ज्ञानेश्वरी / अध्याय सोळावा / संत ज्ञानेश्वर
॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ षोडशोशोऽध्यायः - अध्याय सोळावा,।
। दैवासुरसंपत्तिविभागयोगः।
मावळवीत विश्वाभासु, नवल उदयला चंडांशु,
अद्वयाब्जिनीविकाशु, वंदूं आतां ॥ १ ॥
जो अविद्याराती रुसोनियां, गिळी ज्ञानाज्ञानचांदणिया,
जो सुदिनु करी ज्ञानियां, स्वबोधाचा ॥ २ ॥
जेणें विवळतिये सवळे, लाहोनि आत्मज्ञानाचे डोळे,
सांडिती देहाहंतेचीं अविसाळें, जीवपक्षी ॥ ३ ॥
लिंगदेहकमळाचा, पोटीं वेंचु तया चिद्भ्रमराचा,
बंदिमोक्षु जयाचा, उदैला होय ॥ ४ ॥
शब्दाचिया आसकडीं, भेद नदीच्या दोहीं थडीं,
आरडाते विरहवेडीं, बुद्धिबोधु ॥ ५ ॥
तया चक्रवाकांचें मिथुन, सामरस्याचें समाधान,
भोगवी जो चिद्गगन, भुवनदिवा ॥ ६ ॥
जेणें पाहालिये पाहांटे, भेदाची चोरवेळ फिटे,
रिघती आत्मानुभववाटे, पांथिक योगी ॥ ७ ॥
जयाचेनि विवेककिरणसंगें, उन्मेखसूर्यकांतु फुणगे,
दीपले जाळिती दांगें, संसाराचीं ॥ ८ ॥
जयाचा रश्मिपुंजु निबरु, होता स्वरूप उखरीं स्थिरु,
ये महासिद्धीचा पूरु, मृगजळ तें ॥ ९ ॥
जो प्रत्यग्बोधाचिया माथया, सोऽहंतेचा मध्यान्हीं आलिया,
लपे आत्मभ्रांतिछाया, आपणपां तळीं ॥ १० ॥
ते वेळीं विश्वस्वप्नासहितें, कोण अन्यथामती निद्रेतें,
सांभाळी नुरेचि जेथें, मायाराती ॥ ११ ॥
म्हणौनि अद्वयबोधपाटणीं, तेथ महानंदाची दाटणी,
मग सुखानुभूतीचीं घेणीं देणीं, मंदावो लागती ॥ १२ ॥
किंबहुना ऐसैसें, मुक्तकैवल्य सुदिवसें,
सदा लाहिजे कां प्रकाशें, जयाचेनि ॥ १३ ॥
जो निजधामव्योमींचा रावो, उदैलाचि उदैजतखेंवो,
फेडी पूर्वादि दिशांसि ठावो, उदोअस्तूचा ॥ १४ ॥
न दिसणें दिसणेंनसीं मावळवी, दोहीं झांकिलें ते सैंघ पालवी,
काय बहु बोलों ते आघवी, उखाचि आनी ॥ १५ ॥
तो अहोरात्रांचा पैलकडु, कोणें देखावा ज्ञानमार्तंडु,
जो प्रकाश्येंवीण सुरवाडु, प्रकाशाचा ॥ १६ ॥
तया चित्सूर्या श्रीनिवृत्ती, आतां नमों म्हणों पुढतपुढती,
जे बाधका येइजतसे स्तुती, बोलाचिया ॥ १७ ॥
देवाचें महिमान पाहोनियां, स्तुति तरी येइजे चांगावया,
जरी स्तव्यबुद्धीसीं लया, जाईजे कां ॥ १८ ॥
जो सर्वनेणिवां जाणिजे, मौनाचिया मिठीया वानिजे,
कांहींच न होनि आणिजे, आपणपयां जो ॥ १९ ॥
तया तुझिया उद्देशासाठीं, पश्यंती मध्यमा पोटीं,
सूनि परेसींही पाठीं, वैखरी विरे ॥ २० ॥
तया तूतें मी सेवकपणें, लेववीं बोलकेया स्तोत्राचें लेणें,
हें उपसाहावेंही म्हणतां उणें, अद्वयानंदा ॥ २१ ॥
परी रंकें अमृताचा सागरु, देखिलिया पडे उचिताचा विसरु,
मग करूं धांवे पाहुणेरु, शाकांचा तया ॥ २२ ॥
तेथ शाकुही कीर बहुत म्हणावा, तयाचा हर्षवेगुचि तो घ्यावा,
उजळोनि दिव्यतेजा हातिवा, ते भक्तीचि पाहावी ॥ २३ ॥
बाळा उचित जाणणें होये, तरी बाळपणचि कें आहे ?,
परी साचचि येरी माये, म्हणौनि तोषे ॥ २४ ॥
हां गा गांवरसें भरलें, पाणी पाठीं पाय देत आलें,
तें गंगा काय म्हणितलें, परतें सर ? ॥ २५ ॥
जी भृगूचा कैसा अपकारु, कीं तो मानूनि प्रियोपचारु,
तोषेचिना शारङ्गधरु, गुरुत्वासीं ? ॥ २६ ॥
कीं आंधारें खतेलें अंबर, झालेया दिवसनाथासमोर,
तेणें तयातें पऱ्हा सर, म्हणितलें काई ? ॥ २७ ॥
तेवीं भेदबुद्धीचिये तुळे, घालूनि सूर्यश्लेषाचें कांटाळे,
तुकिलासि तें येकी वेळे, उपसाहिजो जी ॥ २८ ॥
जिहीं ध्यानाचा डोळां पाहिलासी, वेदादि वाचां वानिलासी,
जें उपसाहिलें तयासी, तें आम्हांही करीं ॥ २९ ॥
परी मी आजि तुझ्या गुणीं, लांचावलों अपराधु न गणीं,
भलतें करीं परी अर्धधणीं, नुठी कदा ॥ ३० ॥
मियां गीता येणें नांवें, तुझें पसायामृत सुहावें,
वानूं लाधलों तें दुणेन थावें, दैवलों दैवें ॥ ३१ ॥
माझिया सत्यवादाचें तप, वाचा केलें बहुत कल्प,
तया फळाचें हें महाद्वीप, पातली प्रभु ॥ ३२ ॥
पुण्यें पोशिलीं असाधरणें, तियें तुझें गुण वानणें,
देऊनि मज उत्तीर्णें, जालीं आजी ॥ ३३ ॥
जी जीवित्वाच्या आडवीं, आतुडलों होतों मरणगांवीं,
ते अवदसाची आघवी, फेडिली आजी ॥ ३४ ॥
जे गीता येणें नांवें नावाणिगी, जे अविद्या जिणोनि दाटुगी,
ते कीर्ती तुझी आम्हांजोगी, वानावया जाली ॥ ३५ ॥
पैं निर्धना घरीं वानिवसें, महालक्ष्मी येऊनि बैसे,
तयातें निर्धन ऐसें, म्हणों ये काई ? ॥ ३६ ॥
कां अंधकाराचिया ठाया, दैवें सुर्यु आलिया,
तो अंधारुचि जगा यया, प्रकाशु नोहे ? ॥ ३७ ॥
जया देवाची पाहतां थोरी, विश्व परमाणुही दशा न धरी,
तो भावाचिये सरोभरी, नव्हेचि काई ? ॥ ३८ ॥
तैसा मी गीता वाखाणी, हे खपुष्पाची तुरंबणी,
परी समर्थें तुवां शिरयाणी, फेडिली ते ॥ ३९ ॥
म्हणौनि तुझेनि प्रसादें, मी गीतापद्यें अगाधें,
निरूपीन जी विशदें, ज्ञानदेवो म्हणे ॥ ४० ॥
तरी अध्यायीं पंधरावा, श्रीकृष्णें तया पांडवा,
शास्त्रसिद्धांतु आघवा, उगाणिला ॥ ४१ ॥
जे वृक्षरूपक परीभाषा, केलें उपाधि रूप अशेषा,
सद्वैद्यें जैसें दोषा, अंगलीना ॥ ४२ ॥
आणि कूटस्थु जो अक्षरु, दाविला पुरुषप्रकारु,
तेणें उपहिताही आकारु, चैतन्या केला ॥ ४३ ॥
पाठीं उत्तम पुरुष, शब्दाचें करूनि मिष,
दाविलें चोख, आत्मतत्त्व ॥ ४४ ॥
आत्मविषयीं आंतुवट, साधन जें आंगदट,
ज्ञान हेंही स्पष्ट, चावळला ॥ ४५ ॥
म्हणौनि इये अध्यायीं, निरूप्य नुरेचि कांहीं,
आतां गुरुशिष्यां दोहीं, स्नेहो लाहणा ॥ ४६ ॥
एवं इयेविषयीं कीर, जाणते बुझावले अपार,
परी मुमुक्षु इतर, साकांक्ष जाले ॥ ४७ ॥
त्या मज पुरुषोत्तमा, ज्ञानें भेटे जो सुवर्मा,
तो सर्वज्ञु तोचि सीमा, भक्तीचीही ॥ ४८ ॥
ऐसें हें त्रैलोक्यनायकें, बोलिलें अध्यायांत श्लोकें,
तेथें ज्ञानचि बहुतेकें, वानिलें तोषें ॥ ४९ ॥
भरूनि प्रपंचाचा घोंटु, कीजे देखतांचि देखतया द्रष्टु,
आनंदसाम्राज्यीं पाटु, बांधिजे जीवा ॥ ५० ॥
येवढेया लाठेपणाचा उपावो, आनु नाहींचि म्हणे देवो,
हा सम्यक्ज्ञानाचा रावो, उपायांमाजीं ॥ ५१ ॥
ऐसे आत्मजिज्ञासु जे होते, तिहीं तोषलेनि चित्तें,
आदरें तया ज्ञानातें, वोंवाळिलें जीवें ॥ ५२ ॥
आतां आवडी जेथ पडे, तयाचि अवसरीं पुढें पुढें,
रिगों लागें हें घडे, प्रेम ऐसें ॥ ५३ ॥
म्हणौनि जिज्ञासूंच्या पैकीं, ज्ञानी प्रतीती होय ना जंव निकी,
तंव योग क्षेमु ज्ञानविखीं, स्फुरेलचि कीं ॥ ५४ ॥
म्हणौनि तेंचि सम्यक् ज्ञान, कैसेनि होय स्वाधीन,
जालिया वृद्धियत्न, घडेल केवीं ॥ ५५ ॥
कां उपजोंचि जें न लाहे, जें उपजलेंही अव्हांटा सूये,
तें ज्ञानीं विरुद्ध काय आहे, हें जाणावें कीं ॥ ५६ ॥
मग जाणतयां जें विरू, तयाचीं वाट वाहती करूं,
ज्ञाना हित तेंचि विचारूं, सर्वभावें ॥ ५७ ॥
ऐसा ज्ञानजिज्ञासु तुम्हीं समस्तीं, भावो जो धरिला असे चित्तीं,
तो पुरवावया लक्ष्मीपती, बोलिजेल ॥ ५८ ॥
