भारत की संस्कृति के लिए... भाषा की उन्नति के लिए... साहित्य के प्रसार के लिए

ज्ञानेश्वरी / अध्याय अठरावा / संत ज्ञानेश्वर

Kavita Kosh से
यहाँ जाएँ: भ्रमण, खोज

॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अश्टादशोऽध्यायः - अध्याय अठरावा,।
। मोक्षसंज्ञासयोगः।

जयजय देव निर्मळ, निजजनाखिलमंगळ,
जन्मजराजलदजाळ, प्रभंजन ॥ १ ॥
जयजय देव प्रबळ, विदळितामंगळकुळ,
निगमागमद्रुमफळ, फलप्रद ॥ २ ॥
जयजय देव सकल, विगतविषयवत्सल,
कलितकाळकौतूहल, कलातीत ॥ ३ ॥
जयजय देव निश्चळ, चलितचित्तपानतुंदिल,
जगदुन्मीलनाविरल, केलिप्रिय ॥ ४ ॥
जयजय देव निष्कळ, स्फुरदमंदानंदबहळ,
नित्यनिरस्ताखिलमळ, मूळभूत ॥ ५ ॥
जयजय देव स्वप्रभ, जगदंबुदगर्भनभ,
भुवनोद्भवारंभस्तंभ, भवध्वंस ॥ ६ ॥
जयजय देव विशुद्ध, विदुदयोद्यानद्विरद,
शमदम\-मदनमदभेद, दयार्णव ॥ ७ ॥
जयजय देवैकरूप, अतिकृतकंदर्पसर्पदर्प,
भक्तभावभुवनदीप, तापापह ॥ ८ ॥
जयजय देव अद्वितीय, परीणतोपरमैकप्रिय,
निजजनजित भजनीय, मायागम्य ॥ ९ ॥
जयजय देव श्रीगुरो, अकल्पनाख्यकल्पतरो,
स्वसंविद्रुमबीजप्ररो, हणावनी ॥ १० ॥
हे काय एकैक ऐसैसें, नानापरीभाषावशें,
स्तोत्र करूं तुजोद्देशें, निर्विशेषा ॥ ११ ॥
जिहींं विशेषणीं विशेषिजे, तें दृश्य नव्हे रूप तुझें,
हें जाणें मी म्हणौनि लाजें, वानणा इहीं ॥ १२ ॥
परी मर्यादेचा सागरु, हा तंवचि तया डगरु,
जंव न देखे सुधाकरु, उदया आला ॥ १३ ॥
सोमकांतु निजनिर्झरींं, चंद्रा अर्घ्यादिक न करी,
तें तोचि अवधारीं, करवी कीं जी ॥ १४ ॥
नेणों कैसी वसंतसंगें, अवचितिया वृक्षाचीं अंगें,
फुटती तैं हे तयांहि जोगें, धरणें नोहे ? ॥ १५ ॥
पद्मिनी रविकिरण, लाहे मग लाजें कवण ?,
कां जळें शिवतलें लवण, आंग भुले ॥ १६ ॥
तैसा तूतें जेथ मी स्मरें, तेथ मीपण मी विसरें,
मग जाकळिला ढेंकरें, तृप्तु जैसा ॥ १७ ॥
मज तुवां जी केलें तैसें, माझें मीपण दवडूनि देशें,
स्तुतिमिषेंच पां पिसें, बांधलें वाचे ॥ १८ ॥
ना येऱ्हवींं तरी आठवीं, राहोनि स्तुति जैं करावी,
तैं गुणागुणिया धरावी, सरोभरी कींंं ॥ १९ ॥
तरी तूं जी एकरसाचें लिंग, केवीं करूं गुणागुणीं विभाग,
मोतीं फोडोनि सांधितां चांग, कीं तैसेंचि भलें ॥ २० ॥
आणि बाप तूं माय, इहीं बोलीं ना स्तुति होय,
डिंभोपाधिक आहे, विटाळु तेथें ॥ २१ ॥
जी जालेनि पाइकें आलें, तें गोसावीपण केवीं बोलें ?,
ऐसें उपाधी उशिटलें, काय वर्णूं ॥ २२ ॥
जरी आत्मा तूं एकसरा, हेंही म्हणतां दातारा,
तरी आंतुल तूं बाहेरा, घापतासी ॥ २३ ॥
म्हणौनि सत्यचि तुजलागींं, स्तुति न देखों जी जगीं,
मौनावांचूनि लेणें आंगीं, सुसीना मा ॥ २४ ॥
स्तुति कांहीं न बोलणें, पूजा कांहींं न करणें,
सन्निधी कांहींंं न होणें, तुझ्या ठायीं॥ २५ ॥
तरी जिंतलें जैसें भुली, पिसें आलापु घाली,
तैसें वानूं तें माऊली, उपसाहावें तुवां ॥ २६ ॥
आतां गीतार्थाची मुक्तमुदी, लावीं माझिये वाग्वृद्धी,
जे माने हे सभासदीं, सज्जनांच्या ॥ २७ ॥
तेथ म्हणितलें श्रीनिवृत्ती, नको हें पुढतपुढती,
परीसीं लोहा घृष्टी किती, वेळवेळां कीजे गा, ॥ २८ ॥
तंव विनवी ज्ञानदेवो, म्हणे हो कां जी पसावो,
तरी अवधान देतु देवो, ग्रंथा आतां ॥ २९ ॥
जी गीतारत्नप्रासादाचा, कळसु अर्थचिंतामणीचा,
सर्व गीतादर्शनाचा, पाढाऊं जो ॥ ३० ॥
लोकीं तरी आथी ऐसें, जे दुरूनि कळसु दिसे,
आणी भेटीचि हातवसे, देवतेची तिये ॥ ३१ ॥
तैसेंचि एथही आहे, जे एकेचि येणें अध्यायें,
आघवाचि दृष्ट होये, गीतागमु हा ॥ ३२ ॥
मी कळसु याचि कारणें, अठरावा अध्यायो म्हणें,
उवाइला बादरायणें, गीताप्रासादा ॥ ३३ ॥
नोहे कळसापरतें कांहीं, प्रासादीं काम नाहीं,
तें सांगतसे गीता ही, संपलेपणें ॥ ३४ ॥
व्यासु सहजें सूत्री बळी, तेणें निगमरत्नाचळीं,
उपनिषदार्थाची माळी\-, माजीं खांडिली ॥ ३५ ॥
तेथ त्रिवर्गाचा अणुआरु, आडऊ निघाला जो अपारु,
तो महाभारतप्राकारु, भोंवता केला ॥ ३६ ॥
माजीं आत्मज्ञानाचें एकवट, दळवाडें झाडूनि चोखट,
घडिलें पार्थवैकुंठ\-, संवाद कुसरी ॥ ३७ ॥
निवृत्तिसूत्र सोडवणिया, सर्व शास्त्रार्थ पुरवणिया,
आवो साधिला मांडणिया, मोक्षरेखेचा ॥ ३८ ॥
ऐसेनि करितां उभारा, पंधरा अध्यायांत पंधरा,
भूमि निर्वाळलिया पुरा, प्रासादु जाहला ॥ ३९ ॥
उपरी सोळावा अध्यायो, तो ग्रीवघंटेचा आवो,
सप्तदशु तोचि ठावो, पडघाणिये ॥ ४० ॥
तयाहीवरी अष्टादशु, तो अपैसा मांडला कळसु,
उपरि गीतादिकीं व्यासु, ध्वजें लागला ॥ ४१ ॥
म्हणौनि मागील जे अध्याये, ते चढते भूमीचे आये,
तयांचें पुरें दाविताहे, आपुल्या आंगीं ॥ ४२ ॥
जालया कामा नाहीं चोरी, ते कळसें होय उजरी,
तेवींं अष्टादशु विवरी, साद्यंत गीता ॥ ४३ ॥
ऐसा व्यासें विंदाणियें, गीताप्रासादु सोडवणिये,
आणूनि राखिले प्राणिये, नानापरी ॥ ४४ ॥
एक प्रदक्षिणा जपाचिया, बाहेरोनि करिती यया,
एक ते श्रवणमिषें छाया, सेविती ययाची ॥ ४५ ॥
एक ते अवधानाचा पुरा, विडापाऊड भीतरां,
घेऊनि रिघती गाभारां, अर्थज्ञानाच्या ॥ ४६ ॥
ते निजबोधें उराउरी, भेटती आत्मया श्रीहरी,
परी मोक्षप्रासादीं सरी, सर्वांही आथी ॥ ४७ ॥
समर्थाचिये पंक्तिभोजनें, तळिल्या वरील्या एकचि पक्वान्नें,
तेवीं श्रवणें अर्थें पठणें, मोक्षुचि लाभे ॥ ४८ ॥
ऐसा गीता वैष्णवप्रासादु, अठरावा अध्याय कळसु विशदु,
म्यां म्हणितला हा भेदु, जाणोनियां ॥ ४९ ॥
आतां सप्तदशापाठीं, अध्याय कैसेनि उठी,
तो संबंधु सांगो दिठी, दिसे तैसा ॥ ५० ॥
का गंगायमुना उदक, वोघबगें वेगळिक,
दावी होऊनि एक, पाणीपणें ॥ ५१ ॥
न मोडितां दोन्ही आकार, घडिलें एक शरीर,
हें अर्धनारी नटेश्वर\-, रूपीं दिसें ॥ ५२ ॥
नाना वाढिली दिवसें, कळा बिंबीं पैसे,
परी सिनानें लेवे जैसें, चंद्रीं नाहीं ॥ ५३ ॥
तैसींं सिनानीं चारीं पदें, श्लोक तो श्लोकावच्छेदें,
अध्यावो अध्यायभेदें, गमे कीर ॥ ५४ ॥
परी प्रमेयाची उजरी, आनान रूप न धरी,
नाना रत्नमणीं दोरी, एकचि जैसी ॥ ५५ ॥
मोतियें मिळोनि बहुवें, एकावळीचा पाडु आहे,
परी शोभे रूप होये, एकचि तेथ ॥ ५६ ॥
फुलांफुलसरां लेख चढे, द्रुतीं दुजी अंगुळी न पडे,
श्लोक अध्याय तेणें पाडें, जाणावे हे ॥ ५७ ॥
सात शतें श्लोक, अध्यायां अठरांचे लेख,
परी देवो बोलिले एक, जें दुजें नाहीं ॥ ५८ ॥

आणि म्यांही न सांडूनि ते सोये, ग्रंथ व्यक्ति केली आहे,
प्रस्तुत तेणें निर्वाहे, निरूपण आइका ॥ ५९ ॥
तरी सतरावा अध्यावो, पावतां पुरता ठावो,
जें संपतां श्लोकीं देवो, बोलिले ऐसें ॥ ६० ॥
अर्जुना ब्रह्मनामाच्याविखीं। बुद्धि सांडूनि आस्तिकीं,
कर्मे कीजती तितुकींंंं, असंतें होतीं ॥ ६१ ॥
हा ऐकोनि देवाचा बोलु, अर्जुना आला डोलु,
म्हणे कर्मनिष्ठां मळु, ठेविला देखों ॥ ६२ ॥
तो अज्ञानांधु तंव बापुडा, ईश्वरुचि न देखे एवढा,
तेथ नामचि एक पुढां, कां सुझे तया ॥ ६३ ॥
आणि रजतमें दोन्हीं, गेलियावीण श्रद्धा सानी,
ते कां लागे अभिधानीं, ब्रह्माचिये ?, ॥ ६४ ॥
मग कोता खेंव देणें, वार्तेवरील धावणें,
सांडी पडे खेळणें, नागिणीचें तें ॥ ६५ ॥
तैसीं कर्में दुवाडें, तयां जन्मांतराची कडे,
दुर्मेळावे येवढे, कर्मामाजीं ॥ ६६ ॥
ना विपायें हें उजू होये, तरी ज्ञानाची योग्यता लाहे,
येऱ्हवीं येणेंचि जाये, निरयालया ॥ ६७ ॥
कर्मीं हा ठायवरी, आहाती बहुवा अवसरी,
आतां कर्मठां कैं वारी, मोक्षाची हे ॥ ६८ ॥
तरी फिटो कर्माचा पांगु, कीजो अवघाचि त्यागु,
आदरिजो अव्यंगु, संन्यासु हा ॥ ६९ ॥
कर्मबाधेची कहीं, जेथ भयाची गोठी नाहीं,
तें आत्मज्ञान जिहीं, स्वाधीन होय ॥ ७० ॥
ज्ञानाचें आवाहनमंत्र, जें ज्ञान पिकतें सुक्षेत्र,
ज्ञान आकर्षितें सूत्र, तंतु जे का ॥ ७१ ॥
ते दोनी संन्यास त्याग, अनुष्ठूनि सुटे जग,
तरी हेंचि आतां चांग, व्यक्त पुसों ॥ ७२ ॥
ऐसें म्हणौनि पार्थें, त्यागसंन्यासव्यवस्थे,
रूप होआवया जेथें, प्रश्नु केला ॥ ७३ ॥
तेथ प्रत्युत्तरें बोली, श्रीकृष्णें जे चावळिली,
तया व्यक्ति जाली, अष्टादशा ॥ ७४ ॥
एवं जन्यजनकभावें, अध्यावो अध्यायातें प्रसवे,
आतां ऐका बरवें, पुसिलें जें ॥ ७५ ॥
तरी पंडुकुमरें तेणें, देवाचें सरतें बोलणें,
जाणोनि अंतःकरणें, काणी घेतली ॥ ७६ ॥
येऱ्हवीं तत्वविषयीं भला, तो निश्चितु असे कीर जाहला,
परी देवो राहे उगला, तें साहावेना ॥ ७७ ॥
वत्स धालयाही वरी, धेनू न वचावी दुरी,
अनन्य प्रीतीची परी, ऐसी आहे ॥ ७८ ॥
तेणें काजेवीणही बोलावें, तें देखीलें तरी पाहावें,
भोगितां चाड दुणावे, पढियंतयाठायीं ॥ ७९ ॥
ऐसी प्रेमाची हे जाती, आणि पार्थ तंव तेचि मूर्ती,
म्हणौनि करूं लाहे खंती, उगेपणाची ॥ ८० ॥
आणि संवादाचेनि मिषें, जे अव्यवहारी वस्तु असे,
ते भोगिजे कीं जैसें, आरिसां रूप ॥ ८१ ॥
मग संवादु तोही पारुखे, तरी भोगितां भोगणें थोके,
हें कां साहवेल सुखें, लांचावलेया ? ॥ ८२ ॥
यालागीं त्याग संन्यास, पुसावयाचें घेऊनि मिस,
मग उपलविलें दुस, गीतेंचें तें ॥ ८३ ॥
अठरावा अध्यावो नोहे, हे एकाध्यायी गीताचि आहे,
जैं वांसरुचि गाय दुहे, तैं वेळु कायसा ॥ ८४ ॥
तैसी संपतां अवसरीं, गीता आदरविली माघारीं,
स्वामी भृत्याचा न करी, संवादु काई ? ॥ ८५ ॥
परी हें असो ऐसें, अर्जुनें पुसिजत असे,
म्हणे विनंती विश्वेशें, अवधारिजो ॥ ८६ ॥


अर्जुन उवाच।
संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम्।
त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिषूदन ॥ १॥


हां जी संन्यासु आणि त्यागु, इयां दोहीं एक अर्थीं लागु,
जैसा सांघातु आणि संघु, संघातेंचि बोलिजे ॥ ८७ ॥
तैसेंचि त्यागें आणि संन्यासें, त्यागुचि बोलिजतु असे,
आमचेनि तंव मानसें, जाणिजे हेंचि ॥ ८८ ॥
ना कांहीं आथी अर्थभेदु, तो देवो करोतु विशदु,
तेथ म्हणती श्रीमुकुंदु, भिन्नचि पैं ॥ ८९ ॥
तरी अर्जुना तुझ्या मनीं, त्याग संन्यास दोनी,
एकार्थ गमलें हें मानीं, मीही साच ॥ ९० ॥
इहीं दोहीं कीर शब्दीं, त्यागुचि बोलिजे त्रिशुद्धी,
परी कारण एथ भेदीं, येतुलेंचि ॥ ९१ ॥
जें निपटूनि कर्म सांडिजे, तें सांडणें संन्यासु म्हणिजे,
आणि फलमात्र का त्यजिजे, तो त्यागु गा ॥ ९२ ॥
तरी कोणा कर्माचें फळ, सांडिजे कोण कर्म केवळ,
हेंही सांगों विवळ, चित्त दे पां ॥ ९३ ॥
तरी आपैसीं दांगें डोंगर, झाडें डाळती अपार,
तैसें लांबे राजागर, नुठिती ते ॥ ९४ ॥
न पेरितां सैंघ तृणें, उठती तैसें साळीचें होणें,
नाहीं गा राबाउणें, जियापरी ॥ ९५ ॥
कां अंग जाहलें सहजें, परी लेणें उद्यमें कीजे,
नदी आपैसी आपादिजे, विहिरी जेवीं ॥ ९६ ॥
तैसें नित्य नैमित्तिक, कर्म होय स्वाभाविक,
परी न कामितां कामिक, न निफजे जें ॥ ९७ ॥


श्रीभगवानुवाच।
काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः।
सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः ॥ २॥


कां कामनेचेनि दळवाडें, जें उभारावया घडे,
अश्वमेधादिक फुडे, याग जेथ ॥ ९८ ॥
वापी कूप आराम, अग्रहारें हन महाग्राम,
आणीकही नाना संभ्रम, व्रतांचे ते ॥ ९९ ॥
ऐसें इष्टापूर्त सकळ, जया कामना एक मूळ,
जें केलें भोगवी फळ, बांधोनियां ॥ १०० ॥
देहाचिया गांवा अलिया, जन्ममृत्यूचिया सोहळिया,
ना म्हणों नये धनंजया, जियापरी ॥ १०१ ॥
का ललाटींचें लिहिलें, न मोडे गा कांहीं केलें,
काळेगोरेपण धुतलें, फिटों नेणे ॥ १०२ ॥
केलें काम्य कर्म तैसें, फळ भोगावया धरणें बैसे,
न फेडितां ऋण जैसें, वोसंडीना ॥ १०३ ॥
कां कामनाही न करितां, अवसांत घडे पंडुसुता,
तरी वायकांडें न झुंजतां, लागे जैसें ॥ १०४ ॥
गूळ नेणतां तोंडीं, घातला देचि गोडी,
आगी मानूनि राखोंडी, चेपिला पोळी ॥ १०५ ॥
काम्यकर्मी हें एक, सामर्थ्य आथी स्वाभाविक,
म्हणौनि नको कौतुक, मुमुक्षु एथ ॥ १०६ ॥
किंबहुना पार्था ऐसें, जें काम्य कर्म गा असे,
तें त्यजिजे विष जैसें, वोकूनियां ॥ १०७ ॥
मग तया त्यागातें जगीं, संन्यासु ऐसया भंगीं,
बोलिजे अंतरंगीं, सर्वद्रष्टा ॥ १०८ ॥
हें काम्य कर्म सांडणें, तें कामनेतेंचि उपडणें,
द्रव्यत्यागें दवडणें, भय जैसें ॥ १०९ ॥
आणि सोमसूर्यग्रहणें, येऊनि करविती पार्वणें,
का मातापितरमरणें, अंकित जे दिवस ॥ ११० ॥
अथवा अतिथी हन पावे, हें ऐसैसें पडे जैं करावें,
तैं तें कर्म जाणावें, नौमित्तिक गा ॥ १११ ॥
वार्षिया क्षोमे गगन, वसंतें दुणावे वन,
देहा श्रृंगारी यौवन\-, दशा जैसी ॥ ११२ ॥
का सोमकांतु सोमें पघळें, सूर्यें फांकती कमळें,
एथ असे तेंचि पाल्हाळे, आन नये ॥ ११३ ॥
तैसें नित्य जें का कर्म, तेंचि निमित्ताचे लाहे नियम,
एथ उंचावे तेणें नाम, नैमित्तिक होय ॥ ११४ ॥
आणि सायंप्रातर्मध्यान्हीं, जें कां करणीय प्रतिदिनीं,
परी दृष्टि जैसी लोचनीं, अधिक नोहे ॥ ११५ ॥
कां नापादितां गती, चरणीं जैसी आथी,
नातरी ते दीप्ती, दीपबिंबीं ॥ ११६ ॥
वासु नेदितां जैसे, चंदनीं सौरभ्य असे,
अधिकाराचे तैसें, रूपचि जें ॥ ११७ ॥
नित्य कर्म ऐसें जनीं, पार्था बोलिजे तें मानीं,
एवं नित्य नैमित्तिक दोन्हीं, दाविलीं तुज ॥ ११८ ॥
हेंचि नित्य नैमित्तिक, अनुष्ठेय आवश्यक,
म्हणौनि म्हणोंं पाहती एक, वांझ ययातें ॥ ११९ ॥
परी भोजनीं जैसें होये, तृप्ति लाहे भूक जाये,
तैसे नित्यनैमित्तिकीं आहे, सर्वांगीं फळ ॥ १२० ॥
कीड आगिठां पडे, तरी मळु तुटे वानी चढे,
यया कर्मा तया सांगडें, फळ जाणावें ॥ १२१ ॥
जे प्रत्यवाय तंव गळे, स्वाधिकार बहुवें उजळे,
तेथ हातोफळिया मिळे, सद्गतीसी ॥ १२२ ॥
येवढेवरी ढिसाळ, नित्यनैमित्तिकीं आहे फळ,
परी तें त्यजिजे मूळ, नक्षत्रीं जैसें ॥ १२३ ॥
लता पिके आघवी, तंव च्यूत बांधे पालवीं,
मग हात न लावित माधवीं, सोडूनि घाली ॥ १२४ ॥
तैसी नोलांडितां कर्मरेखा, चित्त दीजे नित्यनैमित्तिका,
पाठीं फळा कीजे अशेखा, वांताचे वानी ॥ १२५ ॥
यया कर्म फळत्यागातें, त्यागु म्हणती पैं जाणते,
एवं त्याग संन्यास तूतें, परीसविले ॥ १२६ ॥
हा संन्यासु जैं संभवे, तैं काम्य बाधूं न पावे,
निषिद्ध तंव स्वभावें, निषेधें गेलें ॥ १२७ ॥
आणि नित्यादिक जें असे, तें येणें फलत्यागें नसे,
शिर लोटलिया जैसें, येर आंग ॥ १२८ ॥
मग सस्य फळपाकांत, तैसें निमालिया कर्मजात,
आत्मज्ञान गिंवसीत, अपैसें ये ॥ १२९ ॥
ऐसिया निगुती दोनी, त्याग संन्यास अनुष्ठानीं,
पडले गा आत्मज्ञानीं, बांधती पाटु ॥ १३० ॥
नातरी हे निगुती चुके, मग त्यागु कीजे हाततुकें,
तैं कांहीं न त्यजे अधिकें, गोंवींचि पडे ॥ १३१ ॥
जें औषध व्याधी अनोळख, तें घेतलिया परतें विख,
कां अन्न न मानितां भूक, मारी ना काय ? ॥ १३२ ॥
म्हणौनि त्याज्य जें नोहे, तेथ त्यागातें न सुवावें,
त्याज्यालागीं नोहावें, लोभापर ॥ १३३ ॥
चुकलिया त्यागाचें वेझें, केला सर्वत्यागुही होय वोझें,
न देखती सर्वत्र दुजें, वीतराग ते ॥ १३४ ॥


त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः।
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे ॥ ३॥


एकां फळाभिलाष न ठके, ते कर्मांते म्हणती बंधकें,
जैसें आपण नग्न भांडकें, जगातें म्हणे ॥ १३५ ॥
कां जिव्हालंपट रोगिया, अन्नें दूषी धनंजया,
आंगा न रुसे कोढिया, मासियां कोपे ॥ १३६ ॥
तैसे फळकाम दुर्बळ, म्हणती कर्मचि किडाळ,
मग निर्णयो देती केवळ, त्यजावें ऐसा ॥ १३७ ॥
एक म्हणती यागादिक, करावेंचि आवश्यक,
जे यावांचूनि शोधक, आन नसे ॥ १३८ ॥
मनशुद्धीच्या मार्गीं, जैं विजयी व्हावें वेगीं,
तैं कर्म सबळालागीं, आळसु न कीजे ॥ १३९ ॥
भांगार आथी शोधावें, तरी आगी जेवी नुबगावें,
कां दर्पणालागीं सांचावें, अधिक रज ॥ १४० ॥
नाना वस्त्रें चोख होआवीं, ऐसें आथी जरी जीवीं,
तरी संवदणी न मनावी, मलिन जैसी ॥ १४१ ॥
तैसीं कर्में क्लेशकारें, म्हणौनि न न्यावीं अव्हेरें,
कां अन्नलाभें अरुवारें, रांधितिये उणें ॥ १४२ ॥
इहीं इहीं गा शब्दीं, एक कर्मीं बांधिती बुद्धी,
ऐसा त्यागु विसंवादीं, पडोनि ठेला ॥ १४३ ॥
तरी विसंवादु तो फिटे, त्यागाचा निश्चयो भेटे,
तैसें बोलों गोमटें, अवधान देईं ॥ १४४ ॥


निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम।
त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः ॥ ४॥


तरी त्यागु एथें पांडवा, त्रिविधु पैं जाणावा,
तया त्रिविधाही बरवा, विभाग करूं ॥ १४५ ॥
त्यागाचे तीन्ही प्रकार, कीजती जरी गोचर,
तरी तूं इत्यर्थाचें सार, इतुलें जाण ॥ १४६ ॥
मज सर्वज्ञाचिये बुद्धी, जें अलोट माने त्रिशुद्धी,
निश्चयतत्व तें आधीं, अवधारीं पां ॥ १४७ ॥
तरी आपुलिये सोडवणें, जो मुमुक्षु जागों म्हणे,
तया सर्वस्वें करणें, हेंचि एक ॥ १४८ ॥


यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत्।
यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् ॥ ५॥


जियें यज्ञदानतपादिकें, इयें कर्में आवश्यकें,
तियें न सांडावीं पांथिकें, पाउलें जैसीं ॥ १४९ ॥
हारपलें न देखिजे, तंव तयाचा मागु न सांडिजे,
कां तृप्त न होतां न लोटिजे, भाणें जेवीं ॥ १५० ॥
नाव थडी न पवतां, न खांडिजे केळी न फळतां,
कां ठेविलें न दिसतां, दीपु जैसा ॥ १५१ ॥
तैसी आत्मज्ञानविखीं, जंव निश्चिती नाहीं निकी,
तंव नोहावें यागादिकीं, उदासीन ॥ १५२ ॥
तरी स्वाधिकारानुरुपें, तियें यज्ञदानें तपें,
अनुष्ठावींचि साक्षेपें, अधिकेंवर ॥ १५३ ॥
जें चालणें वेगावत जाये, तो वेगु बैसावयाचि होये,
तैसा कर्मातिशयो आहे, नैष्कर्म्यालागीं ॥ १५४ ॥
अधिकें जंव जंव औषधी, सेवनेची मांडी बांधी,
तंव तंव मुकिजे व्याधी, तयाचिये ॥ १५५ ॥
तैसीं कर्में हातोपातीं, जैं कीजती यथानिगुती,
तैं रजतमें झडती, झाडा देऊनी ॥ १५६ ॥
कां पाठोवाटीं पुटें, भांगारा खारु देणें घटे,
तैं कीड झडकरी तुटे, निर्व्याजु होय ॥ १५७ ॥
तैसें निष्ठा केलें कर्म, तें झाडी करूनि रजतम,
सत्वशुद्धीचें धाम, डोळां दावी ॥ १५८ ॥
म्हणौनियां धनंजया, सत्वशुद्धी गिंवसितया,
तीर्थांचिया सावाया, आलीं कर्में ॥ १५९ ॥
तीर्थें बाह्यमळु क्षाळे, कर्में अभ्यंतर उजळे,
एवं तीर्थें जाण निर्मळें, सत्कर्मे.चि ॥ १६० ॥
तृषार्ता मरुदेशीं, झळे अमृतें वोळलीं जैसींं,
कीं अंधालागीं डोळ्यांसी, सूर्यु आला ॥ १६१ ॥
बुडतया नदीच धाविन्नली, पडतया पृथ्वीच कळवळिली,
निमतया मृत्यूनें दिधली, आयुष्यवृद्धी ॥ १६२ ॥
तैसें कर्में कर्मबद्धता, मुमुक्षु सोडविले पंडुसुता,
जैसा रसरीति मरतां, राखिला विषें ॥ १६३ ॥
तैसीं एके हातवटिया, कर्में कीजती धनंजया,
बंधकेंचि सोडवावया, मुख्यें होती ॥ १६४ ॥
आतां तेचि हातवटी, तुज सांगों गोमटी,
जया कर्मातें किरीटी, कर्मचि रुसे ॥ १६५ ॥


एतान्यपि तु कर्माणि सण्‌गं त्यक्त्वा फलानि च।
कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम् ॥ ६॥


तरी महायागप्रमुखें, कर्मे निफजतांही अचुकें,
कर्तेपणाचें न ठाके, फुंजणें आंगीं ॥ १६६ ॥
जो मोलें तीर्था जाये, तया मी यात्रा करितु आहे,
ऐसिये श्लाघ्यतेचा नोहे, तोषु जेवीं ॥ १६७ ॥
कां मुद्रा समर्थाचिया, जो एकवटु झोंबे राया,
तो मी जिणता ऐसिया, न येचि गर्वा ॥ १६८ ॥
जो कासें लागोनि तरे, तया पोहती ऊर्मी नुरे,
पुरोहितु नाविष्करे, दातेपणें ॥ १६९ ॥
तैसें कर्तृत्व अहंकारें, नेघोनि यथा अवसरें,
कृत्यजातांचें मोहरें, सारीजती ॥ १७० ॥
केल्या कर्मा पांडवा, जो आथी फळाचा यावा,
तया मोहरा हों नेदावा, मनोरथु ॥ १७१ ॥
आधींचि फळीं आस तुटिया, कर्मे आरंभावीं धनंजया,
परावें बाळ धाया, पाहिजे जैसें ॥ १७२ ॥
पिंपरुवांचिया आशा, न शिंपिजे पिंपळु जैसा,
तैसिया फळनिराशा, कीजती कर्में ॥ १७३ ॥
सांडूनि दुधाची टकळी, गोंवारी गांवधेनु वेंटाळी,
किंबहुना कर्मफळीं, तैसें कीजे ॥ १७४ ॥
ऐसी हे हातवटी, घेऊनि जे क्रिया उठी,
आपणा आपुलिया गांठी, लाहेची तो ॥ १७५ ॥
म्हणौनि फळीं लागु, सांडोनि देहसंगु,
कर्में करावीं हा चांगु, निरोपु माझा ॥ १७६ ॥
जो जीवबंधीं शिणला, सुटके जाचे आपला,
तेणें पुढतपुढतीं या बोला, आन न कीजे ॥ १७७ ॥


नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते।
मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः ॥ ७॥


नातरी आंधाराचेनि रोखें, जैसीं डोळां रोंविजती नखें,
तैसा कर्मद्वेषें अशेखें, कर्मेंचि सांडी ॥ १७८ ॥
तयाचें जें कर्म सांडणें, तें तामस पैं मी म्हणें,
शिसाराचे रागें लोटणें, शिरचि जैसें ॥ १७९ ॥
हां गा मार्गु दुवाडु होये, तरी निस्तरितील पाये,
कीं तेचि खांडणें आहे, मार्गापराधें ॥ १८० ॥
भुकेलियापुढें अन्न, हो कां भलतैसें उन्ह,
तरी बुद्धी न घेतां लंघन, भाणें पापरां हल्या ॥ १८१ ॥
तैसा कर्माचा बाधु कर्में, निस्तरीजे करितेनि वर्में,
हे तामसु नेणें भ्रमें, माजविला ॥ १८२ ॥
कीं स्वभावें आलें विभागा, तें कर्मचि वोसंडी पैं गा,
तरी झणें आतळा त्यागा, तामसा तया ॥ १८३ ॥


दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत्।
स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत् ॥ ८॥


