित जे ॥ १६७ ॥
जया ज्ञानाची रिगवणी, अविद्ये उणें आणी,
जीवा आत्मया बुझावणी, मांडूनि दे ॥ १६८ ॥
जें इंद्रियांचीं द्वारें आडी, प्रवृत्तीचे पाय मोडी,
जें दैन्यचि फेडी, मानसाचें ॥ १६९ ॥
द्वैताचा दुकाळु पाहे, साम्याचें सुयाणें होये,
जया ज्ञानाची सोये, ऐसें करी ॥ १७० ॥
मदाचा ठावोचि पुसी, जें महामोहातें ग्रासी,
नेदी आपपरु ऐसी, भाष उरों ॥ १७१ ॥
जें संसारातें उन्मूळी, संकल्पपंकु पाखाळी,
अनावरातें वेंटाळी, ज्ञेयातें जें ॥ १७२ ॥
जयाचेनि जालेपणें, पांगुळा होईजे प्राणें,
जयाचेनि विंदाणें, जग हें चेष्टें ॥ १७३ ॥
जयाचेनि उजाळें, उघडती बुद्धीचे डोळे,
जीवु दोंदावरी लोळे, आनंदाचिया ॥ १७४ ॥
ऐसें जें ज्ञान, पवित्रैकनिधान,
जेथ विटाळलें मन, चोख कीजे ॥ १७५ ॥
आत्मया जीवबुद्धी, जे लागली होती क्षयव्याधी,
ते जयाचिये सन्निधी, निरुजा कीजे ॥ १७६ ॥
तें अनिरूप्य कीं निरूपिजे, ऐकतां बुद्धी आणिजे,
वांचूनि डोळां देखिजे, ऐसें नाहीं ॥ १७७ ॥
मग तेचि इये शरीरीं, जैं आपुला प्रभावो करी,
तैं इंद्रियांचिया व्यापारीं, डोळांहि दिसे ॥ १७८ ॥
पैं वसंताचें रिगवणें, झाडांचेनि साजेपणें,
जाणिजे तेवीं करणें, सांगती ज्ञान ॥ १७९ ॥
अगा वृक्षासि पाताळीं, जळ सांपडे मुळीं,
तें शाखांचिये बाहाळीं, बाहेर दिसे ॥ १८० ॥
कां भूमीचें मार्दव, सांगे कोंभाची लवलव,
नाना आचारगौरव, सुकुलीनाचें ॥ १८१ ॥
अथवा संभ्रमाचिया आयती, स्नेहो जैसा ये व्यक्तिइ,
कां दर्शनाचिये प्रशस्तीं, पुण्यपुरुष ॥ १८२ ॥
नातरी केळीं कापूर जाहला, जेवीं परिमळें जाणों आला,
कां भिंगारीं दीपु ठेविला, बाहेरी फांके ॥ १८३ ॥
तैसें हृदयींचेनि ज्ञानें, जियें देहीं उमटती चिन्हें,
तियें सांगों आतां अवधानें, चागें आइक ॥ १८४ ॥


अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम्।
आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ॥ ७॥