ज्ञानासि सुजन्म जोडे, आपली विश्रांतिही वरी वाढे,
ते संपत्तीचे पवाडे, सांगिजेल दैवी ॥ ५९ ॥
आणि ज्ञानाचेनि कामाकारें, जे रागद्वेषांसि दे थारे,
तिये आसुरियेहि घोरे, करील रूप ॥ ६० ॥
सहज इष्टानिष्टकरणी, दोघीचि इया कवतुकिणी,
हे नवमाध्यायीं उभारणी, केली होती ॥ ६१ ॥
तेथ साउमा घेयावया उवावो, तंव वोडवला आन प्रस्तावो,
तरी तयां प्रसंगें आतां देवो, निरूपीत असे ॥ ६२ ॥
तया निरूपणाचेनि नांवें, अध्याय पद सोळावें,
लावणी पाहतां जाणावें, मागिलावरी ॥ ६३ ॥
परी हें असो आतां प्रस्तुतीं, ज्ञानाच्या हिताहितीं,
समर्था संपत्ती, इयाचि दोन्ही ॥ ६४ ॥
जे मुमुक्षुमार्गींची बोळावी, जे मोहरात्रीची धर्मदिवी,
ते आधीं तंव दैवी, संपत्ती ऐका ॥ ६५ ॥
जेथ एक एकातें पोखी, ऐसे बहुत पदार्थ येकीं,
संपादिजती ते लोकीं, संपत्ति म्हणिजे ॥ ६६ ॥
ते दैवी सुखसंभवी, तेथ दैवगुणें येकोपजीवीं,
जाली म्हणौनि दैवी, संपत्ति हे ॥ ६७ ॥
श्री भगवानुवाच।
अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितः।
दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवं ॥ १॥
आतां तयाचि दैवगुणां-, माजीं धुरेचा बैसणा,
बैसे तया आकर्णा, अभय ऐसें ॥ ६८ ॥
तरी न घालूनि महापुरीं, न घेपे बुडणयाची शियारी,
कां रोगु न गणिजे घरीं, पथ्याचिया ॥ ६९ ॥
तैसा कर्माकर्माचिया मोहरा, उठूं नेदूनि अहंकारा,
संसाराचा दरारा, सांडणें येणें ॥ ७० ॥
अथवा ऐक्यभावाचेनि पैसें, दुजे मानूनि आत्मा ऐसें,
भयवार्ता देशें, दवडणें जें ॥ ७१ ॥
पाणी बुड{ऊं} ये मिठातें, तंव मीठचि पाणी आतें,
तेवीं आपण जालेनि अद्वैतें, नाशे भय ॥ ७२ ॥
अगा अभय येणें नांवें, बोलिजे तें हें जाणावें,
सम्यक्ज्ञानाचें आघवें, धांवणें हें ॥ ७३ ॥
आतां सत्त्वशुद्धी जे म्हणिजे, ते ऐशा चिन्हीं जाणिजे,
तरी जळे ना विझे, राखोंडी जैसी ॥ ७४ ॥
कां पाडिवा वाढी न मगे, अंवसे तुटी सांडूनि मागे,
माजीं अतिसूक्ष्म अंगें, चंद्रु जैसा राहे ॥ ७५ ॥
नातरी वार्षिया नाहीं मांडिली, ग्रीष्में नाहीं सांडिली,
माजीं निजरूपें निवडली, गंगा जैसी ॥ ७६ ॥
तैसी संकल्पविकल्पाची वोढी, सांडूनि रजतमाची कावडी,
भोगितां निजधर्माची आवडी, बुद्धि उरे ॥ ७७ ॥
इंद्रियवर्गीं दाखविलिया, विरुद्धा अथवा भलीया,
विस्मयो कांहीं केलिया, नुठी चित्तीं ॥ ७८ ॥
गांवा गेलिया वल्लभु, पतिव्रतेचा विरहक्षोभु,
भलतेसणी हानिलाभु, न मनीं जेवीं ॥ ७९ ॥
तेवीं सत्स्वरूप रुचलेपणें, बुद्धी जें ऐसें अनन्य होणें,
ते सत्त्वशुद्धी म्हणे, केशिहंता ॥ ८० ॥
आतां आत्मलाभाविखीं, ज्ञानयोगामाजीं एकीं,
जे आपुलिया ठाकी, हांवें भरे ॥ ८१ ॥
तेथ सगळिये चित्तवृत्ती, त्यागु करणें या रीती,
निष्कामें पूर्णाहुती, हुताशीं जैसी ॥ ८२ ॥
कां सुकुळीनें आपुली, आत्मजा सत्कुळींचि दिधली,
हें असो लक्ष्मी स्थिरावली, मुकुंदीं जैसी ॥ ८३ ॥
तैसे निर्विकल्पपणें, जें योगज्ञानींच या वृत्तिक होणें,
तो तिजा गुण म्हणे, श्रीकृष्णनाथु ॥ ८४ ॥
आतां देहवाचाचित्तें, यथासंपन्नें वित्तें,
वैरी जालियाही आर्तातें, न वंचणे जें कां ॥ ८५ ॥
पत्र पुष्प छाया, फळें मूळ धनंजया,
वाटेचा न चुके आलिया, वृक्षु जैसा ॥ ८६ ॥
तैसें मनौनि धनधान्यवरी, विद्यमानें आल्या अवसरीं,
श्रांताचिये मनोहारीं, उपयोगा जाणें ॥ ८७ ॥
तयां नांव जाण दान, जें मोक्षनिधानाचें अंजन,
हें असो आइक चिन्ह, दमाचें तें ॥ ८८ ॥
तरी विषयेंद्रियां मिळणी, करूनि घापे वितुटणी,
जैसें तोडिजे खड्गपाणी, पारकेया ॥ ८९ ॥
तैसा विषयजातांचा वारा, वाजों नेदिजे इंद्रियद्वारां,
इये बांधोनि प्रत्याहारा, हातीं वोपी ॥ ९० ॥
आंतुला चित्ताचें अंगवरीं, प्रवृत्ति पळे पर बाहेरी,
आगी सुयिजे दाहींहि द्वारीं, वैराग्याची ॥ ९१ ॥
श्वासोश्वासाहुनी बहुवसें, व्रतें आचरे खरपुसें,
वोसंतिता रात्रिदिवसें, नाराणुक जया ॥ ९२ ॥
पैं दमु ऐसा म्हणिपे, तो हा जाण स्वरूपें,
यागार्थुही संक्षेपें, सांगों ऐक ॥ ९३ ॥
तरी ब्राह्मण करूनि धुरे, स्त्रियादिक पैल मेरे,
माझारीं अधिकारें, आपुलालेनि ॥ ९४ ॥
जया जे सर्वोत्तम, भजनीय देवताधर्म,
ते तेणें यथागम, विधी यजिजे ॥ ९५ ॥
जैसा द्विज षट्कर्में करी, शूद्र तयातें नमस्कारी,
कीं दोहींसही सरोभरी, निपजे यागु ॥ ९६ ॥
तैसें अधिकारपर्यालोचें, हें यज्ञ करणें सर्वांचें,
परी विषय विष फळाशेचें, न घापे माजीं ॥ ९७ ॥
आणि मी कर्ता ऐसा भावो, नेदिजे देहाचेनि द्वारें जावों,
ना वेदाज्ञेसि तरी ठावो, होइजे स्वयें ॥ ९८ ॥
अर्जुना एवं यज्ञु, सर्वत्र जाण साज्ञु,
कैवल्यमार्गींचा अभिज्ञु, सांगाती हा ॥ ९९ ॥
आतां चेंडुवें भूमी हाणिजे, नव्हे तो हाता आणिजे,
कीं शेतीं बीं विखुरिजे, परी पिकीं लक्ष ॥ १०० ॥
नातरी ठेविलें देखावया, आदर कीजे दिविया,
कां शाखा फळें यावया, सिंपिजे मूळ ॥ १०१ ॥
हें बहु असो आरिसा, आपणपें देखावया जैसा,
पुढतपुढती बहुवसा, उटिजे प्रीती ॥ १०२ ॥
तैसा वेदप्रतिपाद्यु जो ईश्वरु, तो होआवयालागीं गोचरु,
श्रुतीचा निरंतरु, अभ्यासु करणें ॥ १०३ ॥
तेंचि द्विजांसीच ब्रह्मसूत्र, येरा स्तोत्र कां नाममंत्र,
आवर्तवणें पवित्र, पावावया तत्त्व ॥ १०४ ॥
पार्था गा स्वाध्यावो, बोलिजे तो हा म्हणे देवो,
आतां तप शब्दाभिप्रावो, आईक सांगों ॥ १०५ ॥
तरी दानें सर्वस्व देणें, वेंचणें तें व्यर्थ करणें,
जैसे फळोनि स्वयें सुकणें, इंद्रावणी जेवीं ॥ १०६ ॥
नाना धूपाचा अग्निप्रवेशु, कनकीं तुकाचा नाशु,
पितृपक्षु पोषिता ऱ्हासु, चंद्राचा जैसा ॥ १०७ ॥
तैसा स्वरूपाचिया प्रसरा -। लागीं प्राणेंद्रियशरीरां,
आटणी करणें जें वीरा, तेंचि तप ॥ १०८ ॥
अथवा अनारिसें, तपाचें रूप जरी असे,
तरी जाण जेवीं दुधीं हंसें, सूदली चांचू ॥ १०९ ॥
तैसें देहजीवाचिये मिळणीं, जो उदयजत सूये पाणी,
तो विवेक अंतःकरणीं, जागवीजे ॥ ११० ॥
पाहतां आत्मयाकडे, बुद्धीचा पैसु सांकडें,
सनिद्र स्वप्न बुडे, जागणीं जैसें ॥ १११ ॥
तैसा आत्मपर्यालोचु, प्रवर्ते जो साचु,
तपाचा हा निर्वेचु, धनुर्धरा ॥ ११२ ॥
आतां बाळाच्या हितीं स्तन्य, जैसें नानाभूतीं चैतन्य,
तैसें प्राणिमात्रीं सौजन्य, आर्जव तें ॥ ११३ ॥
अहिंसा सत्यमक्रोध्स्त्यागः शान्तिरपैशुनम्।
दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् ॥ २॥
आणि जगाचिया सुखोद्देशें, शरीरवाचामानसें,
राहाटणें तें अहिंसे, रूप जाण ॥ ११४ ॥
आतां तीख होऊनि मवाळ, जैसें जातीचें मुकुळ,
कां तेज परी शीतळ, शशांकाचें ॥ ११५ ॥
शके दावितांचि रोग फेडूं, आणि जिभे तरी नव्हे कडु,
ते वोखदु नाहीं मा घडू, उपमा कैंची ॥ ११६ ॥
तरी मऊपणें बुबुळे, झगडतांही परी नाडळे,
एऱ्हवीं फोडी कोंराळें, पाणी जैसें ॥ ११७ ॥