अथवा स्वाधिकारु बुझे, आपले विहितही सुजे,
परी करितया उमजे, निबरपणा ॥ १८४ ॥
जे कर्माची ऐलीकड, नावेक दिसे दुवाड,
जे वाहतिये वेळे जड, शिदोरी जैसी ॥ १८५ ॥
जैसा निंब जिभे कडवटु, हिरडा पहिलें तुरटु,
तैसा कर्मा ऐल शेवटु, खणुवाळा होय ॥ १८६ ॥
कां धेनु दुवाड शिंग, शेवंतीये अडव आंग,
भोजनसुख महाग, पाकु करितां ॥ १८७ ॥
तैसें पुढतपुढती कर्म, आरंभींच अति विषम,
म्हणौनि तो तें श्रम, करितां मानी ॥ १८८ ॥
येऱ्हवीं विहितत्वें मांडी, परी घालितां असुरवाडीं,
तेथ पोळला ऐसा सांडी, आदरिलेंही ॥ १८९ ॥
म्हणे वस्तु देहासारिखी, आली बहुतीं भाग्यविशेखीं,
मा जाचूं कां कर्मादिकीं, पापिया जैसा ? ॥ १९० ॥
केलें कर्मीं जे द्यावें, तें झणें मज होआवें,
आजि भोगूं ना कां बरवे, हातींचे भोग ? ॥ १९१ ॥
ऐसा शरीराचिया क्लेशा, भेणें कर्में वीरेशा,
सांडी तो परीयेसा, राजसु त्यागु ॥ १९२ ॥
येऱ्हवीं तेथही कर्म सांडे, परी तया त्यागफळ न जोडे,
जैसें उतलें आगीं पडे, तें नलगेचि होमा ॥ १९३ ॥
कां बुडोनि प्राण गेले, ते अर्धोदकीं निमाले,
हें म्हणों नये जाहलें, दुर्मरणचि ॥ १९४ ॥
तैसें देहाचेनि लोभें, जेणें कर्मा पाणी सुभे,
तेणें साच न लभे, त्यागाचें फळ ॥ १९५ ॥
किंबहुना आपुलें, जैं ज्ञान होय उदया आलें,
तैं नक्षत्रातें पाहलें, गिळी जैसें ॥ १९६ ॥
तैशा सकारण क्रिया, हारपती धनंजया,
तो कर्मत्यागु ये जया, मोक्षफळासी ॥ १९७ ॥
तें मोक्षफळ अज्ञाना, त्यागिया नाहीं अर्जुना,
म्हणौनि तो त्यागु न माना, राजसु जो ॥ १९८ ॥
तरी कोणे पां एथ त्यागें, तें मोक्षफळ घर रिघे,
हेंही आइक प्रसंगे, बोलिजेल ॥ १९९ ॥


कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन।
सण्‌गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्त्विको मतः ॥ ९॥


तरी स्वाधिकाराचेनि नांवें, जें वांटिया आलें स्वभावें,
तें आचरे विधिगौरवें, शृंगारोनि ॥ २०० ॥
परी हें मी करितु असें, ऐसा आठवु त्यजी मानसें,
तैसेचि पाणी दे आशे, फळाचिये ॥ २०१ ॥
पैं अवज्ञा आणि कामना, मातेच्या ठायीं अर्जुना,
केलिया दोनी पतना, कारण होती ॥ २०२ ॥
तरी दोनीं यें त्यजावीं, मग माताची ते भजावी,
वांचूनि मुखालागीं वाळावी, गायचि सगळी ? ॥ २०३ ॥
आवडतियेही फळीं, असारें साली आंठोळीं,
त्यासाठीं अवगळी, फळातें कोण्ही ? ॥ २०४ ॥
तैसा कर्तृत्वाचा मदु, आणि कर्मफळाचा आस्वादु,
या दोहींचें नांव बंधु, कर्माचा कीं ॥ २०५ ॥
तरी या दोहींच्या विखीं, जैसा बापु नातळे लेंकीं,
तैसा हों न शके दुःखी, विहिता क्रिया ॥ २०६ ॥
हा तो त्याग तरुवरु, जो गा मोक्षफळें ये थोरु,
सात्विक ऐसा डगरु, यासींच जगीं ॥ २०७ ॥
आतां जाळूनि बीज जैसें, झाडा कीजे निर्वंशें,
फळ त्यागूनि कर्म तैसें, त्यजिलें जेणें ॥ २०८ ॥
लोह लागतखेंवो परीसीं, धातूची गंधिकाळिमा जैसी,
जाती रजतमें तैसीं, तुटलीं दोन्ही ॥ २०९ ॥
मग सत्वें चोखाळें, उघडती आत्मबोधाचे डोळे,
तेथ मृगांबु सांजवेळे, होय जैसें ॥ २१० ॥
तैसा बुद्ध्यादिकांपुढां, असतु विश्वाभासु हा येवढा,
तो न देखे कवणीकडां, आकाश जैसें ॥ २११ ॥


न द्वेष्ट्यकुशलं कर्म कुशले नानुषज्जते।
त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशयः ॥ १०॥


म्हणौनि प्राचिनाचेनि बळें, अलंकृतें कुशलाकुशलें,
तियें व्योमाआंगीं आभाळें, जिरालीं जैसीं ॥ २१२ ॥
तैसीं तयाचिये दिठी, कर्में चोखाळलीं किरीटी,
म्हणौनि सुखदुःखीं उठी, पडेना तो ॥ २१३ ॥
तेणें शुभकर्म जाणावें, मग तें हर्षें करावें,
कां अशुभालागीं होआवें, द्वेषिया ना ॥ २१४ ॥
तरी इयाविषयींचा कांहीं, तया एकुही संदेहो नाहीं,
जैसा स्वप्नाच्या ठायीं, जागिन्नलिया ॥ २१५ ॥
म्हणौनि कर्म आणि कर्ता, या द्वैतभावाची वार्ता,
नेणें तो पंडुसुता, सात्विक त्यागु ॥ २१६ ॥
ऐसेनि कर्में पार्था, त्यजिलीं त्यजिती सर्वथा,
अधिकें बांधिती अन्यथा, सांडिलीं तरी ॥ २१७ ॥


न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः।
यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते ॥ ११॥


आणि हां गा सव्यसाची, मूर्ति लाहोनि देहाची,
खंती करिती कर्माची, ते गांवढे गा ॥ २१८ ॥
मृत्तिकेचा वीटु, घेऊनि काय करील घटु ?,
केउता ताथु पटु, सांडील तो ? ॥ २१९ ॥
तेवींचि वन्हित्व आंगीं, आणि उबे उबगणें आगी,
कीं तो दीपु प्रभेलागीं, द्वेषु करील काई ? ॥ २२० ॥
हिंगु त्रासिला घाणी, तरी कैचें सुगंधत्व आणी ?,
द्रवपण सांडूनि पाणी, कें राहे तें ? ॥ २२१ ॥
तैसा शरीराचेनि आभासें, नांदतु जंव असे,
तंव कर्मत्यागाचें पिसें, काइसें तरी ? ॥ २२२ ॥
आपण लाविजे टिळा, म्हणौनि पुसों ये वेळोवेळा,
मा घाली फेडी निडळा, कां करूं ये गा ? ॥ २२३ ॥
तैसें विहित स्वयें आदरिलें, म्हणौनि त्यजूं ये त्यजिलें,
परी कर्मचि देह आतलें, तें कां सांडील गा ? ॥ २२४ ॥
जें श्वासोच्छ्वासवरी, होत निजेलियाहीवरी,
कांहीं न करणेंयाचि परी, होती जयाची ॥ २२५ ॥
या शरीराचेनि मिसकें, कर्मची लागलें असिकें,
जितां मेलया न ठाके, इया रीती ॥ २२६ ॥
यया कर्मातें सांडिती परी, एकीचि ते अवधारीं,
जे करितां न जाइजे हारीं, फळशेचिये ॥ २२७ ॥
कर्मफळ ईश्वरीं अर्पे, तत्प्रसादें बोधु उद्दीपें,
तेथ रज्जुज्ञानें लोपे, व्याळशंका ॥ २२८ ॥
तेणें आत्मबोधें तैसें, अविद्येसीं कर्म नाशे,
पार्था त्यजिजे जैं ऐसें, तैं त्यजिलें होय ॥ २२९ ॥
म्हणौनि इयापरी जगीं, कर्में करितां मानूं त्यागी,
येर मुर्छने नांव रोगी, विसांवा जैसा ॥ २३० ॥
तैसा कर्मीं शिणे एकीं, तो विसांवो पाहे आणिकीं,
दांडेयाचे घाय बुकी, धाडणें जैसें ॥ २३१ ॥
परी हें असो पुढती, तोचि त्यागी त्रिजगतीं,
जेणें फळत्यागें निष्कृती, नेलें कर्म ॥ २३२ ॥


अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम्।
भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित् ॥ १२॥


येऱ्हवीं तरी धनंजया, त्रिविधा कर्मफळा गा यया,
समर्थ ते कीं भोगावया, जे न सांडितीचि आशा ॥ २३३ ॥
आपणचि विऊनि दुहिता, कीं न मम म्हणे पिता,
तो सुटे कीं प्रतिग्रहीता, जांवई शिरके ॥ २३४ ॥
विषाचे आगरही वाहती, तें विकितां सुखें लाभे जिती,
येर निमालें जे घेती, वेंचोनि मोलें ॥ २३५ ॥
तैसें कर्ता कर्म करू, अकर्ता फळाशा न धरू,
एथ न शके आवरूं, दोहींतें कर्म ॥ २३६ ॥
वाटे पिकलिया रुखाचें, फळ अपेक्षी तयाचें,
तेवीं साधारण कर्माचें, फळ घे तया ॥ २३७ ॥
परी करूनि फळ नेघे, तो जगाच्या कामीं न रिघे,
जे त्रिविध जग अवघें, कर्मफळ हें ॥ २३८ ॥
देव मनुष्य स्थावर, यया नांव जगडंबर,
आणि हे तंव तिन्ही प्रकार, कर्मफळांचे ॥ २३९ ॥
तेंचि एक गा अनिष्ट, एक तें केवळ इष्ट,
आणि एक इष्टानिष्ट, त्रिविध ऐसें ॥ २४० ॥
परी विषयमंतीं बुद्धी, आंगीं सूनि अविधी,
प्रवर्तती जे निषिद्धीं, कुव्यापारीं ॥ २४१ ॥
तेथ कृमि कीट लोष्ट, हे देह लाहती निकृष्ट,
तया नाम तें अनिष्ट, कर्मफळ ॥ २४२ ॥
कां स्वधर्मा मानु देतां, स्वाधिकारु पुढां सूतां,
सुकृत कीजे पुसतां, आम्नायातें ॥ २४३ ॥
तैं इंद्रादिक देवांचीं, देहें लाहिजती सव्यसाची,
तया कर्मफळा इष्टाची, प्रसिद्धि गा ॥ २४४ ॥
आणि गोड आंबट मिळे, तेथ रसांतर फरसाळें,
उठी दोंही वेगळें, दोहीं जिणतें ॥ २४५ ॥
रेचकुचि योगवशें, होय स्तंभावयादोषें,
तेवीं सत्यासत्य समरसें, सत्यासत्यचि जिणिजे ॥ २४६ ॥
म्हणौनि समभागें शुभाशुभें, मिळोनि अनुष्ठानाचें उभें,
तेणें मनुष्यत्व लाभे, तें मिश्र फळ ॥ २४७ ॥
ऐसें त्रिविध यया भागीं, कर्मफळ मांडलेसें जगीं,
हें न सांडी तयां भोगीं, जें सूदले आशा ॥ २४८ ॥
जेथें जिव्हेचा हातु फांटे, तंव जेवितां वाटे गोमटें,
मग परीणामीं शेवटें, अवश्य मरण ॥ २४९ ॥
संवचोरमैत्री चांग, जंव न पविजे तें दांग,
सामान्या भली आंग, न शिवे तंव ॥ २५० ॥
तैसीं कर्में करितां शरीरीं, लाहती महत्त्वाची फरारी,
पाठीं निधनीं एकसरी, पावती फळें ॥ २५१ ॥
तैसा समर्थु आणि ऋणिया, मागों आला बाइणिया,
न लोटे तैसा प्राणिया, पडे तो भोगु ॥ २५२ ॥
मग कणिसौनि कणु झडे, तो विरूढला कणिसा चढे,
पुढती भूमी पडे, पुढती उठी ॥ २५३ ॥
तैसें भोगीं जें फळ होय, तें फळांतरें वीत जाय,
चालतां पावो पाय, जिणिजे जैसा ॥ २५४ ॥
उताराचिये सांगडी, ठाके ते ऐलीच थडी,
तेवीं न मुकीजती वोढी, भोग्याचिये ॥ २५५ ॥
पैं साध्यसाधनप्रकारें, फळभोगु तो पसरे,
एवं गोंविले संसारें, अत्यागी ते ॥ २५६ ॥
येऱ्हवीं जाईचियां फुलां फांकणें, त्याचि नाम जैसें सुकणें,
तैसें कर्ममिषें न करणें, केलें जिहीं ॥ २५७ ॥
बीजचि वरोसि वेंचे, तेथ वाढती कुळवाडी खांचे,
तेवीं फळत्यागें कर्माचें, सारिलें काम ॥ २५८ ॥
ते सत्वशुद्धि साहाकारें, गुरुकृपामृततुषारें,
सासिन्नलेनि बोधें वोसरे, द्वैतदैन्य ॥ २५९ ॥
तेव्हां जगदाभासमिषें, स्फुरे तें त्रिविध फळ नाशे,
एथ भोक्ता भोग्य आपैसें, निमालें हें ॥ २६० ॥
घडे ज्ञानप्रधानु हा ऐसा, संन्यासु जयां वीरेशा,
तेचि फलभोग सोसा, मुकले गा ॥ २६१ ॥
आणि येणें कीर संन्यासें, जैं आत्मरूपीं दिठी पैसे,
तैं कर्म एक ऐसें, देखणें आहे ? ॥ २६२ ॥
पडोनि गेलिया भिंती, चित्रांची केवळ होय माती,
कां पाहालेया राती, आंधारें उरे ? ॥ २६३ ॥
जैं रूपचि नाहीं उभें, तैं साउली काह्याची शोभे ?,
दर्पणेवीण बिंबें, वदन कें पां ? ॥ २६४ ॥
फिटलिया निद्रेचा ठावो, कैचा स्वप्नासि प्रस्तावो ?,
मग साच का वावो, कोण म्हणे ? ॥ २६५ ॥
तैसें गा संन्यासें येणें, मूळ अविद्येसीचि नाहीं जिणें,
मा तियेचें कार्य कोणें, घेपे दीजे ? ॥ २६६ ॥
म्हणौनि संन्यासी ये पाहीं, कर्माची गोठी कीजेल खई,
परी अविद्या आपुलाम् देहीं, आहे जै कां ॥ २६७ ॥
जैं कर्तेपणाचेनि थांवें, आत्मा शुभाशुभीं धांवें,
दृष्टि भेदाचिये राणिवे, रचलीसे जैं ॥ २६८ ॥
तैं तरी गा सुवर्मा, बिजावळी आत्मया कर्मा,
अपाडें जैसी पश्चिमा, पूर्वेसि कां ॥ २६९ ॥
नातरी आकाशा का आभाळा, सूर्या आणि मृगजळा,
बिजावळी भूतळा, वायूसि जैसी ॥ २७० ॥
पांघरौनि नईचें उदक, असे नईचिमाजीं खडक,
परी जाणिजे का वेगळिक, कोडीची ते ॥ २७१ ॥
हो कां उदकाजवळी, परी सिनानीचि ते बाबुळी,
काय संगास्तव काजळी, दीपु म्हणों ये ? ॥ २७२ ॥
जरी चंद्रीं जाला कलंकु, तरी चंद्रेसीं नव्हे एकु,
आहे दृष्टी डोळ्यां विवेकु, अपाडु जेतुला ॥ २७३ ॥
नाना वाटा वाटे जातया, वोघा वोघीं वाहातया,
आरसा आरसां पाहातया, अपाडु जेतुला ॥ २७४ ॥
पार्था गा तेतुलेनि मानें, आत्मेंनिसीं कर्म सिनें,
परी घेवविजे अज्ञानें, तें कीर ऐसें ॥ २७५ ॥
विकाशें रवीतें उपजवी, द्रुती अलीकरवी भोगवी,
ते सरोवरीं कां बरवी, अब्जिनी जैसी ॥ २७६ ॥
पुढतपुढती आत्मक्रिया, अन्यकारणकाचि तैशिया,
करूं पांचांही तयां, कारणां रूप ॥ २७७ ॥


पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे।
साण्‌ख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम् ॥ १३॥


आणि पांचही कारणें तियें, तूंही जाणसील विपायें,
जें शास्त्रें उभऊनी बाहे, बोलती तयांते ॥ २७८ ॥
वेदरायाचिया राजधानीं, सांख्यवेदांताच्या भुवनीं,
निरूपणाच्या निशाणध्वनीं, गर्जती जियें ॥ २७९ ॥
जें सर्वकर्मसिद्धीलागीं, इयेंचि मुद्दलें हो जगीं,
तेथ न सुवावा अभंगीं, आत्मराजु ॥ २८० ॥
ह्या बोलाचि डांगुरटी, तियें प्रसिद्धीचि आली किरीटी,
म्हणौनि तुझ्या हन कर्णपुटीं, वसों हें काज ॥ २८१ ॥
आणि मुखांतरीं आइकिजे, तैसें कायसें हें ओझें,
मी चिद्रत्न तुझें, असतां हातीं ॥ २८२ ॥
दर्पणु पुढां मांडलेया, कां लोकांचियां डोळयां,
मानु द्यावा पहावया, आपुलें निकें ॥ २८३ ॥
भक्त जैसेनि जेथ पाहे, तेथ तें तेंचि होत जाये,
तो मी तुझें जाहालों आहें, खेळणें आजी ॥ २८४ ॥
ऐसें हें प्रीतीचेनि वेगें, देवो बोलतां से नेघे,
तंव आनंदामाजीं आंगें, विरतसे येरु ॥ २८५ ॥
चांदिणियाचा पडिभरु, होतां सोमकांताचा डोंगरु,
विघरोनि सरोवरु, हों पाहे जैसा ॥ २८६ ॥
तैसें सुख आणि अनुभूती, या भावांची मोडूनि भिंती,
आतलें अर्जुनाकृति, सुखचि जेथ ॥ २८७ ॥
तेथ समर्थु म्हणौनि देवा, अवकाशु जाहला आठवा,
मग बुडतयाचा धांवा, जीवें केला ॥ २८८ ॥
अर्जुना येसणें धेंडें, प्रज्ञा पसरेंसीं बुडे,
आलें भरतें एवढें, तें काढूनि पुढती ॥ २८९ ॥
देवो म्हणे हां गा पार्था, तूं आपणपें देख सर्वथा,
तंव श्वासूनि येरें माथा, तुकियेला ॥ २९० ॥
म्हणे जाणसी दातारा, मी तुजशीं व्यक्तिशेजारा,
उबगला आजी एकाहारा, येवों पाहें ॥ २९१ ॥
तयाही हा ऐसा, लोभें देतसां जरी लालसा,
तरी कां जी घालीतसां, आड आड जीवा ? ॥ २९२ ॥
तेथ श्रीकृष्ण म्हणती निकें, अद्यापि नाहीं मा ठाऊकें,
वेडया चंद्रा आणि चंद्रिके, न मिळणें आहे ?॥ २९३ ॥
आणि हाही बोलोनि भावो, तुज दाऊं आम्ही भिवों,
जे रुसतां बांधे थांवो, तें प्रेम गा हें ॥ २९४ ॥
एथ एकमेकांचिये खुणें, विसंवादु तंवचि जिणें,
म्हणौनि असो हें बोलणें, इयेविषयींचें ॥ २९५ ॥
मग कैशी कैशी ते आतां, बोलत होतों पंडुसुता,
सर्व कर्मा भिन्नता, आत्मेनिसीं ॥ २९६ ॥
तंव अर्जुन म्हणे देवें, माझिये मनींचेंचि स्वभावें,
प्रस्ताविलें बरवें, प्रमेय तें जी ॥ २९७ ॥
जें सकळ कर्माचें बीज, कारणपंचक तुज,
सांगेन ऐसी पैज, घेतली कां ॥ २९८ ॥
आणि आत्मया एथ कांहीं, सर्वथा लागु नाहीं,
हें पुढारलासि ते देईं, लाहाणें माझें ॥ २९९ ॥
यया बोला विश्वेशें, म्हणितलें तोषें बहुवसे,
इयेविषयीं धरणें बैसे। ऐसें कें जोडे ? ॥ ३०० ॥
तरी अर्जुना निरूपिजेल, तें कीर भाषेआंतुल,
परी मेचु ये होईजेल, ऋणिया तुज ॥ ३०१ ॥
तंव अर्जुन म्हणे देवो, काई विसरले मागील भावो ?,
इये गोंठीस कीं राखत आहों, मीतूंपण जी ? ॥ ३०२ ॥
एथ श्रीकृष्ण म्हणती हो कां, आतां अवधानाचा पसरु निका,
करूनियां आइका, पुढारलों तें ॥ ३०३ ॥
तरी सत्यचि गा धनुर्धरा, सर्वकर्मांचा उभारा,
होतसे बहिरबाहिरा, करणीं पांचें ॥ ३०४ ॥
आणि पांच कारण दळवाडें, जिहीं कर्माकारु मांडे,
ते हेतुस्तव घडे, पांच आथी ॥ ३०५ ॥
येर आत्मतत्त्व उदासीन, तें ना हेतु ना उपादान,
ना ते अंगें करी संवाहन, कर्मसिद्धीचें ॥ ३०६ ॥
तेथ शुभाशुभीं अंशीं, निफजती कर्में ऐसीं,
राती दिवो आकाशीं, जियापरी ॥ ३०७ ॥
तोय तेज धूमु, ययां वायूसीं संगमु,
जालिया होय अभ्रागमु, व्योम तें नेणें ॥ ३०८ ॥
नाना काष्ठीं नाव मिळे, ते नावाडेनि चळे,
चालविजे अनिळें, उदक तें साक्षी ॥ ३०९ ॥
कां कवणे एकें पिंडे, वेंचितां अवतरे भांडें,
मग भवंडीजे दंडें, भ्रमे चक्र ॥ ३१० ॥
आणि कर्तृत्व कुलालाचें, तेथ काय तें पृथ्वीयेचें,
आधारावांचूनि वेंचे, विचारीं पां, ॥ ३११ ॥
हेंहि असो लोकांचिया, राहाटी होतां आघविया,
कोण काम सवितया, आंगा आलें ? ॥ ३१२ ॥
तैसें पांचहेतुमिळणीं, पांचेंचि इहीं कारणीं,
कीजे कर्मलतांची लावणी, आत्मा सिना ॥ ३१३ ॥
आतां तेंचि वेगळालीं, पांचही विवंचूं गा भलीं,
तुकोनि घेतलीं, मोतियें जैसीं ॥ ३१४ ॥


अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्।
विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम् ॥ १४॥


तैसीं यथा लक्षणें, आइकें कर्म\-कारणें,
तरी देह हें मी म्हणें, पहिलें एथ ॥ ३१५ ॥
ययातें अधिष्ठान ऐसें, म्हणिजे तें याचि उद्देशें,
जे स्वभोग्येंसीं वसे, भोक्ता येथ ॥ ३१६ ॥
इंद्रियांच्या दाहें हातीं, जाचोनियां दिवोराती,
सुखदुःखें प्रकृती, जोडीजती जियें ॥ ३१७ ॥
तियें भोगावया पुरुखा, आन ठावोचि नाहीं देखा,
म्हणौनि अधिष्ठानभाखा, बोलिजे देह ॥ ३१८ ॥
हें चोविसांही तत्वांचें, कुटुंबघर वस्तीचें,
तुटे बंधमोक्षाचें, गुंथाडे एथ ॥ ३१९ ॥
किंबहुना अवस्थात्रया, हें अधिष्ठान धनंजया,
म्हणौनि देहा यया, हेंचि नाम ॥ ३२० ॥
आणि कर्ता हें दुजें, कर्माचें कारण जाणिजे,
प्रतिबिंब म्हणिजे, चैतन्याचें जें ॥ ३२१ ॥
आकाशचि वर्षे नीर, तें तळवटीं बांधे नाडर,
मग बिंबोनि तदाकार, होय जेवीं ॥ ३२२ ॥
कां निद्राभरें बहुवें, राया आपणपें ठाउवें नव्हे,
मग स्वप्नींचिये सामावे, रंकपणीं ॥ ३२३ ॥
तैसें आपुलेनि विसरें, चैतन्यचि देहाकारें,
आभासोनि आविष्करें, देहपणें जें ॥ ३२४ ॥
जया विसराच्या देशीं, प्रसिद्धि गा जीवु ऐसी,
जेणें भाष केली देहेंसी, आघवाविषयीं ॥ ३२५ ॥
प्रकृति करी कर्में, तीं म्यां केलीं म्हणे भ्रमें,
येथ कर्ता येणें नामें, बोलिजे जीवु ॥ ३२६ ॥
मग पातेयांच्या केशीं, एकीच उठी दिठी जैसी,
मोकळी चवरी ऐसी, चिरीव गमे ॥ ३२७ ॥
कां घराआंतुल एकु, दीपाचा तो अवलोकु,
गवाक्षभेदें अनेकु, आवडे जेवीं ॥ ३२८ ॥
कां एकुचि पुरुषु जैसा, अनुसरत नवां रसां,
नवविधु ऐसा, आवडों लागे ॥ ३२९ ॥
तेवीं बुद्धीचें एक जाणणें, श्रोत्रादिभेदें येणें,
बाहेरी इंद्रियपणें, फांके जें कां ॥ ३३० ॥
तें पृथग्विध करण, कर्माचें इया कारण,
तिसरें गा जाण, नृपनंदना ॥ ३३१ ॥
आणि पूर्वपश्चिमवाहणीं, निघालिया वोघाचिया मिळणी,
होय नदी नद पाणी, एकचि जेवीं ॥ ३३२ ॥
तैसी क्रियाशक्ति पवनीं, असे जे अनपायिनी,
ते पडिली नानास्थानीं, नाना होय ॥ ३३३ ॥
जैं वाचे करी येणें, तैं तेंचि होय बोलणें,
हाता आली तरी घेणें, देणें होय ॥ ३३४ ॥
अगा चरणाच्या ठायीं, तरी गति तेचि पाहीं,
अधोद्वारीं दोहीं, क्षरणें तेचि ॥ ३३५ ॥
कंदौनि हृदयवरी, प्रणवाची उजरी,
करितां तेचि शरीरीं, प्राणु म्हणिजे ॥ ३३६ ॥
मग उर्ध्वींचिया रिगानिगा, पुढती तेचि शक्ति पैं गा,
उदानु ऐसिया लिंगा, पात्र जाहली ॥ ३३७ ॥
अधोरंध्राचेनि वाहें, अपानु हें नाम लाहे,
व्यापकपणें होये, व्यानु तेचि ॥ ३३८ ॥
आरोगिलेनि रसें, शरीर भरी सरिसें,
आणि न सांडितां असे, सर्वसंधीं ॥ ३३९ ॥
ऐसिया इया राहटीं, मग तेचि क्रिया पाठीं,
समान ऐसी किरीटी, बोलिजे गा ॥ ३४० ॥
आणि जांभई शिंक ढेंकर, ऐसैसा होतसे व्यापार,
नाग कूर्म कृकर, इत्यादि होय ॥ ३४१ ॥
एवं वायूची हे चेष्टा, एकीचि परी सुभटा,
वर्तनास्तव पालटा, येतसे जे ॥ ३४२ ॥
तें भेदली वृत्तिपंथें, वायुशक्ति गा एथें,
कर्मकारण चौथें, ऐसें जाण ॥ ३४३ ॥
आणि ऋतु बरवा शारदु, शारदीं पुढती चांदु,
चंद्री जैसा संबंधु, पूर्णिमेचा ॥ ३४४ ॥
कां वसंतीं बरवा आरामु, आरामींही प्रियसंगमु,
संगमीं आगमु, उपचारांचा ॥ ३४५ ॥
नाना कमळीं पांडवा, विकासु जैसा बरवा,
विकासींही यावा, परागाचा ॥ ३४६ ॥
वाचे बरवें कवित्व, कवित्वीं बरवें रसिकत्व,
रसिकत्वीं परतत्व, स्पर्शु जैसा ॥ ३४७ ॥
तैसी सर्ववृत्तिवैभवीं, बुद्धिचि एकली बरवी,
बुद्धिही बरव नवी, इंद्रियप्रौढी ॥ ३४८ ॥
इंद्रियप्रौढीमंडळा, शृंगारु एकुचि निर्मळा,
जैं अधिष्ठात्रियां कां मेळा, देवतांचा जो ॥ ३४९ ॥
म्हणौनि चक्षुरादिकीं दाहें, इंद्रियां पाठीं स्वानुग्रहें,
सूर्यादिकां कां आहे, सुरांचें वृंद ॥ ३५० ॥
तें देववृंद बरवें, कर्मकारण पांचवें,
अर्जुना एथ जाणावें, देवो म्हणे ॥ ३५१ ॥
एवं माने तुझिये आयणी, तैसी कर्मजातांची हे खाणी,
पंचविध आकर्णीं, निरूपिली ॥ ३५२ ॥
आतां हेचि खाणी वाढे, मग कर्माची सृष्टि घडे,
जिहीं ते हेतुही उघडे, दाऊं पांचै ॥ ३५३ ॥


शरीरवाण्‌मनोभिर्यत्कर्म प्रारभते नरः।
न्याय्यं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः ॥ १५॥


तरी अवसांत आली माधवी, ते हेतु होय नवपल्लवीं,
पल्लव पुष्पपुंज दावी, पुष्प फळातें ॥ ३५४ ॥
कां वार्षिये आणिजे मेघु, मेघें वृष्टिप्रसंगु,
वृष्टीस्तव भोगु, सस्यसुखाचा ॥ ३५५ ॥
नातरी प्राची अरुणातें विये, अरुणें सूर्योदयो होये,
सूर्यें सगळा पाहे, दिवो जैसा ॥ ३५६ ॥
तैसें मन हेतु पांडवा, होय कर्मसंकल्पभावा,
तो संकल्पु लावी दिवा, वाचेचा गा ॥ ३५७ ॥
मग वाचेचा तो दिवटा, दावी कृत्यजातांचिया वाटा,
तेव्हां कर्ता रिगे कामठां, कर्तृत्वाच्या ॥ ३५८ ॥
तेथ शरीरादिक दळवाडें, शरीरादिकां हेतुचि घडे,
लोहकाम लोखंडें, निर्वाळिजे जैसें ॥ ३५९ ॥
कां तांथुवाचा ताणा, तांथु घालितां वैरणा,
तो तंतुचि विचक्षणा, होय पटु ॥ ३६० ॥
तैसें मनवाचादेहाचें, कर्म मनादि हेतुचि रचे,
रत्नीं घडे रत्नाचें, दळवाडें जेवीं ॥ ३६१ ॥
एथ शरीरादिकें कारणें, तेंचि हेतु केवीं हें कोणें,
अपेक्षिजे तरी तेणें, अवधारिजो ॥ ३६२ ॥
आइका सूर्याचिया प्रकाशा, हेतु कारण सूर्युचि जैसा,
कां ऊंसाचें कांडें ऊंसा, वाढी हेतु ॥ ३६३ ॥
नाना वाग्देवता वानावी, तैं वाचाचि लागे कामवावी,
कां वेदां वेदेंचि बोलावी, प्रतिष्ठा जेवीं ॥ ३६४ ॥
तैसें कर्मा शरीरादिकें, कारण हें कीर ठाउकें,
परी हेंचि हेतु न चुके, हेंही एथ ॥ ३६५ ॥
आणि देहादिकीं कारणीं, देहादि हेतु मिळणीं,
होय जया उभारणी, कर्मजातां ॥ ३६६ ॥
तें शास्त्रार्थेंं मानिलेया, मार्गा अनुसरे धनंजया,
तरी न्याय तो न्याया, हेतु होय ॥ ३६७ ॥
जैसा पर्जन्योदकाचा लोटु, विपायें धरी साळीचा पाटु,
तो जिरे परी अचाटु, उपयोगु आथी ॥ ३६८ ॥
कां रोषें निघालें अवचटें, पडिलें द्वारकेचिया वाटे,
तें शिणे परी सुनाटें, न वचिती पदें ॥ ३६९ ॥
तैसें हेतुकारण मेळें, उठी कर्म जें आंधळें,
तें शास्त्राचें लाहे डोळे, तैं न्याय म्हणिपे ॥ ३७० ॥
ना दूध वाढिता ठावो पावे, तंव उतोनि जाय स्वभावें,
तोही वेंचु परी नव्हे, वेंचिलें तें ॥ ३७१ ॥
तैसें शास्त्रसाह्येंवीण, केलें नोहे जरी अकारण,
तरी लागो कां नागवण, दानलेखीं ॥ ३७२ ॥
अगा बावन्ना वर्णांपरता, कोण मंत्रु आहे पंडुसुता,
कां बावन्नही नुच्चारितां, जीवु आथी ? ॥ ३७३ ॥
परी मंत्राची कडसणी, जंव नेणिजे कोदंडपाणी,
तंव उच्चारफळ वाणी, न पवे जेवीं ॥ ३७४ ॥
तेवीं कारणहेतुयोगें, जें बिसाट कर्म निगे,
तें शास्त्राचिये न लगे, कांसे जंव ॥ ३७५ ॥
कर्म होतचि असे तेव्हांही, परी तें होणें नव्हे पाहीं,
तो अन्यायो गा अन्यायीं, हेतु होय ॥ ३७६ ॥


तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु यः।
पश्यत्यकृतबुद्धित्वान्न स पश्यति दुर्मतिः ॥ १६॥