तरी कवणेही विषयींचें, साम्य होणें न रुचे,
संभावितपणाचें, वोझे जया ॥ १८५ ॥
आथिलेचि गुण वानितां, मान्यपणें मानितां,
योग्यतेचें येतां, रूप आंगा ॥ १८६ ॥
तैं गजबजों लागे कैसा, व्याधें रुंधला मृगु जैसा,
कां बाहीं तरतां वळसा, दाटला जेवीं ॥ १८७ ॥
पार्था तेणें पाडें, सन्मानें जो सांकडे,
गरिमेतें आंगाकडे, येवोंचि नेदी ॥ १८८ ॥
पूज्यता डोळां न देखावी, स्वकीर्ती कानीं नायकावी,
हा अमुका ऐसी नोहावी, सेचि लोकां ॥ १८९ ॥
तेथ सत्काराची कें गोठी, कें आदरा देईल भेटी,
मरणेंसीं साटी, नमस्कारितां ॥ १९० ॥
वाचस्पतीचेनि पाडें, सर्वज्ञता तरी जोडे,
परी वेडिवेमाजीं दडे, महमेभेणें ॥ १९१ ॥
चातुर्य लपवी, महत्त्व हारवी,
पिसेपण मिरवी, आवडोनि ॥ १९२ ॥
लौकिकाचा उद्वेगु, शास्त्रांवरी उबगु,
उगेपणीं चांगु, आथी भरु ॥ १९३ ॥
जगें अवज्ञाचि करावी, संबंधीं सोयचि न धरावी,
ऐसी ऐसी जीवीं, चाड बहु ॥ १९४ ॥
तळौटेपण बाणे, आंगीं हिणावो खेवणें,
तें तेंचि करणें, बहुतकरुनी ॥ १९५ ॥
हा जीतु ना नोहे, लोक कल्पी येणें भावें,
तैसें जिणें होआवें, ऐसी आशा ॥ १९६ ॥
पै चालतु कां नोहे, कीं वारेनि जातु आहे,
जना ऐसा भ्रमु जाये, तैसें होईजे ॥ १९७ ॥
माझें असतेपण लोपो, नामरूप हारपो,
मज झणें वासिपो, भूतजात ॥ १९८ ॥
ऐसीं जयाचीं नवसियें, जो नित्य एकांता जातु जाये,
नामेंचि जो जिये, विजनाचेनि ॥ १९९ ॥
वायू आणि तया पडे, गगनेंसीं बोलों आवडे,
जीवें प्राणें झाडें, पढियंतीं जया ॥ २०० ॥
किंबहुना ऐसीं, चिन्हें जया देखसी,
जाण तया ज्ञानेंसीं, शेज जाहली ॥ २०१ ॥
पैं अमानित्व पुरुषीं, तें जाणावें इहीं मिषीं,
आतां अदंभाचिया वोळखीसी, सौरसु देवों ॥ २०२ ॥
तरी अदंभित्व ऐसें, लोभियाचें मन जैसें,
जीवु जावो परी नुमसे, ठेविला ठावो ॥ २०३ ॥
तयापरी किरीटी, पडिलाही प्राणसंकटीं,
तरी सुकृत न प्रकटी, आंगें बोलें ॥ २०४ ॥
खडाणें आला पान्हा, पळवी जेवीं अर्जुना,
कां लपवी पण्यांगना, वडिलपण ॥ २०५ ॥
आढ्यु आतुडे आडवीं, मग आढ्यता जेवीं हारवी,
नातरी कुळवधू लपवी, अवेवांतें ॥ २०६ ॥
नाना कृषीवळु आपुलें, पांघुरवी पेरिलें,
तैसें झांकी निपजलें, दानपुण्य ॥ २०७ ॥
वरिवरी देहो न पूजी, लोकांतें न रंजी,
स्वधर्मु वाग्ध्वजीं, बांधों नेणे ॥ २०८ ॥
परोपकारु न बोले, न मिरवी अभ्यासिलें,
न शके विकूं जोडलें, स्फीतीसाठीं ॥ २०९ ॥
शरीर भोगाकडे, पाहतां कृपणु आवडे,
एऱ्हवीं धर्मविषयीं थोडें, बहु न म्हणे ॥ २१० ॥
घरीं दिसे सांकड, देहींची आयती रोड,
परी दानीं जया होड, सुरतरूसीं ॥ २११ ॥
किंबहुना स्वधर्मीं थोरु, अवसरीं उदारु,
आत्मचर्चे चतुरु, एऱ्हवी वेडा ॥ २१२ ॥
केळीचें दळवाडें, हळू पोकळ आवडे,
परी फळोनियां गाढें, रसाळ जैसें ॥ २१३ ॥
कां मेघांचें आंग झील, दिसे वारेनि जैसें जाईल,
परी वर्षती नवल, घनवट तें ॥ २१४ ॥
तैसा जो पूर्णपणीं, पाहतां धाती आयणी,
एऱ्हवीं तरी वाणी, तोचि ठावो ॥ २१५ ॥
हें असो या चिन्हांचा, नटनाचु ठायीं जयाच्या,
जाण ज्ञान तयाच्या, हातां चढें ॥ २१६ ॥
पैं गा अदंभपण, म्हणितलें तें हें जाण,
आतां आईक खूण, अहिंसेची ॥ २१७ ॥
तरी अहिंसा बहुतीं परीं, बोलिली असे अवधारीं,
आपुलालिया मतांतरीं, निरूपिली ॥ २१८ ॥
परी ते ऐसी देखा, जैशा खांडूनियां शाखा,
मग तयाचिया बुडुखा, कूंप कीजे ॥ २१९ ॥
कां बाहु तोडोनि पचविजे, मग भूकेची पीडा राखिजे,
नाना देऊळ मोडोनि कीजे, पौळी देवा ॥ २२० ॥
तैसी हिंसाचि करूनि अहिंसा, निफजविजे हा ऐसा,
पैं पूर्वमीमांसा, निर्णो केला ॥ २२१ ॥
जे अवृष्टीचेनि उपद्रवें, गादलें विश्व आघवें,
म्हणौनि पर्जन्येष्टी करावे, नाना याग ॥ २२२ ॥
तंव तिये इष्टीचिया बुडीं, पशुहिंसा रोकडी,
मग अहिंसेची थडी, कैंची दिसे ? ॥ २२३ ॥
पेरिजे नुसधी हिंसा, तेथ उगवैल काय अहिंसा ?,
परी नवल बापा धिंवसा, या याज्ञिकांचा ॥ २२४ ॥
आणि आयुर्वेदु आघवा, तो याच मोहोरा पांडवा,
जे जीवाकारणें करावा, जीवघातु ॥ २२५ ॥
नाना रोगें आहाळलीं, लोळतीं भूतें देखिलीं,
ते हिंसा निवारावया केली, चिकित्सा कां ॥ २२६ ॥
तंव ते चिकित्से पहिलें, एकाचे कंद खणविले,
एका उपडविलें, समूळीं सपत्रीं ॥ २२७ ॥
एकें आड मोडविली, अजंगमाची खाल काढविली,
एकें गर्भिणी उकडविली, पुटामाजीं ॥ २२८ ॥
अजातशत्रु तरुवरां, सर्वांगीं देवविल्या शिरा,
ऐसे जीव घेऊनि धनुर्धरा, कोरडे केले ॥ २२९ ॥
आणि जंगमाही हात, लाऊनि काढिलें पित्त,
मग राखिले शिणत, आणिक जीव ॥ २३० ॥
अहो वसतीं धवळारें, मोडूनि केलीं देव्हारें,
नागवूनि वेव्हारें, गवांदी घातली ॥ २३१ ॥
मस्तक पांघुरविलें, तंव तळवटीं उघडें पडलें,
घर मोडोनि केले, मांडव पुढें ॥ २३२ ॥
नाना पांघुरणें, जाळूनि जैसें तापणें,
जालें आंगधुणें, कुंजराचें ॥ २३३ ॥
नातरी बैल विकूनि गोठा, पुंसा लावोनि बांधिजे गांठा,
इया करणी कीं चेष्टा ?, काइ हसों ॥ २३४ ॥
एकीं धर्माचिया वाहणी, गाळूं आदरिलें पाणी,
तंव गाळितया आहाळणीं, जीव मेले ॥ २३५॥
एक न पचवितीचि कण, इये हिंसेचे भेण,
तेथ कदर्थले प्राण, तेचि हिंसा ॥ २३६ ॥
एवं हिंसाचि अहिंसा, कर्मकांडीं हा ऐसा,
सिद्धांतु सुमनसा, वोळखें तूं ॥ २३७ ॥
पहिलें अहिंसेचें नांव, आम्हीं केलें जंव,
तंव स्फूर्ति बांधली हांव, इये मती ॥ २३८ ॥
तरि कैसेनि इयेतें गाळावें, म्हणौनि पडिलें बोलावें,
तेवींचि तुवांही जाणावें, ऐसा भावो ॥ २३९ ॥
बहुतकरूनि किरीटी, हाचि विषो इये गोठी,
एऱ्हवी कां आडवाटीं, धाविजैल गा ? ॥ २४० ॥
आणि स्वमताचिया निर्धारा-, लागोनियां धनुर्धरा,
प्राप्तां मतांतरां, निर्वेचु कीजे ॥ २४१ ॥
ऐसी हे अवधारीं, निरूपिती परी,
आतां ययावरी, मुख्य जें गा ॥ २४२ ॥
तें स्वमत बोलिजैल, अहिंसे रूप किजैल,
जेणें उठलिया आंतुल, ज्ञान दिसे ॥ २४३ ॥
परिइ तें अधिष्ठिलेनि आंगें, जाणिजे आचरतेनि बगें,
जैसी कसवटी सांगे, वानियातें ॥ २४४ ॥
तैसें ज्ञानामनाचिये भेटी, सरिसेंचि अहिंसेचें बिंब उठी,
तेंचि ऐसें किरीटी, परिस आतां ॥ २४४ ॥
तरी तरंगु नोलांडितु, लहरी पायें न फोडितु,
सांचलु न मोडितु, पाणियाचा ॥ २४६ ॥
वेगें आणि लेसा, दिठी घालूनि आंविसा,
जळीं बकु जैसा, पाउल सुये ॥ २४७ ॥
कां कमळावरी भ्रमर, पाय ठेविती हळुवार,
कुचुंबैल केसर, इया शंका ॥ २४८ ॥
तैसे परमाणु पां गुंतले, जाणूनि जीव सानुले,
कारुण्यामाजीं पाउलें, लपवूनि चाले ॥ २४९ ॥
ते वाट कृपेची करितु, ते दिशाचि स्नेह भरितु,
जीवातळीं आंथरितु, आपुला जीवु ॥ २५० ॥
ऐसिया जतना, चालणें जया अर्जुना,
हें अनिर्वाच्य परिमाणा, पुरिजेना ॥ २५१ ॥
पैं मोहाचेनि सांगडें, लासी पिलीं धरी तोंडें,
तेथ दांतांचे आगरडे, लागती जैसे ॥ २५२ ॥
कां स्नेहाळु माये, तान्हयाची वास पाहे,
तिये दिठी आहे, हळुवार जें ॥ २५३ ॥
नाना कमळदळें, डोलविजती ढाळें,
तो जेणें पाडें बुबुळें, वारा घेपे ॥ २५४ ॥
तैसेनि मार्दवें पाय, भूमीवरी न्यसीतु जाय,
लागती तेथ होय, जीवां सुख ॥ २५५ ॥
ऐसिया लघिमा चालतां, कृमि कीटक पंडुसुता,
देखे तरी माघौता, हळूचि निघे ॥ २५६ ॥
म्हणे पावो धडफडील, तरी स्वामीची निद्रा मोडैल,
रचलेपणा पडैल, झोती हन ॥ २५७ ॥
इया काकुळती, वाहणी घे माघौती,
कोणेही व्यक्ती, न वचे वरी ॥ २५८ ॥
जीवाचेनि नांवें, तृणातेंही नोलांडवे,
मग न लेखितां जावें, हे कें गोठी ?॥ २५९ ॥
मुंगिये मेरु नोलांडवे, मशका सिंधु न तरवे,
तैसा भेटलियां न करवे, अतिक्रमु ॥ २६० ॥
ऐसी जयाची चाली, कृपाफळी फळा आली,
देखसी जियाली, दया वाचे ॥ २६१ ॥
स्वयें श्वसणेंचि सुकुमार, मुख मोहाचें माहेर,
माधुर्या जाहले अंकुर, दशन तैसे ॥ २६२ ॥
पुढां स्नेह पाझरे, माघां चालती अक्षरें,
शब्द पाठीं अवतरे, कृपा आधीं ॥ २६३ ॥
तंव बोलणेंचि नाहीं, बोलों म्हणे जरी कांहीं,
तरी बोल कोणाही, खुपेल कां ॥ २६४ ॥
बोलतां अधिकुही निघे, तरी कोण्हाही वर्मीं न लगे,
आणि कोण्हासि न रिघे, शंका मनीं ॥ २६५ ॥
मांडिली गोठी हन मोडैल, वासिपैल कोणी उडैल,
आइकोनिचि वोवांडिल, कोण्ही जरी ॥ २६६ ॥
तरी दुवाळी कोणा नोहावी, भुंवई कवणाची नुचलावी,
ऐसा भावो जीवीं, म्हणौनि उगा ॥ २६७ ॥
मग प्रार्थिला विपायें, जरी लोभें बोलों जाये,
तरी परिसतया होये, मायबापु ॥ २६८ ॥
कां नादब्रह्मचि मुसे आलें, कीं गंगापय असललें,
पतिव्रते आलें, वार्धक्य जैसे ॥ २६९ ॥
तैसें साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ,
शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे ॥ २७० ॥
विरोधुवादुबळु, प्राणितापढाळु,
उपहासु छळु, वर्मस्पर्शु ॥ २७१ ॥
आटु वेगु विंदाणु, आशा शंका प्रतारणु,
हे संन्यासिले अवगुणु, जया वाचा ॥ २७२ ॥
आणि तयाचि परी किरीटी, थाउ जयाचिये दिठी,
सांडिलिया भ्रुकुटी, मोकळिया ॥ २७३ ॥
कां जे भूतीं वस्तु आहे, तियें रुपों शके विपायें,
म्हणौनि वासु न पाहे, बहुतकरूनी ॥ २७४ ॥
ऐसाही कोणे एके वेळे, भीतरले कृपेचेनि बळें,
उघडोनियां डोळे, दृष्टी घाली ॥ २७५ ॥
तरी चंद्रबिंबौनि धारा, निघतां नव्हती गोचरा,
परि एकसरें चकोरां, निघती दोंदें ॥ २७६ ॥
तैसें प्राणियांसि होये, जरी तो कहींवासु पाहे,
तया अवलोकनाची सोये, कूर्मींही नेणे ॥ २७७ ॥
किंबहुना ऐसी, दिठी जयाची भूतांसी,
करही देखसी, तैसेचि ते ॥ २७८ ॥
तरी होऊनियां कृतार्थ, राहिले सिद्धांचे मनोरथ,
तैसे जयाचे हात, निर्व्यापार ॥ २७९ ॥
अक्षमें आणि संन्यासिलें, कीं निरिंधन आणि विझालें,
मुकेनि घेतलें, मौन जैसें ॥ २८० ॥
तयापरी कांहीं, जयां करां करणें नाहीं,
जे अकर्तयाच्या ठायीं, बैसों येती ॥ २८१ ॥
आसुडैल वारा, नख लागेल अंबरा,
इया बुद्धी करां, चळों नेदी ॥ २८२ ॥
तेथ आंगावरिलीं उडवावीं, कां डोळां रिगतें झाडावीं,
पशुपक्ष्यां दावावीं, त्रासमुद्रा ॥ २८३ ॥
इया केउतिया गोठी, नावडे दंडु काठी,
मग शस्त्राचें किरीटी, बोलणें कें ? ॥ २८४ ॥
लीलाकमळें खेळणें, कांपुष्पमाळा झेलणें,
न करी म्हणे गोफणें, ऐसें होईल ॥ २८५ ॥
हालवतील रोमावळी, यालागीं आंग न कुरवाळी,
नखांची गुंडाळी, बोटांवरी ॥ २८६ ॥
तंव करणेयाचाचि अभावो, परी ऐसाही पडे प्रस्तावो,
तरी हातां हाचि सरावो, जे जोडिजती ॥ २८७ ॥
कां नाभिकारा उचलिजे, हातु पडिलियां देइजे,
नातरी आर्तातें स्पर्शिजे, अळुमाळु ॥ २८८ ॥
हेंही उपरोधें करणें, तरी आर्तभय हरणें,
नेणती चंद्रकिरणें, जिव्हाळा तो ॥ २८९ ॥
पावोनि तो स्पर्शु, मलयानिळु खरपुसु,
तेणें मानें पशु, कुरवाळणें ॥ २९० ॥
जे सदा रिते मोकळे, जैशी चंदनांगें निसळें,
न फळतांही निर्फळें, होतीचिना ॥ २९१ ॥
आतां असो हें वाग्जाळ, जाणें तें करतळ,
सज्जनांचे शीळ, स्वभाव जैसे ॥ २९२ ॥
आतां मन तयाचें, सांगों म्हणों जरी साचें,
तरी सांगितले कोणाचे, विलास हे ? ॥ २९३ ॥
काइ शाखा नव्हे तरु ?, जळेंवीण असे सागरु ?,
तेज आणि तेजाकारु, आन काई ? ॥ २९४ ॥
अवयव आणि शरीर, हे वेगळाले कीर ?,
कीं रसु आणि नीर, सिनानीं आथी ? ॥ २९५ ॥
म्हणौनि हे जे सर्व, सांगितले बाह्य भाव,
ते मनचि गा सावयव, ऐसें जाणें ॥ २९६ ॥
जें बीज भुईं खोंविलें, तेंचि वरी रुख जाहलें,
तैसें इंद्रियाद्वारीं फांकलें, अंतरचि कीं ॥ २९७ ॥
पैं मानसींचि जरी, अहिंसेची अवसरी,
तरी कैंची बाहेरी, वोसंडेल ? ॥ २९८ ॥
आवडे ते वृत्ती किरीटी, आधीं मनौनीचि उठी,
मग ते वाचे दिठी, करांसि ये ॥ २९९ ॥
वांचूनि मनींचि नाहीं, तें वाचेसि उमटेल काई ?,
बींवीण भुईं, अंकुर असे ? ॥ ३०० ॥
म्हणौनि मनपण जैं मोडे, तैं इंद्रिय आधींचि उबडें,
सूत्रधारेंवीण साइखडें, वावो जैसें ॥ ३०१ ॥
उगमींचि वाळूनि जाये, तें वोघीं कैचें वाहे,
जीवु गेलिया आहे, चेष्टा देहीं ? ॥ ३०२ ॥
तैसें मन हें पांडवा, मूळ या इंद्रियभावा,
हेंचि राहटे आघवां, द्वारीं इहीं ॥ ३०३ ॥
परी जिये वेळीं जैसें, जें होऊनि आंतु असे,
बाहेरी ये तैसें, व्यापाररूपें ॥ ३०४ ॥
यालागी साचोकारें, मनीं अहिंसा थांवे थोरें,
पिकली द्रुती आदरें, बोभात निघे ॥ ३०५ ॥
म्हणौनि इंद्रियें तेचि संपदा, वेचितां हीं उदावादा,
अहिंसेचा धंदा, करितें आहाती ॥ ३०६ ॥
समुद्रीं दाटे भरितें, तैं समुद्रचि भरी तरियांते,
तैसें स्वसंपत्ती चित्तें, इंद्रियां केलें ॥ ३०७ ॥
हें बहु असो पंडितु, धरुनि बाळकाचा हातु,
वोळी लिही व्यक्तु, आपणचि ॥ ३०८ ॥
तैसें दयाळुत्व आपुलें, मनें हातापायां आणिलें,
मग तेथ उपजविलें, अहिंसेतें ॥ ३०९ ॥
याकारणें किरीटी, इंद्रियांचिया गोठी,
मनाचिये राहाटी, रूप केलें ॥ ३१० ॥
ऐसा मनें देहें वाचा, सर्व संन्यासु दंडाचा,
जाहला ठायीं जयाचा, देखशील ॥ ३११ ॥
तो जाण वेल्हाळ, ज्ञानाचें वेळाउळ,
हें असो निखळ, ज्ञानचि तो ॥ ३१२ ॥
जे अहिंसा कानें ऐकिजे, ग्रंथाधारें निरूपिजे,
ते पाहावी हें उपजे, तैं तोचि पाहावा ॥ ३१३ ॥
ऐसें म्हणितलें देवें, तें बोलें एकें सांगावें,
परी फांकला हें उपसाहावें, तुम्हीं मज ॥ ३१४ ॥
म्हणाल हिरवें चारीं गुरूं, विसरे मागील मोहर धरूं,
कां वारेलगें पांखिरूं, गगनीं भरे ॥ ३१५ ॥
तैसिया प्रेमाचिया स्फूर्ती, फावलिया रसवृत्तीं,
वाहविला मती, आकळेना ॥ ३१६ ॥
तरि तैसें नोहे अवधारा, कारण असें विस्तारा,
एऱ्हवीं पद तरी अक्षरां, तिहींचेंचि ॥ ३१७ ॥
अहिंसा म्हणतां थोडी, परिइ ते तैंचि होय उघडी,
जैं लोटिजती कोडी, मतांचिया ॥ ३१८ ॥
एऱ्हवीं प्राप्तें मतांतरें, थातंबूनि आंगभरें,
बोलिजैल ते न सरे, तुम्हांपाशीं ॥ ३१९ ॥
रत्नपारखियांच्या गांवीं, जाईल गंडकी तरी सोडावी,
काश्मीरीं न करावी, मिडगण जेवीं ॥ ३२० ॥
काइसा वासु कापुरा, मंद जेथ अवधारा,
पिठाचा विकरा, तिये सातें ? ॥ ३२१ ॥
म्हणौनि इये सभे, बोलकेपणाचेनि क्षोभें,
लाग सरुउं न लभे, बोला प्रभु ॥ ३२२ ॥
सामान्या आणि विशेषा, सकळै कीजेल देखा,
तरी कानाचेया मुखा-, कडे न्याल ना तुम्ही ॥ ३२३ ॥
शंकेचेनि गदळें, जैं शुद्ध प्रमेय मैळे,
तैं मागुतिया पाउलीं पळे, अवधान येतें ॥ ३२४ ॥
कां करूनि बाबुळियेची बुंथी, जळें जियें ठाती,
तयांची वास पाहाती, हंसु काई ? ॥ ३२५ ॥
कां अभ्रापैलीकडे, जैं येत चांदिणें कोडें,
तैं चकोरें चांचुवडें, उचलितीना ॥ ३२६ ॥
तैसें तुम्ही वास न पाहाल, ग्रंथु नेघा वरी कोपाल,
जरी निर्विवाद नव्हैल, निरूपण ॥ ३२७ ॥
न बुझावितां मतें, न फिटे आक्षेपाचें लागतें,
तें व्याख्यान जी तुमतें, जोडूनि नेदी ॥ ३२८ ॥
आणि माझें तंव आघवें, ग्रथन येणेचि भावें,
जे तुम्हीं संतीं होआवें, सन्मुख सदां ॥ ३२९ ॥
एऱ्हवीं तरी साचोकारें, तुम्ही गीतार्थाचे सोइरे,
जाणोनि गीता एकसरें, धरिली मियां ॥ ३३० ॥
जें आपुलें सर्वस्व द्याल, मग इयेतें सोडवूनि न्याल,
म्हणौनि ग्रंथु नव्हे वोल, साचचि हे ॥ ३३१ ॥
कां सर्स्वाचा लोभु धरा, वोलीचा अव्हेरु करा,
तरी गीते मज अवधारा, एकचि गती ॥ ३३२ ॥
किंबहुना मज, तुमचिया कृपा काज,
तियेलागीं व्याज, ग्रंथाचें केलें ॥ ३३३ ॥
तरिइ तुम्हां रसिकांजोगें, व्याख्यान शोधावें लागे,
म्हणौनि जी मतांगें, बोलों गेलों ॥ ३३४ ॥
तंव कथेसि पसरु जाहला, श्लोकार्थु दूरी गेला,
कीजो क्षमा यया बोला, अपत्या मज ॥ ३३५ ॥
आणि घांसाआंतिल हरळु, फेडितां लागे वेळु,
ते दूषण नव्हें खडळु, सांडावा कीं ॥ ३३६ ॥
कां संवचोरा चुकवितां, दिवस लागलिया माता,
कोपावें कीं जीविता, जिताणें कीजे ? ॥ ३३७ ॥
परी यावरील हें नव्हे, तुम्हीं उपसाहिलें तेंचि बरवें,
आतां अवधारिजो देवें, बोलिलें ऐसें ॥ ३३८ ॥
म्हणे उन्मेखसुलोचना, सावध होईं अर्जुना,
करूं तुज ज्ञाना, वोळखी आतां ॥ ३३९ ॥
तरी ज्ञान गा तें एथें, वोळख तूं निरुतें,
आक्रोशेंवीण जेथें, क्षमा असे ॥ ३४० ॥
अगाध सरोवरीं, कमळिणी जियापरी,
कां सदैवाचिया घरीं, संपत्ति जैसी ॥ ३४१ ॥
पार्था तेणें पाडें, क्षमा जयातें वाढे,
तेही लक्षे तें फुडें, लक्षण सांगों ॥ ३४२ ॥
तरी पढियंते लेणें, आंगीं भावें जेणें,
धरिजे तेवीं साहणें, सर्वचि जया ॥ ३४३ ॥
त्रिविध मुख्य आघवे, उपद्रवांचे मेळावे,
वरी पडिलिया नव्हे, वांकुडा जो ॥ ३४४ ॥
अपेक्षित पावे, तें जेणें तोषें मानवें,
अनपेक्षिताही करवे, तोचि मानु ॥ ३४५ ॥
जो मानापमानातें साहे, सुखदुःख जेथ सामाये,
निंदास्तुती नोहे, दुखंडु जो ॥ ३४६ ॥
उन्हाळेनि जो न तपे, हिमवंती न कांपे,
कयसेनिही न वासिपे, पातलेया ॥ ३४७ ॥