तैसें तोडावया संदेह, तीख जैसें कां लोह,
श्राव्यत्वें तरी माधुर्य, पायीं घालीं ॥ ११८ ॥
ऐकों ठातां कौतुकें, कानातें निघती मुखें,
जें साचारिवेचेनि बिकें, ब्रह्मही भेदी ॥ ११९ ॥
किंबहुना प्रियपणे, कोणातेंही झक{ऊं} नेणे,
यथार्थ तरी खुपणें, नाहीं कवणा ॥ १२० ॥
एऱ्हवीं गोरी कीर काना गोड, परी साचाचा पाखाळीं कीड,
आगीचें करणें उघड, परी जळों तें साच ॥ १२१ ॥
कानीं लागतां महूर, अर्थें विभांडी जिव्हार,
तें वाचा नव्हे सुंदर, लांवचि पां ॥ १२२ ॥
परी अहितीं कोपोनि सोप, लालनीं मऊ जैसें पुष्प,
तिये मातेचें स्वरूप, जैसें कां होय ॥ १२३ ॥
तैसें श्रवणसुख चतुर, परीणमोनि साचार,
बोलणें जें अविकार, तें सत्य येथें ॥ १२४ ॥
आतां घालितांही पाणी, पाषाणीं न निघे आणी,
कां मथिलिया लोणी, कांजी नेदी ॥ १२५ ॥
त्वचा पायें शिरीं, हालेयाही फडे न करी,
वसंतींही अंबरीं, न होती फुलें ॥ १२६ ॥
नाना रंभेचेनिही रूपें, शुकीं नुठिजेचि कंदर्पें,
कां भस्मीं वन्हि न उद्दीपे, घृतेंही जेवीं ॥ १२७ ॥
तेवींचि कुमारु क्रोधें भरे, तैसिया मंत्राचीं बीजाक्षरें,
तियें निमित्तेंही अपारें, मीनलिया ॥ १२८ ॥
परी धातयाही पायां पडतां, नुठी गतायु पंडुसुता,
तैसी नुपजे उपजवितां, क्रोधोर्मी गा ॥ १२९ ॥
अक्रोधत्व ऐसें, नांव तें ये दशे,
जाण ऐसें श्रीनिवासें, म्हणितलें तया ॥ १३० ॥
आतां मृत्तिकात्यागें घटु, तंतुत्यागें पटु,
त्यजिजे जेवीं वटु, बीजत्यागें ॥ १३१ ॥
कां त्यजुनि भिंतिमात्र, त्यजिजे आघवेंचि चित्र,
कां निद्रात्यागें विचित्र, स्वप्नजाळ ॥ १३२ ॥
नाना जळत्यागें तरंग, वर्षात्यागें मेघ,
त्यजिजती जैसे भोग, धनत्यागें ॥ १३३ ॥
तेवीं बुद्धिमंतीं देहीं, अहंता सांडूनि पाहीं,
सांडिजे अशेषही, संसारजात ॥ १३४ ॥
तया नांव त्यागु, म्हणे तो यज्ञांगु,
हे मानूनि सुभगु, पार्थु पुसे ॥ १३५ ॥
आतां शांतीचें लिंग, तें व्यक्त मज सांग,
देवो म्हणती चांग, अवधान देईं ॥ १३६ ॥
तरी गिळोनि ज्ञेयातें, ज्ञाता ज्ञानही माघौतें,
हारपें निरुतें, ते शांति पैं गा ॥ १३७ ॥
जैसा प्रळयांबूचा उभडु, बुडवूनि विश्वाचा पवाडु,
होय आपणपें निबिडु, आपणचि ॥ १३८ ॥
मग उगम ओघ सिंधु, हा नुरेचि व्यवहारभेदु,
परी जलैक्याचा बोधु, तोही कवणा ? ॥ १३९ ॥
तैसी ज्ञेया देतां मिठी, ज्ञातृत्वही पडे पोटीं,
मग उरे तेंचि किरीटी, शांतीचें रूप ॥ १४० ॥
आतां कदर्थवीत व्याधी, बळीकरणाचिया आधीं,
आपपरु न शोधी, सद्वैद्यु जैसा ॥ १४१ ॥
का चिखलीं रुतली गाये, धडभाकड न पाहे,
जो तियेचिया ग्लानी होये, कालाभुला ॥ १४२ ॥
नाना बुडतयातें सकरुणु, न पुसे अंत्यजु कां ब्राह्मणु,
काढूनि राखे प्राणु, हेंचि जाणे ॥ १४३ ॥
कीं माय वनीं पापियें, उघडी केली विपायें,
ते नेसविल्यावीण न पाहे, शिष्टु जैसा ॥ १४४ ॥
तैसे अज्ञानप्रमादादिकीं, कां प्राक्तनहीन सदोखीं,
निंदत्वाच्या सर्वविखीं, खिळिले जे ॥ १४५ ॥
तयां आंगीक आपुलें, देऊनियां भलें,
विसरविजती सलें, सलतीं तियें ॥ १४६ ॥
अगा पुढिलाचा दोखु, करूनि आपुलिये दिठी चोखु,
मग घापे अवलोकु, तयावरी ॥ १४७ ॥
जैसा पुजूनि देवो पाहिजे, पेरूनि शेता जाइजे,
तोषौनि प्रसादु घेइजे, अतिथीचा ॥ १४८ ॥
तैसें आपुलेनि गुणें, पुढिलाचें उणें,
फेडुनियां पाहणें, तयाकडे ॥ १४९ ॥
वांचूनि न विंधिजें वर्मीं, नातुडविजे अकर्मीं,
न बोलविजे नामीं, सदोषीं तिहीं ॥ १५० ॥
वरी कोणे एकें उपायें, पडिलें तें उभें होये,
तेंच कीजे परी घाये, नेदावे वर्मीं ॥ १५१ ॥
पैं उत्तमाचियासाठीं, नीच मानिजे किरीटी,
हें वांचोनि दिठी, दोषु न घेपे ॥ १५२ ॥
अगा अपैशून्याचें लक्षण, अर्जुना हें फुडें जाण,
मोक्षमार्गींचें सुखासन, मुख्य हें गा ॥ १५३ ॥
आतां दया ते ऐसी, पूर्णचंद्रिका जैसी,
निववितां न कडसी, सानें थोर ॥ १५४ ॥
तैसें दुःखिताचें शिणणें, हिरतां सकणवपणें,
उत्तमाधम नेणें, विवंचूं गा ॥ १५५ ॥
पैं जगीं जीवनासारिखें, वस्तु अंगवरी उपखें,
परी जातें जीवित राखे, तृणाचेंहि ॥ १५६ ॥
तैसें पुढिलाचेनि तापें, कळवळलिये कृपें,
सर्वस्वेंसीं दिधलेंहि आपणपें, थोडेंचि गमे ॥ १५७ ॥
निम्न भरलियाविणें, पाणी ढळोंचि नेणे,
तेवीं श्रांता तोषौनि जाणें, सामोरें पां ॥ १५८ ॥
पैं पायीं कांटा नेहटे, तंव व्यथा जीवीं उमटे,
तैसा पोळे संकटें, पुढिलांचेनि ॥ १५९ ॥
कां पावो शीतळता लाहे, कीं ते डोळ्याचिलागीं होये,
तैसा परसुखें जाये, सुखावतु ॥ १६० ॥
किंबहुना तृषितालागीं, पाणी आरायिलें असे जगीं,
तैसें दुःखितांचे सेलभागीं, जिणें जयाचें ॥ १६१ ॥
तो पुरुषु वीरराया, मूर्तिमंत जाण दया,
मी उदयजतांचि तया, ऋणिया लाभें ॥ १६२ ॥
आतां सूर्यासि जीवें, अनुसरलिया राजीवें,
परी तें तो न शिवे, सौरभ्य जैसें ॥ १६३ ॥
कां वसंताचिया वाहाणीं, आलिया वनश्रीच्या अक्षौहिणी,
ते न करीतुचि घेणी, निगाला तो ॥ १६४ ॥
हें असो महासिद्धीसी, लक्ष्मीही आलिया पाशीं,
परी महाविष्णु जैसी, न गणीच ते ॥ १६५ ॥
तैसे ऐहिकींचे कां स्वर्गींचे, भोग पाईक जालिया इच्छेचे,
परी भोगावे हें न रुचे, मनामाजीं ॥ १६६ ॥
बहुवें काय कौतुकीं, जीव नोहे विषयाभिलाखी,
अलोलुप्त्वदशा ठाउकी, जाण ते हे ॥ १६७ ॥
आतां माशियां जैसें मोहळ, जळचरां जेवीं जळ,
कां पक्षियां अंतराळ, मोकळें हें ॥ १६८ ॥
नातरी बाळकोद्देशें, मातेचें स्नेह जैसें,
कां वसंतीच्या स्पर्शें, मऊ मलयानिळु ॥ १६९ ॥
डोळ्यां प्रियाची भेटी, कां पिलियां कूर्मीची दिठी,
तैसीं भूतमात्रीं राहटी, मवाळ ते ॥ १७० ॥
स्पर्शें अतिमृदु, मुखीं घेतां सुस्वादु,
घ्राणासि सुगंधु, उजाळु आंगें ॥ १७१ ॥
तो आवडे तेवढा घेतां, विरुद्ध जरी न होतां,
तरी उपमे येता, कापूर कीं ॥ १७२ ॥
परी महाभूतें पोटीं वाहे, तेवींचि परमाणूमाजीं सामाये,
या विश्वानुसार होये, गगन जैसें ॥ १७३ ॥
काय सांगों ऐसें जिणें, जें जगाचेनि जीवें प्राणें,
तया नांव म्हणें, मार्दव मी ॥ १७४ ॥
आतां पराजयें राजा, जैसा कदर्थिजे लाजा,
कां मानिया निस्तेजा, निकृष्टास्तव ॥ १७५ ॥
नाना चांडाळ मंदिराशीं, अवचटें आलिया संन्याशी,
मग लाज होय जैसी, उत्तमा तया ॥ १७६ ॥
क्षत्रिया रणीं पळोनि जाणें, तें कोण साहे लाजिरवाणें,
कां वैधव्यें पाचारणें, महासतियेतें ॥ १७७ ॥
रूपसा उदयलें कुष्ट, संभावितां कुटीचें बोट,
तया लाजा प्राणसंकट, होय जैसें ॥ १७८ ॥
तैसें औटहातपणें, जें शव होऊनि जिणें,
उपजों उपजों मरणें, नावानावा ॥ १७९ ॥
तियें गर्भमेदमुसें, रक्तमूत्ररसें,
वोंतीव होऊनि असे, तें लाजिरवाणें ॥ १८० ॥
हें बहु असो देहपणें, नामरूपासि येणें,
नाहीं गा लाजिरवाणें, तयाहूनी ॥ १८१ ॥
ऐसैसिया अवकळा, घेपे शरीराचा कंटाळा,