एवं पंचकारणा कर्मा, पांचही हेतु हे सुमहिमा,
आतां एथें पाहें पां आत्मा, सांपडला असे ? ॥ ३७७ ॥
भानु न होनि रूपें जैसीं, चक्षुरूपातें प्रकाशी,
आत्मा न होनि कर्में तैसीं, प्रकटित असे गा ॥ ३७८ ॥
पैं प्रतिबिंब आरिसा, दोन्ही न होनि वीरेशा,
दोहींतें प्रकाशी जैसा, न्याहाळिता तो ॥ ३७९ ॥
कां अहोरात्र सविता, न होनि करी पंडुसुता,
तैसा आत्मा कर्मकर्ता, न होनि दावी ॥ ३८० ॥
परी देहाहंमान भुली, जयाची बुद्धि देहींचि आतली,
तया आत्मविषयीं जाली, मध्यरात्री गा ॥ ३८१ ॥
जेणें चैतन्या ईश्वरा ब्रह्मा, देहचि केलें परमसीमा,
तया आत्मा कर्ता हे प्रमा, अलोट उपजे ॥ ३८२ ॥
आत्माचि कर्मकर्ता, हाही निश्चयो नाहीं तत्वतां,
देहोचि मी कर्मकर्ता, मानितो साचे ॥ ३८३ ॥
जे आत्मा मी कर्मातीतु, सर्वकर्मसाक्षिभूतु,
हे आपुली कहीं मातु, नायकेचि कानीं ॥ ३८४ ॥
म्हणौनि उमपा आत्मयातें, देहचिवरी मविजे एथें,
विचित्र काई रात्रि दिवसातें, डुडुळ न करी ? ॥ ३८५ ॥
पैं जेणें आकाशींचा कहीं, सत्य सूर्यु देखिला नाहीं,
तो थिल्लरींचें बिंब काई, मानू न लाहे ? ॥ ३८६ ॥
थिल्लराचेनि जालेपणें, सूर्यासि आणी होणें,
त्याच्या नाशीं नाशणें, कंपें कंपू ॥ ३८७ ॥
आणि निद्रिस्ता चेवो नये, तंव स्वप्न साच हों लाहे,
रज्जु नेणतां सापा बिहे, विस्मो कवण ? ॥ ३८८ ॥
जंव कवळ आथि डोळां, तंव चंद्रु देखावा कींं पिंवळा,
काय मृगींहीं मृगजळा, भाळावें नाहीं ? ॥ ३८९ ॥
तैसा शास्त्रगुरूचेनि नांवे, जो वाराही टेंकों नेदी सिवें,
केवळ मौढ्याचेनिचि जीवें, जियाला जो ॥ ३९० ॥
तेणें देहात्मदृष्टीमुळें, आत्मया घापे देहाचें जाळें,
जैसा अभ्राचा वेगु कोल्हें, चंद्रीं मानीं ॥ ३९१ ॥
मग तया मानणयासाठीं, देहबंदीशाळे किरीटी,
कर्माच्या वज्रगांठी, कळासे तो ॥ ३९२ ॥
पाहे पां बद्ध भावना दृढा, नळियेवरी तो बापुडा,
काय मोकळेयाही पायाचा चवडा, न ठकेचि पुंसा, ॥ ३९३ ॥
म्हणौनि निर्मळा आत्मस्वरूपीं, तो प्रकृतीचें केलें आरोपी,
तो कल्पकोडीच्या मापीं, मवीचि कर्में ॥ ३९४ ॥
आता कर्मामाजीं असे, परी तयातें कर्म न स्पर्शे,
वडवानळातें जैसें, समुद्रोदक ॥ ३९५ ॥
तैसेंनि वेगळेपणें, जयाचें कर्मीं असणें,
तो कीर वोळखावा कवणें, तरी सांगो ॥ ३९६ ॥
जे मुक्तातें निर्धारितां, लाभे आपलीच मुक्तता,
जैसी दीपें दिसें पाहतां, आपली वस्तु ॥ ३९७ ॥
नातरी दर्पणु जंव उटिजे, तंव आपणपयां आपण भेटिजे,
कां तोय पावतां तोय होईजे, लवणें जेंवीं ॥ ३९८ ॥
हें असो परतोनि मागुतें, प्रतिबिंब पाहे बिंबातें,
तंव पाहणें जाउनी आयितें, बिंबचि होय ॥ ३९९ ॥
तैसें हारपलें आपणपें पावे, तैं संतांतें पाहतां गिंवसावें,
म्हणौनि वानावे ऐकावे, तेचि सदा ॥ ४०० ॥
परी कर्मीं असोनि कर्में, जो नावरे समेंविषमें,
चर्मचक्षूंचेनि चामें, दृष्टि जैसी ॥ ४०१ ॥
तैसा सोडवला जो आहे, तयाचें रूप आतां पाहें,
उपपत्तीची बाहे, उभऊनि सांगों ॥ ४०२ ॥


यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते।
हत्वाऽपि स इमा.ण्ल्लोकान्न हन्ति न निबध्यते ॥ १७॥


तरी अविद्येचिया निदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा,
भोगीत होता प्रबुद्धा, अनादि जो ॥ ४०३ ॥
तो महावाक्याचेनि नांवें, गुरुकृपेचेनि थांवें,
माथां हातु ठेविला नव्हे, थापटिला जैसा ॥ ४०४ ॥
तैसा विश्वस्वप्नेंसीं माया, नीद सांडूनि धनंजया,
सहसा चेइला अद्वया\-, नंदपणें जो ॥ ४०५ ॥
तेव्हां मृगजळाचे पूर, दिसते एक निरंतर,
हारपती कां चंद्रकर, फांकतां जैसे ॥ ४०६ ॥
कां बाळत्व निघोनि जाय, तैं बागुला नाहीं त्राय,
पैं जळालिया इंधन न होय, इंधन जेवीं ॥ ४०७ ॥
नाना चेवो आलिया पाठीं, तैं स्वप्न न दिसे दिठी,
तैसी अहं ममता किरीटी, नुरेचि तया ॥ ४०८ ॥
मग सूर्यु आंधारालागीं, रिघो कां भलते सुरंगीं,
परी तो तयाच्या भागीं, नाहींचि जैसा ॥ ४०९ ॥
तैसा आत्मत्वें वेष्टिला होये, तो जया जया दृश्यातें पाहें,
तें दृष्य द्रष्टेपणेंसीं होत जाये, तयाचेंचि रूप ॥ ४१० ॥
जैसा वन्हि जया लागे, तें वन्हिचि जालिया आंगें,
दाह्यदाहकविभागें, सांडिजे तें ॥ ४११ ॥
तैसा कर्माकारा दुजेया, तो कर्तेपणाचा आत्मया,
आळु आला तो गेलिया, कांहीं बाहीं जें उरे ॥ ४१२ ॥
तिये आत्मस्थितीचा जो रावो, मग तो देहीं इये जाणेल ठावो ?,
काय प्रलयांबूचा उन्नाहो, वोघु मानी ? ॥ ४१३ ॥
तैसी ते पूर्ण अहंता, काई देहपणें पंडुसुता,
आवरे काई सविता, बिंबें धरिला ? ॥ ४१४ ॥
पैं मथूनि लोणी घेपे, तें मागुती ताकीं घापे,
तरी तें अलिप्तपणें सिंपे, तेणेंसी काई ? ॥ ४१५ ॥
नाना काष्ठौनि वीरेशा, वेगळा केलिया हुताशा,
राहे काष्ठाचिया मांदुसा, कोंडलेपणें ? ॥ ४१६ ॥
कां रात्रीचिया उदराआंतु, निघाला जो हा भास्वतु,
तो रात्री ऐसी मातु, ऐके कायी ? ॥ ४१७ ॥
तैसें वेद्य वेदकपणेंसी, पडिलें कां जयाचे ग्रासीं,
तया देह मी ऐसी, अहंता कैंची ? ॥ ४१८ ॥
आणि आकाशें जेथें जेथुनी, जाइजे तेथ असे भरोनी,
म्हणौनि ठेलें कोंदोनी, आपेंआप ॥ ४१९ ॥
तैसें जें तेणें करावें, तो तेंचि आहे स्वभावें,
मा कोणें कर्मीं वेष्टावें, कर्तेपणें ? ॥ ४२० ॥
नुरेचि गगनावीण ठावो, नोहेचि समुद्रा प्रवाहो,
नुठीचि ध्रुवा जावों, तैसें जाहालें ॥ ४२१ ॥
ऐसेनि अहंकृतिभावो, जयाचा बोधीं जाहला वावो,
तऱ्ही देहा जंव निर्वाहो, तंव आथी कर्में ॥ ४२२ ॥
वारा जरी वाजोनि वोसरे, तरी तो डोल रुखीं उरे,
कां सेंदें द्रुति राहे कापुरें, वेंचलेनी ॥ ४२३ ॥
कां सरलेया गीताचा समारंभु, न वचे राहवलेपणाचा क्षोभु,
भूमी लोळोनि गेलिया अंबु, वोल थारे ॥ ४२४ ॥
अगा मावळलेनि अर्कें, संध्येचिये भूमिके,
ज्योतिदीप्ति कौतुकें, दिसे जैसी ॥ ४२५ ॥
पैं लक्ष भेदिलियाहीवरी, बाण धांवेचि तंववरी,
जंव भरली आथी उरी, बळाची ते ॥ ४२६ ॥
नाना चक्रीं भांडें जालें, तें कुलालें परतें नेलें,
परी भ्रमेंचि तें मागिले, भोवंडिलेपणें ॥ ४२७ ॥
तैसा देहाभिमानु गेलिया, देह जेणें स्वभावें धनंजया,
जालें तें अपैसया, चेष्टवीच तें ॥ ४२८ ॥
संकल्पेंवीण स्वप्न, न लावितां दांगीचें बन,
न रचितां गंधर्वभुवन, उठी जैसें ॥ ४२९ ॥
आत्मयाचेनि उद्यमेंवीण, तैसें देहादिपंचकारण,
होय आपणयां आपण, क्रियाजात ॥ ४३० ॥
पैं प्राचीनसंस्कारवशें, पांचही कारणें सहेतुकें,
कामवीजती गा अनेकें, कर्माकारें ॥ ४३१ ॥
तया कर्मामाजीं मग, संहरो आघवें जग,
अथवा नवें चांग, अनुकरो ॥ ४३२ ॥
परी कुमुद कैसेनि सुके, कैसें तें कमळ फांके,
हीं दोन्ही रवी न देखे, जयापरी ॥ ४३३ ॥
कां वीजु वर्षोनि आभाळ, ठिकरिया आतो भूतळ,
अथवा करूं शाड्वळ, प्रसन्नावृष्टी ॥ ४३४ ॥
तरी तया दोहींतें जैसें, नेणिजेचि कां आकाशें,
तैसा देहींच जो असे, विदेहदृष्टी ॥ ४३५ ॥
तो देहादिकीं चेष्टीं, घडतां मोडतां हे सृष्टी,
न देखे स्वप्न दृष्टी, चेइला जैसा ॥ ४३६ ॥
येऱ्हवीं चामाचे डोळेवरी, जे देखती देहचिवरी,
ते कीर तो व्यापारी, ऐसेंचि मानिती ॥ ४३७ ॥
कां तृणाचा बाहुला, जो आगरामेरें ठेविला,
तो साचचि राखता कोल्हा, मानिजे ना ? ॥ ४३८ ॥
पिसेंं नेसलें कां नागवें, हें लोकीं येऊनि जाणावें,
ठाणोरियांचें मवावें, आणिकीं घाय ॥ ४३९ ॥
कां महासतीचे भोग, देखे कीर सकळ जग,
परी ते आगी ना आंग, ना लोकु देखे ॥ ४४० ॥
तैसा स्वस्वरूपें उठिला, जो दृश्येंसी द्रष्टा आटला,
तो नेणें काय राहटला, इंद्रियग्रामु ॥ ४४१ ॥
अगा थोरीं कल्लोळीं कल्लोळ साने, लोपतां तिरींचेनि जनें,
एकीं एक गिळिलें हें मनें, मानिजे जऱ्ही ॥ ४४२ ॥
तऱ्ही उदकाप्रति पाहीं, कोण ग्रसितसे काई,
तैसें पूर्णा दुजें नाहीं, जें तो मारी ॥ ४४३ ॥
सुवर्णाचिया चंडिका, सुवर्णशूळेंचि देखा,
सुवर्णाचिया महिखा, नाशु केला ॥ ४४४ ॥
तो देवलवसिया कडा, व्यवहारु गमला फुडा,
वांचूनि शूळ महिष चामुंडा, सुवर्णचि तें ॥ ४४५ ॥
पैं चित्रींचें जळ हुतांशु, तो दृष्टीचाचि आभासु,
पटीं आगी वोलांशु, दोन्ही नाहीं ॥ ४४६ ॥
मुक्ताचें देह तैसें, हालत संस्कारवशें,
तें देखोनि लोक पिसे, कर्ता म्हणती ॥ ४४७ ॥
आणि तयां करणेया आंतु, घडो तिहीं लोकां घातु,
परी तेणें केला हे मातु, बोलों नये ॥ ४४८ ॥
अगा अंधारुचि देखावा तेजें, मग तो फेडी हें बोलिजे,
तैसें ज्ञानिया नाहीं दुजें, जें तो मारी, ॥ ४४९ ॥
म्हणौनि तयाचि बुद्धी, नेणे पापपुण्याची गंधी,
गंगा मीनलिया नदी, विटाळु जैसा ॥ ४५० ॥
आगीसी आगी झगटलिया, काय पोळे धनंजया,
कीं शस्त्र रुपे आपणया, आपणचि ॥ ४५१ ॥
तैसें आपणपयापरतें, जो नेणें क्रियाजातातें,
तेथ काय लिंपवी बुद्धीतें, तयाचिये ॥ ४५२ ॥
म्हणौनि कार्य कर्ता क्रिया, हें स्वरूपचि जाहलें जया,
नाहीं शरीरादिकीं तया, कर्मी बंधु ॥ ४५३ ॥
जे कर्ता जीव विंदाणीं, काढूनि पांचही खाणी,
घडित आहे करणीं, आउतीं दाहें ॥ ४५४ ॥
तेथ न्यावो आणि अन्यावो, हा द्विविधु साधूनि आवो,
उभविता न लवी खेंवो, कर्मभुवनें ॥ ४५५ ॥
या थोराडा कीर कामा, विरजा नोहे आत्मा,
परी म्हणसी हन उपक्रमा, हातु लावी ॥ ४५६ ॥
तो साक्षी चिद्रूपु, कर्मप्रवृत्तीचा संकल्पु,
उठी तो कां निरोपु, आपणचि दे ? ॥ ४५७ ॥
तरी कर्मप्रवृत्तीहीलागीं, तया आयासु नाहीं आंगीं,
जे प्रवृत्तीचेही उळिगीं, लोकुचि आथी ॥ ४५८ ॥
म्हणौनि आत्मयाचें केवळ, जो रूपचि जाहला निखिळ,
तया नाहीं बंदिशाळ, कर्माचि हे ॥ ४५९ ॥
परी अज्ञानाच्या पटीं, अन्यथा ज्ञानाचें चित्र उठी,
तेथ चितारणी हे त्रिपुटी, प्रसिद्ध जे कां ॥ ४६० ॥


ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना।
करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्मसंग्रहः ॥ १८॥


जें ज्ञान ज्ञाता ज्ञेय, हें जगाचें बीज त्रय,
ते कर्माची निःसंदेह, प्रवृत्ति जाण ॥ ४६१ ॥
आतां ययाचि गा त्रया, व्यक्ति वेगळालिया,
आइकें धनंजया, करूं रूप ॥ ४६२ ॥
तरी जीवसूर्यबिंबाचे, रश्मी श्रोत्रादिकें पांचें,
धांवोनि विषयपद्माचे, फोडिती मढ ॥ ४६३ ॥
कीं जीवनृपाचे वारु उपलाणें, घेऊनि इंद्रियांचीं केकाणें,
विषयदेशींचें नागवणें, आणीत जे ॥ ४६४ ॥
हें असो इहीं इंद्रियीं राहाटे, जें सुखदुःखेंसीं जीवा भेटे,
तें सुषुप्तिकालीं वोहटे, जेथ ज्ञान ॥ ४६५ ॥
तया जीवा नांव ज्ञाता, आणि जें हें सांगितलें आतां,
तेंचि एथ पंडुसुता, ज्ञान जाण ॥ ४६६ ॥
जें अविद्येचिये पोटीं, उपजतखेंवो किरीटी,
आपणयातें वांटी, तिहीं ठायीं ॥ ४६७ ॥
आपुलिये धांवे पुढां, घालूनि ज्ञेयाचा गुंडा,
उभारी मागिलीकडां, ज्ञातृत्वातें ॥ ४६८ ॥
मग ज्ञातया ज्ञेया दोघां, तो नांदणुकेचा बगा,
माजीं जालेनि पैं गा, वाहे जेणें ॥ ४६९ ॥
ठाकूनि ज्ञेयाची शिंव, पुरे जयाची धांव,
सकळ पदार्थां नांव, सूतसे जें ॥ ४७० ॥
तें गा सामान्य ज्ञान, या बोअला नाहीं आन,
ज्ञेयाचेंही चिन्ह, आइक आतां ॥ ४७१ ॥
तरी शब्दु स्पर्शु, रूप गंध रसु,
हा पंचविध आभासु, ज्ञेयाचा तो ॥ ४७२ ॥
जैसें एकेचि चूतफळें, इंद्रियां वेगवेगळे,
रसें वर्णें परीमळें, भेटिजे स्पर्शें ॥ ४७३ ॥
तैसें ज्ञेय तरी एकसरें, परी ज्ञान इंद्रियद्वारें,
घे म्हणौनि प्रकारें, पांचें जालें ॥ ४७४ ॥
आणि समुद्रीं वोघाचें जाणें, सरे लाणीपासीं धावणें,
कां फळीं सरे वाढणें, सस्याचें जेवीं ॥ ४७५ ॥
तैसें इंद्रियांच्या वाहवटीं, धांवतया ज्ञाना जेथ ठी,
होय तें गा किरीटी, विषय ज्ञेय ॥ ४७६ ॥
एवं ज्ञातया ज्ञाना ज्ञेया, तिहीं रूप केलें धनंजया,
हे त्रिविध सर्व क्रिया\-, प्रवृत्ति जाण ॥ ४७७ ॥
जे शब्दादि विषय, हें पंचविध जें ज्ञेय,
तेंचि प्रिय कां अप्रिय, एकेपरीचें ॥ ४७८ ॥
ज्ञान मोटकें ज्ञातया, दावी ना जंव धनंजया,
तंव स्वीकारा कीं त्यजावया, प्रवर्तेचि तो ॥ ४७९ ॥
परी मीनातें देखोनि बकु, जैसा निधानातें रंकु,
कां स्त्री देखोनि कामुकु, प्रवृत्ति धरी ॥ ४८० ॥
जैसें खालारां धांवे पाणी, भ्रमर पुष्पाचिये घाणीं,
नाना सुटला सांजवणीं, वत्सुचि पां ॥ ४८१ ॥
अगा स्वर्गींची उर्वशी, ऐकोनि जेंवी माणुसीं,
वराता लावीजती आकाशीं, यागांचिया ॥ ४८२ ॥
पैं पारिवा जैसा किरीटी, चढला नभाचिये पोटीं,
पारवी देखोनि लोटी, आंगचि सगळें ॥ ४८३ ॥
हें ना घनगर्जनासरिसा, मयूर वोवांडे आकाशा,
ज्ञाता ज्ञेय देखोनि तैसा, धांवचि घे ॥ ४८४ ॥
म्हणौनि ज्ञान ज्ञेय ज्ञाता, हे त्रिविध गा पंडुसुता,
होयचि कर्मा समस्तां, प्रवृत्ति येथ ॥ ४८५ ॥
परी तेंचि ज्ञेय विपायें, जरी ज्ञातयातें प्रिय होये,
तरी भोगावया न साहे, क्षणही विलंबु ॥ ४८६ ॥
नातरी अवचटें, तेंचि विरुद्ध होऊनि भेटे,
तरी युगांत वाटे, सांडावया ॥ ४८७ ॥
व्याळा कां हारा, वरपडा जालेया नरा,
हरिखु आणि दरारा, सरिसाचि उठी ॥ ४८८ ॥
तैसें ज्ञेय प्रियाप्रियें, देखिलेनि ज्ञातया होये,
मग त्याग स्वीकारीं वाहे, व्यापारातें ॥ ४८९ ॥
तेथ रागी प्रतिमल्लाचा, गोसांवी सर्वदळाचा,
रथु सांडूनि पायांचा, होय जैसा ॥ ४९० ॥
तैसें ज्ञातेपणें जें असे, तें ये कर्ता ऐसिये दशे,
जेवितें बैसलें जैसें, रंधन करूं ॥ ४९१ ॥
कां भंवरेंचि केला मळा, वरकलुचि जाला अंकसाळा,
नाना देवो रिगाला देऊळा\-, चिया कामा ॥ ४९२ ॥
तैसा ज्ञेयाचिया हांवा, ज्ञाता इंद्रियांचा मेळावा,
राहाटवी तेथ पांडवा, कर्ता होय ॥ ४९३ ॥
आणि आपण हौनी कर्ता, ज्ञाना आणी करणता,
तेथें ज्ञेयचि स्वभावतां, कार्य होय ॥ ४९४ ॥
ऐसा ज्ञानाचिये निजगति, पालटु पडे गा सुमति,
डोळ्याची शोभा रातीं, पालटे जैसी ॥ ४९५ ॥
कां अदृष्ट जालिया उदासु, पालटे श्रीमंताचा विलासु,
पुनिवेपाठीं शीतांशु, पालटे जैसा ॥ ४९६ ॥
तैसा चाळितां करणें, ज्ञाता वेष्टिजे कर्तेपणें,
तेथींचीं तियें लक्षणें, ऐक आतां ॥ ४९७ ॥
तरी बुद्धि आणि मन, चित्त अहंकार हन,
हें चतुर्विध चिन्ह, अंतःकरणाचें ॥ ४९८ ॥
बाह्य त्वचा श्रवण, चक्षु रसना घ्राण,
हें पंचविध जाण, इंद्रियें गा ॥ ४९९ ॥
तेथ आंतुले तंव करणें, कर्ता कर्तव्या घे उमाणें,
मग तैं जरी जाणें, सुखा येतें ॥ ५०० ॥
तरी बाहेरीलें तियेंही, चक्षुरादिकें दाहाही,
उठौनि लवलाहीं, व्यापारा सूये ॥ ५०१ ॥
मग तो इंद्रियकदंंबु, करविजे तंव राबु,
जंव कर्तव्याचा लाभु, हातासि ये ॥ ५०२ ॥
ना तें कर्तव्य जरी दुःखें, फळेल ऐसें देखे,
तो लावी त्यागमुखें, तियें दाहाही ॥ ५०३ ॥
मग फिटे दुःखाचा ठावो, तंव राहाटवी रात्रिदिवो,
विकणवातें कां रावो, जयापरी ॥ ५०४ ॥
तैसेनि त्याग स्वीकारीं, वाहातां इंद्रियांची धुरी,
ज्ञातयातें अवधारीं, कर्ता म्हणिपे ॥ ५०५ ॥
आणि कर्तयाच्या सर्व कर्मीं, आउतांचिया परी क्षमी,
म्हणौनि इंद्रियांतें आम्ही, करणें म्हणों ॥ ५०६ ॥
आणि हेचि करणेंवरी, कर्ता क्रिया ज्या उभारी,
तिया व्यापे तें अवधारीं, कर्म एथ ॥ ५०७ ॥
सोनाराचिया बुद्धि लेणें, व्यापे चंद्रकरीं चांदणें,
कां व्यापे वेल्हाळपणें, वेली जैसी ॥ ५०८ ॥
नाना प्रभा व्यापे प्रकाशु, गोडिया इक्षुरसु,
हें असो अवकाशु, आकाशीं जैसा ॥ ५०९ ॥
तैसें कर्तयाचिया क्रिया, व्यापलें जें धनंजया,
तें कर्म गा बोलावया, आन नाहीं ॥ ५१० ॥
एवं कर्म कर्ता करण, या तिहींचेंही लक्षण,
सांगितलें तुज विचक्षण\-, शिरोमणी ॥ ५११ ॥
एथ ज्ञाता ज्ञान ज्ञेय, हें कर्माचें प्रवृत्तित्रय,
तैसेंचि कर्ता करण कार्य, हा कर्मसंचयो ॥ ५१२ ॥
वन्हीं ठेविला असे धूमु, आथी बीजीं जेवीं द्रुमु,
कां मनीं जोडे कामु, सदा जैसा ॥ ५१३ ॥
तैसा कर्ता क्रिया करणीं, कर्माचें आहे जिंतवणीं,
सोनें जैसें खाणी, सुवर्णाचिये ॥ ५१४ ॥
म्हणौनि हें कार्य मी कर्ता, ऐसें आथि जेथ पंडुसुता,
तेथ आत्मा दूरी समस्ता, क्रियांपासीं ॥ ५१५ ॥
यालागीं पुढतपुढती, आत्मा वेगळाचि सुमती,
आतां असो हे किती, जाणतासि तूं ॥ ५१६ ॥


ज्ञानं कर्म च कर्ताच त्रिधैव गुणभेदतः।
प्रोच्यते गुणसण्‌ख्याने यथावच्छृणु तान्यपि ॥ १९॥


परी सांगितलें जें ज्ञान, कर्म कर्ता हन,
ते तिन्ही तिहीं ठायीं भिन्न, गुणीं आहाती ॥ ५१७ ॥
म्हणौनि ज्ञाना कर्मा कर्तया, पातेजों नये धनंजया,
जे दोनी बांधती सोडावया, एकचि प्रौढ ॥ ५१८ ॥
तें सात्विक ठाऊवें होये, तो गुणभेदु सांगों पाहे,
जो सांख्यशास्त्रीं आहे, उवाइला ॥ ५१९ ॥
जें विचारक्षीरसमुद्र, स्वबोधकुमुदिनीचंद्र,
ज्ञानडोळसां नरेंद्र, शास्त्रांचा जें ॥ ५२० ॥
कीं प्रकृतिपुरुष दोनी, मिसळलीं दिवोरजनीं,
तियें निवडितां त्रिभुवनीं, मार्तंडु जें ॥ ५२१ ॥
जेथ अपारा मोहराशी, तत्वाच्या मापीं चोविसीं,
उगाणा घेऊनि परेशीं, सुरवाडिजे ॥ ५२२ ॥
अर्जुना तें सांख्यशास्त्र, पढे जयाचें स्तोत्र,
तें गुणभेदचरित्र, ऐसें आहे ॥ ५२३ ॥
जे आपुलेनि आंगिकें, त्रिविधपणाचेनि अंकें,
दृश्यजात तितुकें, अंकित केलें ॥ ५२४ ॥
एवं सत्वरजतमा, तिहींची एवढी असे महिमा,
जें त्रैविध्य आदी ब्रह्मा, अंतीं कृमी ॥ ५२५ ॥
परी विश्वींची आघवी मांदी, जेणें भेदलेनि गुणभेदीं,
पडिली तें तंव आदी, ज्ञान सांगो ॥ ५२६ ॥
जे दिठी जरी चोख कीजे, तरी भलतेंही चोख सुजे,
तैसें ज्ञानें शुद्धें लाहिजे, सर्वही शुद्ध ॥ ५२७ ॥
म्हणौनि तें सात्विक ज्ञान, आतां सांगों दे अवधान,
कैवल्यगुणनिधान, श्रीकृष्ण म्हणे ॥ ५२८ ॥


सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते।
अविभक्तं विभक्तेषु तज्ञानं विद्धि सात्त्विकम् ॥ २०॥


तरी अर्जुना गा तें फुडें, सात्विक ज्ञान चोखडें,
जयाच्या उदयीं ज्ञेय बुडे, ज्ञातेनिसीं ॥ ५२९ ॥
जैसा सूर्य न देखे अंधारें, सरिता नेणिजती सागरें,
कां कवळिलिया न धरे, आत्मछाया ॥ ५३० ॥
तयापरी जया ज्ञाना, शिवादि तृणावसाना,
इया भूतव्यक्ति भिन्ना, नाडळती ॥ ५३१ ॥
जैसें हातें चित्र पाहातां, होय पाणियें मीठ धुतां,
कां चेवोनि स्वप्ना येतां, जैसें होय ॥ ५३२ ॥
तैसें ज्ञानें जेणें, करितां ज्ञातव्यातें पाहाणें,
जाणता ना जाणणें, जाणावें उरे ॥ ५३३ ॥
पैं सोनें आटूनि लेणीं, न काढिती आपुलिया आयणी,
कां तरंग न घेपती पाणी, गाळूनि जैसें ॥ ५३४ ॥
तैसी जया ज्ञानाचिया हाता, न लगेचि दृश्यपथा,
तें ज्ञान जाण सर्वथा, सात्विक गा ॥ ५३५ ॥
आरिसा पाहों जातां कोडें, जैसें पाहातेंचि कां रिगे पुढें,
तैसें ज्ञेय लोटोनि पडे, ज्ञाताचि जें ॥ ५३६ ॥
पुढती तेंचि सात्विक ज्ञान, जें मोक्षलक्ष्मीचें भुवन,
हें असो ऐक चिन्ह, राजसाचें ॥ ५३७ ॥


पृथक्त्वेन तु यज्ञानं नानाभावान्पृथग्विधान्।
वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ञानं विद्धि राजसम् ॥ २१॥


तरी पार्था परीयेस, तें ज्ञान गा राजस,
जें भेदाची कांस, धरूनि चाले ॥ ५३८ ॥
विचित्रता भूतांचिया, आपण आंतोनि ठिकरिया,
बहु चकै ज्ञातया, आणिली जेणें ॥ ५३९ ॥
जैसें साचा रूपाआड, घालूनि विसराचें कवाड,
मग स्वप्नाचें काबाड, ओपी निद्रा ॥ ५४० ॥
तैसें स्वज्ञानाचिये पौळी, बाहेरि मिथ्या महीं खळीं,
तिहीं अवस्थांचिया वह्याळी, दावी जें जीवा ॥ ५४१ ॥
अलंकारपणें झांकलें, बाळा सोनें कां वायां गेलें,
तैसें नामीं रूपीं दुरावलें, अद्वैत जया ॥ ५४२ ॥
अवतरली गाडग्यां घडां, पृथ्वी अनोळख जाली मूढां,
वन्हि जाला कानडा, दीपत्वासाठीं ॥ ५४३ ॥
कां वस्त्रपणाचेनि आरोपें, मूर्खाप्रति तंतु हारपे,
नाना मुग्धा पटु लोपे, दाऊनि चित्र ॥ ५४४ ॥
तैशी जया ज्ञाना, जाणोनि भूतव्यक्ती भिन्ना,
ऐक्यबोधाची भावना, निमोनि गेली ॥ ५४५ ॥
मग इंधनीं भेदला अनळु, फुलांवरी परीमळु,
कां जळभेदें शकलु, चंद्रु जैसा ॥ ५४६ ॥
तैसें पदार्थभेद बहुवस, जाणोनि लहानथोर वेष,
आंतलें तें राजस, ज्ञान येथ ॥ ५४७ ॥
आतां तामसाचेंही लिंग, सांगेन तें वोळख चांग,
डावलावया मातंग\-, सदन जैसें ॥ ५४८ ॥


यत्तु कृत्स्नवदेकस्मिन्कार्ये सक्तमहैतुकम्।
अतत्त्वार्थवदल्पं च तत्तामसमुदाहृतम् ॥ २२॥