स्वशिखरांचा भारु, नेणें जैसा मेरु,
कीं धरा यज्ञसूकरु, वोझें न म्हणे ॥ ३४८ ॥
नाना चराचरीं भूतीं, दाटणी नव्हे क्षिती,
तैसा नाना द्वंद्वीं प्राप्तीं, घामेजेना ॥ ३४९ ॥
घेऊनी जळाचे लोट, आलिया नदीनदांचे संघाट,
करी वाड पोट, समुद्र जेवीं ॥ ३५० ॥
तैसें जयाचिया ठायीं, न साहणें काहींचि नाहीं,
आणि साहतु असे ऐसेंही, स्मरण नुरे ॥ ३५१ ॥
आंगा जें पातलें, तें करूनि घाली आपुलें,
येथ साहतेनि नवलें, घेपिजेना ॥ ३५२ ॥
हे अनाक्रोश क्शमा, जयापाशीं प्रियोत्तमा,
जाण तेणें महिमा, ज्ञानासि गा ॥ ३५३ ॥
तो पुरुषु पांडवा, ज्ञानाचा वोलावा,
आतां परिस आर्जवा, रूप करूं ॥ ३५४ ॥
तरी आर्जव तें ऐसें, प्राणाचें सौजन्य जैसें,
आवडे तयाही दोषें, एकचि गा ॥ ३५५ ॥
कां तोंड पाहूनि प्रकाशु, न करी जेवीं चंडांशु,
जगा एकचि अवकाशु, आकाश जैसें ॥ ३५६ ॥
तैसें जयाचें मन, माणुसाप्रति आन आन,
नव्हे आणि वर्तन, ऐसें पैं तें ॥ ३५७ ॥
जे जगेंचि सनोळख, जगेंसीं जुनाट सोयरिक,
आपपर हें भाख, जाणणें नाहीं ॥ ३५८ ॥
भलतेणेंसीं मेळु, पाणिया ऐसा ढाळु,
कवणेविखीं आडळु, नेघे चित्त ॥ ३५९ ॥
वारियाची धांव, तैसे सरळ भाव,
शंका आणि हांव, नाहीं जया ॥ ३६० ॥
मायेपुढें बाळका, रिगतां न पडे शंका,
तैसें मन देतां लोकां, नालोची जो ॥ ३६१ ॥
फांकलिया इंदीवरा, परिवारु नाहीं धनुर्धरा,
तैसा कोनकोंपरा, नेणेचि जो ॥ ३६२ ॥
चोखाळपण रत्नाचें, रत्नावरी किरणाचें,
तैसें पुढां मन जयाचें, करणें पाठीं ॥ ३६३ ॥
आलोचूं जो नेणे, अनुभवचि जोगावणें,
धरी मोकळी अंतःकरणें, नव्हेचि जया ॥ ३६४ ॥
दिठी नोहे मिणधी, बोलणें नाहीं संदिग्धी,
कवणेंसीं हीनबुद्धी, राहाटीजे ना ॥ ३६५ ॥
दाही इंद्रियें प्रांजळें, निष्प्रपंचें निर्मळें,
पांचही पालव मोकळे, आठही पाहर ॥ ३६६ ॥
अमृताची धार, तैसें उजूं अंतर,
किंबहुना जो माहेर, या चिन्हांचें ॥ ३६७ ॥
तो पुरुष सुभटा, आर्जवाचा आंगवटा,
जाण तेथेंचि घरटा, ज्ञानें केला ॥ ३६८ ॥
आतां ययावरी, गुरुभक्तीची परी,
सांगों गा अवधारीं, चतुरनाथा ॥ ३६९ ॥
आघवियाचि दैवां, जन्मभूमि हे सेवा,
जे ब्रह्म करी जीवा, शोच्यातेंहि ॥ ३७० ॥
हें आचार्योपास्ती, प्रकटिजैल तुजप्रती,
बैसों दे एकपांती, अवधानाची ॥ ३७१ ॥
तरी सकळ जळसमृद्धी, घेऊनि गंगा निघाली उदधी,
कीं श्रुति हे महापदीं, पैठी जाहाली ॥ ३७२ ॥
नाना वेंटाळूनि जीवितें, गुणागुण उखितें,
प्राणनाथा उचितें, दिधलें प्रिया ॥ ३७३ ॥
तैसें सबाह्य आपुलें, जेणें गुरुकुळीं वोपिलें,
आपणपें केलें, भक्तीचें घर ॥ ३७४ ॥
गुरुगृह जये देशीं, तो देशुचि वसे मानसीं,
विरहिणी कां जैसी, वल्लभातें ॥ ३७५ ॥
तियेकडोनि येतसे वारा, देखोनि धांवे सामोरा,
आड पडे म्हणे घरा, बीजें कीजो ॥ ३७६ ॥
साचा प्रेमाचिया भुली, तया दिशेसीचि आवडे बोली,
जीवु थानपती करूनि घाली, गुरुगृहीं जो ॥ ३७७ ॥
परी गुरुआज्ञा धरिलें, देह गांवीं असे एकलें,
वांसरुवा लाविलें, दावें जैसें ॥ ३७८ ॥
म्हणे कैं हें बिरडें फिटेल, कैं तो स्वामी भेटेल,
युगाहूनि वडील, निमिष मानी ॥ ३७९ ॥
ऐसेया गुरुग्रामींचें आलें, कां स्वयें गुरूंनींचि धाडिलें,
तरी गतायुष्या जोडलें, आयुष्य जैसें ॥ ३८० ॥
कां सुकतया अंकुरा-, वरी पडलिया पीयूषधारा,
नाना अल्पोदकींचा सागरा, आला मासा ॥ ३८१ ॥
नातरी रंकें निधान देखिलें, कां आंधळिया डोळे उघडले,
भणंगाचिया आंगा आलें, इंद्रपद ॥ ३८२ ॥
तैसें गुरुकुळाचेनि नांवें, महासुखें अति थोरावे,
जें कोडेंही पोटाळवें, आकाश कां ॥ ३८३ ॥
पैं गुरुकुळीं ऐसी, आवडी जया देखसी,
जाण ज्ञान तयापासीं, पाइकी करी ॥ ३८४ ॥
आणि अभ्यंतरीलियेकडे, प्रेमाचेनि पवाडे,
श्रीगुरूंचें रूपडें, उपासी ध्यानीं ॥ ३८५ ॥
हृदयशुद्धीचिया आवारीं, आराध्यु तो निश्चल ध्रुव करी,
मग सर्व भावेंसी परिवारीं, आपण होय ॥ ३८६ ॥
कां चैतन्यांचिये पोवळी-, माजीं आनंदाचिया राउळीं,
श्रिइगुरुलिंगा ढाळी, ध्यानामृत ॥ ३८७ ॥
उदयिजतां बोधार्का, बुद्धीची डाळ सात्त्विका,
भरोनियां त्र्यंबका, लाखोली वाहे ॥ ३८८ ॥
काळशुद्धी त्रिकाळीं, जीवदशा धूप जाळीं।
न्यानदीपें वोंवाळी, निरंतर ॥ ३८९ ॥
सामरस्याची रससोय, अखंड अर्पितु जाय,
आपण भराडा होय, गुरु तो लिंग ॥ ३९० ॥
नातरी जीवाचिये सेजे, गुरु कांतु करूनि भुंजे,
ऐसीं प्रेमाचेनि भोजें, बुद्धी वाहे ॥ ३९१ ॥
कोणे{ए}के अवसरीं, अनुरागु भरे अंतरीं,
कीं तया नाम करी, क्षीराब्धी ॥ ३९२ ॥
तेथ ध्येयध्यान बहु सुख, तेंचि शेषतुका निर्दोख,
वरी जलशयन देख, भावी गुरु ॥ ३९३ ॥
मग वोळगती पाय, ते लक्ष्मी आपण होय,
गरुड होऊनि उभा राहे, आपणचि ॥ ३९४ ॥
नाभीं आपणचि जन्मे, ऐसें गुरुमूर्तिप्रेमें,
अनुभवी मनोधर्में, ध्यानसुख ॥ ३९५ ॥
एकाधिये वेळें, गुरु माय करी भावबळें,
मग स्तन्यसुखें लोळे, अंकावरी ॥ ३९६ ॥
नातरी गा किरीटी, चैतन्यतरुतळवटीं,
गुरु धेनु आपण पाठीं, वत्स होय ॥ ३९७ ॥
गुरुकृपास्नेहसलिलीं, आपण होय मासोळी,
कोणे एके वेळीं, हेंचि भावीं ॥ ३९८ ॥
गुरुकृपामृताचे वडप, आपण सेवावृत्तीचें होय रोप,
ऐसेसे संकल्प, विये मन ॥ ३९९ ॥
चक्षुपक्षेवीण, पिलूं होय आपण,
कैसें पैं अपारपण, आवडीचें ॥ ४०० ॥
गुरूतें पक्षिणी करी, चारा घे चांचूवरी,
गुरु तारू धरी, आपण कांस ॥ ४०१ ॥
ऐसें प्रेमाचेनि थावें, ध्यानचि ध्यानातें प्रसवे,
पूर्णसिंधु हेलावे, फुटती जैसे ॥ ४०२ ॥
किंबहुना यापरी, श्रीगुरुमूर्ती अंतरीं,
भोगी आतां अवधारीं, बाह्यसेवा ॥ ४०३ ॥
तरी जिवीं ऐसे आवांके, म्हणे दास्य करीन निकें,
जैसें गुरु कौतुकें, माग म्हणती ॥ ४०४ ॥
तैसिया साचा उपास्ती, गोसावी प्रसन्न होती,
तेथ मी विनंती, ऐसी करीन ॥ ४०५ ॥
म्हणेन तुमचा देवा, परिवारु जो आघवा,
तेतुलें रूपें होआवा, मीचि एकु ॥ ४०६ ॥
आणि उपकरतीं आपुलीं, उपकरणें आथि जेतुलीं,
माझीं रूपें तेतुलीं, होआवीं स्वामी ॥ ४०७ ॥
ऐसा मागेन वरु, तेथ हो म्हणती श्रीगुरु,
मग तो परिवारु, मीचि होईन ॥ ४०८ ॥
उपकरणजात सकळिक, तें मीचि होईन एकैक,
तेव्हां उपास्तीचें कवतिक, देखिजैल ॥ ४०९ ॥
गुरु बहुतांची माये, परी एकलौती होऊनि ठाये,
तैसें करूनि आण वायें, कृपे तिये ॥ ४१० ॥
तया अनुरागा वेधु लावीं, एकपत्नीव्रत घेववीं,
क्षेत्रसंन्यासु करवीं, लोभाकरवीं ॥ ४११ ॥
चतुर्दिक्षु वारा, न लाहे निघों बाहिरा,
तैसा गुरुकृपें पांजिरा, मीचि होईन ॥ ४१२ ॥
आपुलिया गुणांचीं लेणीं, करीन गुरुसेवे स्वामिणी,
हें असो होईन गंवसणी, मीचि भक्तीसी ॥ ४१३ ॥
गुरुस्नेहाचिये वृष्टी, मी पृथ्वी होईन तळवटीं,
ऐसिया मनोरथांचिया सृष्टी, अनंता रची ॥ ४१४ ॥
म्हणे श्रीगुरूंचें भुवन, आपण मी होईन,
आणि दास होऊनि करीन, दास्य तेथिंचें ॥ ४१५ ॥
निर्गमागमीं दातारें, जे वोलांडिजती उंबरे,
ते मी होईन आणि द्वारें, द्वारपाळु ॥ ४१६ ॥
पाउवा मी होईन, तियां मीचि लेववीन,
छत्र मी आणि करीन, बारीपण ॥ ४१७ ॥
मी तळ उपरु जाणविता, चंवरु धरु हातु देता,
स्वामीपुढें खोलता, होईन मी ॥ ४१८ ॥
मीचि होईन सागळा, करूं सुईन गुरुळां,
सांडिती तो नेपाळा, पडिघा मीचि ॥ ४१९ ॥
हडप मी वोळगेन, मीचि उगाळु घेईन,
उळिग मी करीन, आंघोळीचें ॥ ४२० ॥
होईन गुरूंचें आसन, अलंकार परिधान,
चंदनादि होईन, उपचार ते ॥ ४२१ ॥
मीचि होईन सुआरु, वोगरीन उपहारु,
आपणपें श्रीगुरु, वोंवाळीन ॥ ४२२ ॥
जे वेळीं देवो आरोगिती, तेव्हां पांतीकरु मीचि पांतीं,
मीचि होईन पुढती, देईन विडा ॥ ४२३ ॥
ताट मी काढीन, सेज मी झाडीन,
चरणसंवाहन, मीचि करीन ॥ ४२४ ॥
सिंहासन होईन आपण, वरी श्रीगुरु करिती आरोहण,
होईन पुरेपण, वोळगेचें ॥ ४२५ ॥
श्रीगुरूंचें मन, जया देईल अवधान,
तें मी पुढां होईन, चमत्कारु ॥ ४२६ ॥
तया श्रवणाचे आंगणीं, होईन शब्दांचिया आक्षौहिणी,
स्पर्श होईन घसणी, आंगाचिया ॥ ४२७ ॥
श्रीगुरूंचे डोळे, अवलोकनें स्नेहाळें,
पाहाती तियें सकळें, होईन रूपें ॥ ४२८ ॥
तिये रसने जो जो रुचेल, तो तो रसु म्यां होईजैल,
गंधरूपें कीजेल, घ्राणसेवा ॥ ४२९ ॥
एवं बाह्यमनोगत, श्रीगुरुसेवा समस्त,
वेंटाळीन वस्तुजात, होऊनियां ॥ ४३० ॥
जंव देह हें असेल, तंव वोळगी ऐसी कीजेल,
मग देहांतीं नवल, बुद्धि आहे ॥ ४३१ ॥
इये शरीरींची माती, मेळवीन तिये क्षिती,
जेथ श्रीचरण उभे ठाती, श्रीगुरूंचे ॥ ४३२ ॥
माझा स्वामी कवतिकें, स्पर्शीजति जियें उदकें,
तेथ लया नेईन निकें, आपीं आप ॥ ४३३ ॥
श्रीगुरु वोंवाळिजती, कां भुवनीं जे उजळिजती,
तयां दीपांचिया दीप्तीं, ठेवीन तेज ॥ ४३४ ॥
चवरी हन विंजणा, तेथ लयो करीन प्राणा,
मग आंगाचा वोळंगणा, होईन मी ॥ ४३५ ॥
जिये जिये अवकाशीं, श्रीगुरु असती परिवारेंसीं,
आकाश लया आकाशीं, नेईन तिये ॥ ४३६ ॥
परी जीतु मेला न संडीं, निमेषु लोकां न धाडीं,
ऐसेनि गणावया कोडी, कल्पांचिया ॥ ४३७ ॥
येतुलेंवरी धिंवसा, जयाचिया मानसा,
आणि करूनियांहि तैसा, अपारु जो ॥ ४३८ ॥
रात्र दिवस नेणे, थोडें बहु न म्हणें,
म्हणियाचेनि दाटपणें, साजा होय ॥ ४३९ ॥
तो व्यापारु येणें नांवें, गगनाहूनि थोरावे,
एकला करी आघवें, एकेचि काळीं ॥ ४४० ॥
हृदयवृत्ती पुढां, आंगचि घे दवडा,
काज करी होडा, मानसेंशीं ॥ ४४१ ॥
एकादियां वेळा, श्रीगुरुचिया खेळा,
लोण करी सकळा, जीविताचें ॥ ४४२ ॥
जो गुरुदास्यें कृशु, जो गुरुप्रेमें सपोषु,
गुरुआज्ञे निवासु, आपणचि जो ॥ ४४३ ॥
जो गुरु कुळें सुकुलीनु, जो गुरुबंधुसौजन्यें सुजनु,
जो गुरुसेवाव्यसनें सव्यसनु, निरंतर ॥ ४४४ ॥
गुरुसंप्रदायधर्म, तेचि जयाचे वर्णाश्रम,
गुरुपरिचर्या नित्यकर्म, जयाचें गा ॥ ४४५ ॥
गुरु क्षेत्र गुरु देवता, गुरु माय गुरु पिता,
जो गुरुसेवेपरौता, मार्ग नेणें ॥ ४४६ ॥
श्रीगुरूचे द्वार, तें जयाचें सर्वस्व सार,
गुरुसेवकां सहोदर, प्रेमें भजे ॥ ४४७ ॥
जयाचें वक्त्र, वाहे गुरुनामाचे मंत्र,
गुरुवाक्यावांचूनि शास्त्र, हातीं न शिवे ॥ ४४८ ॥
शिवतलें गुरुचरणीं, भलतैसें हो पाणी,
तया सकळ तीर्थें आणी, त्रैलोक्यींचीं ॥ ४४९ ॥
श्रीगुरूचें उशिटें, लाहे जैं अवचटें,
तैं तेणें लाभें विटे, समाधीसी ॥ ४५० ॥
कैवल्यसुखासाठीं, परमाणु घे किरीटी,
उधळती पायांपाठीं, चालतां जे ॥ ४५१ ॥
हें असो सांगावें किती, नाहीं पारु गुरुभक्ती,
परी गा उत्क्रांतमती, कारण हें ॥ ४५२ ॥
जया इये भक्तीची चाड, जया इये विषयींचें कोड,
जो हे सेवेवांचून गोड, न मनी कांहीं ॥ ४५३ ॥
तो तत्त्वज्ञाचा ठावो, ज्ञाना तेणेंचि आवो,
हें असो तो देवो, ज्ञान भक्तु ॥ ४५४ ॥
हें जाण पां साचोकारें, तेथ ज्ञान उघडेनि द्वारें,
नांदत असे जगा पुरे, इया रीती ॥ ४५५ ॥
जिये गुरुसेवेविखीं, माझा जीव अभिलाखी,
म्हणौनि सोयचुकी, बोली केली ॥ ४५६ ॥
एऱ्हवीं असतां हातीं खुळा, भजनावधानीं आंधळा,
परिचर्येलागीं पांगुळा-, पासूनि मंदु ॥ ४५७ ॥
गुरुवर्णनीं मुका, आळशी पोशिजे फुका,
परी मनीं आथि निका, सानुरागु ॥ ४५८ ॥
तेणेंचि पैं कारणें, हें स्थूळ पोसणें,
पडलें मज म्हणे, ज्ञानदेवो ॥ ४५९ ॥
परि तो बोलु उपसाहावा, आणि वोळगे अवसरु देयावा,
आतां म्हणेन जी बरवा, ग्रंथार्थुचि ॥ ४६० ॥
परिसा परिसा श्रीकृष्णु, जो भूतभारसहिष्णु,
तो बोलतसे विष्णु, पार्थु ऐके ॥ ४६१ ॥
म्हणे शुचित्व गा ऐसें, जयापाशीं दिसे,
आंग मन जैसें, कापुराचें ॥ ४६२ ॥
कां रत्नाचें दळवाडें, तैसें सबाह्य चोखडें,
आंत बाहेरि एकें पाडें, सूर्यु जैसा ॥ ४६३ ॥
बाहेरीं कर्में क्षाळला, भितरीं ज्ञानें उजळला,
इहीं दोहीं परीं आला, पाखाळा एका ॥ ४६४ ॥
मृत्तिका आणि जळें, बाह्य येणें मेळें,
निर्मळु होय बोलें, वेदाचेनी ॥ ४६५ ॥
भलतेथ बुद्धीबळी, रजआरिसा उजळी,
सौंदणी फेडी थिगळी, वस्त्रांचिया ॥ ४६६ ॥
किंबहुना इयापरी, बाह्य चोख अवधारीं,
आणि ज्ञानदीपु अंतरीं, म्हणौनि शुद्ध ॥ ४६७ ॥
एऱ्हवीं तरी पंडुसुता, आंत शुद्ध नसतां,
बाहेरि कर्म तो तत्त्वतां, विटंबु गा ॥ ४६८ ॥
मृत जैसा शृंगारिला, गाढव तीर्थीं न्हाणिला,
कडुदुधिया माखिला, गुळें जैसा ॥ ४६९ ॥
वोस गृहीं तोरण बांधिलें, कां उपवासी अन्नें लिंपिलें,
कुंकुमसेंदुर केलें, कांतहीनेनें ॥ ४७० ॥
कळस ढिमाचे पोकळ, जळो वरील तें झळाळ,
काय करूं चित्रींव फळ, आंतु शेण ॥ ४७१ ॥
तैसें कर्मवरिचिलेंकडां, न सरे थोर मोलें कुडा,
नव्हे मदिरेचा घडा, पवित्र गंगे ॥ ४७२ ॥
म्हणौनि अंतरीं ज्ञान व्हावें, मग बाह्य लाभेल स्वभावें,
वरी ज्ञान कर्में संभवे, ऐसें कें जोडे ? ॥ ४७३ ॥
यालागी बाह्य विभागु, कर्में धुतला चांगु,
आणि ज्ञानें फिटला वंगु, अंतरींचा ॥ ४७४ ॥
तेथ अंतर बाह्य गेले, निर्मळत्व एक जाहलें,
किंबहुना उरलें, शुचित्वचि ॥ ४७५ ॥
म्हणौनि सद्भाव जीवगत, बाहेरी दिसती फांकत,
जे स्फटिकगृहींचे डोलत, दीप जैसे ॥ ४७६ ॥
विकल्प जेणें उपजे, नाथिली विकृति निपजे,
अप्रवृत्तीचीं बीजें, अंकुर घेती ॥ ४७७ ॥
तें आइके देखे अथवा भेटे, परी मनीं कांहींचि नुमटे,
मेघरंगें न कांटे, व्योम जैसें ॥ ४७८ ॥
एऱ्हवीं इंद्रियांचेनि मेळें, विषयांवरी तरी लोळे,
परी विकाराचेनि विटाळें, लिंपिजेना ॥ ४७९ ॥
भेटलिया वाटेवरी, चोखी आणि माहारी,
तेथ नातळें तियापरी, राहाटों जाणें ॥ ४८० ॥
कां पतिपुत्रांतें आलिंगी, एकचि ते तरुणांगी,
तेथ पुत्रभावाच्या आंगीं, न रिगे कामु ॥ ४८१ ॥
तैसें हृदय चोख, संकल्पविकल्पीं सनोळख,
कृत्याकृत्य विशेख, फुडें जाणें ॥ ४८२ ॥
पाणियें हिरा न भिजे, आधणीं हरळु न शिजे,
तैसी विकल्पजातें न लिंपिजे, मनोवृत्ती ॥ ४८३ ॥
तया नांव शुचिपण, पार्था गा संपूर्ण,
हें देखसी तेथ जाण, ज्ञान असे ॥ ४८४ ॥
आणि स्थिरता साचें, घर रिगाली जयाचें,
तो पुरुष ज्ञानाचें, आयुष्य गा ॥ ४८५ ॥
देह तरी वरिचिलीकडे, आपुलिया परी हिंडे,
परी बैसका न मोडे, मानसींची ॥ ४८६ ॥
वत्सावरूनि धेनूचें, स्नेह राना न वचे,
नव्हती भोग सतियेचे, प्रेमभोग ॥ ४८७ ॥
कां लोभिया दूर जाये, परी जीव ठेविलाचि ठाये,
तैसा देहो चाळितां नव्हे, चळु चित्ता ॥ ४८८ ॥
जातया अभ्रासवें, जैसें आकाश न धांवे,
भ्रमणचक्रीं न भंवे, ध्रुव जैसा ॥ ४८९ ॥
पांथिकाचिया येरझारा, सवें पंथु न वचे धनुर्धरा,
कां नाहीं जेवीं तरुवरा, येणें जाणें ॥ ४९० ॥
तैसा चळणवळणात्मकीं, असोनि ये पांचभौतिकीं,
भूतोर्मी एकी, चळिजेना ॥ ४९१ ॥
वाहुटळीचेनि बळें, पृथ्वी जैसी न ढळे,
तैसा उपद्रव उमाळें, न लोटे जो ॥ ४९२ ॥
दैन्यदुःखीं न तपे, भवशोकीं न कंपे,
देहमृत्यु न वासिपे, पातलेनी ॥ ४९३ ॥
आर्ति आशा पडिभरें, वय व्याधी गजरें,
उजू असतां पाठिमोरें, नव्हे चित्त ॥ ४९४ ॥
निंदा निस्तेज दंडी, कामलोभा वरपडी,
परी रोमा नव्हे वांकुडी, मानसाची ॥ ४९५ ॥
आकाश हें वोसरो, पृथ्वी वरि विरो,
परि नेणे मोहरों, चित्तवृत्ती ॥ ४९६ ॥
हाती हाला फुलीं, पासवणा जेवीं न घाली,
तैसा न लोटे दुर्वाक्यशेलीं, शेलिला सांता ॥ ४९७ ॥
क्षीरार्णवाचिया कल्लोळीं, कंपु नाहीं मंदराचळीं,
कां आकाश न जळे जाळीं, वणवियाच्या ॥ ४९८ ॥
तैशा आल्या गेल्या ऊर्मी, नव्हे गजबज मनोधर्मीं,
किंबहुना धैर्य क्षमी, कल्पांतींही ॥ ४९९ ॥
परी स्थैर्य ऐसी भाष, बोलिजे जे सविशेष,
ते हे दशा गा देख, देखणया ॥ ५०० ॥
हें स्थैर्य निधडें, जेथ आंगें जीवें जोडे,
तें ज्ञानाचें उघडें, निधान साचें ॥ ५०१ ॥
आणि इसाळु जैसा घरा, कां दंदिया हतियेरा,
न विसंबे भांडारा, बद्धकु जैसा ॥ ५०२ ॥
कां एकलौतिया बाळका-, वरि पडौनि ठाके अंबिका,
मधुविषीं मधुमक्षिका, लोभिणी जैसी ॥ ५०३ ॥
अर्जुना जो यापरी, अंतःकरण जतन करी,
नेदी उभें ठाकों द्वारीं, इंद्रियांच्या ॥ ५०४ ॥
म्हणे काम बागुल ऐकेल, हे आशा सियारी देखैल,
तरि जीवा टेंकैल, म्हणौनि बिहे ॥ ५०५ ॥
बाहेरी धीट जैसी, दाटुगा पति कळासी,
करी टेहणी तैसी, प्रवृत्तीसीं ॥ ५०६ ॥
सचेतनीं वाणेपणें, देहासकट आटणें,
संयमावरीं करणें, बुझूनि घाली ॥ ५०७ ॥
मनाच्या महाद्वारीं, प्रत्याहाराचिया ठाणांतरीं,
जो यम दम शरीरीं, जागवी उभे ॥ ५०८ ॥
आधारीं नाभीं कंठीं, बंधत्रयाचीं घरटीं,
चंद्रसूर्य संपुटीं, सुये चित्त ॥ ५०९ ॥
समाधीचे शेजेपासीं, बांधोनि घाली ध्यानासी,
चित्त चैतन्य समरसीं, आंतु रते ॥ ५१० ॥
अगा अंतःकरणनिग्रहो जो, तो हा हें जाणिजो,
हा आथी तेथ विजयो, ज्ञानाचा पैं ॥ ५११ ॥
जयाची आज्ञा आपण, शिरीं वाहे अंतःकरण,
मनुष्याकारें जाण, ज्ञानचि तो ॥ ५१२ ॥