ते लाज पैं निर्मळा, निसुगा गोड ॥ १८२ ॥
आतां सूत्रतंतु तुटलिया, चेष्टाचि ठाके सायखडिया,
तैसें प्राणजयें कर्मेंद्रियां, खुंटे गती ॥ १८३ ॥
कीं मावळलिया दिनकरु, सरे किरणांचा प्रसरु,
तैसा मनोजयें प्रकारु, ज्ञानेंद्रियांचा ॥ १८४ ॥
एवं मनपवननियमें, होती दाही इंद्रियें अक्षमें,
तें अचापल्य वर्में, येणें होय ॥ १८५ ॥
तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता।
भवन्ति संपदं दैवीमभिजातस्य भारत ॥ ३॥
आतां ईश्वरप्राप्तीलागीं, प्रवर्ततां ज्ञानमार्गीं,
धिंवसेयाचि आंगी, उणीव नोहे ॥ १८६ ॥
वोखटें मरणा{ऐ}सें, तेंही आलें अग्निप्रवेशें,
परी प्राणेश्वरोद्देशें, न गणीचि सती ॥ १८७ ॥
तैसें आत्मनाथाचिया आधी, लाऊनि विषयविषाची बाधी,
धांवों आवडे पाणधी, शून्याचिये ॥ १८८ ॥
न ठाके निषेधु आड, न पडे विधीची भीड,
नुपजेचि जीवीं कोड, महासिद्धीचें ॥ १८९ ॥
ऐसें ईश्वराकडे निज, धांवे आपसया सहज,
तया नांव तेज, आध्यात्मिक तें ॥ १९० ॥
आतां सर्वही साहातिया गरिमा, गर्वा न ये तेचि क्षमा,
जैसें देह वाहोनि रोमा, वाहणें नेणें ॥ १९१ ॥
आणि मातलिया इंद्रियांचे वेग, कां प्राचीनें खवळले रोग,
अथवा योगवियोग, प्रियाप्रियांचे ॥ १९२ ॥
यया आघवियांचाचि थोरु, एके वेळे आलिया पूरु,
तरी अगस्त्य कां होऊनि धीरु, उभा ठाके ॥ १९३ ॥
आकाशीं धूमाची रेखा, उठिली बहुवा आगळिका,
ते गिळी येकी झुळुका, वारा जेवीं ॥ १९४ ॥
तैसें अधिभूताधिदैवां, अध्यात्मादि उपद्रवां,
पातलेयां पांडवा, गिळुनि घाली ॥ १९५ ॥
ऐसें चित्तक्षोभाच्या अवसरीं, उचलूनि धैर्या जें चांगावें करी,
धृति म्हणिपे अवधारीं, तियेतें गा ॥ १९६ ॥
आतां निर्वाळूनि कनकें, भरिला गांगें पीयूखें,
तया कलशाचियासारिखें, शौच असें ॥ १९७ ॥
जे आंगीं निष्काम आचारु, जीवीं विवेकु साचारु,
तो सबाह्य घडला आकारु, शुचित्वाचाचि ॥ १९८ ॥
कां फेडित पाप ताप, पोखीत तीरींचे पादप,
समुद्रा जाय आप, गंगेचें जैसें ॥ १९९ ॥
कां जगाचें आंध्य फेडितु, श्रियेचीं राउळें उघडितु,
निघे जैसा भास्वतु, प्रदक्षिणे ॥ २०० ॥
तैसीं बांधिलीं सोडिता, बुडालीं काढिता,
सांकडी फेडिता, आर्तांचिया ॥ २०१ ॥
किंबहुना दिवसराती, पुढिलांचें सुख उन्नति,
आणित आणित स्वार्थीं, प्रवेशिजे ॥ २०२ ॥
वांचूनि आपुलिया काजालागीं, प्राणिजाताच्या अहितभागीं,
संकल्पाचीही आडवंगी, न करणें जें ॥ २०३ ॥
पैं अद्रोहत्व ऐशिया गोष्टी, ऐकसी जिया किरीटी,
तें सांगितलें हें दिठी, पाहों ये तैसें ॥ २०४ ॥
आणि गंगा शंभूचा माथां, पावोनि संकोचे जेवीं पार्था,
तेवीं मान्यपणें सर्वथा, लाजणें जें ॥ २०५ ॥
तें हें पुढत पुढती, अमानित्व जाण सुमती,
मागां सांगितलेंसे किती, तेंचि तें बोलों ॥ २०६ ॥
एवं इहीं सव्विसें, ब्रह्मसंपदा हे वसत असे,
मोक्षचक्रवर्तीचें जैसें, अग्रहार होय ॥ २०७ ॥
नाना हे संपत्ति दैवी, या गुणतीर्थांची नीच नवी,
निर्विण्णसगरांची दैवी, गंगाचि आली ॥ २०८ ॥
कीं गणकुसुमांची माळा, हे घेऊनि मुक्तिबाळा,
वैराग्यनिरपेक्षाचा गळा, गिंवसीत असे ॥ २०९ ॥
कीं सव्विसें गुणज्योती, इहीं उजळूनि आरती,
गीता आत्मया निजपती, नीरांजना आली ॥ २१० ॥
उगळितें निर्मळें, गुण इयेंचि मुक्ताफळें,
दैवी शुक्तिकळें, गीतार्णवींची ॥ २११ ॥
काय बहु वानूं ऐसी, अभिव्यक्ती ये अपैसी,
केलें दैवी गुणराशी, संपत्तिरूप ॥ २१२ ॥
आतां दुःखाची आंतुवट वेली, दोषकाट्यांची जरी भरली,
तरी निजाभिधानी घाली, आसुरी ते ॥ २१३ ॥
पैं त्याज्य त्यजावयालागीं, जाणावी जरी अनुपयोगी,
तरी ऐका ते चांगी, श्रोत्रशक्ती ॥ २१४ ॥
तरी नरकव्यथा थोरी, आणावया दोषींघोरीं,
मेळु केला ते आसुरी, संपत्ति हे ॥ २१५ ॥
नाना विषवर्गु एकवटु, तया नांव जैसा बासटु,
आसुरी संपत्ती हा खोटु, दोषांचा तैसा ॥ २१६ ॥
दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च।
अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम् ॥ ४॥
तरी तयाचि असुरां, दोषांमाजीं जया वीरा,
वाडपणाचा डांगोरा, तो दंभु ऐसा ॥ २१७ ॥
जैसी आपुली जननी, नग्न दाविलिया जनीं,
ते तीर्थचि परी पतनीं, कारण होय ॥ २१८ ॥
कां विद्या गुरूपदिष्टा, बोभाइलिया चोहटां,
तरी इष्टदा परी अनिष्टा, हेतु होती ॥ २१९ ॥
पैं आंगें बुडतां महापूरीं, जे वेगें काढी पैलतीरीं,
ते नांवचि बांधिलिया शिरीं, बुडवी जैसी ॥ २२० ॥
कारण जें जीविता, तें वानिलें जरी सेवितां,
तरी अन्नचि पंडुसुता, होय विष ॥ २२१ ॥
तैसा दृष्टादृष्टाचा सखा, धर्मु जाला तो फोकारिजे देखा,
तरी तारिता तोचि दोखा-, लागीं होय ॥ २२२ ॥
म्हणौनि वाचेचा चौबारा, घातलिया धर्माचा पसारा,
धर्मुचि तो अधर्मु होय वीरा, तो दंभु जाणे ॥ २२३ ॥
आतां मूर्खाचिये जिभे, अक्षरांचा आंबुखा सुभे,
आणि तो ब्रह्मसभे, न रिझे जैसा ॥ २२४ ॥
कां मादुरी लोकांचा घोडा, गजपतिही मानी थोडा,
कां कांटियेवरिल्या सरडा, स्वर्गुही नीच ॥ २२५ ॥
तृणाचेनि इंधनें, आगी धांवे गगनें,
थिल्लरबळें मीनें, न गणिजे सिंधु ॥ २२६ ॥
तैसा माजे स्त्रिया धनें, विद्या स्तुती बहुतें मानें,
एके दिवसींचेनि परान्नें, अल्पकु जैसा ॥ २२७ ॥
अभ्रच्छायेचिया जोडी, निदैवु घर मोडी,
मृगांबु देखोनि फोडी, पणियाडें मूर्ख ॥ २२८ ॥
किंबहुना ऐसैसें, उतणें जें संपत्तिमिसें,
तो दर्पु गा अनारिसें, न बोलें घेईं ॥ २२९ ॥
आणि जगा वेदीं विश्वासु, आणि विश्वासीं पूज्य ईशु,
जगीं एक तेजसु, सूर्युचि हा ॥ २३० ॥
जगस्पृहे आस्पद, एक सार्वभौमपद,
न मरणें निर्विवाद, जगा पढियें ॥ २३१ ॥
म्हणौनि जग उत्साहें, यातें वानूं जाये,
कीं तें आइकोनि मत्सरु वाहे, फुगों लागे ॥ २३२ ॥
म्हणे ईश्वरातें खायें, तया वेदा विष सूयें,
गौरवामाजीं त्राये, भंगीत असे ॥ २३३ ॥
पतंगा नावडे ज्योती, खद्योता भानूची खंती,
टिटिभेनें आपांपती, वैरी केला ॥ २३४ ॥
तैसा अभिमानाचेनि मोहें, ईश्वराचेंही नाम न साहे,
बापातें म्हणे मज हे, सवती जाली ॥ २३५ ॥
ऐसा मान्यतेचा पुष्टगंडु, तो अभिमानी परमलंडु,
रौरवाचा रूढु, मार्गुचि पै ॥ २३६ ॥
आणि पुढिलांचें सुख, देखणियाचें होय मिख,
चढे क्रोधाग्नीचें विख, मनोवृत्ती ॥ २३७ ॥
शीतळाचिये भेटी, तातला तेलीं आगी उठी,
चंद्रु देखोनि जळे पोटीं, कोल्हा जैसा ॥ २३८ ॥
विश्वाचें आयुष्य जेणें उजळे, तो सूर्यु उदैला देखोनि सवळे,
पापिया फुटती डोळे, डुडुळाचे ॥ २३९ ॥
जगाची सुखपहांट, चोरां मरणाहूनि निकृष्ट,
दुधाचें काळकूट, होय व्याळीं ॥ २४० ॥
अगाधें समुद्रजळें, प्राशितां अधिक जळे,
वडवाग्नी न मिळे, शांति कहीं ॥ २४१ ॥
तैसा विद्याविनोदविभवें, देखे पुढिलांचीं दैवें,
तंव तंव रोषु दुणावे, क्रोधु तो जाण ॥ २४२ ॥
आणि मन सर्पाची कुटी, डोळे नाराचांची सुटी,