तरी किरीटी जें ज्ञान, हिंडे विधीचेनि वस्त्रेंहीन,
श्रुति पाठमोरी नग्न, म्हणौनि तया ॥ ५४९ ॥
येरींही शास्त्र बटिकरीं, जें निंदेचे विटाळवरी,
बोळविलेंसे डोंगरीं, म्लेंच्छधर्माच्या ॥ ५५० ॥
जें गा ज्ञान ऐसें, गुणग्रहें तामसें,
घेतलें भवें पिसें, होऊनियां ॥ ५५१ ॥
जें सोयरिकें बाधु नेणें, पदार्थीं निषेधु न म्हणे,
निरोविलें जैसें सुणें, शून्यग्रामीं ॥ ५५२ ॥
तया तोंडीं जें नाडळे, कां खातां जेणें पोळे,
तेंचि येक वाळे, येर घेणेचि ॥ ५५३ ॥
पैं सोनें चोरितां उंदिरु, न म्हणे थरुविथरु,
नेणे मांसखाइरु, काळें गोरें ॥ ५५४ ॥
नाना वनामाजीं बोहरी, कडसणी जेवीं न करी,
कां जीत मेलें न विचारी, बैसतां माशी ॥ ५५५ ॥
अगा वांता कां वाढिलेया, साजुक कां सडलिया,
विवेकु कावळिया, नाहीं जैसा ॥ ५५६ ॥
तैसें निषिद्ध सांडूनि द्यावें, कां विहित आदरें घ्यावें,
हें विषयांचेनि नांवें, नेणेंचि जें ॥ ५५७ ॥
जेतुलें आड पडे दिठी, तेतुलें घेचि विषयासाठीं,
मग तें स्त्री\-द्रव्य वाटी, शिश्नोदरां ॥ ५५८ ॥
तीर्थातीर्थ हे भाख, उदकीं नाहीं सनोळख,
तृषा वोळे तेंचि सुख, वांचूनियां ॥ ५५९ ॥
तयाचिपरी खाद्याखाद्य, न म्हणे निंद्यानिंद्य,
तोंडा आवडे तें मेध्य, ऐसाचि बोधु ॥ ५६० ॥
आणि स्त्रीजात तितुकें, त्वचेंद्रियेंचि वोळखे,
तियेविषयीं सोयरिकें, एकचि बोधु ॥ ५६१ ॥
पैं स्वार्थीं जें उपकरे, तयाचि नाम सोयिरें,
देहसंबंधु न सरे, जिये ज्ञानीं ॥ ५६२ ॥
मृत्यूचें आघवेंचि अन्न, आघवेंचि आगी इंधन,
तैसें जगचि आपलें धन, तामसज्ञाना ॥ ५६३ ॥
ऐसेनि विश्व सकळ, जेणें विषयोचि मानिलें केवळ,
तया एक जाण फळ, देहभरण ॥ ५६४ ॥
आकाशपतिता नीरा, जैसा सिंधुचि येक थारा,
तैसें कृत्यजात उदरा\-, लागिंचि बुझे ॥ ५६५ ॥
वांचूनि स्वर्गु नरकु आथी, तया हेतु प्रवृत्ति निवृत्ती,
इये आघवियेचि राती, जाणिवेची जें ॥ ५६६ ॥
जें देहखंडा नाम आत्मा, ईश्वर पाषाणप्रतिमा,
ययापरौती प्रमा, ढळों नेणें ॥ ५६७ ॥
म्हणे पडिलेनि शरीरें, केलेनिसीं आत्मा सरे,
मा भोगावया उरे, कोण वेषें, ॥ ५६८ ॥
ना ईश्वरु पाहातां आहे, तो भोगवी हें जरी होये,
तरी देवचि खाये, विकूनियां ॥ ५६९ ॥
गांवींचें देवळेश्वर, नियामकचि होती साचार,
तरी देशींचे डोंगर, उगे कां असती ? ॥ ५७० ॥
ऐसा विपायें देवो मानिजे, तरी पाषाणमात्रचि जाणिजे,
आणि आत्मा तंव म्हणिजे, देहातेंचि ॥ ५७१ ॥
येरें पापपुण्यादिकें, तें आघवेंचि करोनि लटिकें,
हित मानी अग्निमुखे, चरणें जें कां ॥ ५७२ ॥
जें चामाचे डोळे दाविती, जें इंद्रियें गोडी लाविती,
तेंचि साच हे प्रतीती, फुडी जया ॥ ५७३ ॥
किंबहुना ऐसी प्रथा, वाढती देखसी पार्था,
धूमाची वेली वृथा, आकाशीं जैसी ॥ ५७४ ॥
कोरडा ना वोला, उपेगा आथी गेला,
तो वाढोनि मोडला, भेंडु जैसा ॥ ५७५ ॥
नाना उंसांचीं कणसें, कां नपुंसकें माणुसें,
वन लागलें जैसें, साबरीचें ॥ ५७६ ॥
नातरी बाळकाचें मन, कां चोराघरींचें धन,
अथवा गळास्तन, शेळियेचे ॥ ५७७ ॥
तैसें जें वायाणें, वोसाळ दिसे जाणणें,
तयातें मी म्हणें, तामस ज्ञान ॥ ५७८ ॥
तेंही ज्ञान इया भाषा, बोलिजे तो भावो ऐसा,
जात्यंधाचा कां जैसा, डोळा वाडु ॥ ५७९ ॥
कां बधिराचे नीट कान, अपेया नाम पान,
तैसें आडनांव ज्ञान, तामसा तया ॥ ५८० ॥
हें असो किती बोलावें, तरी ऐसें जें देखावें,
तें ज्ञान नोहे जाणावें, डोळस तम ॥ ५८१ ॥
एवं तिहीं गुणीं, भेदलें यथालक्षणीं,
ज्ञान श्रोतेशिरोमणी, दाविलें तुज ॥ ५८२ ॥
आतां याचि त्रिप्रकारा, ज्ञानाचेनि धनुर्धरा,
प्रकाशें होती गोचरा, कर्तयांच्या क्रिया ॥ ५८३ ॥
म्हणौनि कर्म पैं गा, अनुसरे तिहीं भागां,
मोहरे जालिया वोघा, तोय जैसे ॥ ५८४ ॥
तेंचि ज्ञानत्रयवशें, त्रिविध कर्म जें असे,
तेथ सात्विक तंव ऐसें, परीसे आधीं ॥ ५८५ ॥


नियतं सण्‌गरहितमरागद्वेषतः कृतम्।
अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्त्विकमुच्यते ॥ २३॥


तरी स्वाधिकाराचेनि मार्गेंं, आलें जें मानिलें आंगें,
पतिव्रतेचेनि परीष्वंगें, प्रियातें जैसें ॥ ५८६ ॥
सांवळ्या आंगा चंदन, प्रमदालोचनीं अंजन,
तैसें अधिकारासी मंडण, नित्यपणें जें ॥ ५८७ ॥
तें नित्य कर्म भलें, होय नैमित्तिकीं सावाइलें,
सोनयासि जोडलें, सौरभ्य जैसें ॥ ५८८ ॥
आणि आंगा जीवाची संपत्ती, वेंचूनि बाळाची करी पाळती,
परी जीवें उबगणें हें स्थिती, न पाहे माय ॥ ५८९ ॥
तैसें सर्वस्वें कर्म अनुष्ठी, परी फळ न सूये दिठी,
उखिती क्रिया पैठी, ब्रह्मींचि करी ॥ ५९० ॥
आणि प्रिय आलिया स्वभावें, शंबळ उरे वेंचे ठाउवें,
नव्हे तैसें सत्प्रसंगें करावें, पारुषे जरी ॥ ५९१ ॥
तरी अकरणाचेनि खेदें, द्वेषातें जीवीं न बांधे,
जालियाचेनि आनंदें, फुंजों नेणें ॥ ५९२ ॥
ऐस{ऐ}सिया हातवटिया, कर्म निफजे जें धनंजया,
जाण सात्विक हें तया, गुणनाम गा ॥ ५९३ ॥
ययावरी राजसाचें, लक्षण सांगिजेल साचें,
न करीं अवधानाचें, वाणेंपण ॥ ५९४ ॥


यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः।
क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम् ॥ २४॥


तरी घरीं मातापितरां, धड बोली नाहीं संसारा,
येर विश्व भरी आदरा, मूर्खु जैसा ॥ ५९५ ॥
का तुळशीचिया झाडा, दुरूनि न घापें सिंतोडा,
द्राक्षीचिया तरी बुडा, दूधचि लाविजे ॥ ५९६ ॥
तैसी नित्यनैमित्तिकें, कर्में जियें आवश्यकें,
तयांचेविषयीं न शके, बैसला उठूं ॥ ५९७ ॥
येरां काम्याचेनि तरी नांवें, देह सर्वस्व आघवें,
वेचितांही न मनवे, बहु ऐसें ॥ ५९८ ॥
अगा देवढी वाढी लाहिजे, तेथ मोल देतां न धाइजे,
पेरितां पुरें न म्हणिजे, बीज जेवीं ॥ ५९९ ॥
कां परीसु आलिया हातीं, लोहालागीं सर्वसंपत्ती,
वेचितां ये उन्नती, साधकु जैसा ॥ ६०० ॥
तैसीं फळें देखोनि पुढें, काम्यकर्में दुवाडें,
करी परी तें थोकडें, केलेंही मानी ॥ ६०१ ॥
तेणें फळकामुकें, यथाविधी नेटकें,
काम्य कीजे तितुकें, क्रियाजात ॥ ६०२ ॥
आणि तयाही केलियाचें, तोंडीं लावी दौंडीचें,
कर्मी या नांवपाटाचें, वाणें सारी ॥ ६०३ ॥
तैसा भरे कर्माहंकारु, मग पिता अथवा गुरु,
ते न मनी काळज्वरु, औषध जैसें ॥ ६०४ ॥
तैसेनि साहंकारें, फळाभिलाषियें नरें,
कीजे गा आदरें, जें जें कांहीं ॥ ६०५ ॥
परी तेंही करणें बहुवसा, वळघोनि करी सायासा,
जीवनोपावो कां जैसा, कोल्हाटियांचा ॥ ६०६ ॥
एका कणालागीं.ण् उंदिरु, आसका उपसे डोंगरु,
कां शेवाळोद्देशें दर्दुरु, समुद्रु डहुळी ॥ ६०७ ॥
पैं भिकेपरतें न लाहे, तऱ्ही गारुडी सापु वाहे,
काय कीजे शीणुचि होये, गोडु येकां ॥ ६०८ ॥
हे असो परमाणूचेनि लाभें, पाताळ लंघिती वोळंबे,
तैसें स्वर्गसुखलोभें, विचंबणें जें ॥ ६०९ ॥
तें काम्य कर्म सक्लेश, जाणावें येथ राजस,
आतां चिन्ह परिस, तामसाचें ॥ ६१० ॥


अनुबन्धं क्षयं हिंसामनपेक्ष्य च पौरुषम्।
मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते ॥ २५॥


तरी तें गा तामस कर्म, जें निंदेचें काळें धाम,
निषेधाचें जन्म, सांच जेणें ॥ ६११ ॥
जें निपजविल्यापाठींं, कांहींच न दिसे दिठी,
रेघ काढलिया पोटीं, तोयाचे जेवीं ॥ ६१२ ॥
कां कांजी घुसळलिया, कां राखोंडी फुंकलिया,
कांहीं न दिसे गाळिलिया, वाळुघाणा ॥ ६१३ ॥
नाना उपणिलिया भूंस, कां विंधिलिया आकाश,
नाना मांडिलिया पाश, वारयासी ॥ ६१४ ॥
हें आवघेंचि जैसें, वांझें होऊनि नासे,
जें केलिया पाठीं तैसें, वायांचि जाय ॥ ६१५ ॥
येऱ्हवीं नरदेहाही येवढें, धन आटणीये पडे,
जें कर्म निफजवितां मोडे, जगाचें सुख ॥ ६१६ ॥
जैसा कमळवनीं फांसु, काढिलिया कांटसु,
आपण झिजे नाशु, कमळां करी ॥ ६१७ ॥
कां आपण आंगें जळे, आणि नागवी जगाचे डोळे,
पतंगु जैसा सळें, दीपाचेनि ॥ ६१८ ॥
तैसें सर्वस्व वायां जावो, वरी देहाही होय घावो,
परी पुढिलां अपावो, निफजविजे जेणें ॥ ६१९ ॥
माशी आपणयातें गिळवी, परी पुढीला वांती शिणवी,
तें कश्मळ आठवी, आचरण जें ॥ ६२० ॥
तेंही करावयो दोषें, मज सामर्थ्य असे कीं नसे,
हेंहीं पुढील तैसें, न पाहतां करी ॥ ६२१ ॥
केवढा माझा उपावो, करितां कोण प्रस्तावो,
केलियाही आवो, काय येथ ॥ ६२२ ॥
इये जाणिवेची सोये, अविवेकाचेनि पायें,
पुसोनियां होये, साटोप कर्मीं ॥ ६२३ ॥
आपला वसौटा जाळुनी, बिसाटे जैसा वन्ही,
कां स्वमर्यादा गिळोनि, सिंधु उठी ॥ ६२४ ॥
मग नेणें बहु थोडें, न पाहे मागें पुढें,
मार्गामार्ग येकवढें, करीत चाले ॥ ६२५ ॥
तैसें कृत्याकृत्य सरकटित, आपपर नुरवित,
कर्म होय तें निश्चित, तामस जाण ॥ ६२६ ॥
ऐसी गुणत्रयभिन्ना, कर्माची गा अर्जुना,
हे केली विवंचना, उपपत्तींसीं ॥ ६२७ ॥
आतां ययाचि कर्मा भजतां, कर्माभिमानिया कर्ता,
तो जीवुही त्रिविधता, पातला असे ॥ ६२८ ॥
चतुराश्रमवशें, एकु पुरुषु चतुर्धा दिसे,
कर्तया त्रैविध्य तैसें, कर्मभेदें ॥ ६२९ ॥
तरी तयां तिहीं आंतु, सात्विक तंव प्रस्तुतु,
सांगेन दत्तचित्तु, आकर्णीं तूं ॥ ६३० ॥


मुक्तसण्‌गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः।
सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते ॥ २६॥


तरी फळोद्देशें सांडिलिया, वाढती जेवीं सरळिया,
शाखा कां चंदनाचिया, बावन्नया ॥ ६३१ ॥
कां न फळतांही सार्थका, जैसिया नागलतिका,
तैसिया करी नित्यादिकां, क्रिया जो कां ॥ ६३२ ॥
परी फळशून्यता, नाहीं तया विफळता,
पैं फळासीचि पंडुसुता, फळें कायिसी, ॥ ६३३ ॥
आणि आदरें करी बहुवसें, परी कर्ता मी हें नुमसे,
वर्षाकाळींचें जैसें, मेघवृंद ॥ ६३४ ॥
तेवींचि परमात्मलिंगा, समर्पावयाजोगा,
कर्मकलापु पैं गा, निपजावया ॥ ६३५ ॥
तया काळातें नुलंघणें, देशशुद्धिही साधणें,
कां शास्त्रांच्या वातीं पाहणें, क्रियानिर्णयो ॥ ६३६ ॥
वृत्ति करणें येकवळा, चित्त जावों न देणें फळा,
नियमांचिया सांखळा, वाहणें सदा ॥ ६३७ ॥
हा निरोधु साहावयालागीं, धैर्याचिया चांगचांगीं,
चिंतवणी जिती आंगीं, वाहे जो कां ॥ ६३८ ॥
आणि आत्मयाचिये आवडी, कर्में करितां वरपडीं,
देहसुखाचिये परवडीं, येवों न लाहे ॥ ६३९ ॥
आळसा निद्रा दुऱ्हावे, क्षुधा न बाणवे,
सुरवाडु न पावे, आंगाचा ठावो ॥ ६४० ॥
तंव अधिकाधिक, उत्साहो धरी आगळीक,
सोनें जैसें पुटीं तुक, तुटलिया कसीं ॥ ६४१ ॥
जरी आवडी आथी साच, तरी जीवितही सलंच,
आगीं घालितां रोमांच, देखिजती सतिये, ॥ ६४२ ॥
मा आत्मया येवढीया प्रिया, वालभेला जो धनंजया,
देहही सिदतां तया, काय खेदु होईल ? ॥ ६४३ ॥
म्हणौनि विषयसुरवाडु तुटे, जंव जंव देहबुद्धि आटे,
तंव तंव आनंदु दुणवटे, कर्मीं जया ॥ ६४४ ॥
ऐसेनि जो कर्म करी, आणि कोणे एके अवसरीं,
तें ठाके ऐसी परी, वाहे जरी ॥ ६४५ ॥
तरी कडाडीं लोटला गाडा, तो आपणपें न मनी अवघडा,
तैसा ठाकलेनिही थोडा, नोहे जो कां ॥ ६४६ ॥
नातरी आदरिलें, अव्यंग सिद्धी गेलें,
तरी तेंही जिंतिलें, मिरवूं नेणें ॥ ६४७ ॥
इया खुणा कर्म करितां, देखिजे जो पंडुसुता,
तयातें म्हणिपे तत्त्वतां, सात्विकु कर्ता ॥ ६४८ ॥
आतां राजसा कर्तेया, वोळखणें हें धनंजया,
जे अभिलाषा जगाचिया, वसौटा तो ॥ ६४९ ॥


रागी कर्मफलप्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मकोऽशुचिः।
हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः ॥ २७॥


जैसा गावींचिया कश्मळा, उकरडा होय येकवळा,
कां स्मशानीं अमंगळा, आघवयांची ॥ ६५० ॥
तया परी जो अशेषा, विश्वाचिया अभिलाषा,
पायपाखाळणिया दोषां, घरटा जाला ॥ ६५१ ॥
म्हणौनि फळाचा लागु, देखे जिये असलगु,
तिये कर्मीं चांगु, रोहो मांडी ॥ ६५२ ॥
आणि आपण जालिये जोडी, उपखों नेदी कवडी,
क्षणक्षणा कुरोंडी, जीवाची करी ॥ ६५३ ॥
कृपणु चित्तीं ठेवा आपुला, तैसा दक्षु पराविया माला,
बकु जैसा खुतला, मासेयासी ॥ ६५४ ॥
आणि गोंवी गेलिया जवळी, झगटलिया अंग फाळी,
फळें तरी आंतु पोळी, बोरांटी जैसी ॥ ६५५ ॥
तैसें मनें वाचा कायें, भलतया दुःख देतु जाये,
स्वार्थु साधितां न पाहे, पराचें हित ॥ ६५६ ॥
तेवींचि आंगें कर्मीं, आचरणें नोहे क्षमी,
न निघे मनोधर्मीं, अरोचकु ॥ ६५७ ॥
कनकाचिया फळा, आंतु माज बाहेरी मौळा,
तैसा सबाह्य दुबळा, शुचित्वें जो ॥ ६५८ ॥
आणि कर्मजात केलिया, फळ लाहे जरी धनंजया,
तरी हरिखें जगा यया, वांकुलिया वाये ॥ ६५९ ॥
अथवा जें आदरिलें, हीनफळ होय केलें,
तरीं शोकें तेणें जिंतिलें, धिक्कारों लागे ॥ ६६० ॥
कर्मीं राहाटी ऐसी, जयातें होती देखसी,
तोचि जाण त्रिशुद्धीसी, राजस कर्ता ॥ ६६१ ॥
आतां यया पाठीं येरु, जो कुकर्माचा आगरु,
तोही करूं गोचरु, तामस कर्ता ॥ ६६२ ॥


अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठो नैष्कृतिकोऽलसः।
विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते ॥ २८॥


तरी मियां लागलिया कैसें, पुढील जळत असे,
हें नेणिजे हुताशें, जियापरी ॥ ६६३ ॥
पैं शस्त्रें मियां तिखटें, नेणिजे कैसेनि निवटे,
कां नेणिजे काळकूटें, आपुलें केलें ॥ ६६४ ॥
तैसा पुढीलया आपुलया, घातु करीत धनंजया,
आदरी वोखटिया, क्रिया जो कां ॥ ६६५ ॥
तिया करितांही वेळीं, काय जालें हें न सांभाळी,
चळला वायु वाहटुळी, चेष्टे तैसा ॥ ६६६ ॥
पैं करणिया आणि जया, मेळु नाहीं धनंजया,
तो पाहुनी पिसेया, कैंचीं त्राय ? ॥ ६६७ ॥
आणि इंद्रियांचें वोगरिलें, चरोनि राखे जो जियालें,
बैलातळीं लागलें, गोचिड जैसें ॥ ६६८ ॥
हांसया रुदना वेळु, नेणतां आदरी बाळु,
राहाटे उच्छृंखळु, तयापरी ॥ ६६९ ॥
जो प्रकृती आंतलेपणें, कृत्याकृत्यस्वादु नेणे,
फुगे केरें धालेपणें, उकरडा जैसा ॥ ६७० ॥
म्हणौनि मान्याचेनि नांवें, ईश्वराही परी न खालवे,
स्तब्धपणें न मनवे, डोंगरासी ॥ ६७१ ॥
आणि मन जयाचें विषकल्लोळीं, राहाटी फुडी चोरिली,
दिठी कीर ते वोली, पण्यांगनेची ॥ ६७२ ॥
किंबहुना कपटाचें, देहचि वळिलें तयाचें,
तें जिणें कीं जुंवाराचें, टिटेघर ॥ ६७३ ॥
नोहे तयाचा प्रादुर्भावो, तो साभिलाष भिल्लांचा गांवो,
म्हणौनि नये येवों जावों, तया वाटा ॥ ६७४ ॥
आणि आणिकांचें निकें केलें, विरु होय जया आलें,
जैसें अपेय पया मिनलें, लवण करी ॥ ६७५ ॥
कां हींव ऐसा पदार्थु, घातलिया आगीआंतु,
तेचि क्षणीं धडाडितु, अग्नि होय ॥ ६७६ ॥
नाना सुद्रव्यें गोमटीं, जालिया शरीरीं पैठीं,
होऊनि ठाती किरीटी, मळुचि जेवीं ॥ ६७७ ॥
तैसें पुढिलाचें बरवें, जयाच्या भीतरीं पावे,
आणि विरुद्धचि आघवें, होऊनि निगे ॥ ६७८ ॥
जो गुण घे दे दोख, अमृताचें करी विख,
दूध पाजलिया देख, व्याळु जैसा ॥ ६७९ ॥
आणि ऐहिकीं जियावें, जेणें परत्रा साच यावें,
तें उचित कृत्य पावे, अवसरीं जिये ॥ ६८० ॥
तेव्हां जया आपैसी, निद्रा ये ठेविली ऐसी,
दुर्व्यवहारीं जैसी, विटाळें लोटे ॥ ६८१ ॥
पैं द्राक्षरसा आम्ररसा, वेळे तोंड सडे वायसा,
कां डोळे फुटती दिवसा, डुडुळाचे ॥ ६८२ ॥
तैसा कल्याणकाळु पाहे, तैं तयातें आळसु खाये,
ना प्रमादीं तरी होये, तो म्हणे तैसें ॥ ६८३ ॥
जेवींचि सागराच्या पोटीं, जळे अखंड आगिठी,
तैसा विषादु वाहे गांठीं, जिवाचिये जो ॥ ६८४ ॥
लेंडोराआगीं धूमावधि, कां अपाना आंगीं दुर्गंधि,
तैसा जो जीवितावधि, विषादें केला ॥ ६८५ ॥
आणि कल्पांताचिया पारा, वेगळेंही जो वीरा,
सूत्र धरी व्यापारा, साभिलाषा ॥ ६८६ ॥
अगा जगाही परौती, शुचा वाहे पैं चित्तीं,
करितां विषीं हातीं, तृणही न लगे ॥ ६८७ ॥
ऐसा जो लोकाआंतु, पापपुंजु मूर्तु,
देखसी तो अव्याहतु, तामसु कर्ता ॥ ६८८ ॥
एवं कर्म कर्ता ज्ञान, या तिहींचें त्रिधा चिन्ह,
दाविलें तुज सुजन, चक्रवर्ती ॥ ६८९ ॥


बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु।
प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय ॥ २९॥


आतां अविद्येचिया गांवीं, मोहाची वेढूनि मदवी,
संदेहाचीं आघवीं, लेऊनि लेणीं ॥ ६९० ॥
आत्मनिश्चयाची बरव, जया आरिसां पाहे सावयव,
तिये बुद्धीचीही धांव, त्रिधा असे ॥ ६९१ ॥
अगा सत्वादि गुणीं इहीं, कायी एक तिहीं ठायीं,
न कीजेचि येथ पाहीं, जगामाजीं ॥ ६९२ ॥
आगी न वसतां पोटीं, कवण काष्ठ असे सृष्टीं,
तैसें तें कैंचें दृश्यकोटीं, त्रिविध जें नोहे ॥ ६९३ ॥
म्हणौनि तिहीं गुणीं, बुद्धी केली त्रिगुणी,
धृतीसिही वांटणी, तैसीचि असे ॥ ६९४ ॥
तेंचि येक वेगळालें, यथा चिन्हीं अळंकारलें,
सांगिजैल उपाइलें, भेदलेपणें ॥ ६९५ ॥
परी बुद्धि धृति इयां, दोहीं भागामाजीं धनंंजया,
आधीं रूप बुद्धीचिया, भेदासि करूं ॥ ६९६ ॥
तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा, संसारासि गा सुभटा,
प्राणियां येतिया वाटा, तिनी आथी ॥ ६९७ ॥
जे अकरणीय काम्य निषिद्ध, ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध,
संसारभयें सबाध, जीवां ययां ॥ ६९८ ॥


प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये।
बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्त्विकी ॥ ३०॥


म्हणौनि अधिकारें मानिलें, जें विधीचेनि वोघें आलें,
तें एकचि येथ भलें, नित्य कर्म ॥ ६९९ ॥
तेंचि आत्मप्राप्ति फळ, दिठी सूनि केवळ,
कीजे जैसें कां जळ, सेविजे ताहनें ॥ ७०० ॥
येतुलेनि तें कर्म, सांडी जन्मभय विषम,
करूनि दे उगम, मोक्षसिद्धि ॥ ७०१ ॥
ऐसें करी तो भला, संसारभयें सांडिला,
करणीयत्वें आला, मुमुक्षुभागा ॥ ७०२ ॥
तेथ जे बुद्धि ऐसा, बळिया बांधे भरंवसा,
मोक्षु ठेविला ऐसा, जोडेल येथ ॥ ७०३ ॥
म्हणौनि निवृत्तीची मांडिली, सूनि प्रवृत्तितळीं,
इये कर्मीं बुडकुळी, द्यावीं कीं ना ? ॥ ७०४ ॥
तृषार्ता उदकें जिणें, कां पुरीं पडलिया पोहणें,
अंधकूपीं गति किरणें, सूर्याचेनि ॥ ७०५ ॥
नाना पथ्येंसीं औषध लाहे, तरी रोगें दाटलाही जिये,
का मीना जिव्हाळा होये, जळाचा जरी ॥ ७०६ ॥
तरी तयाच्या जीविता, नाहीं जेवीं अन्यथा,
तैसें कर्मीं इये वर्ततां, जोडेचि मोक्षु ॥ ७०७ ॥
हें करणीयाचिया कडे, जें ज्ञान आथी चोखडें,
आणि अकरणीय हें फुडें, ऐसें जाण ॥ ७०८ ॥
जीं तिथें काम्यादिकें, संसारभयदायकें,
अकृत्यपणाचें आंबुखें, पडिलें जयां ॥ ७०९ ॥
तिये कर्मीं अकार्यीं, जन्ममरणसमयीं,
प्रवृत्ति पळवी पायीं, मागिलींचि ॥ ७१० ॥
पैं आगीमाजीं न रिघवे, अथावीं न घालवे,
धगधगीत नागवे, शूळ जेवीं ॥ ७११ ॥
कां काळियानाग धुंधुवातु, देखोनि न घालवे हातु,
न वचवे खोपेआंतु, वाघाचिये ॥ ७१२ ॥
तैसें कर्म अकरणीय, देखोनि महाभय,
उपजे निःसंदेह, बुद्धी जिये ॥ ७१३ ॥
वाढिलें रांधूनि विखें, तेथें जाणिजे मृत्यु न चुके,
तेवीं निषेधीं कां देखे, बंधातें जे ॥ ७१४ ॥
मग बंधभयभरितीं, तियें निषिद्धीं प्राप्ती,
विनियोगु जाणे निवृत्ती, कर्माचिये ॥ ७१५ ॥
ऐसेनि कार्याकार्यविवेकी, जे प्रवृत्ति निवृत्ति मापकी,
खरा कुडा पारखी, जियापरी ॥ ७१६ ॥
तैसी कृत्याकृत्यशुद्धी, बुझे जे निरवधी,
सात्विक म्हणिपे बुद्धी, तेचि तूं जाण ॥ ७१७ ॥


यया धर्ममधर्मं च कार्यं चाकार्यमेव च।
अयथावत्प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी ॥ ३१॥


आणि बकाच्या गांवीं, घेपे क्षीरनीर सकलवी,
कां अहोरात्रींची गोंवी, आंधळें नेणे ॥ ७१८ ॥
जया फुलाचा मकरंदु फावे, तो काष्ठें कोरूं धांवे,
परी भ्रमरपणा नव्हे, अव्हांटा जेवीं ॥ ७१९ ॥
तैसीं इयें कार्याकार्यें, धर्माधर्मरूपें जियें,
तियें न चोजवितां जाये, जाणती जे कां ॥ ७२० ॥
अगा डोळांवीण मोतियें, घेतां पाडु मिळे विपायें,
न मिळणें तें आहे, ठेविलें तेथें ॥ ७२१ ॥
तैसें अकरणीय अवचटें, नोडवे तरीच लोटे,
येऱ्हवीं जाणें एकवटें, दोन्ही जे कां ॥ ७२२ ॥
ते गा बुद्धि चोखविषीं, जाण येथ राजसी,
अक्षत टाकिली जैसी, मांदियेवरी ॥ ७२३ ॥


अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता।
सर्वार्थान्विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी ॥ ३२॥


आणि राजा जिया वाटा जाये, ते चोरांसि आडव होये,
कां राक्षसां दिवो पाहे, राती होऊनि ॥ ७२४ ॥
नाना निधानचि निदैवा, होये कोळसयाचा उडवा,
पैं असतें आपणपें जीवा, नाहीं जालें ॥ ७२५ ॥
तैसें धर्मजात तितुकें, जिये बुद्धीसी पातकें,
साच तें लटिकें, ऐसेंचि बुझे ॥ ७२६ ॥
ते आघवेचि अर्थ, करूनि घाली अनर्थ,
गुण ते ते व्यवस्थित, दोषचि मानी ॥ ७२७ ॥
किंबहुना श्रुतिजातें, अधिष्ठूनि केलें सरतें,
तेतुलेंही उपरतें, जाणे जे बुद्धी ॥ ७२८ ॥
ते कोणातेंही न पुसतां, तामसी जाणावी पंडुसुता,
रात्री काय धर्मार्था, साच करावी, ॥ ७२९ ॥
एवं बुद्धीचे भेद, तिन्ही तुज विशद,
सांगितले स्वबोध\-, कुमुदचंद्रा ॥ ७३० ॥
आतां ययाचि बुद्धिवृत्ती, निष्टंकिला कर्मजातीं,
खांदु मांडिजे धृती, त्रिविधा तया ॥ ७३१ ॥
तिये धृतीचेही विभाग, तिन्ही यथालिंग,
सांगिजती चांग, अवधान देईं ॥ ७३२ ॥


धृत्या यया धारयते मनःप्राणेन्द्रियक्रियाः।
योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्त्विकी ॥ ३३॥


तरी उदेलिया दिनकरु, चोरीसिं थोके अंधारु,
कां राजाज्ञा अव्यवहारु, कुंठवी जेवीं ॥ ७३३ ॥
नाना पवनाचा साटु, वाजीनलिया नीटु,
आंगेंसीं बोभाटु, सांडिती मेघ ॥ ७३४ ॥
कां अगस्तीचेनि दर्शनें, सिंधु घेऊनि ठाती मौनें,
चंद्रोदयीं कमळवनें, मिठी देती ॥ ७३५ ॥
हें असो पावो उचलिला, मदमुख न ठेविती खालां,
गर्जोनि पुढां जाला, सिंहु जरी ॥ ७३६ ॥
तैसा जो धीरु, उठलिया अंतरु,
मनादिकें व्यापारु, सांडिती उभीं ॥ ७३७ ॥
इंद्रियां विषयांचिया गांठी, अपैसया सुटती किरीटी,
मन मायेच्या पोटीं, रिगती दाही ॥ ७३८ ॥
अधोर्ध्व गूढें काढी, प्राण नवांची पेंडी,
बांधोनि घाली उडी, मध्यमेमाजीं ॥ ७३९ ॥
संकल्पविकल्पांचें लुगडे, सांडूनि मन उघडें,
बुद्धि मागिलेकडे, उगीचि बैसे ॥ ७४० ॥
ऐसी धैर्यराजें जेणें, मन प्राण करणें,
स्वचेष्टांचीं संभाषणें, सांडविजती ॥ ७४१ ॥
मग आघवींचि सडीं, ध्यानाच्या आंतुल्या मढीं,
कोंडिजती निरवडी, योगाचिये ॥ ७४२ ॥
परी परमात्मया चक्रवर्ती, उगाणिती जंव हातीं,
तंव लांचु न घेतां धृती, धरिजती जिया ॥ ७४३ ॥
ते गा धृती येथें, सात्विक हें निरुतें,
आईक अर्जुनातें, श्रीकांतु म्हणे ॥ ७४४ ॥


यया तु धर्मकामार्थान्धृत्या धारयतेऽर्जुन।
प्रसण्‌गेन फलाकाण्‌क्षी धृतिः सा पार्थ राजसी ॥ ३४॥


आणि होऊनियां शरीरी, स्वर्गसंसाराच्या दोहीं घरीं,
नांदे जो पोटभरी, त्रिवर्गोपायें ॥ ७४५ ॥
तो मनोरथांच्या सागरीं, धर्मार्थकामांच्या तारुवावरी,
जेणें धैर्यबळें करी, क्रिया\-वणिज ॥ ७४६ ॥
जें कर्म भांडवला सूये, तयाची चौगुणी येती पाहे,
येवढें सायास साहे, जया धृती ॥ ७४७ ॥
ते गा धृती राजस, पार्था येथ परीयेस,
आतां आइक तामस, तिसरी जे कां ॥ ७४८ ॥


यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च।
न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी ॥ ३५॥