इंद्रियार्थेषु वैराग्यमनहंकार एव च।
जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् ॥ ८॥


आणि विषयांविखीं, वैराग्याची निकी,
पुरवणी मानसीं कीं, जिती आथी ॥ ५१३ ॥
वमिलेया अन्ना, लाळ न घोंटी जेवीं रसना,
कांआंग न सूये आलिंगना, प्रेताचिया ॥ ५१४ ॥
विष खाणें नागवे, जळत घरीं न रिगवे,
व्याघ्रविवरां न वचवे, वस्ती जेवीं ॥ ५१५ ॥
धडाडीत लोहरसीं, उडी न घालवे जैसी,
न करवे उशी, अजगराची ॥ ५१६ ॥
अर्जुना तेणें पाडें, जयासी विषयवार्ता नावडे,
नेदी इंद्रियांचेनि तोंडें, कांहींच जावों ॥ ५१७ ॥
जयाचे मनीं आलस्य, देही अतिकार्श्य,
शमदमीं सौरस्य, जयासि गा ॥ ५१८ ॥
तपोव्रतांचा मेळावा, जयाच्या ठायीं पांडवा,
युगांत जया गांवा-, आंतु येतां ॥ ५१९ ॥
बहु योगाभ्यासीं हांव, विजनाकडे धांव,
न साहे जो नांव, संघाताचें ॥ ५२० ॥
नाराचांचीं आंथुरणें, पूयपंकीं लोळणें,
तैसें लेखी भोगणें, ऐहिकींचें ॥ ५२१ ॥
आणि स्वर्गातें मानसें, ऐकोनि मानी ऐसें,
कुहिलें पिशित जैसें, श्वानाचें कां ॥ ५२२ ॥
तें हें विषयवैराग्य, जें आत्मलाभाचें सभाग्य,
येणें ब्रह्मानंदा योग्य, जीव होती ॥ ५२३ ॥
ऐसा उभयभोगीं त्रासु, देखसी जेथ बहुवसु,
तेथ जाण रहिवासु, ज्ञानाचा तूं ॥ ५२४ ॥
आणि सचाडाचिये परी, इष्टापूर्तें करी,
परी केलेंपण शरीरीं, वसों नेदी ॥ ५२५ ॥
वर्णाश्रमपोषकें, कर्में नित्यनैमित्तिकें,
तयामाजीं कांहीं न ठके, आचरतां ॥ ५२६ ॥
परि हें मियां केलें, कीं हें माझेनि सिद्धी गेलें,
ऐसें नाहीं ठेविलें, वासनेमाजीं ॥ ५२७ ॥
जैसें अवचितपणें, वायूसि सर्वत्र विचरणें,
कां निरभिमान उदैजणें, सूर्याचें जैसें ॥ ५२८ ॥
कां श्रुति स्वभावता बोले, गंगा काजेंविण चाले,
तैसें अवष्टंभहीन भलें, वर्तणें जयाचें ॥ ५२९ ॥
ऋतुकाळीं तरी फळती, परी फळलों हें नेणती,
तयां वृक्षांचिये ऐसी वृत्ती, कर्मीं सदा ॥ ५३० ॥
एवं मनीं कर्मीं बोलीं, जेथ अहंकारा उखी जाहली,
एकावळीची काढिली, दोरी जैसी ॥ ५३१ ॥
संबंधेंवीण जैसीं, अभ्रें असती आकाशीं,
देहीं कर्में तैसीं, जयासि गा ॥ ५३२ ॥
मद्यपाआंगींचें वस्त्र, लेपाहातींचें शस्त्र,
बैलावरी शास्त्र, बांधलें आहे ॥ ५३३ ॥
तया पाडें देहीं, जया मी आहे हे सेचि नाहीं,
निरहंकारता पाहीं, तया नांव ॥ ५३४ ॥
हें संपूर्ण जेथें दिसे, तेथेंचि ज्ञान असे,
इयेविषीं अनारिसें, बोलों नये ॥ ५३५ ॥
आणि जन्ममृत्युजरादुःखें, व्याधिवार्धक्यकलुषें,
तियें आंगा न येतां देखे, दुरूनि जो ॥ ५३६ ॥
साधकु विवसिया, कां उपसर्गु योगिया,
पावे उणेयापुरेया, वोथंबा जेवीं ॥ ५३७ ॥
वैर जन्मांतरींचें, सर्पा मनौनि न वचे,
तेवीं अतीता जन्माचें, उणें जो वाहे ॥ ५३८ ॥
डोळां हरळ न विरे, घाईं कोत न जिरे,
तैसें काळींचें न विसरे, जन्मदुःख ॥ ५३९ ॥
म्हणे पूयगर्ते रिगाला, अहा मूत्ररंध्रें निघाला,
कटा रे मियां चाटिला, कुचस्वेदु ॥ ५४० ॥
ऐस{ऐ}सिया परी, जन्माचा कांटाळा धरी,
म्हणे आतां तें मी न करीं, जेणें ऐसें होय ॥ ५४१ ॥
हारी उमचावया, जुंवारी जैसा ये डाया,
कीं वैरा बापाचेया, पुत्र जचे ॥ ५४२ ॥
मारिलियाचेनि रागें, पाठीचा जेवीं सूड मागें,
तेणें आक्षेपें लागे, जन्मापाठीं ॥ ५४३ ॥
परी जन्मती ते लाज, न सांडी जयाचें निज,
संभाविता निस्तेज, न जिरे जेवीं ॥ ५४४ ॥
आणि मृत्यु पुढां आहे, तोचि कल्पांतीं कां पाहे,
परी आजीचि होये, सावधु जो ॥ ५४५ ॥
माजीं अथांव म्हणता, थडियेचि पंडुसुता,
पोहणारा आइता, कासे जेवीं ॥ ५४६ ॥
कां न पवतां रणाचा ठावो, सांभाळिजे जैसा आवो,
वोडण सुइजे घावो, न लागतांचि ॥ ५४७ ॥
पाहेचा पेणा वाटवधा, तंव आजीचि होईजे सावधा,
जीवु न वचतां औषधा, धांविजे जेवीं ॥ ५४८ ॥
येऱ्हवीं ऐसें घडे, जो जळतां घरीं सांपडे,
तो मग न पवाडे, कुहा खणों ॥ ५४९ ॥
चोंढिये पाथरु गेला, तैसेनि जो बुडाला,
तो बोंबेहिसकट निमाला, कोण सांगे ॥ ५५० ॥
म्हणौनि समर्थेंसीं वैर, जया पडिलें हाडखाइर,
तो जैसा आठही पाहर, परजून असे ॥ ५५१ ॥
नातरी केळवली नोवरी, का संन्यासी जियापरी,
तैसा न मरतां जो करी, मृत्युसूचना ॥ ५५२ ॥
पैं गा जो ययापरी, जन्मेंचि जन्म निवारी,
मरणें मृत्यु मारी, आपण उरे ॥ ५५३ ॥
तया घरीं ज्ञानाचें, सांकडें नाहीं साचें,
जया जन्ममृत्युचें, निमालें शल्य ॥ ५५४ ॥
आणि तयाचिपरी जरा, न टेंकतां शरीरा,
तारुण्याचिया भरा-, माजीं देखे ॥ ५५५ ॥
म्हणे आजिच्या अवसरीं, पुष्टि जे शरीरीं,
ते पाहे होईल काचरी, वाळली जैसी ॥ ५५६ ॥
निदैव्याचे व्यवसाय, तैसे ठाकती हातपाय,
अमंत्र्या राजाची परी आहे, बळा यया ॥ ५५७ ॥
फुलांचिया भोगा-, लागीं प्रेम टांगा,
तें करेयाचा गुडघा, तैसें होईल ॥ ५५८ ॥
वोढाळाच्या खुरीं, आखरुआतें बुरी,
ते दशा माझ्या शिरीं, पावेल गा ॥ ५५९ ॥
पद्मदळेंसी इसाळे, भांडताति हे डोळे,
ते होती पडवळें, पिकलीं जैसीं ॥ ५६० ॥
भंवईचीं पडळें, वोमथती सिनसाळे,
उरु कुहिजैल जळें, आंसुवाचेनि ॥ ५६१ ॥
जैसें बाभुळीचें खोड, गिरबडूनि जाती सरड,
तैसें पिचडीं तोंड, सरकटिजैल ॥ ५६२ ॥
रांधवणी चुलीपुढें, पऱ्हे उन्मादती खातवडे,
तैसींचि यें नाकाडें, बिडबिडती ॥ ५६३ ॥
तांबुलें वोंठ राऊं, हांसतां दांत दाऊं,
सनागर मिरऊं, बोल जेणें ॥ ५६४ ॥
तयाचि पाहे या तोंडा, येईल जळंबटाचा लोंढा,
इया उमळती दाढा, दातांसहित ॥ ५६५ ॥
कुळवाडी रिणें दाटली, कां वांकडिया ढोरें बैसलीं,
तैसी नुठी कांहीं केली, जीभचि हे ॥ ५६६ ॥
कुसळें कोरडीं, वारेनि जाती बरडीं,
तैसा आपदा तोंडीं, दाढियेसी ॥ ५६७ ॥
आषाढींचेनि जळें, जैसीं झिरपती शैलाचीं मौळें,
तैसें खांडीहूनि लाळे, पडती पूर ॥ ५६८ ॥
वाचेसि अपवाडु, कानीं अनुघडु,
पिंड गरुवा माकडु, होईल हा ॥ ५६९ ॥
तृणाचें बुझवणें, आंदोळे वारेनगुणें,
तैसें येईल कांपणें, सर्वांगासी ॥ ५७० ॥
पायां पडती वेंगडी, हात वळती मुरकुंडी,
बरवपणा बागडी, नाचविजैल ॥ ५७१ ॥
मळमूत्रद्वारें, होऊनि ठाती खोंकरें,
नवसियें होती इतरें, माझियां निधनीं ॥ ५७२ ॥
देखोनि थुंकील जगु, मरणाचा पडैल पांगु,
सोइरियां उबगु, येईल माझा ॥ ५७३ ॥
स्त्रियां म्हणती विवसी, बाळें जाती मूर्छी,
किंबहुना चिळसी, पात्र होईन ॥ ५७४ ॥
उभळीचा उजगरा, सेजारियां साइलिया घरा,
शिणवील म्हणती म्हातारा, बहुतांतें हा ॥ ५७५ ॥
ऐसी वार्धक्याची सूचणी, आपणिया तरुणपणीं,
देखे मग मनीं, विटे जो गा ॥ ५७६ ॥
म्हणे पाहे हें येईल, आणि आतांचें भोगितां जाईल,
मग काय उरेल, हितालागीं ? ॥ ५७७ ॥
म्हणौनि नाइकणें पावे, तंव आईकोनि घाली आघवें,
पंगु न होता जावें, तेथ जाय ॥ ५७८ ॥
दृष्टी जंव आहे, तंव पाहावें तेतुलें पाहे,
मूकत्वा आधीं वाचा वाहे, सुभाषितें ॥ ५७९ ॥
हात होती खुळे, हें पुढील मोटकें कळे,
आणि करूनि घाली सकळें, दानादिकें ॥ ५८० ॥
ऐसी दशा येईल पुढें, तैं मन होईल वेडें,
तंव चिंतूनि ठेवी चोखडें, आत्मज्ञान ॥ ५८१ ॥
जैं चोर पाहे झोंबती, तंव आजीचि रुसिजे संपत्ती,
का झांकाझांकी वाती, न वचतां कीजे ॥ ५८२ ॥
तैसें वार्धक्य यावें, मग जें वायां जावें,
तें आतांचि आघवें, सवतें करीं ॥ ५८३ ॥
आतां मोडूनि ठेलीं दुर्गें, कां वळित धरिलें खगें,
तेथ उपेक्षूनि जो निघे, तो नागवला कीं ? ॥ ५८४ ॥
तैसें वृद्धाप्य होये, आलेपण तें वायां जाये,
जे तो शतवृद्ध आहे, नेणों कैंचा ॥ ५८५ ॥
झाडिलींचि कोळें झाडी, तया न फळे जेवीं बोंडीं,
जाहला अग्नि तरी राखोंडी, जाळील काई ? ॥ ५८६ ॥
म्हणौनि वार्धक्याचेनि आठवें, वार्धक्या जो नागवे,
तयाच्या ठायीं जाणावें, ज्ञान आहे ॥ ५८७ ॥
तैसेंचि नाना रोग, पडिघाती ना जंव पुढां आंग,
तंव आरोग्याचे उपेग, करूनि घाली ॥ ५८८ ॥
सापाच्या तोंडी, पडली जे उंडी,
ते लाऊनि सांडी, प्रबुद्धु जैसा ॥ ५८९ ॥
तैसा वियोगें जेणें दुःखे, विपत्ति शोक पोखे,
तें स्नेह सांडूनि सुखें, उदासु होय ॥ ५९० ॥
आणि जेणें जेणें कडे, दोष सूतील तोंडें,
तयां कर्मरंध्री गुंडे, नियमाचे दाटी ॥ ५९१ ॥
ऐस{ऐ}सिया आइती, जयाची परी असती,
तोचि ज्ञानसंपत्ती-, गोसावी गा ॥ ५९२ ॥
आतां आणीकही एक, लक्षण अलौकिक,
सांगेन आइक, धनंजया ॥ ५९३ ॥


असक्तिरनभिष्वंगः पुत्रदारगृहादिषु।
नित्यं च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु ॥ ९॥


तरि जो या देहावरी, उदासु ऐसिया परी,
उखिता जैसा बिढारीं, बैसला आहे ॥ ५९४ ॥
कां झाडाची साउली, वाटे जातां मीनली,
घरावरी तेतुली, आस्था नाहीं ॥ ५९५ ॥
साउली सरिसीच असे, परी असे हें नेणिजे जैसें,
स्त्रियेचें तैसें, लोलुप्य नाहीं ॥ ५९६ ॥
आणि प्रजा जे जाली, तियें वस्ती कीर आलीं,
कां गोरुवें बैसलीं, रुखातळीं ॥ ५९७ ॥
जो संपत्तीमाजी असतां, ऐसा गमे पंडुसुता,
जैसा कां वाटे जातां, साक्षी ठेविला ॥ ५९८ ॥
किंबहुना पुंसा, पांजरियामाजीं जैसा,
वेदाज्ञेसी तैसा, बिहूनि असे ॥ ५९९ ॥
एऱ्हवीं दारागृहपुत्रीं, नाहीं जया मैत्री,
तो जाण पां धात्री, ज्ञानासि गा ॥ ६०० ॥
महासिंधू जैसे, ग्रीष्मवर्षीं सरिसे,
इष्टानिष्ट तैसें, जयाच्या ठायीं ॥ ६०१ ॥
कां तिन्ही काळ होतां, त्रिधा नव्हे सविता,
तैसा सुखदुःखीं चित्ता, भेदु नाहीं ॥ ६०२ ॥
जेथ नभाचेनि पाडें, समत्वा उणें न पडे,
तेथ ज्ञान रोकडें, वोळख तूं ॥ ६०३ ॥


मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी।
विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि ॥ १०॥


आणि मीवांचूनि कांहीं, आणिक गोमटें नाहीं,
ऐसा निश्चयोचि तिहीं, जयाचा केला ॥ ६०४ ॥
शरीर वाचा मानस, पियालीं कृतनिश्चयाचा कोश,
एक मीवांचूनि वास, न पाहती आन ॥ ६०५ ॥
किंबहुना निकट निज, जयाचें जाहलें मज,
तेणें आपणयां आम्हां सेज, एकी केली ॥ ६०६ ॥
रिगतां वल्लभापुढें, नाहीं आंगीं जीवीं सांकडें,
तिये कांतेचेनि पाडें, एकसरला जो ॥ ६०७ ॥
मिळोनि मिळतचि असे, समुद्रीं गंगाजळ जैसें,
मी होऊनि मज तैसें, सर्वस्वें भजती ॥ ६०८ ॥
सूर्याच्या होण्यां होईजे, कां सूर्यासवेंचि जाइजे,
हें विकलेपण साजे, प्रभेसि जेवीं ॥ ६०९ ॥
पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें,
ते लहरी म्हणती लौकिकें, एऱ्हवीं तें पाणी ॥ ६१० ॥
जो अनन्यु यापरी, मी जाहलाहि मातें वरी,
तोचि तो मूर्तधारी, ज्ञान पैं गा ॥ ६११ ॥
आणि तीर्थें धौतें तटें, तपोवनें चोखटें,
आवडती कपाटें, वसवूं जया ॥ ६१२ ॥
शैलकक्षांचीं कुहरें, जळाशय परिसरें,
अधिष्ठी जो आदरें, नगरा न ये ॥ ६१३ ॥
बहु एकांतावरी प्रीति, जया जनपदाची खंती,
जाण मनुष्याकारें मूर्ती, ज्ञानाची तो ॥ ६१४ ॥
आणिकहि पुढती, चिन्हें गा सुमती,
ज्ञानाचिये निरुती-, लागीं सांगों ॥ ६१५ ॥


अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम्।
एतद्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोन्यथा ॥ ११॥