बोलणें ते वृष्टी, इंगळांची ॥ २४३ ॥
येर जें क्रियाजात, तें तिखयाचें कर्वत,
ऐसें सबाह्य खसासित, जयाचें गा ॥ २४४ ॥
तो मनुष्यांत अधमु जाण, पारुष्याचें अवतरण,
आतां आइक खूण, अज्ञानाची ॥ २४५ ॥
तरी शीतोष्णस्पर्शा, निवाडु नेणें पाषाणु जैसा,
कां रात्री आणि दिवसा, जात्यंधु तो ॥ २४६ ॥
आगी उठिला आरोगणें, जैसा खाद्याखाद्य न म्हणे,
कां परिसा पाडु नेणें, सोनया लोहा ॥ २४७ ॥
नातरी नानारसीं, रिघोनि दर्वी जैसी,
परी रसस्वादासी, चाखों नेणें ॥ २४८ ॥
कां वारा जैसा पारखी, नव्हेचि गा मार्गामार्गविखीं,
तैसे कृत्याकृत्यविवेकीं, अंधपण जें ॥ २४९ ॥
हें चोख हें मैळ, ऐसें नेणोनियां बाळ,
देखे तें केवळ, मुखींचि घाली ॥ २५० ॥
तैसें पापपुण्याचें खिचटें, करोनि खातां बुद्धिचेष्टे,
कडु मधुर न वाटे, ऐसी जे दशा ॥ २५१ ॥
तिये नाम अज्ञान, या बोला नाहीं आन,
एवं साही दोषांचें चिन्ह, सांगितलें ॥ २५२ ॥
इहींच साही दोषांगीं, हे आसुरी संपत्ति दाटुगी,
जैसें थोर विषय सुभगे अंगीं, अंग सानें ॥ २५३ ॥
कां तिघा वन्हींच्या पांती, पाहतां थोडे ठाय गमती,
परी विश्वही प्राणाहुती, करूं न पुरे ॥ २५४ ॥
धातयाही गेलिया शरण, त्रिदोषीं न चुके मरण,
तया तिहींची दुणी जाण, साही दोष हे ॥ २५५ ॥
इहीं साही दोषीं संपूर्णीं, जाली इयेचि उभारणी,
म्हणौनि आसुरी उणी, संपदा नव्हे ॥ २५६ ॥
परी क्रूरग्रहांची जैसी, मांदी मिळे एकेचि राशी,
कां येती निंदकापासीं, अशेष पापें ॥ २५७ ॥
मरणाराचें आंग, पडिघाती अवघेचि रोग,
कां कुमुहूर्तीं दुर्योग, एकवटती ॥ २५८ ॥
विश्वासला आतुडवीजे चोरा, शिणला सुइजे महापुरा,
तैसें दोषीं इहीं नरा, अनिष्ट कीजे ॥ २५९ ॥
कां आयुष्य जातिये वेळे, शेळिये सातवेउळी मिळे,
तैसे साही दोष सगळे, जोडती तया ॥ २६० ॥
मोक्षमार्गाकडे, जैं यांचा आंबुखा पडे,
तैं न निघे म्हणौनि बुडे, संसारीं तो ॥ २६१ ॥
अधमां योनींच्या पाउटीं, उतरत जो किरीटी,
स्थावरांही तळवटीं, बैसणें घे ॥ २६२ ॥
हें असो तयाच्या ठायीं, मिळोनि साही दोषीं इहीं,
आसुरी संपत्ति पाहीं, वाढविजे ॥ २६३ ॥
ऐसिया या दोनी, संपदा प्रसिद्धा जनीं,
सांगितलिया चिन्हीं, वेगळाल्या ॥ २६४ ॥
दैवी संपद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता।
मा शुचः संपदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव ॥ ५॥
इया दोन्हींमाजीं पहिली, दैवी जे म्हणितली,
ते मोक्षसूर्यें पाहली, उखाचि जाण ॥ २६५ ॥
येरी जे दुसरी, संपत्ति कां आसुरी,
ते मोहलोहाची खरी, सांखळी जीवां ॥ २६६ ॥
परी हें आइकोनि झणें, भय घेसी हो मनें,
काय रात्रीचा दिनें, धाकु धरिजे ॥ २६७ ॥
हे आसुरी संपत्ति तया, बंधालागीं धनंजया,
जो साही दोषां ययां, आश्रयो होय ॥ २६८ ॥
तूं तंव पांडवा, सांगितलेया दैवा,
गुणनिधी बरवा, जन्मलासी ॥ २६९ ॥
म्हणौनि पार्था तूं या, दैवी संपत्ती स्वामिया,
होऊनि यावें उवाया, कैवल्याचिया ॥ २७० ॥
द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च।
दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे श्रुणु ॥ ६॥
आणि दैवां आसुरां, संपत्तिवंतां नरां,
अनादिसिद्ध उजगरा, राहाटीचा आहे ॥ २७१ ॥
जैसें रात्रीच्या अवसरीं, व्यापारिजे निशाचरीं,
दिवसा सुव्यवहारीं, मनुष्यादिकीं ॥ २७२ ॥
तैसिया आपुलालिया राहाटीं, वर्तती दोन्ही सृष्टी,
दैवी आणि किरीटी, आसुरी येथ ॥ २७३ ॥
तेवींचि विस्तारूनि दैवी, ज्ञानकथनादि प्रस्तावीं,
मागील ग्रंथीं बरवी, सांगितली ॥ २७४ ॥
आतां आसुरी जे सृष्टी, तेथिंची उपलऊं गोठी,
अवधानाची दिठी, दे पां निकी ॥ २७५ ॥
तरी वाद्येंवीण नादु, नेदी कवणाही सादु,
कां अपुष्पीं मकरंदु, न लभे जैसा ॥ २७६ ॥
तैसी प्रकृति हे आसुर, एकली नोहे गोचर,
जंव एकाधें शरीर, माल्हातीना ॥ २७७ ॥
मग आविष्कारला लांकुडें, पावकु जैसा जोडे,
तैसी प्राणिदेहीं सांपडे, आटोपली हे ॥ २७८ ॥
ते वेळीं जे वाढी ऊंसा, तेचि आंतुला रसा,
देहाकारु होय तैसा, प्राणियांचा ॥ २७९ ॥
आतां तयाचि प्राणियां, रूप करूं धनंजया,
घडले जे आसुरीया, दोषवृंदीं ॥ २८० ॥
प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदुरासुराः।
न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते ॥ ७॥
तरी पुण्यालागीं प्रवृत्ती, कां पापाविषयीं निवृत्ती,
या जाणणेयाची राती, तयांचें मन ॥ २८१ ॥
निगणेया आणि प्रवेशा, चित्त नेदीतु आवेशा,
कोशकिटु जैसा, जाचिन्नला पैं ॥ २८२ ॥
कां दिधलें मागुती येईल, कीं न ये हें पुढील,
न पाहातां दे भांडवल, मूर्ख चोरां ॥ २८३ ॥
तैसिया प्रवृत्ति निवृत्ति दोनी, नेणिजती आसुरीं जनीं,
आणि शौच ते स्वप्नीं, देखती ना ते ॥ २८४ ॥
काळिमा सांडील कोळसा, वरी चोखी होईल वायसा,
राक्षसही मांसा, विटों शके ॥ २८५ ॥
परी आसुरां प्राणियां, शौच नाहीं धनंजया,
पवित्रत्व जेवीं भांडिया, मद्याचिया ॥ २८६ ॥
वाढविती विधीची आस, कां पाहाती वडिलांची वास,
आचाराची भाष, नेणतीचि ते ॥ २८७ ॥
जैसें चरणें शेळियेचें, कां धावणें वारियाचें,
जाळणें आगीचें, भलतेउतें ॥ २८८ ॥
तैसें पुढां सूनि स्वैर, आचरती ते गा आसुर,
सत्येंसि कीर वैर, सदाचि तयां ॥ २८९ ॥
जरी नांगिया आपुलिया, विंचू करी गुदगुलिया,
तरी साचा बोली बोलिया, बोलती ते ॥ २९० ॥
आपानाचेनि तोंडें, जरी सुगंधा येणें घडे,
तरी सत्य तयां जोडे, आसुरांतें ॥ २९१ ॥
ऐसें ते न करितां कांहीं, आंगेंचि वोखटे पाहीं,
आतां बोलती ते नवाई, सांगिजैल ॥ २९२ ॥
एऱ्हवीं करेयाच्या ठायीं चांग, तें तयासि कैचें नीट आंग,
तैसा आसुरांचा प्रसंग, प्रसंगें परीस ॥ २९३ ॥
उधवणीचें जेवीं तोंड, उभळी धुंवाचे उभड,
हें जाणिजे तेवीं उघड, सांगों ते बोल ॥ २९४ ॥
असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम्।
अपरस्परसंभूतं किमन्यत् कामहैतुकम् ॥ ८॥
तरी विश्व हा अनादि ठावो, येथ नियंता ईश्वररावो,
चावडिये न्यावो अन्यावो, निवडी वेदु ॥ २९५ ॥
वेदीं अन्यायीं पडे, तो निरयभोगें दंडे,
सन्यायी तो सुरवाडें, स्वर्गीं जिये ॥ २९६ ॥
ऐसी हे विश्वव्यवस्था, अनादि जे पार्था,
इयेतें म्हणती ते वृथा, अवघेंचि हें ॥ २९७ ॥
यज्ञमूढ ठकिले यागीं, देवपिसें प्रतिमालिंगीं,
नागविले भगवे योगी, समाधिभ्रमें ॥ २९८ ॥
येथ आपुलेनि बळें, भोगिजे जें जें वेंटाळें,
हें वांचोनि वेगळें, पुण्य आहे ? ॥ २९९ ॥
ना अशक्तपणें आंगिकें, वेगळवेंटाळीं न टकें,
ऐसा गादिजेवीण विषयसुखें, तेंचि पाप ॥ ३०० ॥
प्राण घेपती संपन्नांचे, ते पाप जरी साचें,
तरी सर्वस्व हाता ये तयांचें, हें पुण्यफळ कीं ? ॥ ३०१ ॥
बळी अबळातें खाय, हेंचि बाधित जरी होय,
तरी मासयां कां न होय, निसंतान ? ॥ ३०२ ॥