तरी सर्वाधमें गुणें, जयाचें कां रूपा येणें,
कोळसा काळेपणें, घडला जैसा ॥ ७४९ ॥
अहो प्राकृत आणि हीनु, तयाही कीं गुणत्वाचा मानु,
तरी न म्हणिजे पुण्यजनु, राक्षसु काई ?॥ ७५० ॥
पैं ग्रहांमाजीं इंगळु, तयातें म्हणिजे मंगळु,
तैसा तमीं धसाळु, गुणशब्दु हा ॥ ७५१ ॥
जे सर्वदोषांचा वसौटा, तमचि कामऊनि सुभटा,
उभारिला आंगवठा, जया नराचा ॥ ७५२ ॥
तो आळसु सूनि असे कांखे, म्हणौनि निद्रे कहीं न मुके,
पापें पोषितां दुःखें, न सांडिजे जेवीं ॥ ७५३ ॥
आणि देहधनाचिया आवडी, सदा भय तयातें न सांडी,
विसंबूं न सके धोंडीं, काठिण्य जैसें ॥ ७५४ ॥
आणि पदार्थजातीं स्नेहो, बांधे म्हणौनि तो शोकें ठावो,
केला न शके पाप जावों, कृतघ्नौनि जैसें ॥ ७५५ ॥
आणि असंतोष जीवेंसीं, धरूनि ठेला अहर्निशीं,
म्हणौनि मैत्री तेणेंसीं, विषादें केली ॥ ७५६ ॥
लसणातें न सांडी गंधी, कां अपथ्यशीळातें व्याधी,
तैसी केली मरणावधी, विषादें तया ॥ ७५७ ॥
आणि वयसा वित्तकामु, ययांचा वाढवी संभ्रमु,
म्हणौनि मदें आश्रमु, तोचि केला ॥ ७५८ ॥
आगीतें न सांडी तापु, सळातें जातीचा सापु,
कां जगाचा वैरी वासिपु, अखंडु जैसा ॥ ७५९ ॥
नातरी शरीरातें काळु, न विसंबे कवणे वेळु,
तैसा आथी अढळु, तामसीं मदु ॥ ७६० ॥
एवं पांचही हे निद्रादिक, तामसाच्या ठाईं दोख,
जिया धृती देख, धरिलें आहाती ॥ ७६१ ॥
तिये गा धृती नांवें, तामसी येथ हें जाणावें,
म्हणितलें तेणें देवें, जगाचेनी ॥ ७६२ ॥
एवं त्रिविध जे बुद्धि, कीजे कर्मनिश्चयो आधि,
तो धृती या सिद्धि, नेइजो येथ ॥ ७६३ ॥
सूर्यें मार्गु गोचरु होये, आणि तो चालती कीर पाये,
परी चालणें तें आहे, धैर्यें जेवीं ॥ ७६४ ॥
तैसी बुद्धि कर्मातें दावी, ते करणसामग्री निफजवी,
परी निफजावया होआवी, धीरता जे ॥ ७६५ ॥
ते हे गा तुजप्रती, सांगीतली त्रिविध धृती,
यया कर्मत्रया निष्पत्ती, जालिया मग ॥ ७६६ ॥
येथ फळ जें एक निफजे, सुख जयातें म्हणिजे,
तेंही त्रिविध जाणिजे, कर्मवशें ॥ ७६७ ॥
तरी फळरूप तें सुख, त्रिगुणीं भेदलें देख,
विवंचूं आतां चोख, चोखीं बोलीं ॥ ७६८ ॥
परी चोखी ते कैसी सांगे, पैं घेवों जातां बोलबगें,
कानींचियेही लागे, हातींचा मळु ॥ ७६९ ॥
म्हणौनि जयाचेनि अव्हेरें, अवधानही होय बाहिरें,
तेणें आइक हो आंतरें, जीवाचेनि जीवें ॥ ७७० ॥
ऐसें म्हणौनि देवो, त्रिविधा सुखाचा प्रस्तावो,
मांडला तो निर्वाहो, निरूपित असें ॥ ७७१ ॥


सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ।
अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति ॥ ३६॥


म्हणे सुखत्रयसंज्ञा, सांगों म्हणौनि प्रतिज्ञा,
बोलिलों तें प्राज्ञा, ऐक आतां ॥ ७७२ ॥
तरी सुख तें गा किरीटी, दाविजेल तुज दिठी,
जें आत्मयाचिये भेटी, जीवासि होय ॥ ७७३ ॥
परी मात्रेचेनि मापें, दिव्यौषध जैसें घेपें,
कां कथिलाचें कीजे रुपें, रसभावनीं ॥ ७७४ ॥
नाना लवणाचें जळु, होआवया दोनि चार वेळु,
देऊनि सांडिजती ढाळु, तोयाचें जेवीं ॥ ७७५ ॥
तेवीं जालेनि सुखलेशें, जीवु भाविलिया अभ्यासें,
जीवपणाचें नासे, दुःख जेथें ॥ ७७६ ॥
तें येथ आत्मसुख, जालें असे त्रिगुणात्मक,
तेंही सांगों एकैक, रूप आतां ॥ ७७७ ॥


यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम्।
तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम् ॥ ३७॥


आतां चंदनाचें बूड, सर्पी जैसें दुवाड,
कां निधानाचें तोंड, विवसिया जेवीं ॥ ७७८ ॥
अगा स्वर्गींचें गोमटें, आडव यागसंकटें,
कां बाळपण दासटें, त्रासकाळें ॥ ७७९ ॥
हें असो दीपाचिये सिद्धी, अवघड धू आधीं,
नातरी तो औषधीं, जिभेचा ठावो ॥ ७८० ॥
तयापरी पांडवा, जया सुखाचा रिगावा,
विषम तेथ मेळावा, यमदमांचा ॥ ७८१ ॥
देत सर्वस्नेहा मिठी, आगीं ऐसें वैराग्य उठी,
स्वर्ग संसारा कांटी, काढितचि ॥ ७८२ ॥
विवेकश्रवणें खरपुसें, जेथ व्रताचरणें कर्कशें,
करितां जाती भोकसे, बुद्ध्यादिकांचे ॥ ७८३ ॥
सुषुम्नेचेनि तोंडें, गिळिजे प्राणापानाचे लोंढे,
बोहणियेसीचि येवढें, भारी जेथ ॥ ७८४ ॥
जें सारसांही विघडतां, होय वोहाहूनि वस्त काढितां,
ना भणंगु दवडितां, भाणयावरुनी ॥ ७८५ ॥
पैं मायेपुढौनि बाळक, काळें नेतां एकुलतें एक,
होय कां उदक, तुटतां मीना ॥ ७८६ ॥
तैसें विषयांचें घर, इंद्रियां सांडितां थोर,
युगांतु होय तें वीर, विराग साहाती ॥ ७८७ ॥
ऐसा जया सुखाचा आरंभु, दावी काठिण्याचा क्षोभु,
मग क्षीराब्धी लाभु, अमृताचा जैसा ॥ ७८८ ॥
पहिलया वैराग्यगरळा, धैर्यशंभु वोडवी गळा,
तरी ज्ञानामृतें सोहळा, पाहे जेथें ॥ ७८९ ॥
पैं कोलिताही कोपे ऐसें, द्राक्षांचें हिरवेपण असे,
तें परीपाकीं कां जैसें, माधुर्य आते ॥ ७९० ॥
तें वैराग्यादिक तैसें, पिकलिया आत्मप्रकाशें,
मग वैराग्येंसींही नाशे, अविद्याजात ॥ ७९१ ॥
तेव्हां सागरीं गंगा जैसी, आत्मीं मीनल्या बुद्धि तैसी,
अद्वयानंदाची आपैसी, खाणी उघडे ॥ ७९२ ॥
ऐसें स्वानुभवविश्रामें, वैराग्यमूळ जें परिणमे,
तें सात्विक येणें नामें, बोलिजे सुख ॥ ७९३ ॥


विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम्।
परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम् ॥ ३८॥


आणि विषयेंद्रियां, मेळु होतां धनंजया,
जें सुख जाय थडिया, सांडूनि दोन्ही ॥ ७९४ ॥
अधिकारिया रिगतां गांवो, होय जैसा उत्साहो,
कां रिणावरी विवाहो, विस्तारिला ॥ ७९५ ॥
नाना रोगिया जिभेपासीं, केळें गोड साखरेसीं,
कां बचनागाची जैसी, मधुरता पहिली ॥ ७९६ ॥
पहिलें संवचोराचें मैत्र, हाटभेटीचें कलत्र,
कां लाघवियाचे विचित्र, विनोद ते ॥ ७९७ ॥
तैसें विषयेंद्रियदोखीं, जें सुख जीवातें पोखी,
मग उपडिला खडकीं, हंसु जैसा ॥ ७९८ ॥
तैसी जोडी आघवी आटे, जीविताचा ठाय फिटे,
सुकृताचियाही सुटे, धनाची गांठी ॥ ७९९ ॥
आणिक भोगिलें जें कांहीं, तें स्वप्न तैसें होय नाहीं,
मग हानीच्याचि घाईं, लोळावें उरे ॥ ८०० ॥
ऐसें आपत्ती जें सुख, ऐहिकीं परिणमे देख,
परत्रीं कीर विख, होऊनि परते ॥ ८०१ ॥
जे इंद्रियजाता लळा, दिधलिया धर्माचा मळा,
जाळूनि भोगिजे सोहळा, विषयांचा जेथ ॥ ८०२ ॥
तेथ पातकें बांधिती थावो, तियें नरकीं देती ठावो,
जेणें सुखें हा अपावो, परत्रीं ऐसा ॥ ८०३ ॥
पैं नामें विष महुरें, परी मारूनि अंतीं खरें,
तैसें आदि जें गोडिरें, अंतीं कडू ॥ ८०४ ॥
पार्था तें सुख साचें, वळिलें आहे रजाचें,
म्हणौनि न शिवें तयाचें, आंग कहीं ॥ ८०५ ॥


यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः।
निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम् ॥ ३९॥


आणि अपेयाचेनि पानें, अखाद्याचेनि भोजनें,
स्वैरस्त्रीसंनिधानें, होय जें सुख ॥ ८०६ ॥
का पुढिलांचेनि मारें, नातरी परस्वापहारें,
जें सुख अवतरे, भाटाच्या बोलीं ॥ ८०७ ॥
जें आलस्यावरी पोखिजे, निद्रेमाजीं जें देखिजे,
जयाच्या आद्यंतीं भुलिजे, आपुली वाट ॥ ८०८ ॥
तें गा सुख पार्था, तामस जाण सर्वथा,
हें बहु न सांगोंचि जें कथा, असंभाव्य हे ॥ ८०९ ॥
ऐसें कर्मभेदें मुदलें, फळसुखही त्रिधा जालें,
तें हें यथागमें केलें, गोचर तुज ॥ ८१० ॥
ते कर्ता कर्म कर्मफळ, ये त्रिपुटी येकी केवळ,
वांचूनि कांहींचि नसे स्थूल, सूक्ष्मीं इये ॥ ८११ ॥
आणि हे तंव त्रिपुटी, तिहीं गुणीं इहीं किरीटी,
गुंफिली असे पटीं, तांतुवीं जैसी ॥ ८१२ ॥


न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः।
सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात्त्रिभिर्गुणैः ॥ ४०॥


म्हणौनि प्रकृतीच्या आवलोकीं, न बंधिजे इहीं सत्वादिकीं,
तैसी स्वर्गीं ना मृत्युलोकीं, आथी वस्तु ॥ ८१३ ॥
कैंचा लोंवेवीण कांबळा, मातियेवीण मोदळा,
का जळेंवीण कल्लोळा, होणें आहे ? ॥ ८१४ ॥
तैसें न होनि गुणाचें, सृष्टीची रचना रचे,
ऐसें नाहींचि गा साचें, प्राणिजात ॥ ८१५ ॥
यालागीं हें सकळ, तिहीं गुणांचेंचि केवळ,
घडलें आहे निखिळ, ऐसें जाण ॥ ८१६ ॥
गुणीं देवां त्रयी लाविली, गुणीं लोकीं त्रिपुटी पाडिली,
चतुर्वर्णा घातली, सिनानीं उळिगें ॥ ८१७ ॥


ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परन्तप।
कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः ॥ ४१॥


तेचि चारी वर्ण, पुससी जरी कोण कोण,
तरी जयां मुख्य ब्राह्मण, धुरेचे कां ॥ ८१८ ॥
येर क्षत्रिय वैश्य दोन्ही, तेही ब्राह्मणाच्याचि मानिजे मानी,
जे ते वैदिकविधानीं, योग्य म्हणौनि ॥ ८१९ ॥
चौथा शूद्रु जो धनंजया, वेदीं लागु नाहीं तया,
तऱ्हीं वृत्ति वर्णत्रया, आधीन तयाची ॥ ८२० ॥
तिये वृत्तिचिया जवळिका, वर्णा ब्राह्मणादिकां,
शूद्रही कीं देखा, चौथा जाला ॥ ८२१ ॥
जैसा फुलाचेनि सांगातें, तांतुं तुरंबिजे श्रीमंतें,
तैसें द्विजसंगें शूद्रातें, स्वीकारी श्रुती ॥ ८२२ ॥
ऐसैसी गा पार्था, हे चतुर्वर्णव्यवस्था,
करूं आतां कर्मपथा, यांचिया रूपा ॥ ८२३ ॥
जिहीं गुणीं ते वर्ण चारी, जन्ममृत्यूंचिये कातरी,
चुकोनियां ईश्वरीं, पैठे होती ॥ ८२४ ॥
जिये आत्मप्रकृतीचे इहीं, गुणीं सत्त्वादिकीं तिहीं,
कर्में चौघां चहूं ठाईं, वांटिलीं वर्णा ॥ ८२५ ॥
जैसें बापें जोडिलें लेंका, वांटिलें सूर्यें मार्ग पांथिका,
नाना व्यापार सेवकां, स्वामी जैसें ॥ ८२६ ॥
तैसी प्रकृतीच्या गुणीं, जया कर्माची वेल्हावणी,
केली आहे वर्णीं, चहूं इहीं ॥ ८२७ ॥
तेथ सत्त्वें आपल्या आंगीं, समीन\-निमीन भागीं,
दोघे केले नियोगी, ब्राह्मण क्षत्रिय ॥ ८२८ ॥
आणि रज परी सात्त्विक, तेथ ठेविलें वैश्य लोक,
रजचि तमभेसक, तेथ शूद्र ते गा ॥ ८२९ ॥
ऐसा येकाचि प्राणिवृंदा, भेदु चतुर्वर्णधा,
गुणींचि प्रबुद्धा, केला जाण ॥ ८३० ॥
मग आपुलें ठेविलें जैसें, आइतेंचि दीपें दिसे,
गुणभिन्न कर्म तैसें, शास्त्र दावी ॥ ८३१ ॥
तेंचि आतां कोण कोण, वर्णविहिताचें लक्षण,
हें सांगों ऐक श्रवण\-, सौभाग्यनिधी ॥ ८३२ ॥


शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च।
ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् ॥ ४२॥


तरी सर्वेंद्रियांचिया वृत्ती, घेऊनि आपुल्या हातीं,
बुद्धि आत्मया मिळे येकांतीं, प्रिया जैसी ॥ ८३३ ॥
ऐसा बुद्धीचा उपरमु, तया नाम म्हणिपे शमु,
तो गुण गा उपक्रमु, जया कर्माचा ॥ ८३४ ॥
आणि बाह्येंद्रियांचें धेंडें, पिटूनि विधीचेनि दंडें,
नेदिजे अधर्माकडे, कहींचि जावों ॥ ८३५ ॥
तो पैं गा शमा विरजा, दमु गुण जेथ दुजा,
आणि स्वधर्माचिया वोजा, जिणें जें कां ॥ ८३६ ॥
सटवीचिये रातीं, न विसंबिजे जेवीं वाती,
तैसा ईश्वरनिर्णयो चित्तीं, वाहणें सदा ॥ ८३७ ॥
तया नाम तप, ते तिजया गुणाचें रूप,
आणि शौचही निष्पाप, द्विविध जेथ ॥ ८३८ ॥
मन भावशुद्धी भरलें, आंग क्रिया अळंकारिलें,
ऐसें सबाह्य जियालें, साजिरें जें कां ॥ ८३९ ॥
तया नाम शौच पार्था, तो कर्मीं गुण जये चौथा,
आणि पृथ्वीचिया परी सर्वथा, सर्व जें साहाणें ॥ ८४० ॥
ते गा क्षमा पांडवा, गुण जेथ पांचवा,
स्वरांमाजीं सुहावा, पंचमु जैसा ॥ ८४१ ॥
आणि वांकडेनी वोघेंसीं, गंगा वाहे उजूचि जैसी,
कां पुटीं वळला ऊसीं, गोडी जैसी ॥ ८४२ ॥
तैसा विषमांही जीवां-, लागीं उजुकारु बरवा,
तें आर्जव गा साहावा, जेथींचा गुण ॥ ८४३ ॥
आणि पाणियें प्रयत्नें माळी, अखंड जचे झाडामुळीं,
परी तें आघवेंचि फळीं, जाणे जेवीं ॥ ८४४ ॥
तैसें शास्त्राचारें तेणें, ईश्वरुचि येकु पावणें,
हें फुडें जें कां जाणणें, तें येथ ज्ञान ॥ ८४५ ॥
तें गा कर्मीं जिये, सातवा गुण होये,
आणि विज्ञान हें पाहें, एवंरूप ॥ ८४६ ॥
तरी सत्वशुद्धीचिये वेळे, शास्त्रें कां ध्यानबळें,
ईश्वरतत्त्वींचि मिळे, निष्टंकबुद्धी ॥ ८४७ ॥
हें विज्ञान बरवें, गुणरत्न जेथ आठवें,
आणि आस्तिक्य जाणावें, नववा गुण ॥ ८४८ ॥
पैं राजमुद्रा आथिलिया, प्रजा भजे भलतया,
तेवीं शास्त्रें स्वीकारिलिया, मार्गमात्रातें ॥ ८४९ ॥
आदरें जें कां मानणें, तें आस्तिक्य मी म्हणें,
तो नववा गुण जेणें, कर्म तें साच ॥ ८५० ॥
एवं नवही शमादिक, गुण जेथ निर्दोख,
तें कर्म जाण स्वाभाविक, ब्राह्मणाचें ॥ ८५१ ॥
तो नवगुणरत्नाकरु, यया नवरत्नांचा हारु,
न फेडीत ले दिनकरु, प्रकाशु जैसा ॥ ८५२ ॥
नाना चांपा चांपौळी पूजिला, चंद्रु चंद्रिका धवळला,
कां चंदनु निजें चर्चिला, सौरभ्यें जेवीं ॥ ८५३ ॥
तेवीं नवगुणटिकलग, लेणें ब्राह्मणाचें अव्यंग,
कहींचि न संडी आंग, ब्राह्मणाचें ॥ ८५४ ॥
आतां उचित जें क्षत्रिया, तेंहीं कर्म धनंजया,
सांगों ऐक प्रज्ञेचिया, भरोवरी ॥ ८५५ ॥


शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनम्।
दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम् ॥ ४३॥


तरी भानु हा तेजें, नापेक्षी जेवीं विरजे,
कां सिंहें न पाहिजे, जावळिया ॥ ८५६ ॥
ऐसा स्वयंभ जो जीवें लाठु, सावायेंवीण उद्भटु,
ते शौर्य गा जेथ श्रेष्ठु, पहिला गुण ॥ ८५७ ॥
आणि सूर्याचेनि प्रतापें, कोडिही नक्षत्र हारपे,
ना तो तरी न लोपे, सचंद्रीं तिहीं ॥ ८५८ ॥
तैसेनि आपुले प्रौढीगुणें, जगा या विस्मयो देणें,
आपण तरी न क्षोभणें, कायसेनही ॥ ८५९ ॥
तें प्रागल्भ्यरूप तेजा, जिये कर्मीं गुण दुजा,
आणि धीरु तो तिजा, जेथींचा गुण ॥ ८६० ॥
वरिपडलिया आकाश, बुद्धीचे डोळे मानस,
झांकी ना ते परीयेस, धैर्य जेथें ॥ ८६१ ॥
आणि पाणी हो कां भलतेतुकें, परी तें जिणौनि पद्म फांके,
कां आकाश उंचिया जिंके, आवडे तयातें ॥ ८६२ ॥
तेवीं विविध अवस्था, पातलिया जिणौनि पार्था,
प्रज्ञाफळ तया अर्था, वेझ देणें जें ॥ ८६३ ॥
तें दक्षत्व गा चोख, जेथ चौथा गुण देख,
आणि झुंज अलौकिक, तो पांचवा गुण ॥ ८६४ ॥
आदित्याचीं झाडें, सदा सन्मुख सूर्याकडे,
तेवीं समोर शत्रूपुढें, होणें जें कां ॥ ८६५ ॥
माहेवणी प्रयत्नेंसी, चुकविजे सेजे जैसी,
रिपू पाठी नेदिजे तैसी, समरांगणीं ॥ ८६६ ॥
हा क्षत्रियाचेया आचारीं, पांचवा गुणेंद्रु अवधारीं,
चहूं पुरुषार्थां शिरीं, भक्ति जैसी ॥ ८६७ ॥
आणि जालेनि फुलें फळें, शाखिया जैसीं मोकळे,
कां उदार परीमळें, पद्माकरु ॥ ८६८ ॥
नाना आवडीचेनि मापें, चांदिणें भलतेणें घेपे,
पुढिलांचेनि संकल्पें, तैसें जें देणें ॥ ८६९ ॥
तें उमप गा दान, जेथ सहावें गुणरत्न,
आणि आज्ञे एकायतन, होणें जें कां ॥ ८७० ॥
पोषूनि अवयव आपुले, करविजतीं मानविले,
तेवीं पालणें लोभविलें, जग जें भोगणें ॥ ८७१ ॥
तया नाम ईश्वरभावो, जो सर्वसामर्थ्याचा ठावो,
तो गुणांमाजीं रावो, सातवा जेथ ॥ ८७२ ॥
ऐसें जें शौर्यादिकीं, इहीं सात गुणविशेखीं,
अळंकृत सप्तऋखीं, आकाश जैसें ॥ ८७३ ॥
तैसें सप्तगुणीं विचित्र, कर्म जें जगीं पवित्र,
तें सहज जाण क्षात्र, क्षत्रियाचें ॥ ८७४ ॥
नाना क्षत्रिय नव्हे नरु, तो सत्त्वसोनयाचा मेरु,
म्हणौनि गुणस्वर्गां आधारु, सातां इयां ॥ ८७५ ॥
नातरी सप्तगुणार्णवीं, परीवारली बरवी,
हे क्रिया नव्हे पृथ्वी, भोगीतसे तो ॥ ८७६ ॥
कां गुणांचे सातांही ओघीं, हे क्रिया ते गंगा जगीं,
तया महोदधीचिया आंगीं, विलसे जैसी ॥ ८७७ ॥
परी हें बहु असो देख, शौर्यादि गुणात्मक,
कर्म गा नैसर्गिक, क्षात्रजातीसी ॥ ८७८ ॥
आतां वैश्याचिये जाती, उचित जे महामती,
ते ऐकें गा निरुती, क्रिया सांगों ॥ ८७९ ॥


कृषिगौरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम्।
परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम् ॥ ४४॥


तरी भूमि बीज नांगरु, यया भांडवलाचा आधारु,
घेऊनि लाभु अपारु, मेळवणें जें ॥ ८८० ॥
किंबहुना कृषी जिणें, गोधनें राखोनि वर्तणें,
कां समर्घीची विकणें, महर्घीवस्तु ॥ ८८१ ॥
येतुलाचि पांडवा, वैश्यातें कर्माचा मेळावा,
हा वैश्यजातीस्वभावा, आंतुला जाण ॥ ८८२ ॥
आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण, हे द्विजन्में तिन्ही वर्ण,
ययांचें जें शुश्रूषण, तें शूद्रकर्म ॥ ८८३ ॥
पैं द्विजसेवेपरौतें, धांवणें नाहीं शूद्रातें,
एवं चतुर्वर्णोचितें, दाविलीं कर्में ॥ ८८४ ॥


स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः।
स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु ॥ ४५॥


आतां इयेचि विचक्षणा, वेगळालिया वर्णा,
उचित जैसें करणां, शब्दादिक ॥ ८८५ ॥
नातरी जळदच्युता, पाणिया उचित सरिता,
सरितेसी पंडुसुता, सिंधु उचितु ॥ ८८६ ॥
तैसें वर्णाश्रमवशें, जें करणीय आलें असे,
गोरेया आंगा जैसें, गोरेपण ॥ ८८७ ॥
तया स्वभावविहिता कर्मा, शास्त्राचेनि मुखें वीरोत्तमा,
प्रवर्तावयालागीं प्रमा, अढळ कीजे ॥ ८८८ ॥
पैं आपुलेंचि रत्न थितें, घेपे पारखियाचेनि हातें,
तैसें स्वकर्म आपैतें, शास्त्रें करावीं ॥ ८८९ ॥
जैसी दिठी असे आपुलिया ठायीं, परी दीपेंवीण भोग नाहीं,
मार्गु न लाहतां काई, पाय असतां होय ? ॥ ८९० ॥
म्हणौनि ज्ञातिवशें साचारु, सहज असे जो अधिकारु,
तो आपुलिया शास्त्रें गोचरु, आपण कीजे ॥ ८९१ ॥
मग घरींचाचि ठेवा, जेवीं डोळ्यां दावी दिवा,
तरी घेतां काय पांडवा, आडळु असे ? ॥ ८९२ ॥
तैसें स्वभावें भागा आलें, वरी शास्त्रें खरें केलें,
तें विहित जो आपुलें, आचरे गा ॥ ८९३ ॥
परी आळसु सांडुनी, फळकाम दवडुनी,
आंगें जीवें मांडुनी, तेथेंचि भरु ॥ ८९४ ॥
वोघीं पडिलें पाणी, नेणें आनानी वाहणी,
तैसा जाय आचरणीं, व्यवस्थौनी ॥ ८९५ ॥
अर्जुना जो यापरी, तें विहित कर्म स्वयें करी,
तो मोक्षाच्या ऐलद्वारीं, पैठा होय ॥ ८९६ ॥
जे अकरणा आणि निषिद्धा, न वचेचि कांहीं संबंधा,
म्हणौनि भवा विरुद्धा, मुकला तो ॥ ८९७ ॥
आणि काम्यकर्मांकडे, न परतेचि जेथ कोडें,
तेथ चंदनाचेही खोडे, न लेचि तो ॥ ८९८ ॥
येर नित्य कर्म तंव, फळत्यागें वेंचिलें सर्व,
म्हणौनि मोक्षाची शींव, ठाकूं लाहे ॥ ८९९ ॥
ऐसेनि शुभाशुभीं संसारीं, सांडिला तो अवधारीं,
वौराग्यमोक्षद्वारीं, उभा ठाके ॥ ९०० ॥
जें सकळ भाग्याची सीमा, मोक्षलाभाची जें प्रमा,
नाना कर्ममार्गश्रमा, शेवटु जेथ ॥ ९०१ ॥
मोक्षफळें दिधली वोल, जें सुकृततरूचें फूल,
तयें वैराग्यीं ठेवी पाऊल, भंवरु जैसा ॥ ९०२ ॥
पाहीं आत्मज्ञानसुदिनाचा, वाधावा सांगतया अरुणाचा,
उदयो त्या वैराग्याचा, ठावो पावे ॥ ९०३ ॥
किंबहुना आत्मज्ञान, जेणें हाता ये निधान,
तें वैराग्य दिव्यांजन, जीवें ले तो ॥ ९०४ ॥
ऐसी मोक्षाची योग्यता, सिद्धी जाय तया पंडुसुता,
अनुसरोनि विहिता, कर्मा यया ॥ ९०५ ॥
हें विहित कर्म पांडवा, आपुला अनन्य वोलावा,
आणि हेचि परम सेवा, मज सर्वात्मकाची ॥ ९०६ ॥
पैं आघवाचि भोगेंसीं, पतिव्रता क्रीडे प्रियेंसीं,
कीं तयाचीं नामें जैसीं, तपें तियां केलीं ॥ ९०७ ॥
कां बाळका एकी माये, वांचोनि जिणें काय आहे,
म्हणौनि सेविजे कीं तो होये, पाटाचा धर्मु ॥ ९०८ ॥
नाना पाणी म्हणौनि मासा, गंगा न सांडितां जैसा,
सर्व तीर्थ सहवासा, वरपडा जाला ॥ ९०९ ॥
तैसें आपुलिया विहिता, उपावो असे न विसंबितां,
ऐसा कीजे कीं जगन्नाथा, आभारु पडे ॥ ९१० ॥
अगा जया जें विहित, तें ईश्वराचें मनोगत,
म्हणौनि केलिया निभ्रांत, सांपडेचि तो ॥ ९११ ॥
पैं जीवाचे कसीं उतरली, ते दासी कीं गोसावीण जाली,
सिसे वेंचि तया मविली, वही जेवीं ॥ ९१२ ॥
तैसें स्वामीचिया मनोभावा, न चुकिजे हेचि परमसेवा,
येर तें गा पांडवा, वाणिज्य करणें ॥ ९१३ ॥


यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम्।
स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः ॥ ४६॥


म्हणौनि विहित क्रिया केली, नव्हे तयाची खूण पाळिली,
जयापसूनि कां आलीं, आकारा भूतें ॥ ९१४ ॥
जो अविद्येचिया चिंधिया, गुंडूनि जीव बाहुलिया,
खेळवीतसे तिगुणिया, अहंकाररज्जू ॥ ९१५ ॥
जेणें जग हें समस्त, आंत बाहेरी पूर्ण भरित,
जालें आहे दीपजात, तेजें जैसें ॥ ९१६ ॥
तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्मकुसुमांची वीरा,
पूजा केली होय अपारा, तोषालागीं ॥ ९१७ ॥
म्हणौनि तिये पूजे, रिझलेनि आत्मराजें,
वैराग्यसिद्धि देईजे, पसाय तया ॥ ९१८ ॥
जिये वैराग्यदशें, ईश्वराचेनि वेधवशें,
हें सर्वही नावडे जैसें, वांत होय ॥ ९१९ ॥
प्राणनाथाचिया आधी, विरहिणीतें जिणेंही बाधी,
तैसें सुखजात त्रिशुद्धी, दुःखचि लागे ॥ ९२० ॥
सम्यक्‌ज्ञान नुदैजतां, वेधेंचि तन्मयता,
उपजे ऐसी योग्यता, बोधाची लाहे ॥ ९२१ ॥
म्हणौनि मोक्षलाभालागीं, जो व्रतें वाहातसें आंगीं,
तेणें स्वधर्मु आस्था चांगी, अनुष्ठावा ॥ ९२२ ॥


श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्।
स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥ ४७॥


अगा आपुला हा स्वधर्मु, आचरणीं जरी विषमु,
तरी पाहावा तो परिणामु, फळेल जेणें ॥ ९२३ ॥
जैं सुखालागीं आपणपयां, निंबचि आथी धनंजया,
तैं कडुवटपणा तयाचिया, उबगिजेना ॥ ९२४ ॥
फळणया ऐलीकडे, केळीतें पाहातां आस मोडे,
ऐसी त्यजिली तरी जोडे, तैसें कें गोमटें ॥ ९२५ ॥
तेवीं स्वधर्मु सांकडु, देखोनि केला जरी कडु,
तरी मोक्षसुरवाडु, अंतरला कीं ॥ ९२६ ॥
आणि आपुली माये, कुब्ज जरी आहे,
तरी जीये तें नोहे, स्नेह कुऱ्हें कीं ॥ ९२७ ॥
येरी जिया पराविया, रंभेहुनि बरविया,
तिया काय कराविया, बाळकें तेणें ? ॥ ९२८ ॥
अगा पाणियाहूनि बहुवें, तुपीं गुण कीर आहे,
परी मीना काय होये, असणें तेथ ॥ ९२९ ॥
पैं आघविया जगा जें विख, तें विख किडियाचें पीयूख,
आणि जगा गूळ तें देख, मरण तया ॥ ९३० ॥
म्हणौनि जे विहित जया जेणें, फिटे संसाराचें धरणें,
क्रिया कठोर तऱ्ही तेणें, तेचि करावी ॥ ९३१ ॥
येरा पराचारा बरविया, ऐसें होईल टेंकलया,
पायांचें चालणें डोइया, केलें जैसें ॥ ९३२ ॥
यालागीं कर्म आपुले, जें जातिस्वभावें असे आलें,
तें करी तेणें जिंतिलें, कर्मबंधातें ॥ ९३३ ॥
आणि स्वधर्मुचि पाळावा, परधर्मु तो गाळावा,
हा नेमुही पांडवा, न कीजेचि पै गा ? ॥ ९३४ ॥
तरी आत्मा दृष्ट नोहे, तंव कर्म करणें कां ठाये ?,
आणि करणें तेथ आहे, आयासु आधीं ॥ ९३५ ॥


सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत्।
सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः ॥ ४८॥