तरी परमात्मा ऐसें, जें एक वस्तु असे,
तें जया दिसें, ज्ञानास्तव ॥ ६१६ ॥
तें एकवांचूनि आनें, जियें भवस्वर्गादि ज्ञानें,
तें अज्ञान ऐसा मनें, निश्चयो केला ॥ ६१७ ॥
स्वर्गा जाणें हें सांडी, भवविषयीं कान झाडी,
दे अध्यात्मज्ञानीं बुडी, सद्भावाची ॥ ६१८ ॥
भंगलिये वाटे, शोधूनिया अव्हांटे,
निघिजे जेवीं नीटें, राजपंथें ॥ ६१९ ॥
तैसें ज्ञानजातां करी, आघवेंचि एकीकडे सारी,
मग मन बुद्धि मोहरी, अध्यात्मज्ञानीं ॥ ६२० ॥
म्हणे एक हेंचि आथी, येर जाणणें ते भ्रांती,
ऐसी निकुरेंसी मती, मेरु होय ॥ ६२१ ॥
एवं निश्चयो जयाचा, द्वारीं आध्यात्मज्ञानाचा,
ध्रुव देवो गगनींचा, तैसा राहिला ॥ ६२२ ॥
तयाच्या ठायीं ज्ञान, या बोला नाहीं आन,
जे ज्ञानीं बैसलें मन, तेव्हांचि तें तो मी ॥ ६२३ ॥
तरी बैसलेपणें जें होये, बैसतांचि बोलें न होये,
तरी ज्ञाना तया आहे, सरिसा पाडु ॥ ६२४ ॥
आणि तत्त्वज्ञान निर्मळ, फळे जें एक फळ,
तें ज्ञेयही वरी सरळ, दिठी जया ॥ ६२५ ॥
एऱ्हवीं बोधा आलेनि ज्ञानें, जरी ज्ञेय न दिसेचि मनें,
तरी ज्ञानलाभुही न मने, जाहला सांता ॥ ६२६ ॥
आंधळेनि हातीं दिवा, घेऊनि काय करावा ?,
तैसा ज्ञाननिश्चयो आघवा, वायांचि जाय ॥ ६२७ ॥
जरि ज्ञानाचेनि प्रकाशें, परतत्त्वीं दिठी न पैसे,
ते स्फूर्तीचि असे, अंध होऊनी ॥ ६२८ ॥
म्हणौनि ज्ञान जेतुलें दावीं, तेतुली वस्तुचि आघवी,
तें देखे ऐशी व्हावी, बुद्धि चोख ॥ ६२९ ॥
यालागीं ज्ञानें निर्दोखें, दाविलें ज्ञेय देखे,
तैसेनि उन्मेखें, आथिला जो ॥ ६३० ॥
जेवढी ज्ञानाची वृद्धी, तेवढीच जयाची बुद्धी,
तो ज्ञान हे शब्दीं, करणें न लगे ॥ ६३१ ॥
पैं ज्ञानाचिये प्रभेसवें, जयाची मती ज्ञेयीं पावे,
तो हातधरणिया शिवे, परतत्त्वातें ॥ ६३२ ॥
तोचि ज्ञान हें बोलतां, विस्मो कवण पंडुसुता ?,
काय सवितयातें सविता, म्हणावें असें ? ॥ ६३३ ॥
तंव श्रोतें म्हणती असो, न सांगें तयाचा अतिसो,
ग्रंथोक्ती तेथ आडसो, घालितोसी कां ? ॥ ६३४ ॥
तुझा हाचि आम्हां थोरु, वक्तृत्वाचा पाहुणेरु,
जे ज्ञानविषो फारु, निरोपिला ॥ ६३५ ॥
रसु होआवा अतिमात्रु, हा घेतासि कविमंत्रु,
तरी अवंतूनि शत्रु, करितोसि कां गा ? ॥ ६३६ ॥
ठायीं बैसतिये वेळे, जे रससोय घेऊनि पळे,
तियेचा येरु वोडव मिळे, कोणा अर्था ? ॥ ६३७ ॥
आघवाचि विषयीं भादी, परी सांजवणीं टेंकों नेदी,
ते खुरतोडी नुसधी, पोषी कवण ? ॥ ६३८ ॥
तैसी ज्ञानीं मती न फांके, येर जल्पती नेणों केतुकें,
परि तें असो निकें, केलें तुवां ॥ ६३९ ॥
जया ज्ञानलेशोद्देशें, कीजती योगादि सायासें,
तें धणीचें आथी तुझिया ऐसें, निरूपण ॥ ६४० ॥
अमृताची सातवांकुडी, लागो कां अनुघडी,
सुखाच्या दिवसकोडी, गणिजतु कां ॥ ६४१ ॥
पूर्णचंद्रेंसीं राती, युग एक असोनि पहाती,
तरी काय पाहात आहाती, चकोर ते ? ॥ ६४२ ॥
तैसें ज्ञानाचें बोलणें, आणि येणें रसाळपणें,
आतां पुरे कोण म्हणे ?, आकर्णितां ॥ ६४३ ॥
आणि सभाग्यु पाहुणा ये, सुभगाचि वाढती होये,
तैं सरों नेणें रससोये, ऐसें आथी ॥ ६४४ ॥
तैसा जाहला प्रसंगु, जे ज्ञानीं आम्हांसि लागु,
आणि तुजही अनुरागु, आथि तेथ ॥ ६४५ ॥
म्हणौनि यया वाखाणा-, पासीं से आली चौगुणा,
ना म्हणों नयेसि देखणा ?, होसी ज्ञानी ॥ ६४६ ॥
तरी आतां ययावरी, प्रज्ञेच्या माजघरीं,
पदें साच करीं, निरूपणीं ॥ ६४७ ॥
या संतवाक्यासरिसें, म्हणितलें निवृत्तिदासें,
माझेंही जी ऐसें, मनोगत ॥ ६४८ ॥
यावरी आतां तुम्हीं, आज्ञापिला स्वामी,
तरी वायां वागू मी, वाढों नेदी ॥ ६४९ ॥
एवं इयें अवधारा, ज्ञानलक्षणें अठरा,
श्रीकृष्णें धनुर्धरा, निरूपिली ॥ ६५० ॥
मग म्हणें या नांवें, ज्ञान एथ जाणावें,
हे स्वमत आणि आघवें, ज्ञानियेही म्हणती ॥ ६५१ ॥
करतळावरी वाटोळा, डोलतु देखिजे आंवळा,
तैसें ज्ञान आम्हीं डोळां, दाविलें तुज ॥ ६५२ ॥
आतां धनंजया महामती, अज्ञान ऐसी वदंती,
तेंही सांगों व्यक्ती, लक्षणेंसीं ॥ ६५३ ॥
एऱ्हवीं ज्ञान फुडें जालिया, अज्ञान जाणवे धनंजया,
जें ज्ञान नव्हे तें अपैसया, अज्ञानचि ॥ ६५४ ॥
पाहें पां दिवसु आघवा सरे, मग रात्रीची वारी उरे,
वांचूनि कांहीं तिसरें, नाहीं जेवीं ॥ ६५५ ॥
तैसें ज्ञान जेथ नाहीं, तेंचि अज्ञान पाहीं,
तरी सांगों कांहीं कांहीं, चिन्हें तियें ॥ ६५६ ॥
तरी संभावने जिये, जो मानाची वाट पाहे,
सत्कारें होये, तोषु जया ॥ ६५७ ॥
गर्वें पर्वताचीं शिखरें, तैसा महत्त्वावरूनि नुतरे,
तयाचिया ठायीं पुरे, अज्ञान आहे ॥ ६५८ ॥
आणि स्वधर्माची मांगळी, बांधे वाचेच्या पिंपळीं,
उभिला जैसा देउळीं, जाणोनि कुंचा ॥ ६५९ ॥
घाली विद्येचा पसारा, सूये सुकृताचा डांगोरा,
करी तेतुलें मोहरा, स्फीतीचिया ॥ ६६० ॥
आंग वरिवरी चर्ची, जनातें अभ्यर्चितां वंची,
तो जाण पां अज्ञानाची, खाणी एथ ॥ ६६१ ॥
आणि वन्ही वनीं विचरे, तेथ जळती जैसीं जंगमें स्थावरें,
तैसें जयाचेनि आचारें, जगा दुःख ॥ ६६२ ॥
कौतुकें जें जें जल्पे, तें साबळाहूनि तीख रुपे,
विषाहूनि संकल्पें, मारकु जो ॥ ६६३ ॥
तयातें बहु अज्ञान, तोचि अज्ञानाचें निधान,
हिंसेसि आयतन, जयाचें जिणें ॥ ६६४ ॥
आणि फुंकें भाता फुगे, रेचिलिया सवेंचि उफगे,
तैसा संयोगवियोगें, चढे वोहटे ॥ ६६५ ॥
पडली वारयाचिया वळसा, धुळी चढे आकाशा,
हरिखा वळघे तैसा, स्तुतीवेळे ॥ ६६६ ॥
निंदा मोटकी आइके, आणि कपाळ धरूनि ठाके,
थेंबें विरे वारोनि शोखे, चिखलु जैसा ॥ ६६७ ॥
तैसा मानापमानीं होये, जो कोण्हीचि उर्मी न साहे,
तयाच्या ठायीं आहे, अज्ञान पुरें ॥ ६६८ ॥
आणि जयाचिया मनीं गांठी, वरिवरी मोकळी वाचा दिठी,
आंगें मिळे जीवें पाठीं, भलतया दे ॥ ६६९ ॥
व्याधाचे चारा घालणें, तैसें प्रांजळ जोगावणें,
चांगाचीं अंतःकरणें, विरु करी ॥ ६७० ॥
गार शेवाळें गुंडाळली, कां निंबोळी जैसी पिकली,
तैसी जयाची भली, बाह्य क्रिया ॥ ६७१ ॥
अज्ञान तयाचिया ठायीं, ठेविलें असे पाहीं,
याबोला आन नाहीं, सत्य मानीं ॥ ६७२ ॥
आणि गुरुकुळीं लाजे, जो गुरुभक्ती उभजे,
विद्या घेऊनि माजे, गुरूसींचि जो ॥ ६७३ ॥
तयाचें नाम घेणें, तें वाचे शूद्रान्न होणें,
परी घडलें लक्षणें, बोलतां इयें ॥ ६७४ ॥
आता गुरुभक्तांचें नांव घेवों, तेणें वाचेसि प्रायश्चित देवों,
गुरुसेवका नांव पावों, सूर्यु जैसा ॥ ६७५ ॥
येतुलेनि पांगु पापाचा, निस्तरेल हे वाचा,
जो गुरुतल्पगाचा, नामीं आला ॥ ६७६ ॥
हा ठायवरी, तया नामाचें भय हरी,
मग म्हणे अवधारीं, आणिकें चिन्हें ॥ ६७७ ॥
तरि आंगें कर्में ढिला, जो मनें विकल्पें भरला,
अडवींचा अवगळला, कुहा जैसा ॥ ६७८ ॥
तया तोंडीं कांटिवडे, आंतु नुसधीं हाडें,
अशुचि तेणें पाडें, सबाह्य जो ॥ ६७९ ॥
जैसें पोटालागीं सुणें, उघडें झांकलें न म्हणे,
तैसें आपलें परावें नेणे, द्रव्यालागीं ॥ ६८० ॥
इया ग्रामसिंहाचिया ठायीं, जैसा मिळणी ठावो अठावो नाहीं,
तैसा स्त्रीविषयीं कांहीं, विचारीना ॥ ६८१ ॥
कर्माचा वेळु चुके, कां नित्य नैमित्तिक ठाके,
तें जया न दुखे, जीवामाजीं ॥ ६८२ ॥
पापी जो निसुगु, पुण्याविषयीं अतिनिलागु,
जयाचिया मनीं वेगु, विकल्पाचा ॥ ६८३ ॥
तो जाण निखिळा, अज्ञानाचा पुतळा,
जो बांधोनि असे डोळां, वित्ताशेतें ॥ ६८४ ॥
आणि स्वार्थें अळुमाळें, जो धैर्यापासोनि चळे,
जैसें तृणबीज ढळे, मुंगियेचेनी ॥ ६८५ ॥
पावो सूदलिया सवें, जैसें थिल्लर कालवे,
तैसा भयाचेनि नांवें, गजबजे जो ॥ ६८६ ॥
मनोरथांचिया धारसा, वाहणें जयाचिया मानसा,
पूरीं पडिला जैसा, दुधिया पाहीं ॥ ६८७ ॥
वायूचेनि सावायें, धू दिगंतरा जाये,
दुःखवार्ता होये, तसें जया ॥ ६८८ ॥
वाउधणाचिया परी, जो आश्रो कहींचि न धरी,
क्षेत्रीं तीर्थीं पुरीं, थारों नेणे ॥ ६८९ ॥
कां मातलिया सरडा, पुढती बुडुख पुढती शेंडा,
हिंडणवारा कोरडा, तैसा जया ॥ ६९० ॥
जैसा रोविल्याविणें, रांजणु थारों नेणे,
तैसा पडे तैं राहणें, एऱ्हवीं हिंडे ॥ ६९१ ॥
तयाच्या ठायीं उदंड, अज्ञान असे वितंड,
जो चांचल्यें भावंड, मर्कटाचें ॥ ६९२ ॥
आणि पैं गा धनुर्धरा, जयाचिया अंतरा,
नाहीं वोढावारा, संयमाचा ॥ ६९३ ॥
लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरवंडा,
तैसा निषेधाचिया तोंडा, बिहेना जो ॥ ६९४ ॥
व्रतातें आड मोडी, स्वधर्मु पायें वोलांडी,
नियमाची आस तोडी, जयाची क्रिया ॥ ६९५ ॥
नाहीं पापाचा कंटाळा, नेणें पुण्याचा जिव्हाळा,
लाजेचा पेंडवळा, खाणोनि घाली ॥ ६९६ ॥
कुळेंसीं जो पाठमोरा, वेदाज्ञेसीं दुऱ्हा,
कृत्याकृत्यव्यापारा, निवाडु नेणे ॥ ६९७ ॥
वसू जैसा मोकाटु, वारा जैसा अफाटु,
फुटला जैसा पाटु, निर्जनीं ॥ ६९८ ॥
आंधळें हातिरूं मातलें, कां डोंगरीं जैसें पेटलें,
तैसें विषयीं सुटलें, चित्त जयाचें ॥ ६९९ ॥
पैं उबधडां काय न पडे, मोकाटु कोणां नातुडे,
ग्रामद्वारींचे आडें, नोलांडी कोण ॥ ७०० ॥
जैसें सत्रीं अन्न जालें, कीं सामान्या बीक आलें,
वाणसियेचें उभलें, कोण न रिगे ? ॥ ७०१ ॥
तैसें जयाचें अंतःकरण, तयाच्या ठायीं संपूर्ण,
अज्ञानाची जाण, ऋद्धि आहे ॥ ७०२ ॥
आणि विषयांची गोडी, जो जीतु मेला न संडी,
स्वर्गींही खावया जोडी, येथूनिची ॥ ७०३ ॥
जो अखंड भोगा जचे, जया व्यसन काम्यक्रियेचें,
मुख देखोनि विरक्ताचें, सचैल करी ॥ ७०४ ॥
विषो शिणोनि जाये, परि न शिणे सावधु नोहे,
कुहीला हातीं खाये, कोढी जैसा ॥ ७०५ ॥
खरी टेंकों नेदी उडे, लातौनि फोडी नाकाडें,
तऱ्ही जेवीं न काढे, माघौता खरु ॥ ७०६ ॥
तैसा जो विषयांलागीं, उडी घाली जळतिये आगीं,
व्यसनाची आंगीं, लेणीं मिरवी ॥ ७०७ ॥
फुटोनि पडे तंव, मृग वाढवी हांव,
परी न म्हणे ते माव, रोहिणीची ॥ ७०८ ॥
तैसा जन्मोनि मृत्यूवरी, विषयीं त्रासितां बहुतीं परीं,
तऱ्ही त्रासु नेघे धरी, अधिक प्रेम ॥ ७०९ ॥
पहिलिये बाळदशे, आई बा हेंचि पिसें,
तें सरे मग स्त्रीमांसें, भुलोनि ठाके ॥ ७१० ॥
मग स्त्री भोगितां थावों, वृद्धाप्य लागे येवों,
तेव्हां तोचि प्रेमभावो, बाळकांसि आणी ॥ ७११ ॥
आंधळें व्यालें जैसें, तैसा बाळें परिवसे,
परि जीवें मरे तों न त्रासे, विषयांसि जो ॥ ७१२ ॥
जाण तयाच्या ठायीं, अज्ञानासि पारु नाहीं,
आतां आणीक कांहीं, चिन्हें सांगों ॥ ७१३ ॥
तरि देह हाचि आत्मा, ऐसेया जो मनोधर्मा,
वळघोनियां कर्मा, आरंभु करी ॥ ७१४ ॥
आणि उणें कां पुरें, जें जें कांहीं आचरे,
तयाचेनि आविष्करें, कुंथों लागे ॥ ७१५ ॥
डोईये ठेविलेनि भोजें, देवलविसें जेवीं फुंजे,
तैसा विद्यावयसा माजे, उताणा चाले ॥ ७१६ ॥
म्हणे मीचि एकु आथी, माझ्यांचि घरीं संपत्ती,
माझी आचरती रीती, कोणा आहे ॥ ७१७ ॥
नाहीं माझेनि पाडें वाडु, मी सर्वज्ञ एकचि रूढु,
ऐसा गर्वतुष्टीगंडु, घेऊनि ठाके ॥ ७१८ ॥
व्याधि लागलिया माणुसा, नयेचि भोग दाऊं जैसा,
निकें न साहे जो तैसा, पुढिलांचें ॥ ७१९ ॥
पैं गुण तेतुला खाय, स्नेह कीं जाळितु जाय,
जेथ ठेविजे तेथ होय, मसी{ऐ}सें ॥ ७२० ॥
जीवनें शिंपिला तिडपिडी, विजिला प्राण सांडीं,
लागला तरी काडी, उरों नेदी ॥ ७२१ ॥
आळुमाळ प्रकाशु करी, तेतुलेनीच उबारा धरी,
तैसिया दीपाचि परी, सुविद्यु जो ॥ ७२२ ॥
औषधाचेनि नांवें अमृतें, जैसा नवज्वरु आंबुथे,
कां विषचि होऊनि परतें, सर्पा दूध ॥ ७२३ ॥
तैसा सद्गुणीं मत्सरु, व्युत्पत्ती अहंकारु,
तपोज्ञानें अपारु, ताठा चढे ॥ ७२४ ॥
अंत्यु राणिवे बैसविला, आरें धारणु गिळिला,
तैसा गर्वें फुगला, देखसी जो ॥ ७२५ ॥
जो लाटणें ऐसा न लवे, पाथरु तेवीं न द्रवे,
गुणियासि नागवे, फोडसें जैसें ॥ ७२६ ॥
किंबहुना तयापाशी, अज्ञान आहे वाढीसीं,
हें निकरें गा तुजसीं, बोलत असों ॥ ७२७ ॥
आणीकही धनंजया, जो गृहदेह सामग्रिया,
न देखे कालचेया, जन्मातें गा ॥ ७२८ ॥
कृतघ्ना उपकारु केला, कां चोरा व्यवहारु दिधला,
निसुगु स्तविला, विसरे जैसा ॥ ७२९ ॥
वोढाळितां लाविलें, तें तैसेंच कान पूंस वोलें,
कीं पुढती वोढाळुं आलें, सुणें जैसें ॥ ७३० ॥
बेडूक सापाचिया तोंडीं, जातसे सबुडबुडीं,
तो मक्षिकांचिया कोडीं, स्मरेना कांहीं ? ॥ ७३१ ॥
तैसीं नवही द्वारें स्रवती, आंगीं देहाची लुती जिती,
जेणें जाली तें चित्तीं, सलेना जया ॥ ७३२ ॥
मातेच्या उदरकुहरीं, पचूनि विष्ठेच्या दाथरीं,
जठरीं नवमासवरी, उकडला जो ॥ ७३३ ॥
तें गर्भींची जे व्यथा, कां जें जालें उपजतां,
तें कांहींचि सर्वथा, नाठवी जो ॥ ७३४ ॥
मलमूत्रपंकीं, जे लोळतें बाळ अंकीं,
तें देखोनि जो न थुंकीं, त्रासु नेघे ॥ ७३५ ॥
कालचि ना जन्म गेलें, पाहेचि पुढती आलें,
ऐसें हें कांहीं वाटलें, नाहीं जया ॥ ७३६ ॥
आणि पैं तयाची परी, जीविताची फरारी,
देखोनि जो न करी, मृत्युचिंता ॥ ७३७ ॥
जिणेयाचेनि विश्वासें, मृत्यु एक एथ असे,
हें जयाचेनि मानसें, मानिजेना ॥ ७३८ ॥
अल्पोदकींचा मासा, हें नाटे ऐसिया आशा,
न वचेचि कां जैसा, अगाध डोहां ॥ ७३९ ॥
कां गोरीचिया भुली, मृग व्याधा दृष्टी न घाली,
गळु न पाहतां गिळिली, उंडी मीनें ॥ ७४० ॥
दीपाचिया झगमगा, जाळील हें पतंगा,
नेणवेचि पैं गा, जयापरी ॥ ७४१ ॥
गव्हारु निद्रासुखें, घर जळत असे तें न देखे,
नेणतां जेंवी विखें, रांधिलें अन्न ॥ ७४२ ॥
तैसा जीविताचेनि मिषें, हा मृत्युचि आला असे,
हें नेणेचि राजसें, सुखें जो गा ॥ ७४३ ॥
शरीरींचीं वाढी, अहोरात्रांची जोडी,
विषयसुखप्रौढी, साचचि मानी ॥ ७४४ ॥
परी बापुडा ऐसें नेणे, जें वेश्येचें सर्वस्व देणें,
तेंचि तें नागवणें, रूप एथ ॥ ७४५ ॥
संवचोराचें साजणें, तेंचि तें प्राण घेणें,
लेपा स्नपन करणें, तोचि नाशु ॥ ७४६ ॥
पांडुरोगें आंग सुटलें, तें तयाचि नांवे खुंटलें,
तैसें नेणें भुललें, आहारनिद्रा ॥ ७४७ ॥
सन्मुख शूला, धांवतया पायें चपळा,
प्रतिपदीं ये जवळा, मृत्यु जेवीं ॥ ७४८ ॥
तेवीं देहा जंव जंव वाढु, जंव जंव दिवसांचा पवाडु,
जंव जंव सुरवाडु, भोगांचा या ॥ ७४९ ॥
तंव तंव अधिकाधिकें, मरण आयुष्यातें जिंके,
मीठ जेवीं उदकें, घांसिजत असे ॥ ७५० ॥
तैसें जीवित्व जाये, तयास्तव काळु पाहे,
हें हातोहातींचें नव्हे, ठाउकें जया ॥ ७५१ ॥
किंबहुना पांडवा, हा आंगींचा मृत्यु नीच नवा,
न देखे जो मावा। विषयांचिया ॥ ७५२ ॥
तो अज्ञानदेशींचा रावो, या बोला महाबाहो।
न पडे गा ठावो, आणिकांचा ॥ ७५३ ॥
पैं जीविताचेनि तोखें, जैसा कां मृत्यु न देखे,
तैसाचि तारुण्ये पोखें, जरा न गणी ॥ ७५४ ॥
कडाडीं लोटला गाडा, कां शिखरौनि सुटला धोंडा,
तैसा न देखे जो पुढां, वार्धक्य आहे ॥ ७५५ ॥
कां आडवोहळा पाणी आलें, कां जैसे म्हैसयाचें झुंज मातलें,
तैसें तारुण्याचे चढलें, भुररें जया ॥ ७५६ ॥
पुष्टि लागे विघरों, कांति पाहे निसरों,
मस्तक आदरीं शिरों-, भागीं कंप ॥ ७५७ ॥
दाढी साउळ धरी, मान हालौनि वारी,
तरी जो करी, मायेचा पैसु ॥ ७५८ ॥
पुढील उरीं आदळे, तंव न देखे जेवीं आंधळें,
कां डोळ्यावरलें निगळे, आळशी तोषें ॥ ७५९ ॥
तैसें तारुण्य आजिचें, भोगितां वृद्धाप्य पाहेचें,
न देखे तोचि साचें, अज्ञानु गा ॥ ७६० ॥
देखे अक्षमें कुब्जें, कीं विटावूं लागे फुंजें,
परी न म्हणे पाहे माझें, ऐसेंचि भवे ॥ ७६१ ॥
आणि आंगीं वृद्धाप्यतेची, संज्ञा ये मरणाची,
परी जया तारुण्याची, भुली न फिटे ॥ ७६२ ॥
तो अज्ञानाचें घर, हें साचचि घे उत्तर,
तेवींचि परियेसीं थोर, चिन्हें आणिक ॥ ७६३ ॥
तरि वाघाचिये अडवे, एक वेळ आला चरोनि दैवें,
तेणें विश्वासें पुढती धांवे, वसू जैसा ॥ ७६४ ॥
कां सर्पघराआंतु, अवचटें ठेवा आणिला स्वस्थु,
येतुलियासाठीं निश्चितु, नास्तिकु होय ॥ ७६५ ॥
तैसेनि अवचटें हें, एकदोनी वेळां लाहे,
एथ रोग एक आहे, हें मानीना जो ॥ ७६६ ॥
वैरिया नीद आली, आतां द्वंद्वें माझीं सरलीं,
हें मानी तो सपिली, मुकला जेवीं ॥ ७६७ ॥
तैसी आहारनिद्रेची उजरी, रोग निवांतु जोंवरी,
तंव जो न करी, व्याधी चिंता ॥ ७६८ ॥
आणि स्त्रीपुत्रादिमेळें, संपत्ति जंव जंव फळे,
तेणें रजें डोळे, जाती जयाचे ॥ ७६९ ॥
सवेंचि वियोगु पडैल, विळौनी विपत्ति येईल,
हें दुःख पुढील, देखेना जो ॥ ७७० ॥
तो अज्ञान गा पांडवा, आणि तोही तोचि जाणावा,
जो इंद्रियें अव्हासवा, चारी एथ ॥ ७७१ ॥
वयसेचेनि उवायें, संपत्तीचेनि सावायें,
सेव्यासेव्य जाये, सरकटितु ॥ ७७२ ॥
न करावें तें करी, असंभाव्य मनीं धरी,
चिंतू नये तें विचारी, जयाची मती ॥ ७७३ ॥
रिघे जेथ न रिघावें, मागे जें न घ्यावें,
स्पर्शे जेथ न लागावें, आंग मन ॥ ७७४ ॥
न जावें तेथ जाये, न पाहावें तें जो पाहे,
न खावें तें खाये, तेवींचि तोषे ॥ ७७५ ॥
न धरावा तो संगु, न लागावें तेथ लागु,
नाचरावा तो मार्गु, आचरे जो ॥ ७७६ ॥
नायकावें तें आइके, न बोलावें तें बके,
परी दोष होतील हें न देखे, प्रवर्ततां ॥ ७७७ ॥
आंगा मनासि रुचावें, येतुलेनि कृत्याकृत्य नाठवें,
जो करणेयाचेनि नांवें, भलतेंचि करी ॥ ७७८ ॥
परि पाप मज होईल, कां नरकयातना येईल,
हें कांहींचि पुढील, देखेना जो ॥ ७७९ ॥
तयाचेनि आंगलगें, अज्ञान जगीं दाटुगें,
जें सज्ञानाही संगें, झोंबों सके ॥ ७८० ॥
परी असो हें आइक, अज्ञान चिन्हें आणिक,
जेणें तुज सम्यक्, जाणवे तें ॥ ७८१ ॥
तरी जयाची प्रीति पुरी, गुंतली देखसी घरीं,
नवगंधकेसरीं, भ्रमरी जैशी ॥ ७८२ ॥
साकरेचिया राशी, बैसली नुठे माशी,
तैसेनि स्त्रीचित्त आवेशीं, जयाचें मन ॥ ७८३ ॥
ठेला बेडूक कुंडीं, मशक गुंतला शेंबुडीं,
जैसा ढोरु सबुडबुडीं, रुतला पंकीं ॥ ७८४ ॥
तैसें घरींहूनि निघणें, नाहीं जीवें मनें प्राणें,
जया साप होऊनि असणें, भाटीं तियें ॥ ७८५ ॥
प्रियोत्तमाचिया कंठीं, प्रमदा घे आटी,
तैशी जीवेंसी कोंपटी, धरूनि ठाके ॥ ७८६ ॥
मधुरसोद्देशें, मधुकर जचे जैसें,
गृहसंगोपन तैसें, करी जो गा ॥ ७८७ ॥
म्हातारपणीं जालें, मा आणिक एक विपाईलें,
तयाचें कां जेतुलें, मातापितरां ॥ ७८८ ॥
तेतुलेनि पाडें पार्था, घरीं जया प्रेम आस्था,
आणि स्त्रीवांचूनि सर्वथा, जाणेना जो ॥ ७८९ ॥
तैसा स्त्रीदेहीं जो जीवें, पडोनिया सर्वभावें,
कोण मी काय करावें, कांहीं नेणे ॥ ७९० ॥
महापुरुषाचें चित्त, जालिया वस्तुगत,
ठाके व्यवहारजात, जयापरी ॥ ७९१ ॥
हानि लाज न देखे, परापवादु नाइके,
जयाचीं इंद्रियें एकमुखें, स्त्रिया केलीं ॥ ७९२ ॥
चित्त आराधी स्त्रीयेचें, आणि तियेचेनि छंदें नाचे,
माकड गारुडियाचें, जैसें होय ॥ ७९३ ॥
आपणपेंही शिणवी, इष्टमित्र दुखवी,
मग कवडाचि वाढवी, लोभी जैसा ॥ ७९४ ॥
तैसा दानपुण्यें खांची, गोत्रकुटुंबा वंची,
परी गारी भरी स्त्रियेची, उणी हों नेदी ॥ ७९५ ॥
पूजिती दैवतें जोगावी, गुरूतें बोलें झकवी,
मायबापां दावी, निदारपण ॥ ७९६ ॥
स्त्रियेच्या तरी विखीं, भोगुसंपत्ती अनेकीं,
आणी वस्तु निकी, जे जे देखे ॥ ७९७ ॥
प्रेमाथिलेनि भक्तें, जैसेनि भजिजे कुळदैवतें,
तैसा एकाग्रचित्तें, स्त्री जो उपासी ॥ ७९८ ॥
साच आणि चोख, तें स्त्रियेसीचि अशेख,
येरांविषयीं जोगावणूक, तेही नाहीं ॥ ७९९ ॥
इयेतें हन कोणी देखैल, इयेसी वेखासें जाईल,
तरी युगचि बुडैल, ऐसें जया ॥ ८०० ॥
नायट्यांभेण, न मोडिजे नागांची आण,
तैसी पाळी उणखुण, स्त्रीयेची जो ॥ ८०१ ॥
किंबहुना धनंजया, स्त्रीचि सर्वस्व जया,
आणि तियेचिया जालिया-, लागीं प्रेम ॥ ८०२ ॥
आणिकही जें समस्त, तियेचें संपत्तिजात,
तें जीवाहूनि आप्त, मानी जो कां ॥ ८०३ ॥
तो अज्ञानासी मूळ, अज्ञाना त्याचेनि बळ,
हें असो केवळ, तेंचि रूप ॥ ८०४ ॥
आणि मातलिया सागरीं, मोकललिया तरी,
लाटांच्या येरझारीं, आंदोळे जेवीं ॥ ८०५ ॥
तेवीं प्रिय वस्तु पावे, आणि सुखें जो उंचावे,
तैसाचि अप्रियासवें, तळवटु घे ॥ ८०६ ॥
ऐसेनि जयाचे चित्तीं, वैषम्यसाम्याची वोखती,
वाहे तो महामती, अज्ञान गा ॥ ८०७ ॥
आणि माझ्या ठायीं भक्ती, फळालागीं जया आर्ती,
धनोद्देशें विरक्ती, नटणें जेवीं ॥ ८०८ ॥
नातरी कांताच्या मानसी, रिगोनि स्वैरिणी जैसी,
राहाटे जारेंसीं, जावयालागीं ॥ ८०९ ॥
तैसा मातें किरीटी, भजती गा पाउटी,
करूनि जो दिठी, विषो सूये ॥ ८१० ॥
आणि भजिन्नलियासवें, तो विषो जरी न पावे,
तरी सांडी म्हणे आघवें, टवाळ हें ॥ ८११ ॥
कुणबट कुळवाडी, तैसा आन आन देव मांडी,
आदिलाची परवडी, करी तया ॥ ८१२ ॥
तया गुरुमार्गा टेंकें, जयाचा सुगरवा देखे,
तरी तयाचा मंत्र शिके, येरु नेघे ॥ ८१३ ॥
प्राणिजातेंसीं निष्ठुरु, स्थावरीं बहु भरु,
तेवींचि नाहीं एकसरु, निर्वाहो जया ॥ ८१४ ॥
माझी मूर्ति निफजवी, ते घराचे कोनीं बैसवी,
आपण देवो देवी, यात्रे जाय ॥ ८१५ ॥
नित्य आराधन माझें, काजीं कुळदैवता भजे,
पर्वविशेषें कीजे, पूजा आना ॥ ८१६ ॥
माझें अधिष्ठान घरीं, आणि वोवसे आनाचे करी,
पितृकार्यावसरीं, पितरांचा होय ॥ ८१७ ॥
एकादशीच्या दिवशीं, जेतुला पाडु आम्हांसी,
तेतुलाचि नागांसी, पंचमीच्या दिवशीं ॥ ८१८ ॥
चौथ मोटकी पाहे, आणि गणेशाचाचि होये,
चावदसी म्हणे माये, तुझाचि वो दुर्गे ॥ ८१९ ॥
नित्य नैमित्तिकें कर्में सांडी, मग बैसे नवचंडी,
आदित्यवारीं वाढी, बहिरवां पात्रीं ॥ ८२० ॥
पाठीं सोमवार पावे, आणि बेलेंसी लिंगा धांवे,
ऐसा एकलाचि आघवे, जोगावी जो ॥ ८२१ ॥
ऐसा अखंड भजन करी, उगा नोहे क्षणभरी,
अवघेन गांवद्वारीं, अहेव जैसी ॥ ८२२ ॥
ऐसेनि जो भक्तु, देखसी सैरा धांवतु,
जाण अज्ञानाचा मूर्तु, अवतार तो ॥ ८२३ ॥
आणि एकांतें चोखटें, तपोवनें तीर्थे तटें,
देखोनि जो गा विटे, तोहि तोचि ॥ ८२४ ॥
जया जनपदीं सुख, गजबजेचें कवतिक,
वानूं आवडे लौकिक, तोहि तोची ॥ ८२५ ॥
आणि आत्मा गोचरु होये, ऐसी जे विद्या आहे,
ते आइकोनि डौर वाहे, विद्वांसु जो ॥ ८२६ ॥
उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे,
अध्यात्मज्ञानीं जयाचें, मनचि नाहीं ॥ ८२७ ॥
आत्मचर्चा एकी आथी, ऐसिये बुद्धीची भिंती,
पाडूनि जयाची मती, वोढाळ जाहली ॥ ८२८ ॥
कर्मकांड तरी जाणे, मुखोद्गत पुराणें,
ज्योतिषीं तो म्हणे, तैसेंचि होय ॥ ८२९ ॥
शिल्पीं अति निपुण, सूपकर्मींही प्रवीण,
विधि आथर्वण, हातीं आथी ॥ ८३० ॥
कोकीं नाहीं ठेलें, भारत करी म्हणितलें,
आगम आफाविले, मूर्त होतीं ॥ ८३१ ॥
नीतिजात सुझे, वैद्यकही बुझे,
काव्यनाटकीं दुजें, चतुर नाहीं ॥ ८३२ ॥
स्मृतींची चर्चा, दंशु जाणे गारुडियाचा,
निघंटु प्रज्ञेचा, पाइकी करी ॥ ८३३ ॥
पैं व्याकरणीं चोखडा, तर्कीं अतिगाढा,
परी एक आत्मज्ञानीं फुडा, जात्यंधु जो ॥ ८३४ ॥
तें एकवांचूनि आघवां शास्त्रीं, सिद्धांत निर्माणधात्री,
परी जळों तें मूळनक्षत्रीं, न पाहें गा ॥ ८३५ ॥
मोराआंगीं अशेषें, पिसें असतीं डोळसें,
परी एकली दृष्टि नसे, तैसें तें गा ॥ ८३६ ॥
जरी परमाणू{ए}वढें, संजीवनीमूळ जोडे,
तरी बहु काय गाडे, भरणें येरें ? ॥ ८३७ ॥
आयुष्येंवीण लक्षणें, सिसेंवीण अळंकरणें,
वोहरेंवीण वाधावणें, तो विटंबु गा ॥ ८३८ ॥
तैसें शास्त्रजात जाण, आघवेंचि अप्रमाण,
अध्यात्मज्ञानेंविण, एकलेनी ॥ ८३९ ॥
यालागीं अर्जुना पाहीं, अध्यात्मज्ञानाच्या ठायीं,
जया नित्यबोधु नाहीं, शास्त्रमूढा ॥ ८४० ॥
तया शरीर जें जालें, तें अज्ञानाचें बीं विरुढलें,
तयाचें व्युत्पन्नत्व गेलें, अज्ञानवेलीं ॥ ८४१ ॥
तो जें जें बोले, तें अज्ञानचि फुललें,
तयाचें पुण्य जें फळलें, तें अज्ञान गा ॥ ८४२ ॥
आणि अध्यात्मज्ञान कांहीं, जेणें मानिलेंचि नाहीं,
तो ज्ञानार्थु न देखे काई, हें बोलावें असें ? ॥ ८४३ ॥
ऐलीचि थडी न पवतां, पळे जो माघौता,
तया पैलद्वीपींची वार्ता, काय होय ? ॥ ८४४ ॥
कां दारवंठाचि जयाचें, शीर रोंविलें खांचे,
तो केवीं परिवरींचें, ठेविलें देखे ? ॥ ८४५ ॥
तेवीं अध्यात्मज्ञानीं जया, अनोळख धनंजया,
तया ज्ञानार्थु देखावया, विषो काई ? ॥ ८४६ ॥
म्हणौनि आतां विशेषें, तो ज्ञानाचें तत्त्व न देखे,
हें सांगावें आंखेंलेखें, न लगे तुज ॥ ८४७ ॥
जेव्हां सगर्भे वाढिलें, तेव्हांचि पोटींचें धालें,
तैसें मागिलें पदें बोलिलें, तेंचि होय ॥ ८४८ ॥
वांचूनियां वेगळें, रूप करणें हें न मिळे,
जेवीं अवंतिलें आंधळें, तें दुजेनसीं ये ॥ ८४९ ॥
एवं इये उपरतीं, अज्ञानचिन्हें मागुतीं,
अमानित्वादि प्रभृती, वाखाणिलीं ॥ ८५० ॥
जे ज्ञानपदें अठरा, केलियां येरी मोहरां,
अज्ञान या आकारा, सहजें येती ॥ ८५१ ॥
मागां श्लोकाचेनि अर्धार्धें, ऐसें सांगितलें श्रीमुकुंदें,
ना उफराटीं इयें ज्ञानपदें, तेंचि अज्ञान ॥ ८५२ ॥
म्हणौनि इया वाहणीं, केली म्यां उपलवणी,
वांचूनि दुधा मेळऊनि पाणी, फार कीजे ? ॥ ८५३ ॥
तैसें जी न बडबडीं, पदाची कोर न सांडी,
परी मूळध्वनींचिये वाढी, निमित्त जाहलों ॥ ८५४ ॥
तंव श्रोते म्हणती राहें, कें परिहारा ठावो आहे ?,
बिहिसी कां वायें, कविपोषका ? ॥ ८५५ ॥
तूतें श्रीमुरारी, म्हणितलें आम्ही प्रकट करीं,
जें अभिप्राय गव्हरीं, झांकिले आम्हीं ॥ ८५६ ॥
तें देवाचें मनोगत, दावित आहासी तूं मूर्त,
हेंही म्हणतां चित्त, दाटैल तुझें ॥ ८५७ ॥
म्हणौनि असो हें न बोलों, परि साविया गा तोषलों,
जे ज्ञानतरिये मेळविलों, श्रवण सुखाचिये ॥ ८५८ ॥
आतां इयावरी, जे तो श्रीहरी,
बोलिला तें करीं, कथन वेगां ॥ ८५९ ॥
इया संतवाक्यासरिसें, म्हणितलें निवृत्तिदासें,
जी अवधारा तरी ऐसें, बोलिलें देवें ॥ ८६० ॥
म्हणती तुवां पांडवा, हा चिन्हसमुच्चयो आघवा,
आयकिला तो जाणावा, अज्ञानभागु ॥ ८६१ ॥
इया अज्ञानविभागा, पाठी देऊनि पैं गा,
ज्ञानविखीं चांगा, दृढा होईजे ॥ ८६२ ॥
मग निर्वाळिलेनि ज्ञानें, ज्ञेय भेटेल मनें,
तें जाणावया अर्जुनें, आस केली ॥ ८६३ ॥
तंव सर्वज्ञांचा रावो, म्हणे जाणौनि तयाचा भावो,
परिसें ज्ञेयाचा अभिप्रावो, सांगों आतां ॥ ८६४ ॥


ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्यामि यज्ञात्वा~मृतमश्नुते ॥
अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते ॥ १२॥


तरि ज्ञेय ऐसें म्हणणें, वस्तूतें येणेंचि कारणें,
जें ज्ञानेंवांचूनि कवणें, उपायें नये ॥ ८६५ ॥
आणि जाणितलेयावरौतें, कांहींच करणें नाहीं जेथें,
जाणणेंचि तन्मयातें, आणी जयाचें ॥ ८६६ ॥
जें जाणितलेयासाठीं, संसार काढूनियां कांठीं,
जिरोनि जाइजे पोटीं, नित्यानंदाच्या ॥ ८६७ ॥
तें ज्ञेय गा ऐसें, आदि जया नसे,
परब्रह्म आपैसें, नाम जया ॥ ८६८ ॥
जें नाहीं म्हणों जाइजे, तंव विश्वाकारें देखिजे,
आणि विश्वचि ऐसें म्हणिजे, तरि हे माया ॥ ८६९ ॥
रूप वर्ण व्यक्ती, नाहीं दृश्य दृष्टा स्थिती,
तरी कोणें कैसें आथी, म्हणावें पां ॥ ८७० ॥
आणि साचचि जरी नाहीं, तरी महदादि कोणें ठाईं,
स्फुरत कैचें काई, तेणेंवीण असे ? ॥ ८७१ ॥
म्हणौनि आथी नाथी हे बोली, जें देखोनि मुकी जाहली,
विचारेंसीं मोडली, वाट जेथें ॥ ८७२ ॥
जैसी भांडघटशरावीं, तदाकारें असे पृथ्वी,
तैसें सर्व होऊनियां सर्वीं, असे जे वस्तु ॥ ८७३ ॥


सर्वतः पाणिपादं तत्सर्वतो~क्षिशिरोमुखम्।
सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति ॥ १३॥


आघवांचि देशीं काळीं, नव्हतां देशकाळांवेगळी,
जे क्रिया स्थूळास्थूळीं, तेचि हात जयाचे ॥ ८७४ ॥
तयातें याकारणें, विश्वबाहू ऐसें म्हणणें,
जें सर्वचि सर्वपणें, सर्वदा करी ॥ ८७५ ॥
आणि समस्तांही ठाया, एके काळीं धनंजया,
आलें असे म्हणौनि जया, विश्वांघ्रीनाम ॥ ८७६ ॥
पैं सवितया आंग डोळे, नाहींत वेगळे वेगळे,
तैसें सर्वद्रष्टे सकळें, स्वरूपें जें ॥ ८७७ ॥
म्हणौनि विश्वतश्चक्षु, हा अचक्षूच्या ठायीं पक्षु,
बोलावया दक्षु, जाहला वेदु ॥ ८७८ ॥
जें सर्वांचे शिरावरी, नित्य नांदे सर्वांपरी,
ऐसिये स्थितीवरी, विश्वमूर्धा म्हणिपे ॥ ८७९ ॥
पैं गा मूर्ति तेंचि मुख, हुताशना जैसें देख,
तैसें सर्वपणें अशेख, भोक्ते जे ॥ ८८० ॥
यालागीं तया पार्था, विश्वतोमुख हे व्यवस्था,
आली वाक्पथा, श्रुतीचिया ॥ ८८१ ॥
आणि वस्तुमात्रीं गगन, जैसें असे संलग्न,
तैसें शब्दजातीं कान, सर्वत्र जया ॥ ८८२ ॥
म्हणौनि आम्हीं तयातें, म्हणों सर्वत्र आइकतें,
एवं जें सर्वांतें, आवरूनि असे ॥ ८८३ ॥
एऱ्हवीं तरी महामती, विश्वतश्चक्षु इया श्रुती,
तयाचिया व्याप्ती, रूप केलें ॥ ८८४ ॥
वांचूनि हस्त नेत्र पाये, हें भाष तेथ कें आहे ?,
सर्व शून्याचा न साहे, निष्कर्षु जें ॥ ८८५ ॥
पैं कल्लोळातें कल्लोळें, ग्रसिजत असे ऐसें कळे,
परी ग्रसितें ग्रासावेगळें, असे काई ? ॥ ८८६ ॥
तैसें साचचि जें एक, तेथ कें व्याप्यव्यापक ?,
परी बोलावया नावेक, करावें लागे ॥ ८८७ ॥
पैं शून्य जैं दावावें जाहलें, तैं बिंदुलें एक पाहिजे केलें,
तैसें अद्वैत सांगावें बोलें, तैं द्वैत कीजे ॥ ८८८ ॥
एऱ्हवीं तरी पार्था, गुरुशिष्यसत्पथा,
आडळु पडे सर्वथा, बोल खुंटे ॥ ८८९ ॥
म्हणौनि गा श्रुती, द्वैतभावें अद्वैतीं,
निरूपणाची वाहती, वाट केली ॥ ८९० ॥
तेंचि आतां अवधारीं, इये नेत्रगोचरें आकारीं,
तें ज्ञेय जयापरी, व्यापक असे ॥ ८९१ ॥


सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम्।
असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च ॥ १४॥


तरी तें गा किरीटी ऐसें, अवकाशीं आकाश जैसें,
पटीं पटु होऊनि असे, तंतु जेवीं ॥ ८९२ ॥
उदक होऊनि उदकीं, रसु जैसा अवलोकीं,
दीपपणें दीपकीं, तेज जैसें ॥ ८९३ ॥
कर्पूरत्वें कापुरीं, सौरभ्य असे जयापरी,
शरीर होऊनि शरीरीं, कर्म जेवीं ॥ ८९४ ॥
किंबहुना पांडवा, सोनेंचि सोनयाचा रवा,
तैसें जें या सर्वां, सर्वांगीं असे ॥ ८९५ ॥
परी रवेपणामाजिवडे, तंव रवा ऐसें आवडे,
वांचूनि सोनें सांगडें, सोनया जेवीं ॥ ८९६ ॥
पैं गा वोघुचि वांकुडा, परि पाणी उजू सुहाडा,
वन्हि आला लोखंडा, लोह नव्हे कीं ॥ ८९७ ॥
घटाकारें वेंटाळें, तेथ नभ गमे वाटोळें,
मठीं तरी चौफळें, आये दिसे ॥ ८९८ ॥
तरि ते अवकाश जैसें, नोहिजतीचि कां आकाशें,
जें विकार होऊनि तैसें, विकारी नोहे ॥ ८९९ ॥
मन मुख्य इंद्रियां, सत्त्वादि गुणां ययां-,
सारिखें ऐसें धनंजया, आवडे कीर ॥ ९०० ॥
पैं गुळाची गोडी, नोहे बांधया सांगडी,
तैसीं गुण इंद्रियें फुडीं, नाहीं तेथ ॥ ९०१ ॥
अगा क्षीराचिये दशे, घृत क्षीराकारें असे,
परी क्षीरचि नोहे जैसें, कपिध्वजा ॥ ९०२ ॥
तैसें जें इये विकारीं, विकार नोहे अवधारीं,
पैं आकारा नाम भोंवरी, येर सोने तें सोनें ॥ ९०३ ॥
इया उघड मऱ्हाटिया, तें वेगळेपण धनंजया,
जाण गुण इंद्रियां-, पासोनियां ॥ ९०४ ॥
नामरूपसंबंधु, जातिक्रियाभेदु,
हा आकारासीच प्रवादु, वस्तूसि नाहीं ॥ ९०५ ॥
तें गुण नव्हे कहीं, गुणा तया संबंधु नाहीं,
परी तयाच्याचि ठायीं, आभासती ॥ ९०६ ॥
येतुलेयासाठीं, संभ्रांताच्या पोटीं,
ऐसें जाय किरीटी, जे हेंचि धरी ॥ ९०७ ॥
तरी तें गा धरणें ऐसें, अभ्रातें जेवीं आकाशें,
कां प्रतिवदन जैसें, आरसेनी ॥ ९०८ ॥
नातरी सूर्य प्रतिमंडल, जैसेनि धरी सलिल,
कां रश्मिकरीं मृगजळ, धरिजे जेवीं ॥ ९०९ ॥
तैसें गा संबंधेंवीण, यया सर्वांतें धरी निर्गुण,
परी तें वायां जाण, मिथ्यादृष्टी ॥ ९१० ॥
आणि यापरी निर्गुणें, गुणातें भोगणें,
रंका राज्य करणें, स्वप्नीं जैसें ॥ ९११ ॥
म्हणौनि गुणाचा संगु, अथवा गुणभोगु,
हा निर्गुणीं लागु, बोलों नये ॥ ९१२ ॥


बहिरन्तश्च भूतानामचरं चरमेव च।
सूक्षमत्वात्तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् ॥ १५॥


जें चराचर भूतां-, माजीं असे पंडुसुता,
नाना वन्हीं उष्णता, अभेदें जैसी ॥ ९१३ ॥
तैसेनि अविनाशभावें, जें सूक्ष्मदशे आघवें,
व्यापूनि असे तें जाणावें, ज्ञेय एथ ॥ ९१४ ॥
जें एक आंतुबाहेरी, जें एक जवळ दुरी,
जें एकवांचूनि परी, दुजीं नाहीं ॥ ९१५ ॥
क्षीरसागरींची गोडी, माजीं बहु थडिये थोडी,
हें नाहीं तया परवडी, पूर्ण जें गा ॥ ९१६ ॥
स्वेदजादिप्रभृती, वेगळाल्यां भूतीं,
जयाचिये अनुस्यूतीं, खोमणें नाहीं ॥ ९१७ ॥
पैं श्रोते मुखटिळका, घटसहस्रा अनेकां-,
माजीं बिंबोनि चंद्रिका, न भेदे जेवीं ॥ ९१८ ॥
नाना लवणकणाचिये राशी, क्षारता एकचि जैसी,
कां कोडी एकीं ऊसीं, एकचि गोडी ॥ ९१९ ॥


अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं।
भूतभर्तृ च तज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च ॥ १६॥


तैसें अनेकीं भूतजातीं, जें आहे एकी व्याप्ती,
विश्वकार्या सुमती, कारण जें गा ॥ ९२० ॥
म्हणौनि हा भूताकारु, जेथोनि तेंचि तया आधारु,
कल्लोळा सागरु, जियापरी ॥ ९२१ ॥
बाल्यादि तिन्हीं वयसीं, काया एकचि जैसी,
तैसें आदिस्थितिग्रासीं, अखंड जें ॥ ९२२ ॥
सायंप्रातर्मध्यान, होतां जातां दिनमान,
जैसें कां गगन, पालटेना ॥ ९२३ ॥
अगा सृष्टिवेळे प्रियोत्तमा, जया नांव म्हणती ब्रह्मा,
व्याप्ति जें विष्णुनामा, पात्र जाहलें ॥ ९२४ ॥
मग आकारु हा हारपे, तेव्हां रुद्र जें म्हणिपे,
तेंही गुणत्रय जेव्हां लोपे, तैं जें शून्य ॥ ९२५ ॥
नभाचें शून्यत्व गिळून, गुणत्रयातें नुरऊन,
तें शून्य तें महाशून्य, श्रुतिवचनसंमत ॥ ९२६ ॥


ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते।
ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विस्ठितम् ॥ १७॥


जें अग्नीचें दीपन, जें चंद्राचें जीवन,
सूर्याचे नयन, देखती जेणें ॥ ९२७ ॥
जयाचेनि उजियेडें, तारांगण उभडें,
महातेज सुरवाडें, राहाटे जेणें ॥ ९२८ ॥
जें आदीची आदी, जें वृद्धीची वृद्धी,
बुद्धीची जे बुद्धी, जीवाचा जीवु ॥ ९२९ ॥
जें मनाचें मन, जें नेत्राचे नयन,
कानाचे कान, वाचेची वाचा ॥ ९३० ॥
जें प्राणाचा प्राण, जें गतीचे चरण,
क्रियेचें कर्तेपण, जयाचेनि ॥ ९३१ ॥
आकारु जेणें आकारे, विस्तारु जेणें विस्तारे,
संहारु जेणें संहारे, पंडुकुमरा ॥ ९३२ ॥
जें मेदिनीची मेदिनी, जें पाणी पिऊनि असे पाणी,
तेजा दिवेलावणी, जेणें तेजें ॥ ९३३ ॥
जें वायूचा श्वासोश्वासु, जें गगनाचा अवकाशु,
हें असो आघवाची आभासु, आभासे जेणें ॥ ९३४ ॥
किंबहुना पांडवा, जें आघवेंचि असे आघवा,
जेथ नाहीं रिगावा, द्वैतभावासी ॥ ९३५ ॥
जें देखिलियाचिसवें, दृश्य द्रष्टा हें आघवें,
एकवाट कालवे, सामरस्यें ॥ ९३६ ॥
मग तेंचि होय ज्ञान, ज्ञाता ज्ञेय हन,
ज्ञानें गमिजे स्थान, तेंहि तेंची ॥ ९३७ ॥
जैसें सरलियां लेख, आंख होती एक,
तैसें साध्यसाधनादिक, ऐक्यासि ये ॥ ९३८ ॥
अर्जुना जिये ठायीं, न सरे द्वैताची वही,
हें असो जें हृदयीं, सर्वांच्या असे ॥ ९३९ ॥


इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः।
मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते ॥ १८॥


एवं तुजपुढां, आदीं क्षेत्र सुहाडा,
दाविलें फाडोवाडां, विवंचुनी ॥ ९४० ॥
तैसेंचि क्षेत्रापाठीं, जैसेनि देखसी दिठी,
तें ज्ञानही किरीटी, सांगितलें ॥ ९४१ ॥
अज्ञानाही कौतुकें, रूप केलें निकें,
जंव आयणी तुझी टेंके, पुरे म्हणे ॥ ९४२ ॥
आणि आतां हें रोकडें, उपपत्तीचेनि पवाडें,
निरूपिलें उघडें, ज्ञेय पैं गा ॥ ९४३ ॥
हे आघवीच विवंचना, बुद्धी भरोनि अर्जुना,
मत्सिद्धिभावना, माझिया येती ॥ ९४४ ॥
देहादि परिग्रहीं, संन्यासु करूनियां जिहीं,
जीवु माझ्या ठाईं, वृत्तिकु केला ॥ ९४५ ॥
ते मातें किरीटी, हेंचि जाणौनियां शेवटीं,
आपणपयां साटोवाटीं, मीचि होती ॥ ९४६ ॥
मीचि होती परी, हे मुख्य गा अवधारीं,
सोहोपी सर्वांपरी, रचिलीं आम्हीं ॥ ९४७ ॥
कडां पायरी कीजे, निराळीं माचु बांधिजे,
अथावीं सुइजे, तरी जैसी ॥ ९४८ ॥
एऱ्हवीं अवघेंचि आत्मा, हें सांगों जरी वीरोत्तमा,
परी तुझिया मनोधर्मा, मिळेल ना ॥ ९४९ ॥
म्हणौनि एकचि संचलें, चतुर्धा आम्हीं केलें,
जें अदळपण देखिलें, तुझिये प्रज्ञे ॥ ९५० ॥
पैं बाळ जैं जेवविजे, तैं घांसु विसा ठायीं कीजे,
तैसें एकचि हेंचतुर्व्याजें, कथिलें आम्हीं ॥ ९५१ ॥
एक क्षेत्र एक ज्ञान, एक ज्ञेय एक अज्ञान,
हे भाग केले अवधान, जाणौनि तुझें ॥ ९५२ ॥
आणि ऐसेनही पार्था, जरी हा अभिप्रावो तुज हाता,
नये तरी हे व्यवस्था, एक वेळ सांगों ॥ ९५३ ॥
आतां चौठायीं न करूं, एकही म्हणौनि न सरूं,
आत्मानात्मया धरूं, सरिसा पाडु ॥ ९५४ ॥
परि तुवां येतुलें करावें, मागों तें आम्हां देआवें,
जे कानचि नांव ठेवावें, आपण पैं गा ॥ ९५५ ॥
या श्रीकृष्णाचिया बोला, पार्थु रोमांचितु जाहला,
तेथ देवो म्हणती भला, उचंबळेना ॥ ९५६ ॥
ऐसेनि तो येतां वेगु, धरूनि म्हणे श्रीरंगु,
प्रकृतिपुरुषविभागु, परिसें सांगों ॥ ९५७ ॥


प्रकृतिं पुरुषं चैव विद्ध्यनादी उभावपि।
विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसंभवान् ॥ १९॥


जया मार्गातें जगीं, सांख्य म्हणती योगी,
जयाचिये भाटिवेलागीं, मी कपिल जाहलों ॥ ९५८ ॥
तो आइक निर्दोखु, प्रकृतिपुरुषविवेकु,
म्हणे आदिपुरुखु, अर्जुनातें ॥ ९५९ ॥
तरी पुरुष अनादि आथी, आणि तैंचि लागोनि प्रकृति,
संसरिसी दिवोराती, दोनी जैसी ॥ ९६० ॥
कां रूप नोहे वायां, परी रूपा लागली छाया,
निकणु वाढे धनंजया, कणेंसीं कोंडा ॥ ९६१ ॥
तैसीं जाण जवटें, दोन्हीं इयें एकवटे,
प्रकृतिपुरुष प्रगटें, अनादिसिद्धें ॥ ९६२ ॥
पैं क्षेत्र येणें नांवें, जें सांगितलें आघवें,
तेंचि एथ जाणावें, प्रकृति हे गा ॥ ९६३ ॥
आणि क्षेत्रज्ञ ऐसें, जयातें म्हणितलें असे,
तो पुरुष हें अनारिसे, न बोलों घेईं ॥ ९६४ ॥
इयें आनानें नांवें, परी निरूप्य आन नोहे,
हें लक्षण न चुकावें, पुढतपुढती ॥ ९६५ ॥
तरी केवळ जे सत्ता, तो पुरुष गा पंडुसुता,
प्रकृतीतें समस्तां, क्रिया नाम ॥ ९६६ ॥
बुद्धि इंद्रियें अंतःकरण, इत्यादि विकारभरण,
आणि ते तिन्ही गुण, सत्त्वादिक ॥ ९६७ ॥
हा आघवाचि मेळावा, प्रकृती जाहला जाणावा,
हेचि हेतु संभवा, कर्माचिया ॥ ९६८ ॥


कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते।
पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते ॥ २०॥


तेथ इच्छा आणि बुद्धि, घडवी अहंकारेंसीं आधीं,
मग तिया लाविती वेधीं, कारणाच्या ॥ ९६९ ॥
तेंचि कारण ठाकावया, जें सूत्र धरणें उपाया,
तया नांव धनंजया, कार्य पैं गा ॥ ९७० ॥
आणि इच्छा मदाच्या थावीं, लागली मनातें उठवी,
तें इंद्रियें राहाटवी, हें कर्तृत्व पैं गा ॥ ९७१ ॥
म्हणौनि तीन्ही या जाणा, कार्यकर्तृत्वकारणा,
प्रकृति मूळ हे राणा, सिद्धांचा म्हणे ॥ ९७२ ॥
एवं तिहींचेनि समवायें, प्रकृति कर्मरूप होये,
परी जया गुणा वाढे त्राये, त्याचि सारिखी ॥ ९७३ ॥
जें सत्त्वगुणें अधिष्ठिजे, तें सत्कर्म म्हणिजे,
रजोगुणें निफजे, मध्यम तें ॥ ९७४ ॥
जें कां केवळ तमें, होती जियें कर्में,
निषिद्धें अधमें, जाण तियें ॥ ९७५ ॥
ऐसेनि संतासंतें, कर्में प्रकृतीस्तव होतें,
तयापासोनि निर्वाळतें, सुखदुःख गा ॥ ९७६ ॥
असंतीं दुःख उपजे, सत्कर्मीं सुख निफजे,
तया दोहींचा बोलिजे, भोगु पुरुषा ॥ ९७७ ॥
सुखदुःखें जंववरी, निफजती साचोकारीं,
तंव प्रकृति उद्यमु करी, पुरुषु भोगी ॥ ९७८ ॥
प्रकृतिपुरुषांची कुळवाडी, सांगतां असंगडी,
जे आंबुली जोडी, आंबुला खाय ॥ ९७९ ॥
आंबुला आंबुलिये, संगती ना सोये,
कीं आंबुली जग विये, चोज ऐका ॥ ९८० ॥


पुरुषः प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान्गुणान्।
कारणं गुण संगोऽस्य सदसद्योनिजन्मसु ॥ २१॥


जे अनंगु तो पेंधा, निकवडा नुसधा,
जीर्णु अतिवृद्धा-, पासोनि वृद्धु ॥ ९८१ ॥
तया आडनांव पुरुषु, एऱ्हवीं स्त्री ना नपुंसकु,
किंबहुना एकु, निश्चयो नाहीं ॥ ९८२ ॥
तो अचक्षु अश्रवणु, अहस्तु अचरणु,
रूप ना वर्णु, नाम आथी ॥ ९८३ ॥
अर्जुना कांहींचि जेथ नाहीं, तो प्रकृतीचा भर्ता पाहीं,
कीं भोगणें ऐसयाही, सुखदुःखांचें ॥ ९८४ ॥
तो तरी अकर्ता, उदासु अभोक्ता,
परी इया पतिव्रता, भोगविजे ॥ ९८५ ॥
जियेतें अळुमाळु, रूपागुणाचा चाळढाळु,
ते भलतैसाही खेळु, लेखा आणी ॥ ९८६ ॥
मा इये प्रकृती तंव, गुणमयी हेंचि नांव,
किंबहुना सावेव, गुण तेचि हे ॥ ९८७ ॥
हे प्रतिक्षणीं नीत्य नवी, रूपा गुणाचीच आघवी,
जडातेंही माजवी, इयेचा माजु ॥ ९८८ ॥
नामें इयें प्रसिद्धें, स्नेहो इया स्निग्धें,
इंद्रियें प्रबुद्धें, इयेचेनि ॥ ९८९ ॥
कायि मन हें नपुंसक, कीं ते भोगवी तिन्ही लोक,
ऐसें ऐसें अलौकिक, करणें इयेचें ॥ ९९० ॥
हे भ्रमाचे महाद्वीप, व्याप्तीचें रूप,
विकार उमप, इया केले ॥ ९९१ ॥
हे कामाची मांडवी, हे मोहवनींची माधवी,
इये प्रसिद्धचि दैवी, माया हे नाम ॥ ९९२ ॥
हे वाङ्मयाची वाढी, हे साकारपणाची जोडी,
प्रपंचाची धाडी, अभंग हे ॥ ९९३ ॥
कळा एथुनि जालिया, विद्या इयेच्या केलिया,
इच्छा ज्ञान क्रिया, वियाली हे ॥ ९९४ ॥
हे नादाची टांकसाळ, हे चमत्काराचें वेळाउळ,
किंबहुना सकळ, खेळु इयेचा ॥ ९९५ ॥
जे उत्पत्ति प्रलयो होत, ते इयेचे सायंप्रात,
हें असो अद्भुत, मोहन हे ॥ ९९६ ॥
हे अद्वयाचें दुसरें, हे निःसंगाचें सोयरे,
निराळेंसि घरें, नांदत असे ॥ ९९७ ॥
इयेतें येतुलावरी, सौभाग्यव्याप्तीची थोरी,
म्हणौनि तया आवरी, अनावरातें ॥ ९९८ ॥
तयाच्या तंव ठायीं, निपटूनि कांहींचि नाहीं,
कीं तया आघवेहीं, आपणचि होय ॥ ९९९ ॥
तया स्वयंभाची संभूती, तया अमूर्ताची मूर्ती,
आपण होय स्थिती, ठावो तया ॥ १००० ॥
तया अनार्ताची आर्ती, तया पूर्णाची तृप्ती,
तया अकुळाची जाती-, गोत होय ॥ १००१ ॥
तया अचर्चाचें चिन्ह, तया अपाराचें मान,
तया अमनस्काचें मन, बुद्धीही होय ॥ १००२ ॥
तया निराकाराचा आकारु, तया निर्व्यापाराचा व्यापारु,
निरहंकाराचा अहंकारु, होऊनि ठाके ॥ १००३ ॥
तया अनामाचें नाम, तया अजाचें जन्म,
आपण होय कर्म-, क्रिया तया ॥ १००४ ॥
तया निर्गुणाचे गुण, तया अचरणाचे चरण,
तया अश्रवणाचे श्रवण, अचक्षूचे चक्षु ॥ १००५ ॥
तया भावातीताचे भाव, तया निरवयवाचे अवयव,
किंबहुना होय सर्व, पुरुषाचें हे ॥ १००६ ॥
ऐसेनि इया प्रकृती, आपुलिया सर्व व्याप्ती,
तया अविकारातें विकृती-, माजीं कीजे ॥ १००७ ॥
तेथ पुरुषत्व जें असे, तें ये इये प्रकृतिदशे,
चंद्रमा अंवसे, पडिला जैसा ॥ १००८ ॥
विदळ बहु चोखा, मीनलिया वाला एका,
कसु होय पांचका, जयापरी ॥ १००९ ॥
कां साधूतें गोंधळी, संचारोनि सुये मैळी,
नाना सुदिनाचा आभाळीं, दुर्दिनु कीजे ॥ १०१० ॥
जेवीं पय पशूच्या पोटीं, कां वन्हि जैसा काष्ठीं,
गुंडूनि घेतला पटीं, रत्नदीपु ॥ १०११ ॥
राजा पराधीनु जाहला, कां सिंहु रोगें रुंधला,
तैसा पुरुष प्रकृती आला, स्वतेजा मुके ॥ १०१२ ॥
जागता नरु सहसा, निद्रा पाडूनि जैसा,
स्वप्नींचिया सोसा, वश्यु कीजे ॥ १०१३ ॥
तैसें प्रकृति जालेपणें, पुरुषा गुण भोगणें,
उदास अंतुरीगुणें, आतुडे जेवीं ॥ १०१४ ॥
तैसें अजा नित्या होये, आंगीं जन्ममृत्यूचे घाये,
वाजती जैं लाहे, गुणसंगातें ॥ १०१५ ॥
परि तें ऐसें पंडुसुता, तातलें लोह पिटितां,
जेवीं वन्हीसीचि घाता, बोलती तया ॥ १०१६ ॥
कां आंदोळलिया उदक, प्रतिभा होय अनेक,
तें नानात्व म्हणती लोक, चंद्रीं जेवीं ॥ १०१७ ॥
दर्पणाचिया जवळिका, दुजेपण जैसें ये मुखा,
कां कुंकुमें स्फटिका, लोहितत्व ये ॥ १०१८ ॥
तैसा गुणसंगमें, अजन्मा हा जन्मे,
पावतु ऐसा गमे, एऱ्हवीं नाहीं ॥ १०१९ ॥
अधमोत्तमा योनी, यासि ऐसिया मानी,
जैसा संन्यासी होय स्वप्नीं, अंत्यजादि जाती ॥ १०२० ॥
म्हणौनि केवळा पुरुषा, नाहीं होणें भोगणें देखा,
येथ गुणसंगुचि अशेखा-, लागीं मूळ ॥ १०२१ ॥


उपद्रष्टाऽनुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः।
परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः ॥ २२॥


हा प्रकृतिमाजीं उभा, परी जुई जैसा वोथंबा,
इया प्रकृति पृथ्वी नभा, तेतुला पाडु ॥ १०२२ ॥
प्रकृतिसरितेच्या तटीं, मेरु होय हा किरीटी,
माजीं बिंबे परी लोटीं, लोटों नेणे ॥ १०२३ ॥
प्रकृति होय जाये, हा तो असतुचि आहे,
म्हणौनि आब्रह्माचें होये, शासन हा ॥ १०२४ ॥
प्रकृति येणें जिये, याचिया सत्ता जग विये,
इयालागीं इये, वरयेतु हा ॥ १०२५ ॥
अनंतें काळें किरीटी, जिया मिळती इया सृष्टी,
तिया रिगती ययाच्या पोटीं, कल्पांतसमयीं ॥ १०२६ ॥
हा महद्ब्रह्मगोसावी, ब्रह्मगोळ लाघवी,
अपारपणें मवी, प्रपंचातें ॥ १०२७ ॥
पैं या देहामाझारीं, परमात्मा ऐसी जे परी,
बोलिजे तें अवधारीं, ययातेंचि ॥ १०२८ ॥
अगा प्रकृतिपरौता, एकु आथी पंडुसुता,
ऐसा प्रवादु तो तत्त्वता, पुरुषु हा पैं ॥ १०२९ ॥


य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह।
सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते ॥ २३॥


जो निखळपणें येणें, पुरुषा यया जाणे,
आणि गुणांचें करणें, प्रकृतीचें तें ॥ १०३० ॥
हें रूप हे छाया, पैल जळ हे माया,
ऐसा निवाडु धनंजया, जेवीं कीजे ॥ १०३१ ॥
तेणें पाडें अर्जुना, प्रकृतिपुरुषविवंचना,
जयाचिया मना, गोचर जाहली ॥ १०३२ ॥
तो शरीराचेनि मेळें, करूं कां कर्में सकळें,
परी आकाश धुई न मैळे, तैसा असे ॥ १०३३ ॥
आथिलेनि देहें, जो न घेपे देहमोहें,
देह गेलिया नोहे, पुनरपि तो ॥ १०३४ ॥
ऐसा तया एकु, प्रकृतिपुरुषविवेकु,
उपकारु अलौकिकु, करी पैं गा ॥ १०३५ ॥
परी हाचि अंतरीं, विवेक भानूचिया परी,
उदैजे तें अवधारीं, उपाय बहुत ॥ १०३६ ॥


ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना।
अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे ॥ २४॥


कोणी एकु सुभटा, विचाराचा आगिटां,
आत्मानात्मकिटा, पुटें देउनी ॥ १०३७ ॥
छत्तीसही वानी भेद, तोडोनियां निर्विवाद,
निवडिती शुद्ध, आपणपें ॥ १०३८ ॥
तया आपणपयाच्या पोटीं, आत्मध्यानाचिया दिठी,
देखती गा किरीटी, आपणपेंचि ॥ १०३९ ॥
आणिक पैं दैवबगें, चित्त देती सांख्ययोगें,
एक ते अंगलगें, कर्माचेनी ॥ १०४० ॥


अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वाऽन्येभ्य उपासते।
तेऽपि चातितरंत्येव मृत्युं श्रुतिपरायणः ॥ २५॥


येणें येणें प्रकारें, निस्तरती साचोकारें,
हें भवा भेउरें, आघवेंचि ॥ १०४१ ॥
परी ते करिती ऐसें, अभिमानु दवडूनि देशें,
एकाचिया विश्वासें, टेंकती बोला ॥ १०४२ ॥
जे हिताहित देखती, हानि कणवा घेपती,
पुसोनि शिणु हरिती, देती सुख ॥ १०४३ ॥
तयांचेनि मुखें जें निघे, तेतुलें आदरें चांगें,
ऐकोनियां आंगें, मनें होती ॥ १०४४ ॥
तया ऐकणेयाचि नांवें, ठेविती गा आघवें,
तया अक्षरांसीं जीवें, लोण करिती ॥ १०४५ ॥
तेही अंतीं कपिध्वजा, इया मरणार्णवसमाजा-,
पासूनि निघती वोजा, गोमटिया ॥ १०४६ ॥
ऐसेसे हे उपाये, बहुवस एथें पाहें,
जाणावया होये, एकी वस्तु ॥ १०४७ ॥
आतां पुरे हे बहुत, पैं सर्वार्थाचें मथित,
सिद्धांतनवनीत, देऊं तुज ॥ १०४८ ॥
येतुलेनि पंडुसुता, अनुभव लाहाणा आयिता,
येर तंव तुज होतां, सायास नाहीं ॥ १०४९ ॥
म्हणौनि ते बुद्धि रचूं, मतवाद हे खांचूं,
सोलीव निर्वचूं, फलितार्थुची ॥ १०५० ॥