आणि कुळें शोधूनि दोन्ही, कुमारेंचि शुभलग्नीं,
मेळवीजती प्रजासाधनीं, हेतु जरी ॥ ३०३ ॥
तरी पशुपक्षादि जाती, जया मिती नाहीं संतती,
तयां कोणें प्रतिपत्तीं, विवाह केले ? ॥ ३०४ ॥
चोरियेचें धन आलें, तरी तें कोणासि विष जालें ?,
वालभें परद्वार केलें, कोढी कोणी होय ? ॥ ३०५ ॥
म्हणौनि देवो गोसांवी, तो धर्माधर्मु भोगवी,
आणि परत्राच्या गांवीं, करी तो भोगी ॥ ३०६ ॥
परी परत्र ना देवो, न दिसे म्हणौनि तें वावो,
आणि कर्ता निमे मा ठावो, भोग्यासि कवणु ? ॥ ३०७ ॥
येथ उर्वशिया इंद्र सुखी, जैसा कां स्वर्गलोकीं,
तैसाचि कृमिही नरकीं, लोळतु श्लाघे ॥ ३०८ ॥
म्हणौनि नरक स्वर्गु, नव्हे पापपुण्यभागु,
जे दोहीं ठायीं सुखभोगु, कामाचाचि तो ॥ ३०९ ॥
याकारणें कामें, स्त्रीपुरुषयुग्में,
मिळती तेथ जन्मे, आघवें जग ॥ ३१० ॥
आणि जें जें अभिलाषें, स्वार्थालागीं हें पोषे,
पाठीं परस्परद्वेषें, कामचि नाशी ॥ ३११ ॥
एवं कामावांचूनि कांहीं, जगा मूळचि आन नाहीं,
ऐसें बोलती पाहीं, आसुर गा ते ॥ ३१२ ॥
आतां असो हें किडाळ, बोली न करूं पघळ,
सांगतांचि सफोल, होतसे वाचा ॥ ३१३ ॥
एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः।
प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतोऽहिताः ॥ ९॥
आणि ईश्वराचिया खंती, नुसधियाचि करिती चांथी,
हेंही नाहीं चित्तीं, निश्चयो एकु ॥ ३१४ ॥
किंबहुना उघड, आंगी लाऊनियां पाखांड,
नास्तिकपणाचें हाड, रोंविलें जीवीं ॥ ३१५ ॥
ते वेळीं स्वर्गालागीं आदरु, कां नरकाचा अडदरु,
या वासनांचा अंकुरु, जळोनि गेला ॥ ३१६ ॥
मग केवळ ये देहखोडां, अमेध्योदकाचा बुडबुडा,
विषयपंकीं सुहाडा, बुडाले गा ॥ ३१७ ॥
जैं आटावें होती जळचर, तैं डोहीं मिळतीं ढीवर,
कां पडावें होय शरीर, तैं रोगा उदयो ॥ ३१८ ॥
उदैजणें केतूचें जैसें, विश्वा अनिष्टोद्देशें,
जन्मती ते तैसे, लोकां आटूं ॥ ३१९ ॥
विरूढलिया अशुभ, फुटती तैं ते कोंभ,
पापाचे कीर्तिस्तंभ, चालते ते ॥ ३२० ॥
आणि मागांपुढां जाळणें, वांचूनि आगी कांहीं नेणें,
तैसें विरुद्धचि एक करणें, भलतेयां ॥ ३२१ ॥
परी तेंचि गा करणें, आदरिती संभ्रमें जेणें,
तो आइक पार्था म्हणे, श्रीनिवासु ॥ ३२२ ॥
काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विताः।
मोहाद् गृहीत्वाऽसद्ग्रहान्प्रवर्तन्तेऽशुचिव्रताः ॥ १०॥
तरी जाळ पाणियें न भरे, आगी इंधन न पुरे,
तयां दुर्भरांचिये धुरे, भुकाळु जो ॥ ३२३ ॥
तया कामाचा वोलावा, जीवीं धरुनिया पांडवा,
दंभमानाचा मेळावा, मेळविती ॥ ३२४ ॥
मातलिया कुंजरा, आगळी जाली मदिरा,
तैसा मदाचा ताठा तंव जरा, चढतां आंगीं ॥ ३२५ ॥
आणि आग्रहा तोचि ठावो, वरी मौढ्या{ऐ}सा सावावो,
मग काय वानूं निर्वाहो, निश्चयाचा ॥ ३२६ ॥
जिहीं परोपतापु घडे, परावा जीवु रगडे,
तिहीं कर्मीं होऊनि गाढे, जन्मवृत्ती ॥ ३२७ ॥
मग आपुलें केलें फोकारिती, आणि जगातें धिक्कारिती,
दाहीं दिशीं पसरिती, स्पृहाजाळ ॥ ३२८ ॥
ऐसेनि गा आटोपें, थोरियें आणती पापें,
धर्मधेनु खुरपें, सुटलें जैसें ॥ ३२९ ॥
चिन्तामपरिमेयां च प्रलयान्तामुपाश्रिताः।
कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः ॥ ११॥
याचि एका आयती, तयाचिया कर्मप्रवृत्ती,
आणि जिणियाही परौती, वाहती चिंता ॥ ३३० ॥
पाताळाहूनि निम्न, जियेचिये उंचीये सानें गगन,
जें पाहातां त्रिभुवन, अणुही नोहे ॥ ३३१ ॥
ते योगपटाची मवणी, जीवीं अनियम चिंतवणी,
जे सांडूं नेणें मरणीं, वल्लभा जैसी ॥ ३३२ ॥
तैसी चिंता अपार, वाढविती निरंतर,
जीवीं सूनि असार, विषयादिक ॥ ३३३ ॥
स्त्रिया गाइलें आइकावें, स्त्रीरूप डोळां देखावें,
सर्वेंद्रियें आलिंगावें, स्त्रियेतेंचि ॥ ३३४ ॥
कुरवंडी कीजे अमृतें, ऐसें सुख स्त्रियेपरौतें,
नाहींचि म्हणौनि चित्तें, निश्चयो केला ॥ ३३५ ॥
मग तयाचि स्त्रीभोगा-, लागीं पाताळ स्वर्गा,
धांवती दिग्विभागा, परौतेही ॥ ३३६ ॥
आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायाणाः।
ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसञ्चयान् ॥ १२॥
आमिषकवळु थोरी आशा, न विचारितां गिळी मासा,
तैसें कीजे विषयाशा, तयांसि गा ॥ ३३७ ॥
वांछित तंव न पवती, मग कोरडियेचि आशेची संतती,
वाढऊं वाढऊं होती, कोशकिडे ॥ ३३८ ॥
आणि पसरिला अभिलाषु, अपूर्णु होय तोचि द्वेषु,
एवं कामक्रोधांहूनि अधिकु, पुरुषार्थु नाहीं ॥ ३३९ ॥
दिहा खोलणें रात्रीं जागोवा, ठाणांतरीयां जैसा पांडवा,
अहोरात्रींही विसांवा, भेटेचिना ॥ ३४० ॥
तैसें उंचौनि लोटिलें कामें, नेहटती क्रोधाचिये ढेमे,
तरी रागद्वेष प्रेमें, न माती केंही ॥ ३४१ ॥
तेवींचि जीवींचिया हांवा, विषयवासनांचा मेळावा,
केला तरी भोगावा, अर्थें कीं ना ? ॥ ३४२ ॥
म्हणौनि भोगावयाजोगा, पुरता अर्थु पैं गा,
आणावया जगा, झोंबती सैरा ॥ ३४३ ॥
एकातें साधूनि मारिती, एकाचि सर्वस्वें हरिती,
एकालागीं उभारिती, अपाययंत्रें ॥ ३४४ ॥
पाशिकें पोतीं वागुरा, सुणीं ससाणें चिकाटी खोंचारा,
घेऊनि निघती डोंगरा, पारधी जैसें ॥ ३४५ ॥
ते पोसावया पोट, मारूनि प्राणियांचे संघाट,
आणिती ऐसें निकृष्ट, तेंही करिती ॥ ३४६ ॥
परप्राणघातें, मेळविती वित्तें,
मिळाल्या चित्तें, तोषणें कैसें ॥ ३४७ ॥
इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम्।
इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् ॥ १३॥
म्हणे आजि मियां, संपत्ति बहुतेकांचिया,
आपुल्या हातीं केलिया, धन्यु ना मी ? ॥ ३४८ ॥
ऐसा श्लाघों जंव जाये, तंव मन आणीकही वाहे,
सवेंचि म्हणे पाहे, आणिकांचेंही आणूं ॥ ३४९ ॥
हें जेतुलें असे जोडिलें, तयाचेनि भांडवलें,
लाभा घेईन उरलें, चराचर हें ॥ ३५० ॥
ऐसेनि धना विश्वाचिया, मीचि होईन स्वामिया,
मग दिठी पडे तया, उरों नेदी ॥ ३५१ ॥
असौ मया हतः शत्रुऱनिष्ये चापरानपि।
ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान् सुखी ॥ १४॥
हे मारिले वैरी थोडे, आणीकही साधीन गाढे,
मग नांदेन पवाडें, येकलाचि मी ॥ ३५२ ॥
मग माझी होतील कामारीं, तियेंवांचूनि येरें मारीं,
किंबहुना चराचरीं, ईश्वरु तो मी ॥ ३५३ ॥
मी भोगभूमीचा रावो, आजि सर्वसुखासी ठावो,
म्हणौनि इंद्रुही वावो, मातें पाहुनि ॥ ३५४ ॥
मी मनें वाचा देहें, करीं ते कैसें नोहे,
कें मजवांचूनि आहे, आज्ञासिद्ध आन ? ॥ ३५५ ॥
तंवचि बळिया काळु, जंव न दिसें मी अतुर्बळु,
सुखाचा कीर निखिळु, रासिवा मीचि ॥ ३५६ ॥
आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया।
यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः ॥ १५॥
कुबेरु आथिला होये, परी तो नेणें माझी सोये,
संपत्ती मजसम नव्हे, श्रीनाथाही ॥ ३५७ ॥