म्हणौनि भलतिये कर्मीं, आयासु जऱ्ही उपक्रमीं,
तरी काय स्वधर्मीं, दोषु, सांगें ? ॥ ९३६ ॥
आगा उजू वाटा चालावें, तऱ्ही पायचि शिणवावे,
ना आडरानें धांवावें, तऱ्ही तेंचि ॥
९३७ ॥
पैं शिळा कां सिदोरिया, दाटणें एक धनंजया,
परी जें वाहतां विसांवया, मिळिजे तें घेपे ॥ ९३८ ॥
येऱ्हवीं कणा आणि भूसा, कांडितांही सोसु सरिसा,
जेंचि रंधन श्वान मांसा, तेंचि हवी ॥ ९३९ ॥
दधी जळाचिया घुसळणा, व्यापार सारिखेचि विचक्षणा,
वाळुवे तिळा घाणा, गाळणें एक ॥ ९४० ॥
पैं नित्य होम देयावया, कां सैरा आगी सुवावया,
फुंकितां धू धनंजया, साहणें तेंचि ॥ ९४१ ॥
परी धर्मपत्नी धांगडी, पोसितां जरी एकी वोढी,
तरी कां अपरवडी, आणावी आंगा ? ॥ ९४२ ॥
हां गा पाठीं लागला घाई, मरण न चुकेचि पाहीं,
तरी समोरला काई, आगळें न कीजे ? ॥ ९४३ ॥
कुलस्त्री दांड्याचे घाये, परघर रिगालीहि जरी साहे,
तरी स्वपतीतें वायें, सांडिलें कीं, ॥ ९४४ ॥
तैसें आवडतेंही करणें, न निपजे शिणल्याविणें,
तरी विहित बा रे कोणें, बोलें भारी ? ॥ ९४५ ॥
वरी थोडेंचि अमृत घेतां, सर्वस्व वेंचो कां पंडुसुता,
जेणें जोडे जीविता, अक्षयत्व ॥ ९४६ ॥
येर काह्यां मोलें वेंचूनि, विष पियावे घेऊनि,
आत्महत्येसि निमोनि, जाइजे जेणें ॥ ९४७ ॥
तैसें जाचूनियां इंद्रियें, वेंचूनि आयुष्याचेनि दिये,
सांचलें पापीं आन आहे, दुःखावाचूनि ? ॥ ९४८ ॥
म्हणौनि करावा स्वधर्मु, जो करितां हिरोनि घे श्रमु,
उचित देईल परमु, पुरुषार्थराजु ॥ ९४९ ॥
याकारणें किरीटी, स्वधर्माचिये राहाटी,
न विसंबिजे संकटीं, सिद्धमंत्र जैसा ॥ ९५० ॥
कां नाव जैसी उदधीं, महारोगी दिव्यौषधी,
न विसंबिजे तया बुद्धी, स्वकर्म येथ ॥ ९५१ ॥
मग ययाचि गा कपिध्वजा, स्वकर्माचिया महापूजा,
तोषला ईशु तमरजा, झाडा करुनी ॥ ९५२ ॥
शुद्धसत्त्वाचिया वाटा, आणी आपुली उत्कंठा,
भवस्वर्ग काळकूटा, ऐसें दावी ॥ ९५३ ॥
जियें वैराग्य येणें बोलें, मागां संसिद्धी रूप केलें,
किंबहुना तें आपुलें, मेळवी खागें ॥ ९५४ ॥
मग जिंतिलिया हे भोये, पुरुष सर्वत्र जैसा होये,
कां जालाही जें लाहे, तें आतां सांगों ॥ ९५५ ॥


असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः।
नैष्कर्म्यसिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति ॥ ४९॥


तरी देहादिक हें संसारें, सर्वही मांडलेंसे जें गुंफिरें,
तेथ नातुडे तो वागुरें, वारा जैसा ॥ ९५६ ॥
पैं परिपाकाचिये वेळे, फळ देठें ना देठु फळें,
न धरे तैसें स्नेह खुळें, सर्वत्र होय ॥ ९५७ ॥
पुत्र वित्त कलत्र, हे जालियाही स्वतंत्र,
माझें न म्हणे पात्र, विषाचें जैसें ॥ ९५८ ॥
हें असो विषयजाती, बुद्धि पोळली ऐसी माघौती,
पाउलें घेऊनि एकांतीं, हृदयाच्या रिगे ॥ ९५९ ॥
ऐसया अंतःकरण, बाह्य येतां तयाची आण,
न मोडी समर्था भेण, दासी जैसी ॥ ९६० ॥
तैसें ऐक्याचिये मुठी, माजिवडें चित्त किरीटी,
करूनि वेधी नेहटीं, आत्मयाच्या ॥ ९६१ ॥
तेव्हां दृष्टादृष्ट स्पृहे, निमणें जालेंचि आहे,
आगीं दडपलिया धुयें, राहिजे जैसें ॥ ९६२ ॥
म्हणौनि नियमिलिया मानसीं, स्पृहा नासौनि जाय आपैसीं,
किंबहुना तो ऐसी, भूमिका पावे ॥ ९६३ ॥
पैं अन्यथा बोधु आघवा, मावळोनि तया पांडवा,
बोधमात्रींचि जीवा, ठावो होय ॥ ९६४ ॥
धरवणी वेंचें सरे, तैसें भोगें प्राचीन पुरे,
नवें तंव नुपकरे, कांहीचि करूं ॥ ९६५ ॥
ऐसीं कर्में साम्यदशा, होय तेथ वीरेशा,
मग श्रीगुरु आपैसा, भेटेचि गा ॥ ९६६ ॥
रात्रीची चौपाहरी, वेंचलिया अवधारीं,
डोळ्यां तमारी, मिळे जैसा ॥ ९६७ ॥
का येऊनि फळाचा घडु, पारुषवी केळीची वाढु,
श्रीगुरु भेटोनि करी पाडु, बुभुत्सु तैसा ॥ ९६८ ॥
मग आलिंगिला पूर्णिमा, जैसा उणीव सांडी चंद्रमा,
तैसें होय वीरोत्तमा, गुरुकृपा तया ॥ ९६९ ॥
तेव्हां अबोधुमात्र असे, तो तंव तया कृपा नासे,
तेथ निशीसवें जैसें, आंधारें जाय ॥ ९७० ॥
तैसी अबोधाचिये कुशी, कर्म कर्ता कार्य ऐशी,
त्रिपुटी असे ते जैसी, गाभिणी मारिली ॥ ९७१ ॥
तैसेंचि अबोधनाशासवें, नाशे क्रियाजात आघवें,
ऐसा समूळ संभवे, संन्यासु हा ॥ ९७२ ॥
येणें मुळाज्ञानसंन्यासें, दृश्याचा जेथ ठावो पुसे,
तेथ बुझावें तें आपैसें, तोचि आहे ॥ ९७३ ॥
चेइलियावरी पाहीं, स्वप्नींचिया तिये डोहीं,
आपणयातें काई, काढूं जाइजे ? ॥ ९७४ ॥
तैं मी नेणें आतां जाणेन, हें सरलें तया दुःस्वप्न,
जाला ज्ञातृज्ञेयाविहीन, चिदाकाश ॥ ९७५ ॥
मुखाभासेंसी आरिसा, परौता नेलिया वीरेशा,
पाहातेपणेंवीण जैसा, पाहाता ठाके ॥ ९७६ ॥
तैसें नेणणें जें गेलें, तेणें जाणणेंही नेलें,
मग निष्क्रिय उरलें, चिन्मात्रचि ॥ ९७७ ॥
तेथ स्वभावें धनंजया, नाहीं कोणीचि क्रिया,
म्हणौनि प्रवादु तया, नैष्कर्म्यु ऐसा ॥ ९७८ ॥
तें आपुलें आपणपें, असे तेंचि होऊनि हारपे,
तरंगु कां वायुलोपें, समुद्रु जैसा ॥ ९७९ ॥
तैसें न होणें निफजे, ते नैष्कर्म्यसिद्धि जाणिजे,
सर्वसिद्धींत सहजें, परम हेचि ॥ ९८० ॥
देउळाचिया कामा कळसु, उपरम गंगेसी सिंधु प्रवेशु,
कां सुवर्णशुद्धी कसु, सोळावा जैसा ॥ ९८१ ॥
तैसें आपुलें नेणणें, फेडिजे का जाणणें,
तेंहि गिळूनि असणें, ऐसी जे दशा ॥ ९८२ ॥
तियेपरतें कांहीं, निपजणें आन नाहीं,
म्हणौनि म्हणिपे पाहीं, परमसिद्धि ते ॥ ९८३ ॥


सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे।
समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा ॥ ५०॥


परी हेचि आत्मसिद्धि, जो कोणी भाग्यनिधि,
श्रीगुरुकृपालब्धि\-, काळीं पावे ॥ ९८४ ॥
उदयतांचि दिनकरु, प्रकाशुचि आते आंधारु,
कां दीपसंगें कापुरु, दीपुचि होय ॥ ९८५ ॥
तया लवणाची कणिका, मिळतखेंवो उदका,
उदकचि होऊनि देखा, ठाके जेवीं ॥ ९८६ ॥
कां निद्रितु चेवविलिया, स्वप्नेंसि नीद वायां,
जाऊनि आपणपयां, मिळे जैसा ॥ ९८७ ॥
तैसें जया कोण्हासि दैवें, गुरुवाक्यश्रवणाचि सवें,
द्वैत गिळोनि विसंवे, आपणया वृत्ती ॥ ९८८ ॥
तयासी मग कर्म करणें, हें बोलिजैलचि कवणें,
आकाशा येणें जाणें, आहे काई ?, ॥ ९८९ ॥
म्हणौनि तयासि कांहीं, त्रिशुद्धि करणें नाहीं,
परी ऐसें जरी हें कांहीं, नव्हे जया ॥ ९९० ॥
कानावचनाचिये भेटी-, सरिसाचि पैं किरीटी,
वस्तु होऊनि उठी, कवणि एकु जो ॥ ९९१ ॥
येऱ्हवीं स्वकर्माचेनि वन्ही, काम्यनिषिद्धाचिया इंधनीं,
रजतमें कीर दोन्ही, जाळिलीं आधीं ॥ ९९२ ॥
पुत्र वित्त परलोकु, यया तिहींचा अभिलाखु,
घरीं होय पाइकु, हेंही जालें ॥ ९९३ ॥
इंद्रियें सैरा पदार्थीं, रिगतां विटाळलीं होतीं,
तिये प्रत्याहार तीर्थीं, न्हाणिलीं कीर ॥ ९९४ ॥
आणि स्वधर्माचें फळ, ईश्वरीं अर्पूनि सकळ,
घेऊनि केलें अढळ, वैराग्यपद ॥ ९९५ ॥
ऐसी आत्मसाक्षात्कारीं, लाभे ज्ञानाची उजरी,
ते सामुग्री कीर पुरी, मेळविली ॥ ९९६ ॥
आणि तेचि समयीं, सद्गुरु भेटले पाहीं,
तेवींचि तिहीं कांहीं, वंचिजेना ॥ ९९७ ॥
परी वोखद घेतखेंवो, काय लाभे आपला ठावो ?,
कां उदयजतांचि दिवो, मध्यान्ह होय ? ॥ ९९८ ॥
सुक्षेत्रीं आणि वोलटें, बीजही पेरिलें गोमटें,
तरी आलोट फळ भेटे, परी वेळे कीं गा ॥ ९९९ ॥
जोडला मार्गु प्रांजळु, मिनला सुसंगाचाही मेळु,
तरी पाविजे वांचूनि वेळु, लागेचि कीं ॥ १००० ॥
तैसा वैराग्यलाभु जाला, वरी सद्गुरुही भेटला,
जीवीं अंकुरु फुटला, विवेकाचा ॥ १००१ ॥
तेणें ब्रह्म एक आथी, येर आघवीचि भ्रांती,
हेही कीर प्रतीती, गाढ केली ॥ १००२ ॥
परी तेंचि जें परब्रह्म, सर्वात्मक सर्वोत्तम,
मोक्षाचेंही काम, सरे जेथ ॥ १००३ ॥
यया तिन्ही अवस्था पोटीं, जिरवी जें गा किरीटी,
तया ज्ञानासिही मिठी, दे जे वस्तु ॥ १००४ ॥
ऐक्याचें एकपण सरे, जेथ आनंदकणुही विरे,
कांहींचि नुरोनि उरे, जें कांहीं गा ॥ १००५ ॥
तियें ब्रह्मीं ऐक्यपणें, ब्रह्मचि होऊनि असणें,
तें क्रमेंचि करूनि तेणें, पाविजे पैं ॥ १००६ ॥
भुकेलियापासीं, वोगरिलें षड्रसीं,
तो तृप्ति प्रतिग्रासीं, लाहे जेवीं ॥ १००७ ॥
तैसा वैराग्याचा वोलावा, विवेकाचा तो दिवा,
आंबुथितां आत्मठेवा, काढीचि तो ॥ १००८ ॥
तरी भोगिजे आत्मऋद्धी, येवढी योग्यतेची सिद्धी,
जयाच्या आंगीं निरवधी, लेणें जाली ॥ १००९ ॥
तो जेणें क्रमें ब्रह्म, होणें करी गा सुगम,
तया क्रमाचें आतां वर्म, आईक सांगों ॥ १०१० ॥


बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च।
शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च ॥ ५१॥


तरी गुरु दाविलिया वाटा, येऊन विवेकतीर्थतटा,
धुऊनियां मळकटा, बुद्धीचा तेणें ॥ १०११ ॥
मग राहूनें उगळिली, प्रभा चंद्रें आलिंगिली,
तैसी शुद्धत्वें जडली, आपणयां बुद्धि ॥ १०१२ ॥
सांडूनि कुळें दोन्ही, प्रियासी अनुसरे कामिनी,
द्वंद्वत्यागें स्वचिंतनीं, पडली तैसी ॥ १०१३ ॥
आणि ज्ञान ऐसें जिव्हार, नेवों नेवों निरंतर,
इंद्रियीं केले थोर, शब्दादिक जे ॥ १०१४ ॥
ते रश्मिजाळ काढलेया, मृगजळ जाय लया,
तैसें वृत्तिरोधें तयां, पांचांही केलें ॥ १०१५ ॥
नेणतां अधमाचिया अन्ना, खादलिया कीजे वमना,
तैसीं वोकविली सवासना, इंद्रियें विषयीं ॥ १०१६ ॥
मग प्रत्यगावृत्ती चोखटें, लाविलीं गंगेचेनि तटें,
ऐसीं प्रायश्चित्तें धुवटें, केलीं येणें ॥ १०१७ ॥
पाठीं सात्विकें धीरें तेणें, शोधारलीं तियें करणें,
मग मनेंसीं योगधारणें, मेळविलीं ॥ १०१८ ॥
तेवींचि प्राचीनें इष्टानिष्टें, भोगेंसीं येउनी भेटे,
तेथ देखिलियाही वोखटें, द्वेषु न करी ॥ १०१९ ॥
ना गोमटेंचि विपायें, तें आणूनि पुढां सूये,
तयालागीं न होये, साभिलाषु ॥ १०२० ॥
यापरी इष्टानिष्टींंं, रागद्वेष किरीटी,
त्यजूनि गिरिकपाटीं, निकुंजीं वसे ॥ १०२१ ॥


विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः।
ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः ॥ ५२॥


गजबजा सांडिलिया, वसवी वनस्थळिया,
अंगाचियाचि मांदिया, एकलेया ॥ १०२२ ॥
शमदमादिकीं खेळे, न बोलणेंचि चावळे,
गुरुवाक्याचेनि मेळें, नेणे वेळु ॥ १०२३ ॥
आणि आंगा बळ यावें, नातरी क्षुधा जावें,
कां जिभीचे पुरवावे, मनोरथ ॥ १०२४ ॥
भोजन करितांविखीं, ययां तिहींतें न लेखी,
आहारीं मिती संतोषीं, माप न सूये ॥ १०२५ ॥
अशनाचेनि पावकें, हारपतां प्राणु पोखे,
इतुकियाचि भागु मोटकें, अशन करी ॥ १०२६ ॥
आणि परपुरुषें कामिली, कुळवधू आंग न घाली,
निद्रालस्या न मोकली, आसन तैसें ॥ १०२७ ॥
दंडवताचेनि प्रसंगें, भुयीं हन अंग लागे,
वांचूनि येर नेघे, राभस्य तेथ ॥ १०२८ ॥
देहनिर्वाहापुरतें, राहाटवी हातांपायांतें,
किंबहुना आपैतें, सबाह्य केलें ॥ १०२९ ॥
आणि मनाचा उंबरा, वृत्तीसी देखों नेदी वीरा,
तेथ कें वाग्व्यापारा, अवकाशु असे ? ॥ १०३० ॥
ऐसेनि देह वाचा मानस, हें जिणौनि बाह्यप्रदेश,
आकळिलें आकाश, ध्यानाचें तेणें ॥ १०३१ ॥
गुरुवाक्यें उठविला, बोधीं निश्चयो आपुला,
न्याहाळीं हातीं घेतला, आरिसा जैसा ॥ १०३२ ॥
पैं ध्याता आपणचि परी, ध्यानरूप वृत्तिमाझारीं,
ध्येयत्वें घे हे अवधारीं, ध्यानरूढी गा ॥ १०३३ ॥
तेथ ध्येय ध्यान ध्याता, ययां तिहीं एकरूपता,
होय तंव पंडुसुता, कीजे तें गा ॥ १०३४ ॥
म्हणौनि तो मुमुक्षु, आत्मज्ञानीं जाला दक्षु,
परी पुढां सूनि पक्षु, योगाभ्यासाचा ॥ १०३५ ॥
अपानरंध्रद्वया, माझारीं धनंजया,
पार्ष्णीं पिडूनियां, कांवरुमूळ ॥ १०३६ ॥
आकुंचूनि अध, देऊनि तिन्ही बंध,
करूनि एकवद, वायुभेदी ॥ १०३७ ॥
कुंडलिनी जागवूनि, मध्यमा विकाशूनि,
आधारादि भेदूनि, आज्ञावरी ॥ १०३८ ॥
सहस्त्रदळाचा मेघु, पीयुषें वर्षोनि चांगु,
तो मूळवरी वोघु, आणूनियां ॥ १०३९ ॥
नाचतया पुण्यगिरी, चिद्भैरवाच्या खापरीं,
मनपवनाची खीच पुरी, वाढूनियां ॥ १०४० ॥
जालिया योगाचा गाढा, मेळावा सूनि हा पुढां,
ध्यान मागिलीकडां, स्वयंभ केलें ॥ १०४१ ॥
आणि ध्यान योग दोन्ही, इयें आत्मतत्वज्ञानीं,
पैठा होआवया निर्विघ्नीं, आधींचि तेणें ॥ १०४२ ॥
वीतरागतेसारिखा, जोडूनि ठेविला सखा,
तो आघवियाचि भूमिका-, सवें चाले ॥ १०४३ ॥
पहावें दिसे तंववरी, दिठीतें न संडी दीप जरी,
तरी कें आहे अवसरी, देखावया ॥ १०४४ ॥
तैसें मोक्षीं प्रवर्तलया, वृत्ती ब्रह्मीं जाय लया,
तंव वैराग्य आथी तया, भंगु कैचा, ॥ १०४५ ॥
म्हणौनि सवैराग्यु, ज्ञानाभ्यासु तो सभाग्यु,
करूनि जाला योग्यु, आत्मलाभा ॥ १०४६ ॥
ऐसी वैराग्याची आंगीं, बाणूनियां वज्रांगीं,
राजयोगतुरंगीं, आरूढला ॥ १०४७ ॥
वरी आड पडिलें दिठी, सानें थोर निवटी,
तें बळीं विवेकमुष्टीं, ध्यानाचें खांडें ॥ १०४८ ॥
ऐसेनि संसाररणाआंतु, आंधारीं सूर्य तैसा असे जातु,
मोक्षविजयश्रीये वरैतु, होआवयालागीं ॥ १०४९ ॥


अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम्।
विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ॥ ५३॥


तेथ आडवावया आले, दोषवैरी जे धोपटिले,
तयांमाजीं पहिलें, देहाहंकारु ॥ १०५० ॥
जो न मोकली मारुनी, जीवों नेदी उपजवोनि,
विचंबवी खोडां घालुनी, हाडांचिया ॥ १०५१ ॥
तयाचा देहदुर्ग हा थारा, मोडूनि घेतला तो वीरा,
आणि बळ हा दुसरा, मारिला वैरी ॥ १०५२ ॥
जो विषयाचेनि नांवें, चौगुणेंही वरी थांवे,
जेणें मृतावस्था धांवे, सर्वत्र जगा ॥ १०५३ ॥
तो विषय विषाचा अथावो, आघविया दोषांचा रावो,
परी ध्यानखड्गाचा घावो, साहेल कैंचा ? ॥ १०५४ ॥
आणि प्रिय विषयप्राप्ती, करी जया सुखाची व्यक्ती,
तेचि घालूनि बुंथी, आंगीं जो वाजे ॥ १०५५ ॥
जो सन्मार्गा भुलवी, मग अधर्माच्या आडवीं,
सूनि वाघां सांपडवी, नरकादिकां ॥ १०५६ ॥
तो विश्वासें मारितां रिपु, निवटूनि घातला दर्पु,
आणि जयाचा अहा कंपु, तापसांसी ॥ १०५७ ॥
क्रोधा ऐसा महादोखु, जयाचा देखा परिपाकु,
भरिजे तंव अधिकु, रिता होय जो ॥ १०५८ ॥
तो कामु कोणेच ठायीं, नसे ऐसें केलें पाहीं,
कीं तेंचि क्रोधाही, सहजें आलें ॥ १०५९ ॥
मुळाचें तोडणें जैसें, होय कां शाखोद्देशें,
कामु नाशलेनि नाशे, तैसा क्रोधु ॥ १०६० ॥
म्हणौनि काम वैरी, जाला जेथ ठाणोरी,
तेथ सरली वारी, क्रोधाचीही ॥ १०६१ ॥
आणि समर्थु आपुला खोडा, शिसें वाहवी जैसा होडा,
तैसा भुंजौनि जो गाढा, परीग्रहो ॥ १०६२ ॥
जो माथांचि पालाणवी, अंगा अवगुण घालवी,
जीवें दांडी घेववी, ममत्वाची ॥ १०६३ ॥
शिष्यशास्त्रादिविलासें, मठादिमुद्रेचेनि मिसें,
घातले आहाती फांसे, निःसंगा जेणें ॥ १०६४ ॥
घरीं कुटुंबपणें सरे, तरी वनीं वन्य होऊनि अवतरे,
नागवीयाही शरीरें, लागला आहे ॥ १०६५ ॥
ऐसा दुर्जयो जो परीग्रहो, तयाचा फेडूनि ठावो,
भवविजयाचा उत्साहो, भोगीतसे जो ॥ १०६६ ॥
तेथ अमानित्वादि आघवे, ज्ञानगुणाचे जे मेळावे,
ते कैवल्यदेशींचे आघवे, रावो जैसे आले ॥ १०६७ ॥
तेव्हां सम्यक्‌ज्ञानाचिया, राणिवा उगाणूनि तया,
परिवारु होऊनियां, राहत आंगें ॥ १०६८ ॥
प्रवृत्तीचिये राजबिदीं, अवस्थाभेदप्रमदीं,
कीजत आहे प्रतिपदीं, सुखाचें लोण ॥ १०६९ ॥
पुढां बोधाचिये कांबीवरी, विवेकु दृश्याची मांदी सारी,
योगभूमिका आरती करी, येती जैसिया ॥ १०७० ॥
तेथ ऋद्धिसिद्धींचीं अनेगें, वृंदें मिळती प्रसंगें,
तिये पुष्पवर्षीं आंगें, नाहातसे तो ॥ १०७१ ॥
ऐसेनि ब्रह्मैक्यासारिखें, स्वराज्य येतां जवळिकें,
झळंबित आहे हरिखें, तिन्ही लोक ॥ १०७२ ॥
तेव्हां वैरियां कां मैत्रियां, तयासि माझें म्हणावया,
समानता धनंजया, उरेचिही ना ॥ १०७३ ॥
हें ना भलतेणें व्याजें, तो जयातें म्हणे माझें,
तें नोडवेचि कां दुजें, अद्वितीय जाला ॥ १०७४ ॥
पैं आपुलिया एकी सत्ता, सर्वही कवळूनिया पंडुसुता,
कहीं न लगती ममता, धाडिली तेणें ॥ १०७५ ॥
ऐसा जिंतिलिया रिपुवर्गु, अपमानिलिया हें जगु,
अपैसा योगतुरंगु, स्थिर जाला ॥ १०७६ ॥
वैराग्याचें गाढलें, अंगी त्राण होतें भलें,
तेंही नावेक ढिलें, तेव्हां करी ॥ १०७७ ॥
आणि निवटी ध्यानाचें खांडें, तें दुजें नाहींचि पुढें,
म्हणौनि हातु आसुडें, वृत्तीचाही ॥ १०७८ ॥
जैसें रसौषध खरें, आपुलें काज करोनि पुरें,
आपणही नुरे, तैसें होतसे ॥ १०७९ ॥
देखोनि ठाकिता ठावो, धांवता थिरावे पावो,
तैसा ब्रह्मसामीप्यें थावो, अभ्यासु सांडी ॥ १०८० ॥
घडतां महोदधीसी, गंगा वेगु सांडी जैसी,
कां कामिनी कांतापासीं, स्थिर होय ॥ १०८१ ॥
नाना फळतिये वेळे, केळीची वाढी मांटुळे,
कां गांवापुढें वळे, मार्गु जैसा ॥ १०८२ ॥
तैसा आत्मसाक्षात्कारु, होईल देखोनि गोचरु,
ऐसा साधनहतियेरु, हळुचि ठेवी ॥ १०८३ ॥
म्हणौनि ब्रह्मेंसी तया, ऐक्याचा समो धनंजया,
होतसे तैं उपाया, वोहटु पडे ॥ १०८४ ॥
मग वैराग्याची गोंधळुक, जे ज्ञानाभ्यासाचें वार्धक्य,
योगफळाचाही परिपाक, दशा जे कां ॥ १०८५ ॥
ते शांति पैं गा सुभगा, संपूर्ण ये तयाचिया आंगा,
तैं ब्रह्म होआवया जोगा, होय तो पुरुषु ॥ १०८६ ॥
पुनवेहुनी चतुर्दशी, जेतुलें उणेपण शशी,
कां सोळे पाऊनि जैसी, पंधरावी वानी ॥ १०८७ ॥
सागरींही पाणी वेगें, संचरे तें रूप गंगे,
येर निश्चळ जें उगें, तें समुद्रु जैसा ॥ १०८८ ॥
ब्रह्मा आणि ब्रह्महोतिये, योग्यते तैसा पाडु आहे,
तेंचि शांतीचेनि लवलाहें, होय तो गा ॥ १०८९ ॥
पैं तेंचि होणेंनवीण, प्रतीती आलें जें ब्रह्मपण,
ते ब्रह्म होती जाण, योग्यता येथ ॥ १०९० ॥


ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काण्‌क्षति।
समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम् ॥ ५४॥


ते ब्रह्मभावयोग्यता, पुरुषु तो मग पंडुसुता,
आत्मबोधप्रसन्नता\-, पदीं बैसे ॥ १०९१ ॥
जेणें निपजे रससोय, तो तापुही जैं जाय,
तैं ते कां होय, प्रसन्न जैसी ॥ १०९२ ॥
नाना भरतिया लगबगा, शरत्काळीं सांडिजे गंगा,
कां गीत रहातां उपांगा, वोहटु पडे ॥ १०९३ ॥
तैसा आत्मबोधीं उद्यमु, करितां होय जो श्रमु,
तोही जेथें समु, होऊनि जाय ॥ १०९४ ॥
आत्मबोधप्रशस्ती, हे तिये दशेची ख्याती,
ते भोगितसे महामती, योग्यु तो गा ॥ १०९५ ॥
तेव्हां आत्मत्वें शोचावें, कांहीं पावावया कामावें,
हें सरलें समभावें, भरितें तया ॥ १०९६ ॥
उदया येतां गभस्ती, नाना नक्षत्रव्यक्ती,
हारवीजती दीप्ती, आंगिका जेवीं ॥ १०९७ ॥
तेवीं उठतिया आत्मप्रथा, हे भूतभेदव्यवस्था,
मोडीत मोडीत पार्था, वास पाहे तो ॥ १०९८ ॥
पाटियेवरील अक्षरें, जैसीं पुसतां येती करें,
तैसीं हारपती भेदांतरें, तयाचिये दृष्टी ॥ १०९९ ॥
तैसेनि अन्यथा ज्ञानें, जियें घेपती जागरस्वप्नें,
तियें दोन्ही केलीं लीनें, अव्यक्तामाजीं ॥ ११०० ॥
मग तेंही अव्यक्त, बोध वाढतां झिजत,
पुरलां बोधीं समस्त, बुडोनि जाय ॥ ११०१ ॥
जैसी भोजनाच्या व्यापारीं, क्षुधा जिरत जाय अवधारीं,
मग तृप्तीच्या अवसरीं, नाहींच होय ॥ ११०२ ॥
नाना चालीचिया वाढी, वाट होत जाय थोडी,
मग पातला ठायीं बुडी, देऊनि निमे ॥ ११०३ ॥
कां जागृति जंव जंव उद्दीपे, तंव तंव निद्रा हारपे,
मग जागीनलिया स्वरूपें, नाहींच होय ॥ ११०४ ॥
हें ना आपुलें पूर्णत्व भेटें, जेथ चंद्रासीं वाढी खुंटे,
तेथ शुक्लपक्षु आटे, निःशेषु जैसा ॥ ११०५ ॥
तैसा बोध्यजात गिळितु, बोधु बोधें ये मज आंतु,
मिसळला तेथ साद्यंतु, अबोधु गेला ॥ ११०६ ॥
तेव्हां कल्पांताचिये वेळे, नदी सिंधूचें पेंडवळें,
मोडूनि भरलें जळें, आब्रह्म जैसें ॥ ११०७ ॥
नाना गेलिया घट मठ, आकाश ठाके एकवट,
कां जळोनि काष्ठें काष्ठ, वन्हीचि होय ॥ ११०८ ॥
नातरी लेणियांचे ठसे, आटोनि गेलिया मुसे,
नामरूप भेदें जैसें, सांडिजे सोनें ॥ ११०९ ॥
हेंही असो चेइलया, तें स्वप्न नाहीं जालया,
मग आपणचि आपणयां, उरिजे जैसें ॥ १११० ॥
तैसी मी एकवांचूनि कांहीं, तया तयाहीसकट नाहीं,
हे चौथी भक्ति पाहीं, माझी तो लाहे ॥ ११११ ॥
येर आर्तु जिज्ञासु अर्थार्थी, हे भजती जिये पंथीं,
ते तिन्ही पावोनी चौथी, म्हणिपत आहे ॥ १११२ ॥
येऱ्हवीं तिजी ना चौथी, हे पहिली ना सरती,
पैं माझिये सहजस्थिती, भक्ति नाम ॥ १११३ ॥
जें नेणणें माझें प्रकाशूनि, अन्यथात्वें मातें दाऊनि,
सर्वही सर्वीं भजौनि, बुझावीतसे जे ॥ १११४ ॥
जो जेथ जैसें पाहों बैसे, तया तेथ तैसेंचि असे,
हें उजियेडें कां दिसे, अखंडें जेणें ॥ १११५ ॥
स्वप्नाचें दिसणें न दिसणें, जैसें आपलेनि असलेपणें,
विश्वाचें आहे नाहीं जेणें, प्रकाशें तैसें ॥ १११६ ॥
ऐसा हा सहज माझा, प्रकाशु जो कपिध्वजा,
तो भक्ति या वोजा, बोलिजे गा ॥ १११७ ॥
म्हणौनि आर्ताच्या ठायीं, हे आर्ति होऊनि पाहीं,
अपेक्षणीय जें कांहीं, तें मीचि केला ॥ १११८ ॥
जिज्ञासुपुढां वीरेशा, हेचि होऊनि जिज्ञासा,
मी कां जिज्ञास्यु ऐसा, दाखविला ॥ १११९ ॥
हेंचि होऊनि अर्थना, मीचि माझ्या अर्थीं अर्जुना,
करूनि अर्थाभिधाना, आणी मातें ॥ ११२० ॥
एवं घेऊनि अज्ञानातें, माझी भक्ति जे हे वर्ते,
ते दावी मज द्रष्टयातें, दृश्य करूनि ॥ ११२१ ॥
येथें मुखचि दिसे मुखें, या बोला कांहीं न चुके,
तरी दुजेपण हें लटिकें, आरिसा करी ॥ ११२२ ॥
दिठी चंद्रचि घे साचें, परी येतुलें हें तिमिराचें,
जे एकचि असे तयाचे, दोनी दावी ॥ ११२३ ॥
तैसा सर्वत्र मीचि मियां, घेपतसें भक्ति इया,
परी दृश्यत्व हें वायां, अज्ञानवशें ॥ ११२४ ॥
तें अज्ञान आतां फिटलें, माझें दृष्टृत्व मज भेटलें,
निजबिंबीं एकवटलें, प्रतिबिंब जैसें ॥ ११२५ ॥
पैं जेव्हांही असे किडाळ, तेव्हांही सोनेंचि अढळ,
परी तें कीड गेलिया केवळ, उरे जैसें ॥ ११२६ ॥
हां गा पूर्णिमे आधीं कायी, चंद्रु सावयवु नाहीं ?,
परी तिये दिवशीं भेटे पाहीं, पूर्णता तया ॥ ११२७ ॥
तैसा मीचि ज्ञानद्वारें, दिसें परी हस्तांतरें,
मग दृष्टृत्व तें सरे, मियांचि मी लाभें ॥ ११२८ ॥
म्हणौनि दृश्यपथा-, अतीतु माझा पार्था,
भक्तियोगु चवथा, म्हणितला गा ॥ ११२९ ॥


भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः।
ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् ॥ ५५॥