यावत्संजायते किंचित्सत्त्वं स्थावरजंगमम्।
क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात्तद्विद्धि भरतर्षभ ॥ २६॥


तरी क्षेत्रज्ञ येणें बोलें, तुज आपणपें जें दाविलें,
आणि क्षेत्रही सांगितलें, आघवें जें ॥ १०५१ ॥
तया येरयेरांच्या मेळीं, होईजे भूतीं सकळीं,
अनिलसंगें सलिलीं, कल्लोळ जैसे ॥ १०५२ ॥
कां तेजा आणि उखरा, भेटी जालिया वीरा,
मृगजळाचिया पूरा, रूप होय ॥ १०५३ ॥
नाना धाराधरधारीं, झळंबलिया वसुंधरी,
उठिजे जेवीं अंकुरीं, नानाविधीं ॥ १०५४ ॥
तैसें चराचर आघवें, जें कांहीं जीवु नावें,
तें तों उभययोगें संभवे, ऐसें जाण ॥ १०५५ ॥
इयालागीं अर्जुना, क्षेत्रज्ञा प्रधाना-,
पासूनि न होती भिन्ना, भूतव्यक्ती ॥ १०५६ ॥


समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम्।
विनश्यत्स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति ॥ २७॥


पैं पटत्व तंतु नव्हे, तरी तंतूसीचि तें आहे,
ऐसां खोलीं डोळां पाहें, ऐक्य हें गा ॥ १०५७ ॥
भूतें आघवींचि होती, एकाचीं एक आहाती,
परी तूं प्रतीती, यांची घे पां ॥ १०५८ ॥
यांचीं नामेंही आनानें, अनारिसीं वर्तनें,
वेषही सिनाने, आघवेयांचे ॥ १०५९ ॥
ऐसें देखोनि किरीटी, भेद सूसी हन पोटीं,
तरी जन्माचिया कोटी, न लाहसी निघों ॥ १०६० ॥
पैं नानाप्रयोजनशीळें, दीर्घें वक्रें वर्तुळें,
होती एकाचींच फळें, तुंबिणीयेचीं ॥ १०६१ ॥
होतु कां उजू वांकुडें, परी बोरीचे हें न मोडे,
तैसी भूतें अवघडें, परी वस्तु उजू ॥ १०६२ ॥
अंगारकणीं बहुवसीं, उष्णता समान जैशी,
तैसा नाना जीवराशीं, परेशु असे ॥ १०६३ ॥
गगनभरी धारा, परी पाणी एकचि वीरा,
तैसा या भूताकारा, सर्वांगीं तो ॥ १०६४ ॥
हें भूतग्राम विषम, परी वस्तू ते एथ सम,
घटमठीं व्योम, जिंयापरी ॥ १०६५ ॥
हा नाशतां भूताभासु, एथ आत्मा तो अविनाशु,
जैसा केयूरादिकीं कसु, सुवर्णाचा ॥ १०६६ ॥
एवं जीवधर्महीनु, जो जीवेंसीं अभिन्नु,
देख तो सुनयनु, ज्ञानियांमाजीं ॥ १०६७ ॥
ज्ञानाचा डोळा डोळसां-, माजीं डोळसु तो वीरेशा,
हे स्तुति नोहे बहुवसा, भाग्याचा तो ॥ १०६८ ॥


समं पश्यन्हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम्।
न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् ॥ २८॥


जे गुणेंद्रिय धोकोटी, देह धातूंची त्रिकुटी,
पांचमेळावा वोखटी, दारुण हे ॥ १०६९ ॥
हें उघड पांचवेउली, पंचधां आगी लागली,
जीवपंचानना सांपडली, हरिणकुटी हे ॥ १०७० ॥
ऐसा असोनि इये शरीरीं, कोण नित्यबुद्धीची सुरी,
अनित्यभावाच्या उदरीं, दाटीचिना ॥ १०७१ ॥
परी इये देहीं असतां, जो नयेचि आपणया घाता,
आणि शेखीं पंडुसुता, तेथेंचि मिळे ॥ १०७२ ॥
जेथ योगज्ञानाचिया प्रौढी, वोलांडूनियां जन्मकोडी,
न निगों इया भाषा बुडी, देती योगी ॥ १०७३ ॥
जें आकाराचें पैल तीर, जें नादाची पैल मेर,
तुर्येचें माजघर, परब्रह्म जें ॥ १०७४ ॥
मोक्षासकट गती, जेथें येती विश्रांती,
गंगादि आपांपती, सरिता जेवीं ॥ १०७५ ॥
तें सुख येणेंचि देहें, पाय पाखाळणिया लाहे,
जो भूतवैषम्यें नोहे, विषमबुद्धी ॥ १०७६ ॥
दीपांचिया कोडी जैसें, एकचि तेज सरिसें,
तैसा जो असतुचि असे, सर्वत्र ईशु ॥ १०७७ ॥
ऐसेनि समत्वें पंडुसुता, जिये जो देखत साता,
तो मरण आणि जीविता, नागवे फुडा ॥ १०७८ ॥
म्हणौनि तो दैवागळा, वानीत असों वेळोवेळां,
जे साम्यसेजे डोळां, लागला तया ॥ १०७९ ॥


प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः।
यः पश्यति तथाऽऽत्मानंअकर्तारं स पश्यति ॥ २९॥


आणि मनोबुद्धिप्रमुखें, कर्मेंद्रियें अशेखें,
करी प्रकृतीचि हें देखे, साच जो गा ॥ १०८० ॥
घरींचीं राहटती घरीं, घर कांहीं न करी,
अभ्र धांवे अंबरीं, अंबर तें उगें ॥ १०८१ ॥
तैसी प्रकृति आत्मप्रभा, खेळे गुणीं विविधारंभा,
येथ आत्मा तो वोथंबा, नेणे कोण ॥ १०८२ ॥
ऐसेनि येणें निवाडें, जयाच्या जीवीं उजिवडें,
अकर्तयातें फुडें, देखिलें तेणें ॥ १०८३ ॥


यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति।
तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा ॥ ३०॥


एऱ्हवीं तैंचि अर्जुना, होईजे ब्रह्मसंपन्ना,
जैं या भूताकृती भिन्ना, दिसती एकी ॥ १०८४ ॥
लहरी जैसिया जळीं, परमाणुकणिका स्थळीं,
रश्मीकरमंडळीं, सूर्याच्या जेवीं ? ॥ १०८५ ॥
नातरी देहीं अवेव, मनीं आघवेचि भाव,
विस्फुलिंग सावेव, वन्हीं एकीं ॥ १०८६ ॥
तैसे भूताकार एकाचे, हें दिठी रिगे जैं साचें,
तैंचि ब्रह्मसंपत्तीचें, तारूं लागे ॥ १०८७ ॥
मग जया तयाकडे, ब्रह्मेचि दिठी उघडे,
किंबहुना जोडे, अपार सुख ॥ १०८८ ॥
येतुलेनि तुज पार्था, प्रकृतिपुरुषव्यवस्था,
ठायें ठावो प्रतीतिपथा-, माजीं जाहली ? ॥ १०८९ ॥
अमृत जैसें ये चुळा, कां निधान देखिजे डोळां,
तेतुला जिव्हाळा, मानावा हा ॥ १०९० ॥
जी जाहलिये प्रतीती, घर बांधणें जें चित्तीं,
तें आतां ना सुभद्रापती, इयावरी ॥ १०९१ ॥
तरी एक दोन्ही ते बोल, बोलिजती सखोल,
देईं मनातें वोल, मग ते घेईं ॥ १०९२ ॥
ऐसें देवें म्हणितलें, मग बोलों आदरिलें,
तेथें अवधानाचेचि केलें, सर्वांग येरें ॥ १०९३ ॥


अनादित्वान्निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः।
शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते ॥ ३१॥


तरी परमात्मा म्हणिपे, तो ऐसा जाण स्वरूपें,
जळीं जळें न लिंपे, सूर्यु जैसा ॥ १०९४ ॥
कां जे जळा आदीं पाठीं, तो असतुचि असे किरीटी,
माजीं बिंबे तें दृष्टी, आणिकांचिये ॥ १०९५ ॥
तैसा आत्मा देहीं, आथि म्हणिपे हें कांहीं,
साचें तरी नाहीं, तो जेथिंचा तेथें ॥ १०९६ ॥
आरिसां मुख जैसें, बिंबलिया नाम असे,
देहीं वसणें तैसें, आत्मतत्त्वा ॥ १०९७ ॥
तया देहा म्हणती भेटी, हे सपायी निर्जीव गोठी,
वारिया वाळुवे गांठी, केंही आहे ? ॥ १०९८ ॥
आगी आणि कापुसा, दोरा सुवावा कैसा,
केउता सांदा आकाशा, पाषाणेंसी ? ॥ १०९९ ॥
एक निघे पूर्वेकडे, एक तें पश्चिमेकडे,
तिये भेटीचेनि पाडें, संबंधु हा ॥ ११०० ॥
उजियेडा आणि अंधारेया, जो पाडु मृता उभेयां,
तोचि गा आत्मया, देहा जाण ॥ ११०१ ॥
रात्री आणि दिवसा, कनका आणि कापुसा,
अपाडु कां जैसा, तैसाचि यासी ॥ ११०२ ॥
देह तंव पांचांचें जालें, हें कर्माचें गुणीं गुंथले,
भंवतसे चाकीं सूदलें, जन्ममृत्यूच्या ॥ ११०३ ॥
हें काळानळाच्या तोंडीं, घातली लोणियाची उंडी,
माशी पांखु पाखडी, तंव हें सरे ॥ ११०४ ॥
हें विपायें आगींत पडे, तरी भस्म होऊनि उडे,
जाहलें श्वाना वरपडें, तरी ते विष्ठा ॥ ११०५ ॥
या चुके दोहीं काजा, तरी होय कृमींचा पुंजा,
हा परिणामु कपिध्वजा, कश्मलु गा ॥ ११०६ ॥
या देहाची हे दशा, आणि आत्मा तो एथ ऐसा,
पैं नित्य सिद्ध आपैसा, अनादिपणें ॥ ११०७ ॥
सकळु ना निष्कळु, अक्रियु ना क्रियाशीळु,
कृश ना स्थुळु, निर्गुणपणें ॥ ११०८ ॥
आभासु ना निराभासु, प्रकाशु ना अप्रकाशु,
अल्प ना बहुवसु, अरूपपणें ॥ ११०९ ॥
रिता ना भरितु, रहितु ना सहितु,
मूर्तु ना अमूर्तु, शून्यपणें ॥ १११० ॥
आनंदु ना निरानंदु, एक ना विविधु,
मुक्त ना बद्धु, आत्मपणें ॥ ११११ ॥
येतुला ना तेतुला, आइता ना रचिला,
बोलता ना उगला, अलक्शपणें ॥ १११२ ॥
सृष्टीच्या होणा न रचे, सर्वसंहारें न वेंचे,
आथी नाथी या दोहींचें, पंचत्व तो ॥ १११३ ॥
मवे ना चर्चे, वाढे ना खांचे,
विटे ना वेंचे, अव्ययपणें ॥ १११४ ॥
एवं रूप पैं आत्मा, देहीं जें म्हणती प्रियोत्तमा,
तें मठाकारें व्योमा, नाम जैसें ॥ १११५ ॥
तैसें तयाचिये अनुस्यूती, होती जाती देहाकृती,
तो घे ना सांडी सुमती, जैसा तैसा ॥ १११६ ॥
अहोरात्रें जैशी, येती जाती आकाशीं,
आत्मसत्तें तैसीं, देहें जाण ॥ १११७ ॥
म्हणौनि इयें शरीरीं, कांहीं करवीं ना करी,
आयताही व्यापारीं, सज्ज न होय ॥ १११८ ॥
यालागीं स्वरूपें, उणा पुरा न घेपे,
हें असो तो न लिंपे, देहीं देहा ॥ १११९ ॥


यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते।
सर्वत्रावस्थितो देहे तथाऽऽत्मा नोपलिप्यते ॥ ३२॥


अगा आकाश कें नाहीं ?, हें न रिघेचि कवणे ठायीं ?,
परी कायिसेनि कहीं, गादिजेना ॥ ११२० ॥
तैसा सर्वत्र सर्व देहीं, आत्मा असतुचि असे पाहीं,
संगदोषें एकेंही, लिप्त नोहे ॥ ११२१ ॥
पुढतपुढती एथें, हेंचि लक्षण निरुतें,
जे जाणावें क्षेत्रज्ञातें, क्षेत्रविहीना ॥ ११२२ ॥
संसर्गें चेष्टिजे लोहें, परी लोह भ्रामकु नोहे,
क्षेत्रक्षेत्रज्ञां आहे, तेतुला पाडु ॥ ११२३ ॥
दीपकाची अर्ची, राहाटी वाहे घरींची,
परी वेगळीक कोडीची, दीपा आणि घरा ॥ ११२४ ॥
पैं काष्ठाच्या पोटीं, वन्हि असे किरीटी,
परी काष्ठ नोहे या दृष्टी, पाहिजे हा ॥ ११२५ ॥
अपाडु नभा आभाळा, रवि आणि मृगजळा,
तैसाचि हाही डोळां, देखसी जरी ॥ ११२६ ॥


यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः।
क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्‌नं प्रकाशयति भारत ॥ ३३॥


हें आघवेंचि असो एकु, गगनौनि जैसा अर्कु,
प्रगटवी लोकु, नांवें नांवें ॥ ११२७ ॥
एथ क्षेत्रज्ञु तो ऐसा, प्रकाशकु क्षेत्राभासा,
यावरुतें हें न पुसा, शंका नेघा ॥ ११२८ ॥


क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवमन्तरं ज्ञानचक्षुषा।
भूतप्रकृतिमोक्षं च विदुर्यान्ति ते परम् ॥ ३४॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञयोगोनाम त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥


शब्दतत्त्वसारज्ञा, पैं देखणें तेचि प्रज्ञा,
जे क्षेत्रा क्षेत्रज्ञा, अपाडु देखे ॥ ११२९ ॥
इया दोहींचें अंतर, देखावया चतुर,
ज्ञानियांचे द्वार, आराधिती ॥ ११३० ॥
याचिलागीं सुमती, जोडिती शांतिसंपत्ती,
शास्त्रांचीं दुभतीं, पोसिती घरीं ॥ ११३१ ॥
योगाचिया आकाशा, वळघिजे येवढाचि धिंवसा,
याचियाचि आशा, पुरुषासि गा ॥ ११३२ ॥
शरीरादि समस्त, मानिताति तृणवत,
जीवें संतांचे होत, वाहणधरु ॥ ११३३ ॥
ऐसैसियापरी, ज्ञानाचिया भरोवरी,
करूनियां अंतरीं, निरुतें होती ॥ ११३४ ॥
मग क्षेत्रक्षेत्रज्ञांचें, जें अंतर देखती साचें,
ज्ञानें उन्मेख तयांचें, वोवाळूं आम्ही ॥ ११३५ ॥
आणि महाभूतादिकीं, प्रभेदलीं अनेकीं,
पसरलीसे लटिकी, प्रकृति जे हे ॥ ११३६ ॥
जे शुकनळिकान्यायें, न लगती लागली आहे,
हें जैसें तैसें होये, ठाउवें जयां ॥ ११३७ ॥
जैसी माळा ते माळा, ऐसीचि देखिजे डोळां,
सर्पबुद्धि टवाळा, उखी हौनी ॥ ११३८ ॥
कां शुक्ति ते शुक्ती, हे साच होय प्रतीती,
रुपेयाची भ्रांती, जाऊनियां ॥ ११३९ ॥
तैसी वेगळी वेगळेपणें, प्रकृति जे अंतःकरणें,
देखती ते मी म्हणें, ब्रह्म होती ॥ ११४० ॥
जें आकाशाहूनि वाड, जें अव्यक्ताची पैल कड,
जें भेटलिया अपाडा पाड, पडों नेदी ॥ ११४१ ॥
आकारु जेथ सरे, जीवत्व जेथ विरे,
द्वैत जेथ नुरे, अद्वय जें ॥ ११४२ ॥
तें परम तत्त्व पार्था, होती ते सर्वथा,
जे आत्मानात्मव्यवस्था-, राजहंसु ॥ ११४३ ॥
ऐसा हा जी आघवा, श्रीकृष्णें तया पांडवा,
उगाणा दिधला जीवा, जीवाचिया ॥ ११४४ ॥
येर कलशींचें येरीं, रिचविजे जयापरी,
आपणपें तया श्रीहरी, दिधलें तैसें ॥ ११४५ ॥
आणि कोणा देता कोण, तो नर तैसा नारायण,
वरी अर्जुनातें श्रीकृष्ण, हा मी म्हणे ॥ ११४६ ॥
परी असो तें नाथिलें, न पुसतां कां मी बोलें,
किंबहुना दिधलें, सर्वस्व देवें ॥ ११४७ ॥
कीं तो पार्थु जी मनीं, अझुनी तृप्ती न मनी,
अधिकाधिक उतान्ही, वाढवीतु असे ॥ ११४८ ॥
स्नेहाचिया भरोवरी, आंबुथिला दीपु घे थोरी,
चाड अर्जुना अंतरीं, परिसतां तैसी ॥ ११४९ ॥
तेथ सुगरिणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे,
मिळती मग अवतरे, हातु जैसा ॥ ११५० ॥
तैसें जी होतसे देवा, तया अवधानाचिया लवलवा,
पाहतां व्याख्यान चढलें थांवा, चौगुणें वरी ॥ ११५१ ॥
सुवायें मेघु सांवरे, जैसा चंद्रें सिंधु भरे,
तैसा मातुला रसु आदरें, श्रोतयांचेनि ॥ ११५२ ॥
आतां आनंदमय आघवें, विश्व कीजेल देवें,
तें रायें परिसावें, संजयो म्हणे ॥ ११५३ ॥
एवं जे महाभारतीं, श्रीव्यासें आप्रांतमती,
भीष्मपर्वसंगतीं, म्हणितली कथा ॥ ११५४ ॥
तो कृष्णार्जुनसंवादु, नागरीं बोलीं विशदु,
सांगोनि दाऊं प्रबंधु, वोवियेचा ॥ ११५५ ॥
नुसधीचि शांतिकथा, आणिजेल कीर वाक्पथा,
जे शृंगाराच्या माथां, पाय ठेवी ॥ ११५६ ॥
दाऊं वेल्हाळे देशी नवी, जे साहित्यातें वोजावी,
अमृतातें चुकी ठेवी, गोडिसेंपणें ॥ ११५७ ॥
बोल वोल्हावतेनि गुणें, चंद्रासि घे उमाणे,
रसरंगीं भुलवणें, नादु लोपी ॥ ११५८ ॥
खेचरांचियाही मना, आणीन सात्त्विकाचा पान्हा,
श्रवणासवें सुमना, समाधि जोडे ॥ ११५९ ॥
तैसा वाग्विलास विस्तारू, गीतार्थेंसी विश्व भरूं,
आनंदाचें आवारूं, मांडूं जगा ॥ ११६० ॥
फिटो विवेकाची वाणी, हो कानामनाची जिणी,
देखो आवडे तो खाणी, ब्रह्मविद्येची ॥ ११६१ ॥
दिसो परतत्त्व डोळां, पाहो सुखाचा सोहळा,
रिघो महाबोध सुकाळा-, माजीं विश्व ॥ ११६२ ॥
हें निफजेल आतां आघवें, ऐसें बोलिजेल बरवें,
जें अधिष्ठिला असें परमदेवें, श्रीनिवृत्तीं मी ॥ ११६३ ॥
म्हणौनि अक्षरीं सुभेदीं, उपमा श्लोक कोंदाकोंदी,
झाडा देईन प्रतिपदीं, ग्रंथार्थासी ॥ ११६४ ॥
हा ठावोवरी मातें, पुरतया सारस्वतें,
केलें असे श्रीमंतें, श्रीगुरुरायें ॥ ११६५ ॥
तेणें जी कृपासावायें, मी बोलें तेतुलें सामाये,
आणि तुमचिये सभे लाहें, गीता म्हणों ॥ ११६६ ॥
वरी तुम्हा संतांचे पाये, आजि मी लाधलों आहें,
म्हणौनि जी नोहे, अटकु काहीं ॥ ११६७ ॥
प्रभु काश्मिरीं मुकें, नुपजे हें काय कौतुकें,
नाहीं उणीं सामुद्रिकें, लक्ष्मीयेसी ॥ ११६८ ॥
तैसी तुम्हां संतांपासीं, अज्ञानाची गोठी कायसी,
यालागीं नवरसीं, वरुषेन मी ॥ ११६९ ॥
किंबहुना आतां देवा, अवसरु मज देयावा,
ज्ञानदेव म्हणे बरवा, सांगेन ग्रंथु ॥ ११७० ॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां त्रयोदशोऽध्यायः ॥