माझिया कुळाचा उजाळू, कां जातिगोतांचा मेळू,
पाहतां ब्रह्माही हळू, उणाचि दिसे ॥ ३५८ ॥
म्हणौनि मिरविती नांवें, वायां ईश्वरादि आघवे,
नाहीं मजसीं सरी पावे, ऐसें कोण्ही ॥ ३५९ ॥
आतां लोपला अभिचारु, तया करीन मी जीर्णोद्धारु,
प्रतिष्ठीन परमारु, यागवरी ॥ ३६० ॥
मातें गाती वानिती, नटनाचें रिझविती,
तयां देईन मागती, ते ते वस्तु ॥ ३६१ ॥
माजिरा अन्नपानीं, प्रमदांच्या आलिंगनीं,
मी होईन त्रिभुवनीं, आनंदाकारु ॥ ३६२ ॥
काय बहु सांगों ऐसें, ते आसुरीप्रकृती पिसें,
तुरंबिती असोसें, गगनौळें तियें ॥ ३६३ ॥
अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः।
प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ ॥ १६॥
ज्वराचेनि आटोपें, रोगी भलतैसें जल्पे,
चावळती संकल्पें, जाण ते तैसें ॥ ३६४ ॥
अज्ञान आतुले धुळी, म्हणौनि आशा वाहटुळी,
भोवंडीजती अंतराळीं, मनोरथांच्या ॥ ३६५ ॥
अनियम आषाढ मेघ, कां समुद्रोर्मी अभंग,
तैसे कामिती अनेग, अखंड काम ॥ ३६६ ॥
मग पैं कामनाचि तया, जीवीं जाल्या वेलरिया,
वोरपिली कांटिया, कमळें जैसीं ॥ ३६७ ॥
कां पाषाणाचिया माथां, हांडी फुटली पार्था,
जीवीं तैसें सर्वथा, कुटके जाले ॥ ३६८ ॥
तेव्हां चढतिये रजनी, तमाची होय पुरवणी,
तैसा मोहो अंतःकरणीं, वाढोंचि लागे ॥ ३६९ ॥
आणि वाढे जंव जंव मोहो, तंव तंव विषयीं रोहो,
विषय तेथ ठावो, पातकासी ॥ ३७० ॥
पापें आपलेनि थांवें, जंव करिती मेळावे,
तंव जितांचि आघवे, येती नरकां ॥ ३७१ ॥
म्हणौनि गा सुमती, जे कुमनोरथां पाळिती,
ते आसुर येती वस्ती, तया ठाया ॥ ३७२ ॥
जेथ असिपत्रतरुवर, खदिरांगाराचे डोंगर,
तातला तेलीं सागर, उतताती ॥ ३७३ ॥
जेथ यातनांची श्रेणी, हे नित्य नवी यमजाचणी,
पडती तिये दारुणीं, नरकलोकीं ॥ ३७४ ॥
ऐसे नरकाचिये शेले, भागीं जे जे जन्मले,
तेही देखों भुलले, यजिती यागीं ॥ ३७५ ॥
एऱ्हवीं यागादिक क्रिया, आहाण तेचि धनंजया,
परी विफळती आचरोनियां, नाटकी जैसी ॥ ३७६ ॥
वल्लभाचिया उजरिया, आपणयाप्रति कुस्त्रिया,
जोडोनि तोषिती जैसियां, अहेवपणें ॥ ३७७ ॥
आत्मसंभाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः।
यजन्ते नामयज्ञैस्ते दम्भेनाविधिपूर्वकम् ॥ १७॥
तैसें आपणयां आपण, मानितां महंतपण,
फुगती असाधारण, गर्वें तेणें ॥ ३७८ ॥
मग लवों नेणती कैसे, आटिवा लोहाचे खांब जैसे,
कां उधवले आकाशें, शिळाराशी ॥ ३७९ ॥
तैसें आपुलिये बरवे, आपणचि रिझतां जीवें,
तृणाहीहूनि आघवें, मानिती नीच ॥ ३८० ॥
वरी धनाचिया मदिरा, माजूनि धनुर्धरा,
कृत्याकृत्यविचारा, सवतें केलें ॥ ३८१ ॥
जया आंगीं आयती ऐसी, तेथ यज्ञाची गोठी कायसी,
तरी काय काय पिसीं, न करिती गा ? ॥ ३८२ ॥
म्हणौनि कोणे एके वेळे, मौढ्यमद्याचेनि बळें,
यागाचींही टवाळें, आदरिती ॥ ३८३ ॥
ना कुंड मंडप वेदी, ना उचित साधनसमृद्धी,
आणि तयांसी तंव विधी, द्वंद्वचि सदा ॥ ३८४ ॥
देवां ब्राह्मणांचेनि नांवें, आडवारेनहि नोहावें,
ऐसें आथी तेथ यावें, लागे कवणा ? ॥ ३८५ ॥
पैं वासरुवाचा भोकसा, गाईपुढें ठेवूनि जैसा,
उगाणा घेती क्षीररसा, बुद्धिवंत ॥ ३८६ ॥
तैसें यागाचेनि नांवें, जग वाऊनि हांवें,
नागविती आघवें, अहेरावारी ॥ ३८७ ॥
ऐशा कांहीं आपुलिया, होमिती जे उजरिया,
तेणें कामिती प्राणिया, सर्वनाशु ॥ ३८८ ॥
अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधम् च संश्रिताः।
मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः ॥ १८॥
मग पुढां भेरी निशाण, लाउनी ते दीक्षितपण,
जगीं फोकारिती आण, वावो वावो ॥ ३८९ ॥
तेव्हां महत्त्वें तेणें अधमा, गर्वा चढे महिमा,
जैसे लेवे दिधले तमा, काजळाचे ॥ ३९० ॥
तैसें मौढ्य घणावे, औद्धत्य उंचावे,
अहंकारु दुणावे, अविवेकुही ॥ ३९१ ॥
मग दुजयाची भाष, नुरवावया निःशेष,
बळीयेपणा अधिक, होय बळ ॥ ३९२ ॥
ऐसा अहंकार बळा, जालिया एकवळा,
दर्पसागरु मर्यादवेळा, सांडूनि उते ॥ ३९३ ॥
मग वोसंडिलेनि दर्पें, कामाही पित्त कुरुपे,
तया धगीं सैंघ पळिपे, क्रोधाग्नि तो ॥ ३९४ ॥
तेथ उन्हाळा आगी खरमरा, तेलातुपाचिया कोठारा,
लागला आणि वारा, सुटला जैसा ॥ ३९५ ॥
तैसा अहंकारु बळा आला, दर्पु कामक्रोधीं गूढला,
या दोहींचा मेळु जाला, जयांच्या ठायीं ॥ ३९६ ॥
ते आपुलिया सवेशा, मग कोणी कोणी हिंसा,
या प्राणियांते वीरेशा, न साधती गा ? ॥ ३९७ ॥
पहिलें तंव धनुर्धरा, आपुलिया मांसरुधिरा,
वेंचु करिती अभिचारा-, लागोनियां ॥ ३९८ ॥
तेथ जाळिती जियें देहें, यामाजीं जो मी आहें,
तया आत्मया मज घाये, वाजती ते ॥ ३९९ ॥
आणि अभिचारकीं तिहीं, उपद्रविजे जेतुलें कांहीं,
तेथ चैतन्य मी पाहीं, सीणु पावे ॥ ४०० ॥
आणि अभिचारावेगळें, विपायें जे अवगळें,
तया टाकिती इटाळें, पैशून्याचीं ॥ ४०१ ॥
सती आणि सत्पुरुख, दानशीळ याज्ञिक,
तपस्वी अलौकिक, संन्यासी जे ॥ ४०२ ॥
कां भक्त हन महात्मे, इयें माझीं निजाचीं धामें,
निर्वाळलीं होमधर्में, श्रौतादिकीं ॥ ४०३ ॥
तयां द्वेषाचेनि काळकूटें, बासटोनि तिखटें,
कुबोलांचीं सदटें, सूति कांडें ॥ ४०४ ॥
तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान्।
क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु ॥ १९॥
ऐसे आघवाचि परी, प्रवर्तले माझ्या वैरी,
तयां पापियां जें मी करीं, तें आइक पां ॥ ४०५ ॥
तरी मनुष्यदेहाचा तागा, घेऊनि रुसती जे जगा,
ते पदवी हिरोनि पैं गा, ऐसे ठेवीं ॥ ४०६ ॥
जे क्लेशगांवींचा उकरडा, भवपुरींचा पानवडा,
ते तमोयोनि तयां मूढां, वृत्तीचि दें ॥ ४०७ ॥
मग आहाराचेनि नांवें, तृणही जेथ नुगवे,
ते व्याघ्र वृश्चिक आडवे, तैसिये करीं ॥ ४०८ ॥
तेथ क्षुधादुःखें बहुतें, तोडूनि खाती आपणयातें,
मरमरों मागुतें, होतचि असती ॥ ४०९ ॥
कां आपुला गरळजाळीं, जळिती आंगाची पेंदळी,
ते सर्पचि करीं बिळीं, निरुंधला ॥ ४१० ॥
परी घेतला श्वासु घापे, येतुलेनही मापें,
विसांवा तयां नाटोपे, दुर्जनांसी ॥ ४११ ॥
ऐसेनि कल्पांचिया कोडी, गणितांही संख्या थोडी,
तेतुला वेळु न काढी, क्लेशौनि तयां ॥ ४१२ ॥
तरी तयांसी जेथ जाणें, तेथिंचें हें पहिलें पेणें,
तें पावोनि येरें दारुणें, न होती दुःखें ॥ ४१३ ॥
आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि।
मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम् ॥ २०॥
हा ठायवरी, संपत्ति ते आसुरी,
अधोगती अवधारीं, जोडिली तिहीं ॥ ४१४ ॥
पाठीं व्याघ्रादि तामसा, योनी तो अळुमाळु ऐसा,
देहाधाराचा उसासा, आथी जोही ॥ ४१५ ॥
तोही मी वोल्हावा हिरें, मग तमचि होती एकसरें,
जेथे गेलें आंधारें, काळवंडैजे ॥ ४१६ ॥
जयांची पापा चिळसी, नरक घेती विवसी,