या ज्ञान भक्ति सहज, भक्तु एकवटला मज,
मीचि केवळ हें तुज, श्रुतही आहे ॥ ११३० ॥
जे उभऊनियां भुजा, ज्ञानिया आत्मा माझा,
हे बोलिलों कपिध्वजा, सप्तमाध्यायीं ॥ ११३१ ॥
ते कल्पादीं भक्ति मियां, श्रीभागवतमिषें ब्रह्मया,
उत्तम म्हणौनि धनंजया, उपदेशिली ॥ ११३२ ॥
ज्ञानी इयेतें स्वसंवित्ती, शैव म्हणती शक्ती,
आम्ही परम भक्ती, आपुली म्हणो ॥ ११३३ ॥
हे मज मिळतिये वेळे, तया क्रमयोगियां फळे,
मग समस्तही निखिळें, मियांचि भरे ॥ ११३४ ॥
तेथ वैराग्य विवेकेंसी, आटे बंध मोक्षेंसीं,
वृत्ती तिये आवृत्तीसीं, बुडोनि जाय ॥ ११३५ ॥
घेऊनि ऐलपणातें, परत्व हारपें जेथें,
गिळूनि चाऱ्ही भूतें, आकाश जैसें ॥ ११३६ ॥
तया परी थडथाद, साध्यसाधनातीत शुद्ध,
तें मी होऊनि एकवद, भोगितो मातें ॥ ११३७ ॥
घडोनि सिंधूचिया आंगा, सिंधूवरी तळपे गंगा,
तैसा पाडु तया भोगा, अवधारी जो ॥ ११३८ ॥
कां आरिसयासि आरिसा, उटूनि दाविलिया जैसा,
देखणा अतिशयो तैसा, भोगणा तिये ॥ ११३९ ॥
हे असो दर्पणु नेलिया, तो मुख बोधुही गेलिया,
देखलेंपण एकलेया, आस्वादिजे जेवीं ॥ ११४० ॥
चेइलिया स्वप्न नाशे, आपलें ऐक्यचि दिसे,
ते दुजेनवीण जैसें, भोगिजे का ॥ ११४१ ॥
तोचि जालिया भोगु तयाचा, न घडे हा भावो जयांचा,
तिहीं बोलें केवीं बोलाचा, उच्चारु कीजे ॥ ११४२ ॥
तयांच्या नेणों गांवीं, रवी प्रकाशी हन दिवी,
कीं व्योमालागीं मांडवी, उभिली तिहीं ॥ ११४३ ॥
हां गा राजन्यत्व नव्हतां आंगीं, रावो रायपण काय भोगी ?,
कां आंधारु हन आलिंगी, दिनकरातें ? ॥ ११४४ ॥
आणि आकाश जें नव्हे, तया आकाश काय जाणवे ?,
रत्नाच्या रूपीं मिरवे, गुंजांचें लेणें ? ॥ ११४५ ॥
म्हणौनि मी होणें नाहीं, तया मीचि आहें केहीं,
मग भजेल हें कायी, बोलों कीर ॥ ११४६ ॥
यालागीं तो क्रमयोगी, मी जालाचि मातें भोगी,
तारुण्य कां तरुणांगीं, जियापरी ॥ ११४७ ॥
तरंग सर्वांगीं तोय चुंबी, प्रभा सर्वत्र विलसे बिंबीं,
नाना अवकाश नभीं, लुंठतु जैसा ॥ ११४८ ॥
तैसा रूप होऊनि माझें, मातें क्रियावीण तो भजे,
अलंकारु का सहजें, सोनयातें जेवीं ॥ ११४९ ॥
का चंदनाची द्रुती जैसी, चंदनीं भजे अपैसी,
का अकृत्रिम शशीं, चंद्रिका ते ॥ ११५० ॥
तैसी क्रिया कीर न साहे, तऱ्ही अद्वैतीं भक्ति आहे,
हें अनुभवाचिजोगें नव्हे, बोला{ऐ}सें ॥ ११५१ ॥
तेव्हां पूर्वसंस्कार छंदें, जें कांहीं तो अनुवादे,
तेणें आळविलेनि वो दें, बोलतां मीचि ॥ ११५२ ॥
बोलतया बोलताचि भेटे, तेथें बोलिलें हें न घटे,
तें मौन तंव गोमटें, स्तवन माझें ॥ ११५३ ॥
म्हणौनि तया बोलतां, बोली बोलतां मी भेटतां,
मौन होय तेणें तत्वतां, स्तवितो मातें ॥ ११५४ ॥
तैसेंचि बुद्धी का दिठी, जें तो देखों जाय किरीटी,
तें देखणें दृश्य लोटी, देखतेंचि दावी ॥ ११५५ ॥
आरिसया आधीं जैसें, देखतेंचि मुख दिसेअ,
तयाचें देखणें तैसें, मेळवी द्रष्टें ॥ ११५६ ॥
दृश्य जाउनियां द्रष्टें, द्रष्टयासीचि जैं भेटे,
तैं एकलेपणें न घटे, द्रष्टेपणही ॥ ११५७ ॥
तेथ स्वप्नींचिया प्रिया, चेवोनि झोंबो गेलिया,
ठायिजे दोन्ही न होनियां, आपणचि जैसें ॥ ११५८ ॥
का दोहीं काष्ठाचिये घृष्टी\-, माजीं वन्हि एक उठी,
तो दोन्ही हे भाष आटी, आपणचि होय ॥ ११५९ ॥
नाना प्रतिबिंब हातीं, घेऊं गेलिया गभस्ती,
बिंबताही असती, जाय जैसी ॥ ११६० ॥
तैसा मी होऊनि देखतें, तो घेऊं जाय दृश्यातें,
तेथ दृश्य ने थितें, द्रष्टृत्वेंसीं ॥ ११६१ ॥
रवि आंधारु प्रकाशिता, नुरेचि जेवीं प्रकाश्यता,
तेंवीं दृश्यीं नाही द्रष्टृता, मी जालिया ॥ ११६२ ॥
मग देखिजे ना न देखिजे, ऐसी जे दशा निपजे,
ते तें दर्शन माझें, साचोकारें ॥ ११६३ ॥
तें भलतयाही किरीटी, पदार्थाचिया भेटी,
द्रष्टृदृश्यातीता दृष्टी, भोगितो सदा ॥ ११६४ ॥
आणि आकाश हें आकाशें, दाटलें न ढळें जैसें,
मियां आत्मेन आपणपें तैसें, जालें तया ॥ ११६५ ॥
कल्पांतीं उदक उदकें, रुंधिलिया वाहों ठाके,
तैसा आत्मेनि मियां येकें, कोंदला तो ॥ ११६६ ॥
पावो आपणपयां वोळघे ?, केवीं वन्हि आपणपयां लागे ?,
आपणपां पाणी रिघे, स्नाना कैसें ? ॥ ११६७ ॥
म्हणौनि सर्व मी जालेपणें, ठेलें तया येणें जाणें,
तेंचि गा यात्रा करणें, अद्वया मज ॥ ११६८ ॥
पैं जळावरील तरंगु, जरी धाविन्नला सवेगु,
तरी नाहीं भूमिभागु, क्रमिला तेणें ॥ ११६९ ॥
जें सांडावें कां मांडावें, जें चालणें जेणें चालावें,
तें तोयचि एक आघवें, म्हणौनियां ॥ ११७० ॥
गेलियाही भलतेउता, उदकपणेंं पंडुसुता,
तरंगाची एकात्मता, न मोडेचि जेवीं ॥ ११७१ ॥
तैसा मीपणें हा लोटला, तो आघवेंयाचि मजआंतु आला,
या यात्रा होय भला, कापडी माझा ॥ ११७२ ॥
आणि शरीर स्वभाववशें, कांहीं येक करूं जरी बैसे,
तरी मीचि तो तेणें मिषें, भेटे तया ॥ ११७३ ॥
तेथ कर्म आणि कर्ता, हें जाऊनि पंडुसुता,
मियां आत्मेनि मज पाहतां, मीचि होय ॥ ११७४ ॥
पैं दर्पणातेंं दर्पणें, पाहिलिया होय न पाहणें,
सोनें झांकिलिया सुवर्णें, ना झांकें जेवीं ॥ ११७५ ॥
दीपातें दीपें प्रकाशिजे, तें न प्रकाशणेंचि निपजे,
तैसें कर्म मियां कीजे, तें करणें कैंचें ? ॥ ११७६ ॥
कर्मही करितचि आहे, जैं करावें हें भाष जाये,
तैं न करणेंचि होये, तयाचें केलें ॥ ११७७ ॥
क्रियाजात मी जालेपणें, घडे कांहींचि न करणें,
तयाचि नांव पूजणें, खुणेचें माझें ॥ ११७८ ॥
म्हणौनि करीतयाही वोजा, तें न करणें हेंचि कपिध्वजा,
निफजे तिया महापूजा, पूजी तो मातें ॥ ११७९ ॥
एवं तो बोले तें स्तवन, तो देखे तें दर्शन,
अद्वया मज गमन, तो चाले तेंचि ॥ ११८० ॥
तो करी तेतुली पूजा, तो कल्पी तो जपु माझा,
तो असे तेचि कपिध्वजा, समाधी माझी ॥ ११८१ ॥
जैसें कनकेंसी कांकणें, असिजे अनन्यपणें,
तो भक्तियोगें येणें, मजसीं तैसा ॥ ११८२ ॥
उदकीं कल्लोळु, कापुरीं परीमळु,
रत्नीं उजाळु, अनन्यु जैसा ॥ ११८३ ॥
किंबहुना तंतूंसीं पटु, कां मृत्तिकेसीं घटु,
तैसा तो एकवटु, मजसीं माझा ॥ ११८४ ॥
इया अनन्यसिद्धा भक्ती, या आघवाचि दृश्यजातीं,
मज आपणपेंया सुमती, द्रष्टयातें जाण ॥ ११८५ ॥
तिन्ही अवस्थांचेनि द्वारें, उपाध्युपहिताकारें,
भावाभावरूप स्फुरे, दृश्य जें हें ॥ ११८६ ॥
तें हें आघवेंचि मी द्रष्टा, ऐसिया बोधाचा माजिवटा,
अनुभवाचा सुभटा, धेंडा तो नाचे ॥ ११८७ ॥
रज्जु जालिया गोचरु, आभासतां तो व्याळाकारु,
रज्जुचि ऐसा निर्धारु, होय जेवीं ॥ ११८८ ॥
भांगारापरतें कांहीं, लेणें गुंजहीभरी नाहीं,
हें आटुनियां ठायीं, कीजे जैसे ॥ ११८९ ॥
उदका येकापरतें, तरंग नाहींचि हें निरुतें,
जाणोनि तया आकारातें, न घेपे जेवीं ॥ ११९० ॥
नातरी स्वप्नविकारां समस्तां, चेऊनियां उमाणें घेतां,
तो आपणयापरौता, न दिसे जैसा ॥ ११९१ ॥
तैसें जें कांहीं आथी नाथी, येणें होय ज्ञेयस्फुर्ती,
तें ज्ञाताचि मी हें प्रतीती, होऊनि भोगी ॥ ११९२ ॥
जाणे अजु मी अजरु, अक्षयो मी अक्षरु,
अपूर्वु मी अपारु, आनंदु मी ॥ ११९३ ॥
अचळु मी अच्युतु, अनंतु मी अद्वैतु,
आद्यु मी अव्यक्तु, व्यक्तुही मी ॥ ११९४ ॥
ईश्य मी ईश्वरु, अनादि मी अमरु,
अभय मी आधारु, आधेय मी ॥ ११९५ ॥
स्वामी मी सदोदितु, सहजु मी सततु,
सर्व मी सर्वगतु, सर्वातीतु मी ॥ ११९६ ॥
नवा मी पुराणु, शून्यु मी संपूर्णु,
स्थुलु मी अणु, जें कांहीं तें मी ॥ ११९७ ॥
अक्रियु मी येकु, असंगु मी अशोकु,
व्यापु मी व्यापकु, पुरुषोत्तमु मी ॥ ११९८ ॥
अशब्दु मी अश्रोत्रु, अरूपु मी अगोत्रु,
समु मी स्वतंत्रु, ब्रह्म मी परु ॥ ११९९ ॥
ऐसें आत्मत्वें मज एकातें, इया अद्वयभक्ती जाणोनि निरुतें,
आणि याही बोधा जाणतें, तेंही मीचि जाणें ॥ १२०० ॥
पैं चेइलेयानंतरें, आपुलें एकपण उरे,
तेंही तोंवरी स्फुरे, तयाशींचि जैसें ॥ १२०१ ॥
कां प्रकाशतां अर्कु, तोचि होय प्रकाशकु,
तयाही अभेदा द्योतकु, तोचि जैसा ॥ १२०२ ॥
तैसा वेद्यांच्या विलयीं, केवळ वीदकु उरे पाहीं,
तेणें जाणवें तया तेंही, हेंही जो जाणे ॥ १२०३ ॥
तया अद्वयपणा आपुलिया, जाणती ज्ञप्ती जे धनंजया,
ते ईश्वरचि मी हे तया, बोधासि ये ॥ १२०४ ॥
मग द्वैताद्वैतातीत, मीचि आत्मा एकु निभ्रांत,
हें जाणोनि जाणणें जेथ, अनुभवीं रिघे ॥ १२०५ ॥
तेथ चेइलियां येकपण, दिसे जे आपुलया आपण,
तेंही जातां नेणों कोण, होईजे जेवीं ॥ १२०६ ॥
कां डोळां देखतिये क्षणीं, सुवर्णपण सुवर्णीं,
नाटितां होय आटणी, अळंकाराचीही ॥ १२०७ ॥
नाना लवण तोय होये, मग क्षारता तोयत्वें राहे,
तेही जिरतां जेवीं जाये, जालेपण तें ॥ १२०८ ॥
तैसा मी तो हें जें असे, तें स्वानंदानुभवसमरसें,
कालवूनिया प्रवेशे, मजचिमाजीं ॥ १२०९ ॥
आणि तो हे भाष जेथ जाये, तेथे मी हें कोण्हासी आहे,
ऐसा मी ना तो तिये सामाये, माझ्याचि रूपीं ॥ १२१० ॥
जेव्हां कापुर जळों सरे, तयाचि नाम अग्नि पुरी,
मग उभयतातीत उरे, आकाश जेवीं ॥ १२११ ॥
का धाडलिया एका एकु, वाढे तो शून्य विशेखु,
तैसा आहे नाहींचा शेखु, मीचि मग आथी ॥ १२१२ ॥
तेथ ब्रह्मा आत्मा ईशु, यया बोला मोडे सौरसु,
न बोलणें याही पैसु, नाहीं तेथ ॥ १२१३ ॥
न बोलणेंही न बोलोनी, तें बोलिजे तोंड भरुनी,
जाणिव नेणिव नेणोनी, जाणिजे तें ॥ १२१४ ॥
तेथ बुझिजे बोधु बोधें, आनंंदु घेपे आनंदें,
सुखावरी नुसधें, सुखचि भोगिजे ॥ १२१५ ॥
तेथ लाभु जोडला लाभा, प्रभा आलिंगिली प्रभा,
विस्मयो बुडाला उभा, विस्मयामाजीं ॥ १२१६ ॥
शमु तेथ सामावला, विश्रामु विश्रांति आला,
अनुभवु वेडावला, अनुभूतिपणें ॥ १२१७ ॥
किंबहुना ऐसें निखळ, मीपण जोडे तया फळ,
सेवूनि वेली वेल्हाळ, क्रमयोगाची ते ॥ १२१८ ॥
पैं क्रमयोगिया किरीटी, चक्रवर्तीच्या मुकुटीं,
मी चिद्रत्न तें साटोवाटीं, होय तो माझा ॥ १२१९ ॥
कीं क्रमयोगप्रासादाचा, कळसु जो हा मोक्षाचा,
तयावरील अवकाशाचा, उवावो जाला तो ॥ १२२० ॥
नाना संसार आडवीं, क्रमयोग वाट बरवी,
जोडिली ते मदैक्यगांवीं, पैठी जालीसे ॥ १२२१ ॥
हें असो क्रमयोगबोधें, तेणें भक्तिचिद्गांगें,
मी स्वानंदोदधी वेगें, ठाकिला कीं गा ॥ १२२२ ॥
हा ठायवरी सुवर्मा, क्रमयोगीं आहे महिमा,
म्हणौनि वेळोवेळां तुम्हां, सांगतों आम्ही ॥ १२२३ ॥
पैं देशें काळें पदार्थें, साधूनि घेइजे मातें,
तैसा नव्हे मी आयतें, सर्वांचें सर्वही ॥ १२२४ ॥
म्हणौनि माझ्या ठायीं, जाचावें न लगे कांहीं,
मी लाभें इयें उपायीं, साचचि गा ॥ १२२५ ॥
एक शिष्य एक गुरु, हा रूढला साच व्यवहारु,
तो मत्प्राप्तिप्रकारु, जाणावया ॥ १२२६ ॥
अगा वसुधेच्या पोटीं, निधान सिद्ध किरीटी,
वन्हि सिद्ध काष्ठीं, वोहां दूध ॥ १२२७ ॥
परी लाभे तें असतें, तया कीजे उपायातें,
येर सिद्धचि तैसा तेथें, उपायीं मी ॥ १२२८ ॥
हा फळहीवरी उपावो, कां पां प्रस्तावीतसे देवो,
हे पुसतां परी अभिप्रावो, येथिंचा ऐसा ॥ १२२९ ॥
जे गीतार्थाचें चांगावें, मोक्षोपायपर आघवें,
आन शास्त्रोपाय कीं नव्हे, प्रमाणसिद्ध ॥ १२३० ॥
वारा आभाळचि फेडी, वांचूनि सूर्यातें न घडी,
कां हातु बाबुळी धाडी, तोय न करी ॥ १२३१ ॥
तैसा आत्मदर्शनीं आडळु, असे अविद्येचा जो मळु,
तो शास्त्र नाशी येरु निर्मळु, मी प्रकाशें स्वयें ॥ १२३२ ॥
म्हणौनि आघवींचि शास्त्रें, अविद्याविनाशाचीं पात्रें,
वांचोनि न होतीं स्वतंत्रें, आत्मबोधीं ॥ १२३३ ॥
तया अध्यात्मशास्त्रांसीं, जैं साचपणाची ये पुसी,
तैं येइजे जया ठायासी, ते हे गीता ॥ १२३४ ॥
भानुभूषिता प्राचिया, सतेजा दिशा आघविया,
तैसी शास्त्रेश्वरा गीता या, सनाथें शास्त्रें ॥ १२३५ ॥
हें असो येणें शास्त्रेश्वरें, मागां उपाय बहुवे विस्तारें,
सांगितला जैसा करें, घेवों ये आत्मा ॥ १२३६ ॥
परी प्रथमश्रवणासवें, अर्जुना विपायें हें फावे,
हा भावो सकणवे, धरूनि श्रीहरी ॥ १२३७ ॥
तेंचि प्रमेय एक वेळ, शिष्यीं होआवया अढळ,
सांगतसे मुकुल, मुद्रा आतां ॥ १२३८ ॥
आणि प्रसंगें गीता, ठावोही हा संपता,
म्हणौनि दावी आद्यंता, एकार्थत्व ॥ १२३९ ॥
जे ग्रंथाच्या मध्यभागीं, नाना अधिकारप्रसंगीं,
निरूपण अनेगीं, सिद्धांतीं केलें ॥ १२४० ॥
तरी तेतुलेही सिद्धांत, इयें शास्त्रीं प्रस्तुत,
हे पूर्वापर नेणत, कोण्ही जैं मानी ॥ १२४१ ॥
तैं महासिद्धांताचा आवांका, सिद्धांतकक्षा अनेका,
भिडऊनि आरंभु देखा, संपवीतु असे ॥ १२४२ ॥
एथ अविद्यानाशु हें स्थळ, तेणें मोक्षोपादान फळ,
या दोहीं केवळ, साधन ज्ञान ॥ १२४३ ॥
हें इतुलेंचि नानापरी, निरूपिलें ग्रंथविस्तारीं,
तें आतां दोहीं अक्षरीं, अनुवादावें ॥ १२४४ ॥
म्हणौनि उपेयही हातीं, जालया उपायस्थिती,
देव प्रवर्तले तें पुढती, येणेंचि भावें ॥ १२४५ ॥


सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः।
मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम् ॥ ५६॥


मग म्हणे गा सुभटा, तो क्रमयोगिया निष्ठा,
मी हौनी होय पैठा, माझ्या रूपीं ॥ १२४६ ॥
स्वकर्माच्या चोखौळीं, मज पूजा करूनि भलीं,
तेणें प्रसादें आकळी, ज्ञाननिष्ठेतें ॥ १२४७ ॥
ते ज्ञाननिष्ठा जेथ हातवसे, तेथ भक्ति माझी उल्लासे,
तिया भजन समरसें, सुखिया होय ॥ १२४८ ॥
आणि विश्वप्रकाशितया, आत्मया मज आपुलिया,
अनुसरे जो करूनियां, सर्वत्रता हे ॥ १२४९ ॥
सांडूनि आपुला आडळ, लवण आश्रयी जळ,
कां हिंडोनि राहे निश्चळ, वायु व्योमीं ॥ १२५० ॥
तैसा बुद्धी वाचा कायें, जो मातें आश्रऊनि ठाये,
तो निषिद्धेंही विपायें, कर्में करूं ॥ १२५१ ॥
परी गंगेच्या संबंधीं, बिदी आणि महानदी,
येक तेवीं माझ्या बोधीं, शुभाशुभांसी ॥ १२५२ ॥
कां बावनें आणि धुरें, हा निवाडु तंवचि सरे,
जंव न घेपती वैश्वानरें, कवळूनि दोन्ही ॥ १२५३ ॥
ना पांचिकें आणि सोळें, हें सोनया तंवचि आलें,
जंव परिसु आंगमेळें, एकवटीना ॥ १२५४ ॥
तैसें शुभाशुभ ऐसें, हें तंवचिवरी आभासे,
जंव येकु न प्रकाशे, सर्वत्र मी ॥ १२५५ ॥
अगा रात्री आणि दिवो, हा तंवचि द्वैतभावो,
जंव न रिगिजे गांवो, गभस्तीचा ॥ १२५६ ॥
म्हणौनि माझिया भेटी, तयाचीं सर्व कर्में किरीटी,
जाऊनि बैसे तो पाटीं, सायुज्याच्या ॥ १२५७ ॥
देशें काळें स्वभावें, वेंचु जया न संभवे,
तें पद माझें पावे, अविनाश तो ॥ १२५८ ॥
किंबहुना पंडुसुता, मज आत्मयाची प्रसन्नता,
लाहे तेणें न पविजतां, लाभु कवणु असे ॥ १२५९ ॥


चेतसा सर्वकर्माणि मयि संन्यस्य मत्परः।
बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव ॥ ५७॥


याकारणें गा तुवां इया, सर्व कर्मा आपुलिया,
माझ्या स्वरूपीं धनंजया, संन्यासु कीजे ॥ १२६० ॥
परी तोचि संन्यासु वीरा, करणीयेचा झणें करा,
आत्मविवेकीं धरा, चित्तवृत्ति हे ॥ १२६१ ॥
मग तेणें विवेकबळें, आपणपें कर्मावेगळें,
माझ्या स्वरूपीं निर्मळें, देखिजेल ॥ १२६२ ॥
आणि कर्माचि जन्मभोये, प्रकृति जे का आहे,
ते आपणयाहूनि बहुवे, देखसी दूरी ॥ १२६३ ॥
तेथ प्रकृति आपणयां, वेगळी नुरे धनंजया,
रूपेंवीण का छाया, जियापरी ॥ १२६४ ॥
ऐसेनि प्रकृतिनाशु, जालया कर्मसंन्यासु,
निफजेल अनायासु, सकारणु ॥ १२६५ ॥
मग कर्मजात गेलया, मी आत्मा उरें आपणपयां,
तेथ बुद्धि घापे करूनियां, पतिव्रता ॥ १२६६ ॥
बुद्धि अनन्य येणें योगें, मजमाजीं जैं रिगे,
तैं चित्त चैत्यत्यागें, मातेंचि भजे ॥ १२६७ ॥
ऐसें चैत्यजातें सांडिलें, चित्त माझ्या ठायीं जडलें,
ठाके तैसें वहिलें, सर्वदा करी ॥ १२६८ ॥


मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि।
अथ चेत्त्वमहंकारान्न श्रोष्यसि विनण्‌क्ष्यसि ॥ ५८॥


मग अभिन्ना इया सेवा, चित्त मियांचि भरेल जेधवां,
माझा प्रसादु जाण तेधवां, संपूर्ण जाहला ॥ १२६९ ॥
तेथ सकळ दुःखधामें, भुंजीजती जियें मृत्युजन्में,
तियें दुर्गमेंचि सुगमें, होती तुज ॥ १२७० ॥
सूर्याचेनि सावायें, डोळा सावाइला होये,
तैं अंधाराचा आहे, पाडु तया ? ॥ १२७१ ॥
तैसा माझेनि प्रसादें, जीवकणु जयाचा उपमर्दे,
तो संसराचेनी बाधे, बागुलें केवीं ? ॥ १२७२ ॥
म्हणौनि धनंजया, तूं संसारदुर्गती यया,
तरसील माझिया, प्रसादास्तव ॥ १२७३ ॥
अथवा हन अहंभावें, माझें बोलणें हें आघवें,
कानामनाचिये शिंवे, नेदिसी टेंकों ॥ १२७४ ॥
तरी नित्य मुक्त अव्ययो, तूं आहासि तें होऊनि वावो,
देहसंबंधाचा घावो, वाजेल आंगीं ॥ १२७५ ॥
जया देहसंबंधा आंतु, प्रतिपदीं आत्मघातु,
भुंजतां उसंतु, कहींचि नाहीं ॥ १२७६ ॥
येवढेनि दारुणें, निमणेनवीण निमणें,
पडेल जरी बोलणें, नेघसी माझें ॥ १२७७ ॥


यदहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे।
मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति ॥ ५९॥


पथ्यद्वेषिया पोषी ज्वरु, कां दीपद्वेषिया अंधकारु,
विवेकद्वेषें अहंकारु, पोषूनि तैसा ॥ १२७८ ॥
स्वदेहा नाम अर्जुनु, परदेहा नाम स्वजनु,
संग्रामा नाम मलिनु, पापाचारु ॥ १२७९ ॥
इया मती आपुलिया, तिघां तीन नामें ययां,
ठेऊनियां धनंजया, न झुंजें ऐसा ॥ १२८० ॥
जीवामाजीं निष्टंकु, करिसी जो आत्यंतिकु,
तो वायां धाडील नैसर्गिकु, स्वभावोचि तुझा ॥ १२८१ ॥
आणि मी अर्जुन हे आत्मिक, ययां वधु करणें हें पातक,
हे मायावांचूनि तात्त्विक, कांहीं आहे ? ॥ १२८२ ॥
आधीं जुंझार तुवां होआवें, मग झुंजावया शस्त्र घेयावें,
कां न जुंझावया करावें, देवांगण ॥ १२८३ ॥
म्हणौनि न झुंजणें, म्हणसी तें वायाणें,
ना मानूं लोकपणें, लोकदृष्टीही ॥ १२८४ ॥
तऱ्ही न झुंजें ऐसें, निष्टंकीसी जें मानसें,
तें प्रकृति अनारिसें, करवीलचि ॥ १२८५ ॥


स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा।
कर्तुं नेच्छसि यन्मोहात्करिष्यस्यवशोपि तत् ॥ ६०॥


पैं पूर्वे वाहतां पाणी, पव्हिजे पश्चिमेचे वाहणीं,
तरी आग्रहोचि उरे तें आणी, आपुलिया लेखा ॥ १२८६ ॥
कां साळीचा कणु म्हणे, मी नुगवें साळीपणें,
तरी आहे आन करणें, स्वभावासी ? ॥ १२८७ ॥
तैसा क्षात्रंस्कारसिद्धा, प्रकृती घडिलासी प्रबुद्धा,
आता नुठी म्हणसी हा धांदा, परी उठवीजसीचि तूं ॥ १२८८ ॥
पैं शौर्य तेज दक्षता, एवमादिक पंडुसुता,
गुण दिधले जन्मतां, प्रकृती तुज ॥ १२८९ ॥
तरी तयाचिया समवाया\-, अनुरूप धनंजया,
न करितां उगलियां, नयेल असों ॥ १२९० ॥
म्हणौनियां तिहीं गुणीं, बांधिलासि तूं कोदंडपाणी,
त्रिशुद्धी निघसी वाहणीं, क्षात्राचिया ॥ १२९१ ॥
ना हें आपुलें जन्ममूळ, न विचारीतचि केवळ,
न झुंजें ऐसें अढळ, व्रत जरी घेसी ॥ १२९२ ॥
तरी बांधोनि हात पाये, जो रथीं घातला होये,
तो न चाले तरी जाये, दिगंता जेवीं ॥ १२९३ ॥
तैसा तूं आपुलियाकडुनी, मीं कांहींच न करीं म्हणौनि,
ठासी परी भरंवसेनि, तूंचि करिसी ॥ १२९४ ॥
उत्तरु वैराटींचा राजा, पळतां तूं कां निघालासी झुंजा ?,
हा क्षात्रस्वभावो तुझा, झुंजवील तुज ॥ १२९५ ॥
महावीर अकरा अक्षौहिणी, तुवां येकें नागविले रणांगणीं,
तो स्वभावो कोदंडपाणी, झुंजवील तूंतें ॥ १२९६ ॥
हां गा रोगु कायी रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया ?,
परी भोगविजे बळिया, अदृष्टें जेणें ॥ १२९७ ॥
तें अदृष्ट अनारिसें, न करील ईश्वरवशें,
तो ईश्वरुही असे, हृदयीं तुझ्या ॥ १२९८ ॥


ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति।
भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ ६१॥


सर्व भूतांच्या अंतरीं, हृदय महाअंबरीं,
चिद्वृत्तीच्या सहस्त्रकरीं, उदयला असे जो ॥ १२९९ ॥
अवस्थात्रय तिन्हीं लोक, प्रकाशूनि अशेख,
अन्यथादृष्टि पांथिक, चेवविले ॥ १३०० ॥
वेद्योदकाच्या सरोवरीं, फांकतां विषयकल्हारीं,
इंद्रियषट्पदा चारी, जीवभ्रमरातें ॥ १३०१ ॥
असो रूपक हें तो ईश्वरु, सकल भूतांचा अहंकारु,
पांघरोनि निरंतरु, उल्हासत असे ॥ १३०२ ॥
स्वमायेचें आडवस्त्र, लावूनि एकला खेळवी सूत्र,
बाहेरी नटी छायाचित्र, चौर्याशीं लक्ष ॥ १३०३ ॥
तया ब्रह्मादिकीटांता, अशेषांही भूतजातां,
देहाकार योग्यता, पाहोनि दावी ॥ १३०४ ॥
तेथ जें देह जयापुढें, अनुरूपपणें मांडे,
तें भूत तया आरूढे, हें मी म्हणौनि ॥ १३०५ ॥
सूत सूतें गुंतलें, तृण तृणचि बांधलें,
कां आत्मबिंबा घेतलें, बाळकें जळीं ॥ १३०६ ॥
तयापरी देहाकारें, आपणपेंचि दुसरें,
देखोनि जीव आविष्करें, आत्मबुद्धि ॥ १३०७ ॥
ऐसेनि शरीराकारीं, यंत्रीं भूतें अवधारीं,
वाहूनि हालवी दोरी, प्राचीनाची ॥ १३०८ ॥
तेथ जया जें कर्मसूत्र, मांडूनि ठेविलें स्वतंत्र,
तें तिये गती पात्र, होंचि लागे ॥ १३०९ ॥
किंबहुना धनुर्धरा, भूतांतें स्वर्गसंसारा,
\-माजीं भोवंडी तृणें वारा, आकाशीं जैसा ॥ १३१० ॥
भ्रामकाचेनि संगें, जैसें लोहो वेढा रिगे,
तैसीं ईश्वरसत्तायोगें, चेष्टती भूतें ॥ १३११ ॥
जैसे चेष्टा आपुलिया, समुद्रादिक धनंजया,
चेष्टती चंद्राचिया, सन्निधी येकीं ॥ १३१२ ॥
तया सिंधू भरितें दाटें, सोमकांता पाझरु फुटे,
कुमुदांचकोरांचा फिटे, संकोचु तो ॥ १३१३ ॥
तैसीं बीजप्रकृतिवशें, अनेकें भूतें येकें ईशें,
चेष्टवीजती तो असे, तुझ्या हृदयीं ॥ १३१४ ॥
अर्जुनपण न घेतां, मी ऐसें जें पंडुसुता,
उठतसे तें तत्वता, तयाचें रूप ॥ १३१५ ॥
यालागीं तो प्रकृतीतें, प्रवर्तवील हें निरुतें,
आणि तें झुंजवील तूंतें, न झुंजशी जऱ्ही ॥ १३१६ ॥
म्हणौनि ईश्वर गोसावी, तेणें प्रकृती हे नेमावी,
तिया सुखें राबवावीं, इंद्रियें आपुलीं ॥ १३१७ ॥
तूं करणें न करणें दोन्हीं, लाऊनि प्रकृतीच्या मानीं,
प्रकृतीही कां अधीनी, हृदयस्था जया ॥ १३१८ ॥


तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत।
तत्प्रसादात्परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् ॥ ६२॥


तया अहं वाचा चित्त आंग, देऊनिया शरण रिग,
महोदधी कां गांग, रिगालें जैसें ॥ १३१९ ॥
मग तयाचेनि प्रसादें, सर्वोपशांतिप्रमदे,
कांतु होऊनिया स्वानंदें, स्वरूपींचि रमसी ॥ १३२० ॥
संभूति जेणें संभवे, विश्रांति जेथें विसंवे,
अनुभूतिही अनुभवे, अनुभवा जया ॥ १३२१ ॥
तिये निजात्मपदींचा रावो, होऊनि ठाकसी अव्यवो,
म्हणे लक्ष्मीनाहो, पार्था तूं गा ॥ १३२२ ॥


इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया।
विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ॥ ६३॥