शीण जाय मूर्च्छी, सिणें जेणें ॥ ४१७ ॥
मळु जेणें मैळे, तापु जेणें पोळे,
जयाचेनि नांवें सळे, महाभय ॥ ४१८ ॥
पापा जयाचा कंटाळा, उपजे अमंगळ अमंगळा,
विटाळुही विटाळा, बिहे जया ॥ ४१९ ॥
ऐसें विश्वाचेया वोखटेया, अधम जे धनंजया,
तें ते होती भोगूनियां, तामसा योनी ॥ ४२० ॥
अहा सांगतां वाचा रडे, आठवितां मन खिरडे,
कटारे मूर्खीं केवढे, जोडिले निरय ॥ ४२१ ॥
कायिसया ते आसुर, संपत्ति पोषिती वाउर,
जिया दिधलें घोर, पतन ऐसें ॥ ४२२ ॥
म्हणौनि तुवां धनुर्धरा, नोहावें गा तिया मोहरा,
जेउता वासु आसुरा, संपत्तिवंता ॥ ४२३ ॥
आणि दंभादि दोष साही, हे संपूर्ण जयांच्या ठायीं,
ते त्यजावे हें काई, म्हणों कीर ? ॥ ४२४ ॥
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः।
कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत् त्रयं त्यजेत् ॥ २१॥
परी काम क्रोध लोभ, या तिहींचेंही थोंब,
थांवे तेथें अशुभ, पिकलें जाण ॥ ४२५ ॥
सर्व दुःखां आपुलिया, दर्शना धनंजया,
पाढाऊ हे भलतया, दिधलें आहाती ॥ ४२६ ॥
कां पापियां नरकभोगीं, सुवावयालागीं जगीं,
पातकांची दाटुगी, सभाचि हे ॥ ४२७ ॥
ते रौरव गा तंवचिवरी, आइकिजती पटांतरीं,
जंव हे तिन्ही अंतरीं, उठती ना ॥ ४२८ ॥
अपाय तिहीं आसलग, यातना इहीं सवंग,
हाणी हाणी नोहे हे तिघ, हेचि हाणी ॥ ४२९ ॥
काय बहु बोलों सुभटा, सांगितलिया निकृष्टा,
नरकाचा दारवंटा, त्रिशंकु हा ॥ ४३० ॥
या कामक्रोधलोभां-, माजीं जीवें जो होय उभा,
तो निरयपुरीची सभा, सन्मानु पावे ॥ ४३१ ॥
म्हणौनि पुढत पुढतीं किरीटी, हे कामादि दोष त्रिपुटी,
त्यजावींचि गा वोखटी, आघवा विषयीं ॥ ४३२ ॥
एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः।
आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम् २२॥
धर्मादिकां चौंही आंतु, पुरुषार्थाची तैंचि मातु,
करावी जैं संघातु, सांडील हा ॥ ४३३ ॥
हे तिन्ही जीवीं जंव जागती, तंववरी निकियाची प्राप्ती,
हे माझे कान नाइकती, देवोही म्हणे ॥ ४३४ ॥
जया आपणपें पढिये, आत्मनाशा जो बिहे,
तेणें न धरावी हे सोये, सावधु होईजे ॥ ४३५ ॥
पोटीं बांधोनि पाषाण, समुद्रीं बाहीं आंगवण,
कां जियावया जेवण, काळकूटाचें ॥ ४३६ ॥
इहीं कामक्रोधलोभेंसी, कार्यसिद्धि जाण तैसी,
म्हणौनि ठावोचि पुसीं, ययांचा गा ॥ ४३७ ॥
जैं कहीं अवचटें, हे तिकडी सांखळ तुटे,
तैं सुखें आपुलिये वाटे, चालों लाभे ॥ ४३८ ॥
त्रिदोषीं सांडिलें शरीर, त्रिकुटीं फिटलिया नगर,
त्रिदाह निमालिया अंतर, जैसें होय ॥ ४३९ ॥
तैसा कामादिकीं तिघीं, सांडिला सुख पावोनि जगीं,
संगु लाहे मोक्षमार्गीं, सज्जनांचा ॥ ४४० ॥
मग सत्संगें प्रबळें, सच्छास्त्राचेनि बळें,
जन्ममृत्यूचीं निमाळें, निस्तरें रानें ॥ ४४१ ॥
ते वेळीं आत्मानंदें आघवें, जें सदा वसतें बरवें,
तें तैसेंचि पाटण पावे, गुरुकृपेचें ॥ ४४२ ॥
तेथ प्रियाची परमसीमा, तो भेटे माउली आत्मा,
तयें खेवीं आटे डिंडिमा, सांसारिक हे ॥ ४४३ ॥
ऐसा जो कामक्रोधलोभां, झाडी करूनि ठाके उभा,
तो येवढिया लाभा, गोसावी होय ॥ ४४४ ॥
यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारत।
न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् ॥ २३॥
ना हें नावडोनि कांहीं, कामादिकांच्याचि ठायीं,
दाटिली जेणें डोई, आत्मचोरें ॥ ४४५ ॥
जो जगीं समान सकृपु, हिताहित दाविता दीपु,
तो अमान्यु केला बापु, वेदु जेणें ॥ ४४६ ॥
न धरीचि विधीची भीड, न करीचि आपली चाड,
वाढवीत गेला कोड, इंद्रियांचें ॥ ४४७ ॥
कामक्रोधलोभांची कास, न सोडीच पाळिली भाष,
स्वैराचाराचें असोस, वळघला रान ॥ ४४८ ॥
तो सुटकेचिया वाहिणीं, मग पिवों न लाहे पाणी,
स्वप्नींही ते कहाणी, दूरीचि तया ॥ ४४९ ॥
आणि परत्र तंव जाये, हें कीर तया आहे,
परी ऐहिकही न लाहे, भोग भोगूं ॥ ४५० ॥
तरी माशालागीं भुलला, ब्राह्मण पाणबुडां रिघाला,
कीं तेथही पावला, नास्तिकवादु ॥ ४५१ ॥
तैसें विषयांचेनि कोडें, जेणें परत्रा केलें उबडें,
तंव तोचि आणिकीकडे, मरणें नेला ॥ ४५२ ॥
एवं परत्र ना स्वर्गु, ना ऐहिकही विषयभोगु,
तेथ केउता प्रसंगु, मोक्षाचा तो ? ॥ ४५३ ॥
म्हणौनि कामाचेनि बळें, जो विषय सेवूं पाहे सळें,
तया विषयो ना स्वर्गु मिळे, ना उद्धरे तो ॥ ४५४ ॥
तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ।
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहाऱसि ॥ २४॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसंपद्विभागयोगोनाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥
याकारणें पैं बापा, जया आथी आपुली कृपा,
तेणें वेदांचिया निरोपा, आन न कीजे ॥ ४५५ ॥
पतीचिया मता, अनुसरोनि पतिव्रता,
अनायासें आत्महिता, भेटेचि ते ॥ ४५६ ॥
नातरी श्रीगुरुवचना, दिठी देतु जतना,
शिष्य आत्मभुवना-, माजीं पैसे ॥ ४५७ ॥
हें असो आपुला ठेवा, हाता आथी जरी यावा,
तरी आदरें जेवीं दिवा, पुढां कीजे ॥ ४५८ ॥
तैसा अशेषांही पुरुषार्था, जो गोसावी हो म्हणे पार्था,
तेणें श्रुतिस्मृति माथां, बैसणें घापे ॥ ४५९ ॥
शास्त्र म्हणेल जें सांडावें, तें राज्यही तृण मानावें,
जें घेववी तें न म्हणावें, विषही विरु ॥ ४६० ॥
ऐसिया वेदैकनिष्ठा, जालिया जरी सुभटा,
तरी कें आहे अनिष्टा, भेटणें गा ? ॥ ४६१ ॥
पैं अहितापासूनि काढिती, हित देऊनि वाढविती,
नाहीं गा श्रुतिपरौती, माउली जगा ॥ ४६२ ॥
म्हणौनि ब्रह्मेंशीं मेळवी, तंव हे कोणें न सांडावी,
अगा तुवांही ऐसीचि भजावी, विशेषेंसीं ॥ ४६३ ॥
जे आजि अर्जुना तूं येथें, करावया सत्य शास्त्रें सार्थें,
जन्मलासि बळार्थें, धर्माचेनि ॥ ४६४ ॥
आणि धर्मानुज हें ऐसें, बोधेंचि आलें अपैसें,
म्हणौनि आनारिसें, करूं नये ॥ ४६५ ॥
कार्याकार्यविवेकीं, शास्त्रेंचि करावीं पारखीं,
अकृत्य तें कुडें लोकीं, वाळावें गा ॥ ४६६ ॥
मग कृत्यपणें खरें निगे, तें तुवां आपुलेनि आंगें,
आचरोनि आदरें चांगें, सारावें गा ॥ ४६७ ॥
जे विश्वप्रामाण्याची मुदी, आजि तुझ्या हातीं असें सुबुद्धी,
लोकसंग्रहासि त्रिशुद्धी, योग्यु होसी ॥ ४६८ ॥
एवं आसुरवर्गु आघवा, सांगोनि तेथिंचा निगावा,
तोहि देवें पांडवा, निरूपिला ॥ ४६९ ॥
इयावरी तो पंडूचा, कुमरु सद्भावो जीवींचा,
पुसेल तो चैतन्याचा, कानीं ऐका ॥ ४७० ॥
संजयें व्यासाचिया निरोपा, तो वेळु फेडिला तया नृपा,
तैसा मीहि निवृत्तिकृपा, सांगेन तुम्हां ॥ ४७१ ॥
तुम्ही संत माझिया कडा, दिठीचा कराल बहुडा,
तरी तुम्हां माने येवढा, होईन मी ॥ ४७२ ॥
म्हणौनि निज अवधान, मज वोळगे पसायदान,
दीजो जी सनाथु होईन, ज्ञानदेवो म्हणे ॥ ४७३ ॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां षोडशोऽध्यायः ॥