हें गीता नाम विख्यात, सर्ववाङ्गमयाचें मथित,
आत्मा जेणें हस्तगत, रत्न होय ॥ १३२३ ॥
ज्ञान ऐसिया रूढी, वेदांतीं जयाची प्रौढी,
वानितां कीर्ति चोखडी, पातली जगीं ॥ १३२४ ॥
बुद्ध्यादिकें डोळसें, हें जयाचें कां कडवसें,
मी सर्वद्रष्टाही दिसें, पाहला जया ॥ १३२५ ॥
तें हें गा आत्मज्ञान, मज गोप्याचेंही गुप्त धन,
परी तूं म्हणौनि आन, केवीं करूं ? ॥ १३२६ ॥
याकारणें गा पांडवा, आम्हीं आपुला हा गुह्य ठेवा,
तुज दिधला कणवा, जाकळिलेपणें ॥ १३२७ ॥
जैसी भुलली वोरसें, माय बोले बाळा दोषें,
प्रीति ही परी तैसें, न करूंचि हो ॥ १३२८ ॥
येथ आकाश आणि गाळिजे, अमृताही साली फेडिजे,
कां दिव्याकरवीं करविजे, दिव्य जैसे ॥ १३२९ ॥
जयाचेनि अंगप्रकाशें, पाताळींचा परमाणु दिसे,
तया सूर्याहि का जैसे, अंजन सूदलें ॥ १३३० ॥
तैसें सर्वज्ञेंही मियां, सर्वही निर्धारूनियां,
निकें होय तें धनंजया, सांगितलें तुज ॥ १३३१ ॥
आतां तूं ययावरी, निकें हें निर्धारीं,
निर्धारूनि करीं, आवडे तैसें ॥ १३३२ ॥
यया देवाचिया बोला, अर्जुनु उगाचि ठेला,
तेथ देवो म्हणती भला, अवंचकु होसी ॥ १३३३ ॥
वाढतयापुढें भुकेला, उपरोधें म्हणे मी धाला,
तैं तोचि पीडे आपुला, आणि दोषुही तया ॥ १३३४ ॥
तैसा सर्वज्ञु श्रीगुरु, भेटलिया आत्मनिर्धारु,
न पुसिजे जैं आभारु, धरूनियां ॥ १३३५ ॥
तैं आपणपेंचि वंचे, आणि पापही वंचनाचें,
आपणयाचि साचें, चुकविलें तेणें ॥ १३३६ ॥
पैं उगेपणा तुझिया, हा अभिप्रावो कीं धनंजया,
जें एकवेळ आवांकुनियां, सांगावें ज्ञान ॥ १३३७ ॥
तेथ पार्थु म्हणे दातारा, भलें जाणसी माझिया अंतरा,
हें म्हणों तरी दुसरा, जाणता असे काई ? ॥ १३३८ ॥
येर ज्ञेय हें जी आघवें, तूं ज्ञाता एकचि स्वभावें,
मा सूर्यु म्हणौनि वानावें, सूर्यातें काई ? ॥ १३३९ ॥
या बोला श्रीकृष्णें, म्हणितलें काय येणें,
हेंचि थोडें गा वानणें, जें बुझतासि तूं ॥ १३४० ॥


सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः।
इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम् ॥ ६४॥


तरी अवधान पघळ, करूनियाम् आणिक येक वेळ,
वाक्य माझें निर्मळ, अवधारीं पां ॥ १३४१ ॥
हें वाच्य म्हणौनि बोलिजे, कां श्राव्य मग आयिकिजे,
तैसें नव्हें परी तुझें, भाग्य बरवें ॥ १३४२ ॥
कूर्मीचिया पिलियां, दिठी पान्हा ये धनंजया,
कां आकाश वाहे बापिया, घरींचें पाणी ॥ १३४३ ॥
जो व्यवहारु जेथ न घडे, तयाचें फळचि तेथ जोडे,
काय दैवें न सांपडे, सानुकूळें ? ॥ १३४४ ॥
येऱ्हवीं द्वैताची वारी, सारूनि ऐक्याच्या परीवरीं,
भोगिजे तें अवधारीं, रहस्य हें ॥ १३४५ ॥
आणि निरुपचारा प्रेमा, विषय होय जें प्रियोत्तमा,
तें दुजें नव्हे कीं आत्मा, ऐसेंचि जाणावें ॥ १३४६ ॥
आरिसाचिया देखिलया, गोमटें कीजे धनंजया,
तें तया नोहे आपणयां, लागीं जैसें ॥ १३४७ ॥
तैसें पार्था तुझेनि मिषें, मी बोलें आपणयाचि उद्देशें,
माझ्या तुझ्या ठाईं असे, मीतूंपण गा ॥ १३४८ ॥
म्हणौनि जिव्हारींचें गुज, सांगतसे जीवासी तुज,
हें अनन्यगतीचें मज, आथी व्यसन ॥ १३४९ ॥
पैम् जळा आपणपें देतां, लवण भुललें पंडुसुता,
कीं आघवें तयाचें होतां, न लजेचि तें ॥ १३५० ॥
तैसा तूं माझ्या ठाईं, राखों नेणसीचि कांहीं,
तरी आतां तुज काई, गोप्य मी करूं ? ॥ १३५१ ॥
म्हणौनि आघवींचि गूढें, जें पाऊनि अति उघडें,
तें गोप्य माझें चोखडें, वाक्य आइक ॥ १३५२ ॥


मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु।
मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे ॥ ६५॥


तरी बाह्य आणि अंतरा, आपुलिया सर्व व्यापारा,
मज व्यापकातें वीरा, विषयो करीं ॥ १३५३ ॥
आघवा आंगीं जैसा, वायु मिळोनि आहे आकाशा,
तूं सर्व कर्मीं तैसा, मजसींचि आस ॥ १३५४ ॥
किंबहुना आपुलें मन, करीं माझें एकायतन,
माझेनि श्रवणें कान, भरूनि घालीं ॥ १३५५ ॥
आत्मज्ञानें चोखडीं, संत जे माझीं रूपडीं,
तेथ दृष्टि पडो आवडी, कामिनी जैसी ॥ १३५६ ॥
मीं सर्व वस्तीचें वसौटें, माझीं नामें जियें चोखटें,
तियें जियावया वाटे, वाचेचिये लावीं ॥ १३५७ ॥
हातांचें करणें, कां पायांचें चालणें,
तें होय मजकारणें, तैसें करीं ॥ १३५८ ॥
आपुला अथवा परावा, ठायीं उपकरसी पांडवा,
तेणें यज्ञें होईं बरवा, याज्ञिकु माझा ॥ १३५९ ॥
हें एकैक शिकऊं काई, पैं सेवकें आपुल्या ठाईं,
उरूनि येर सर्वही, मी सेव्यचि करीं ॥ १३६० ॥
तेथ जाऊनिया भूतद्वेषु, सर्वत्र नमवैन मीचि एकु,
ऐसेनि आश्रयो आत्यंतिकु, लाहसी तूं माझा ॥ १३६१ ॥
मग भरलेया जगाआंतु, जाऊनि तिजयाची मातु,
होऊनि ठायील एकांतु, आम्हां तुम्हां ॥ १३६२ ॥
तेव्हां भलतिये आवस्थे, मी तूतें तूं मातें,
भोगिसी ऐसें आइतें, वाढेल सुख ॥ १३६३ ॥
आणि तिजें आडळ करितें, निमालें अर्जुना जेथें,
तें मीचि म्हणौनि तूं मातें, पावसी शेखीं ॥ १३६४ ॥
जैसी जळींची प्रतिभा, जळनाशीं बिंबा,
येतां गाभागोभा, कांहीं आहे ? ॥ १३६५ ॥
पैं पवनु अंबरा, कां कल्लोळु सागरा,
मिळतां आडवारा, कोणाचा गा ? ॥ १३६६ ॥
म्हणौनि तूं आणि आम्हीं, हें दिसताहे देहधर्मीं,
मग ययाच्या विरामीं, मीचि होसी ॥ १३६७ ॥
यया बोलामाझारीं, होय नव्हे झणें करीं,
येथ आन आथी तरी, तुझीचि आण ॥ १३६८ ॥
पैं तुझी आण वाहणें, हें आत्मलिंगातें शिवणें,
प्रीतीची जाति लाजणें, आठवों नेदी ॥ १३६९ ॥
येऱ्हवीं वेद्यु निष्प्रपंचु, जेणें विश्वाभासु हा साचु,
आज्ञेचा नटनाचु, काळातें जिणें ॥ १३७० ॥
तो देवो मी सत्यसंकल्पु, आणि जगाच्या हितीं बापु,
मा आणेचा आक्षेपु, कां करावा ? ॥ १३७१ ॥
परी अर्जुना तुझेनि वेधें, मियां देवपणाचीं बिरुदें,
सांडिलीं गा मी हे आधें, सगळेनि तुवां ॥ १३७२ ॥
पैं काजा आपुलिया, रावो आपुली आपणया,
आण वाहे धनंजया, तैसें हें कीं ॥ १३७३ ॥
तेथ अर्जुनु म्हणे देवें, अचाट हें न बोलावें,
जे आमचें काज नांवें, तुझेनि एके ॥ १३७४ ॥
यावरी सांगों बैससी, कां सांगतां भाषही देसी,
या तुझिया विनोदासी, पारु आहे जी ? ॥ १३७५ ॥
कमळवना विकाशु, करी रवीचा एक अंशु,
तेथ आघवाचि प्रकाशु, नित्य दे तो ॥ १३७६ ॥
पृथ्वी निवऊनि सागर, भरीजती येवढें थोर,
वर्षे तेथ मिषांतर, चातकु कीं ॥ १३७७ ॥
म्हणौनि औदार्या तुझेया, मज निमित्त ना म्हणावया,
प्राप्ति असे दानीराया, कृपानिधी ॥ १३७८ ॥
तंव देवो म्हणती राहें, या बोलाचा प्रस्तावो नोहे,
पैं मातें पावसी उपायें, साचचि येणें ॥ १३७९ ॥
सैंधव सिंधू पडलिया, जो क्षणु धनंजया,
तेणें विरेचि कीं उरावया, कारण कायी ? ॥ १३८० ॥
तैसें सर्वत्र मातें भजतां, सर्व मी होतां अहंता,
निःशेष जाऊनि तत्वता, मीचि होसी ॥ १३८१ ॥
एवं माझिये प्राप्तीवरी, कर्मालागोनि अवधारीं,
दाविली तुज उजरी, उपायांची ॥ १३८२ ॥
जे आधीं तंव पंडुसुता, सर्व कर्में मज अर्पितां,
सर्वत्र प्रसन्नता, लाहिजे माझी ॥ १३८३ ॥
पाठीं माझ्या इये प्रसादीं, माझें ज्ञान जाय सिद्धी,
तेणें मिसळिजे त्रिशुद्धी, स्वरूपीं माझ्या ॥ १३८४ ॥
मग पार्था तिये ठायीं, साध्य साधन होय नाहीं,
किंबहुना तुज कांहीं, उरेचि ना ॥ १३८५ ॥
तरी सर्व कर्में आपलीं, तुवां सर्वदा मज अर्पिलीं,
तेणें प्रसन्नता लाधली, आजि हे माझी ॥ १३८६ ॥
म्हणौनि येणें प्रसादबळें, नव्हे झुंजाचेनि आडळें,
न ठाकेचि येकवेळे, भाळलों तुज ॥ १३८७ ॥
जेणें सप्रपंच अज्ञान जाये, एकु मी गोचरु होये,
तें उपपत्तीचेनि उपायें, गीतारूप हें ॥ १३८८ ॥
मियां ज्ञान तुज आपुलें, नानापरी उपदेशिलें,
येणें अज्ञानजात सांडी वियालें, धर्माधर्म जें ॥ १३८९ ॥


सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्ष्ययिष्यामि मा शुचः ॥ ६६॥


आशा जैसी दुःखातें, व्यालीं निंदा दुरितें,
हे असो जैसें दैन्यातें, दुर्भगत्व ॥ १३९० ॥
तैसें स्वर्गनरकसूचक, अज्ञान व्यालें धर्मादिक,
तें सांडूनि घालीं अशेख, ज्ञानें येणें ॥ १३९१ ॥
हातीं घेऊन तो दोरु, सांडिजे जैसा सर्पाकारु,
कां निद्रात्यागें घराचारु, स्वप्नींचा जैसा ॥ १३९२ ॥
नाना सांडिलेनि कवळें, चंद्रींचें धुये पिंवळें,
व्याधित्यागें कडुवाळें\-, पण मुखाचें ॥ १३९३ ॥
अगा दिवसा पाठीं देउनी, मृगजळ घापे त्यजुनी,
कां काष्ठत्यागें वन्ही, त्यजिजे जैसा ॥ १३९४ ॥
तैसें धर्माधर्माचें टवाळ, दावी अज्ञान जें कां मूळ,
तें त्यजूनि त्यजीं सकळ, धर्मजात ॥ १३९५ ॥
मग अज्ञान निमालिया, मीचि येकु असे अपैसया,
सनिद्र स्वप्न गेलया, आपणपें जैसें ॥ १३९६ ॥
तैसा मी एकवांचूनि कांहीं, मग भिन्नाभिन्न आन नाहीं,
सोऽहंबोधें तयाच्या ठायीं, अनन्यु होय ॥ १३९७ ॥
पैंं आपुलेनि भेदेंविण, माझें जाणिजे जें एकपण,
तयाचि नांव शरण, मज यीणें गा ॥ १३९८ ॥
जैसें घटाचेनि नाशें, गगनीं गगन प्रवेशे,
मज शरण येणें तैसें, ऐक्य करी ॥ १३९९ ॥
सुवर्णमणि सोनया, ये कल्लोळु जैसा पाणिया,
तैसा मज धनंजया, शरण ये तूं ॥ १४०० ॥
वांचूनि सागराच्या पोटीं, वडवानळु शरण आला किरीटी,
जाळूनि ठाके तया गोठी, वाळूनि दे पां ॥ १४०१ ॥
मजही शरण रिघिजे, आणि जीवत्वेंचि असिजे,
धिग् बोली यिया न लजे, प्रज्ञा केवीं ॥ १४०२ ॥
अगा प्राकृताही राया, आंगीं पडे जें धनंजया,
तें दासिरूंहि कीं तया, समान होय ॥ १४०३ ॥
मा मी विश्वेश्वरु भेटे, आणि जीवग्रंथी न सुटे,
हे बोल नको वोखटें, कानीं लाऊं ॥ १४०४ ॥
म्हणौनि मी होऊनि मातें, सेवणें आहे आयितें,
तें करीं हातां येतें, ज्ञानें येणें ॥ १४०५ ॥
मग ताकौनियां काढिलें, लोणी मागौतें ताकीं घातलें,
परी न घेपेचि कांहींं केलें, तेणें जेवीं ॥ १४०६ ॥
तैसें अद्वयत्वें मज, शरण रिघालिया तुज,
धर्माधर्म हे सहज, लागतील ना ॥ १४०७ ॥
लोह उभें खाय माती, तें परीसाचिये संगतीं,
सोनें जालया पुढती, न शिविजे मळें ॥ १४०८ ॥
हें असो काष्ठापासोनि, मथूनि घेतलिया वन्ही,
मग काष्ठेंही कोंडोनी, न ठके जैसा ॥ १४०९ ॥
अर्जुना काय दिनकरु, देखत आहे अंधारु,
कीं प्रबोधीं होय गोचरु, स्वप्नभ्रमु, ॥ १४१० ॥
तैसें मजसी येकवटलेया, मी सर्वरूप वांचूनियां,
आन कांहीं उरावया, कारण असे ? ॥ १४११ ॥
म्हणौनि तयाचें कांहीं, चिंतीं न आपुल्या ठायीं,
तुझें पापपुण्य पाहीं, मीचि होईन ॥ १४१२ ॥
तेथ सर्वबंधलक्षणें, पापें उरावें दुजेपणें,
तें माझ्या बोधीं वायाणें, होऊनि जाईल ॥ १४१३ ॥
जळीं पडिलिया लवणा, सर्वही जळ होईल विचक्षणा,
तुज मी अनन्यशरणा, होईन तैसा ॥ १४१४ ॥
येतुलेनि आपैसया, सुटलाचि आहसी धनंजया,
घेईं मज प्रकाशोनियां, सोडवीन तूंतें ॥ १४१५ ॥
याकारणें पुढती, हे आधी न वाहे चित्तीं,
मज एकासि ये सुमती, जाणोनि शरण ॥ १४१६ ॥
ऐसें सर्वरूपरूपसें, सर्वदृष्टिडोळसें,
सर्वदेशनिवासें, बोलिलें श्रीकृष्णें ॥ १४१७ ॥
मग सांवळा सकंकणु, बाहु पसरोनि दक्षिणु,
आलिंगिला स्वशरणु, भक्तराजु तो ॥ १४१८ ॥
न पवतां जयातें, काखे सूनि बुद्धीतें,
बोंलणें मागौतें, वोसरलें ॥ १४१९ ॥
ऐसें जें कांहीं येक, बोला बुद्धीसिही अटक,
तें द्यावया मिष, खेवाचें केलें ॥ १४२० ॥
हृदया हृदय येक जाले, ये हृदयींचें ते हृदयीं घातलें,
द्वैत न मोडितां केलें, आपणा{ऐ}सें अर्जुना ॥ १४२१ ॥
दीपें दीप लाविला, तैसा परीष्वंगु तो जाला,
द्वैत न मोडितां केला, आपणपें पार्थुं ॥ १४२२ ॥
तेव्हां सुखाचा मग तया, पूरु आला जो धनंजया,
तेथ वाडु तऱ्हीं बुडोनियां ॥ ठेला देवो ॥ १४२३॥
सिंधु सिंधूतें पावों जाये, तें पावणें ठाके दुणा होये,
वरी रिगे पुरवणिये, आकाशही ॥ १४२४ ॥
तैसें तयां दोघांचें मिळणें, दोघां नावरे जाणावें कवणें,
किंबहुना श्रीनारायणें, विश्व कोंदलें ॥ १४२५ ॥
एवं वेदाचें मूळसूत्र, सर्वाधिकारैकपवित्र,
श्रीकृष्णें गीताशास्त्र, प्रकट केलें ॥ १४२६ ॥
येथ गीता मूळ वेदां, ऐसें केवीं पां आलें बोधा,
हें म्हणाल तरी प्रसिद्धा, उपपत्ति सांगों ॥ १४२७ ॥
तरी जयाच्या निःश्वासीं, जन्म झाले वेदराशी,
तो सत्यप्रतिज्ञ पैजेसीं, बोलला स्वमुखें ॥ १४२८ ॥
म्हणौनि वेदां मूळभूत, गीता म्हणों हें होय उचित,
आणिकही येकी येथ, उपपत्ति असे ॥ १४२९ ॥
जें न नशतु स्वरूपें, जयाचा विस्तारु जेथ लपे,
तें तयांचें म्हणिपे, बीज जगीं ॥ १४३० ॥
तरी कांडत्रयात्मकु, शब्दराशी अशेखु,
गीतेमाजीं असे रुखु, बीजीं जैसा ॥ १४३१ ॥
म्हणौनि वेदांचें बीज, श्रीगीता होय हें मज,
गमे आणि सहज, दिसतही आहे ॥ १४३२ ॥
जे वेदांचे तिन्ही भाग, गीते उमटले असती चांग,
भूषणरत्नीं सर्वांग, शोभलें जैसें ॥ १४३३ ॥
तियेचि कर्मादिकें तिन्ही, कांडें कोणकोणे स्थानीं,
गीते आहाति तें नयनीं, दाखऊं आईक ॥ १४३४ ॥
तरी पहिला जो अध्यावो, तो शास्त्रप्रवृत्तिप्रस्तावो,
द्वितीयीं साङ्ख्यसद्भावो, प्रकाशिला ॥ १४३५ ॥
मोक्षदानीं स्वतंत्र, ज्ञानप्रधान हें शास्त्र,
येतुलालें दुजीं सूत्र, उभारिलें ॥ १४३६ ॥
मग अज्ञानें बांधलेयां, मोक्षपदीं बैसावया,
साधनारंभु तो तृतीया\-, ध्यायीं बोलिला ॥ १४३७ ॥
जे देहाभिमान बंधें, सांडूनि काम्यनिषिद्धें,
विहित परी अप्रमादें, अनुष्ठावें ॥ १४३८ ॥
ऐसेनि सद्भावें कर्म करावें, हा तिजा अध्यावो जो देवें,
निर्णय केला तें जाणावें, कर्मकांड येथ ॥ १४३९ ॥
आणि तेंचि नित्यादिक, अज्ञानाचें आवश्यक,
आचरतां मोंचक, केवीं होय पां ॥ १४४० ॥
ऐसी अपेक्षा जालिया, बद्ध मुमुक्षुते आलिया,
देवें ब्रह्मार्पणत्वें क्रिया, सांगितली ॥ १४४१ ॥
जे देहवाचामानसें, विहित निपजे जें जैसें,
तें एक ईश्वरोद्देशें, कीजे म्हणितलें ॥ १४४२ ॥
हेंचि ईश्वरीं कर्मयोगें, भजनकथनाचें खागें,
आदरिलें शेषभागें, चतुर्थाचेनी ॥ १४४३ ॥
तें विश्वरूप अकरावा, अध्यावो संपे जंव आघवा,
तंव कर्में ईशु भजावा, हें जें बोलिलें ॥ १४४४ ॥
तें अष्टाध्यायीं उघड, जाण येथें देवताकांड,
शास्त्र सांगतसे आड, मोडूनि बोलें ॥ १४४५ ॥
आणि तेणेंचि ईशप्रसादें, श्रीगुरुसंप्रदायलब्धें,
साच ज्ञान उद्बोधे, कोंवळें जें ॥ १४४६ ॥
तें अद्वेष्टादिप्रभृतिकीं, अथवा अमानित्वादिकीं,
वाढविजे म्हणौनि लेखी, बारावा गणूं ॥ १४४७ ॥
तो बारावा अध्याय आदी, आणि पंधरावा अवधी,
ज्ञानफळपाकसिद्धी, निरूपणासीं ॥ १४४८ ॥
म्हणौनि चहूंही इहीं, ऊर्ध्वमूळांतीं अध्यायीं,
ज्ञानकांड ये ठायीं, निरूपिजे ॥ १४४९ ॥
एवं कांडत्रयनिरूपणी, श्रुतीचि हे कोडिसवाणी,
गीतापद्यरत्नांचीं लेणीं, लेयिली आहे ॥ १४५० ॥
हें असो कांडत्रयात्मक, श्रुति मोक्षरूप फळ येक,
बोभावे जें आवश्यक, ठाकावें म्हणौनि ॥ १४५१ ॥
तयाचेनि साधन ज्ञानेंसीं, वैर करी जो प्रतिदिवशीं,
तो अज्ञानवर्ग षोडशीं, प्रतिपादिजे ॥ १४५२ ॥
तोचि शास्त्राचा बोळावा, घेवोनि वैरी जिणावा,
हा निरोपु तो सतरावा, अध्याय येथ ॥ १४५३ ॥
ऐसा प्रथमालागोनि, सतरावा लाणी करूनी,
आत्मनिश्वास विवरूनी, दाविला देवें ॥ १४५४ ॥
तया अर्थजातां अशेषां, केला तात्पर्याचा आवांका,
तो हा अठरावा देखा, कलशाध्यायो ॥ १४५५ ॥
एवं सकळसंख्यासिद्धु, श्रीभागवद्गीता प्रबंधु,
हा औदार्यें आगळा वेदु, मूर्तु जाण ॥ १४५६ ॥
वेदु संपन्नु होय ठाईं, परी कृपणु ऐसा आनु नाहीं,
जे कानीं लागला तिहीं, वर्णांच्याचि ॥ १४५७ ॥
येरां भवव्याथा ठेलियां, स्त्रीशूद्रादिकां प्राणियां,
अनवसरू मांडूनियां, राहिला आहे ॥ १४५८ ॥
तरी मज पाहतां तें मागील उणें, फेडावया गीतापणें,
वेदु वेठला भलतेणें, सेव्य होआवया ॥ १४५९ ॥
ना हे अर्थु रिगोनि मनीं, श्रवणें लागोनि कानीं,
जपमिषें वदनीं, वसोनियां ॥ १४६० ॥
ये गीतेचा पाठु जो जाणे, तयाचेनि सांगातीपणें,
गीता लिहोनि वाहाणें, पुस्तकमिषें ॥ १४६१ ॥
ऐसैसा मिसकटां, संसाराचा चोहटा,
गवादी घालीत चोखटा, मोक्षसुखाची ॥ १४६२ ॥
परी आकाशीं वसावया, पृथ्वीवरी बैसावया,
रविदीप्ति राहाटावया, आवारु नभ ॥ १४६३ ॥
तेवीं उत्तम अधम ऐसें, सेवितां कवणातेंही न पुसे,
कैवल्यदानें सरिसें, निववीत जगा ॥ १४६४ ॥
यालागीं मागिली कुटी, भ्याला वेदु गीतेच्या पोटीं,
रिगाला आतां गोमटी, कीर्ति पातला ॥ १४६५ ॥
म्हणौनि वेदाची सुसेव्यता, ते हे मूर्त जाण श्रीगीता,
श्रीकृष्णें पंडुसुता, उपदेशिली ॥ १४६६ ॥
परी वत्साचेनि वोरसें, दुभतें होय घरोद्देशें,
जालें पांडवाचेनि मिषें, जगदुद्धरण ॥ १४६७ ॥
चातकाचियें कणवें, मेघु पाणियेसिं धांवे,
तेथ चराचर आघवें, निवालें जेवीं ॥ १४६८ ॥
कां अनन्यगतिकमळा\-, लागीं सूर्य ये वेळोवेळां,
कीं सुखिया होईजे डोळां, त्रिभुवनींचा ॥ १४६९ ॥
तैसें अर्जुनाचेनि व्याजें, गीता प्रकाशूनि श्रीराजें,
संसारायेवढें थोर ओझें, फेडिलें जगाचें ॥ १४७० ॥
सर्वशास्त्ररत्नदीप्ती, उजळिता हा त्रिजगतीं,
सूर्यु नव्हें लक्ष्मीपती, वक्त्राकाशींचा ॥ १४७१ ॥
बाप कुळ तें पवित्र, जेथिंचा पार्थु या ज्ञाना पात्र,
जेणें गीता केलें शास्त्र, आवारु जगा ॥ १४७२ ॥
हें असो मग तेणें, सद्गुरु श्रीकृष्णें,
पार्थाचें मिसळणें, आणिलें द्वैता ॥ १४७३ ॥
पाठीं म्हणतसे पांडवा, शास्त्र हें मानलें कीं जीवा,
तेथ येरु म्हणे देवा, आपुलिया कृपा ॥ १४७४ ॥
तरी निधान जोडावया, भाग्य घडे गा धनंजया,
परी जोडिलें भोगावया, विपायें होय ॥ १४७५ ॥
पैं क्षीरसागरायेवढें, अविरजी दुधाचें भांडें,
सुरां असुरां केवढें, मथितां जालें ॥ १४७६ ॥
तें सायासही फळा आलें, जें अमृतही डोळां देखिलें,
परी वरिचिली चुकलें, जतनेतें ॥ १४७७ ॥
तेथ अमरत्वा वोगरिलें, तें मरणाचिलागीं जालें,
भोगों नेणतां जोडलें, ऐसें आहे ॥ १४७८ ॥
नहुषु स्वर्गाधिपति जाहला, परी राहाटीं भांबावला,
तो भुजंगत्व पावला, नेणसी कायी ? ॥ १४७९ ॥
म्हणौनि बहुत पुण्य तुवां, केलें तेणें धनंजया,
आजि शास्त्रराजा इया, जालासि विषयो ॥ १४८० ॥
तरी ययाचि शास्त्राचेनि, संप्रदायें पांघुरौनि,
शास्त्रार्थ हा निकेनि, अनुष्ठीं हो ॥ १४८१ ॥
येऱ्हवीं अमृतमंथना\-, सारिखें होईल अर्जुना,
जरी रिघसी अनुष्ठाना, संप्रदायेंवीण ॥ १४८२ ॥
गाय धड जोडे गोमटी, ते तैंचि पिवों ये किरीटी,
जैं जाणिजे हातवटी, सांजवणीची ॥ १४८३ ॥
तैसा श्रीगुरु प्रसन्न होये, शिष्य विद्याही कीर लाहे,
परी ते फळे संप्रदायें, उपासिलिया ॥ १४८४ ॥
म्हणौनि शास्त्रीं जो इये, उचितु संप्रदायो आहे,
तो ऐक आतां बहुवें, आदरेंसीं ॥ १४८५ ॥


इदं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन।
न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति ॥ ६७॥


तरी तुवां हें जें पार्था, गीताशास्त्र लाधलें आस्था,
तें तपोहीना सर्वथा, सांगावें ना हो ॥ १४८६ ॥
अथवा तापसुही जाला, परी गुरूभक्तीं जो ढिला,
तो वेदीं अंत्यजु वाळिळा, तैसा वाळीं ॥ १४८७ ॥
नातरी पुरोडाशु जैसा, न घापे वृद्ध तरी वायसा,
गीता नेदी तैसी तापसा, गुरुभक्तिहीना ॥ १४८८ ॥
कां तपही जोडे देहीं, भजे गुरुदेवांच्या ठायीं,
परी आकर्णनीं नाहीं, चाड जरी ॥ १४८९ ॥
तरी मागील दोन्हीं आंगीं, उत्तम होय कीर जगीं,
परी या श्रवणालागीं, योग्यु नोहे ॥ १४९० ॥
मुक्ताफळ भलतैसें, हो परी मुख नसे,
तंव गुण प्रवेशे, तेथ कायी ? ॥ १४९१ ॥
सागरु गंभीरु होये, हें कोण ना म्हणत आहे,
परी वृष्टि वायां जाये, जाली तेथ ॥ १४९२ ॥
धालिया दिव्यान्न सुवावें, मग जें वायां धाडावें,
तें आर्तीं कां न करावें, उदारपण ॥ १४९३ ॥
म्हणौनि योग्य भलतैसें, होतु परी चाड नसे,
तरी झणें वानिवसें, देसी हें तयां ॥ १४९४ ॥
रूपाचा सुजाणु डोळा, वोढवूं ये कायि परिमळा ?,
जेथ जें माने ते फळा, तेथचि ते गा ॥ १४९५ ॥
म्हणौनि तपी भक्ति, पाहावे ते सुभद्रापती,
परी शास्त्रश्रवणीं अनासक्ती, वाळावेचि ते ॥ १४९६ ॥
नातरी तपभक्ति, होऊनि श्रवणीं आर्ति,
आथी ऐसीही आयती, देखसी जरी ॥ १४९७ ॥
तरी गीताशास्त्रनिर्मिता, जो मी सकळलोकशास्ता,
तया मातें सामान्यता, बोलेल जो ॥ १४९८ ॥
माझ्या सज्जनेंसिं मातें, पैशुन्याचेनि हातें,
येक आहाती तयांतें, योग्य न म्हण ॥ १४९९ ॥
तयांची येर आघवी, सामग्री ऐसी जाणावी,
दीपेंवीण ठाणदिवी, रात्रीची जैसी ॥ १५०० ॥
अंग गोरें आणि तरुणें, वरी लेईलें आहे लेणें,
परी येकलेनि प्राणें, सांडिलें जेवीं ॥ १५०१ ॥
सोनयाचें सुंदर, निर्वाळिलें होय घर,
परी सर्पांगना द्वार, रुंधलें आहे ॥ १५०२ ॥
निपजे दिव्यान्न चोखट, परी माजीं काळकूट,
असो मैत्री कपट\-, गर्भिणी जैसी ॥ १५०३ ॥
तैसी तपभक्तिमेधा, तयाची जाण प्रबुद्धा,
जो माझयांची कां निंदा, माझीचि करी ॥ १५०४ ॥
याकारणें धनंजया, तो भक्तु मेधावीं तपिया,
तरी नको बापा इया, शास्त्रा आतळों देवों ॥ १५०५ ॥
काय बहु बोलों निंदका, योग्य स्रष्टयाहीसारिखा,
गीता हे कवतिका\-, लागींही नेदीं ॥ १५०६ ॥
म्हणौनि तपाचा धनुर्धरा, तळीं दाटोनि गाडोरा,
वरी गुरुभक्तीचा पुरा, प्रासादु जो जाला ॥ १५०७ ॥
आणि श्रवणेच्छेचा पुढां, दारवंटा सदा उघडा,
वरी कलशु चोखडा, अनिंदारत्नांचा ॥ १५०८ ॥


य इदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति।
भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्यसंशयः ॥ ६८॥


ऐशा भक्तालयीं चोखटीं, गीतारत्नेश्वरु हा प्रतिष्ठीं,
मग माझिया संवसाटी, तुकसी जगीं ॥ १५०९ ॥
कां जे एकाक्षरपणेंसीं, त्रिमात्रकेचिये कुशीं,
प्रणवु होतां गर्भवासीं, सांकडला ॥ १५१० ॥
तो गीतेचिया बाहाळींं, वेदबीज गेलें पाहाळी.ण्,
कीं गायत्री फुलींफळीं, श्लोकांच्या आली ॥ १५११ ॥
ते हे मंत्ररहय गीता, मेळवी जो माझिया भक्ता,
अनन्यजीवना माता, बाळका जैसी ॥ १५१२ ॥
तैसी भक्तां गीतेसीं, भेटी करी जो आदरेंसीं,
तो देहापाठीं मजसीं, येकचि होय ॥ १५१३ ॥


न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः।
भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि ॥ ६९॥


आणि देहाचेंही लेणें, लेऊनि वेगळेपणें,
असे तंव जीवेंप्राणें, तोचि पढिये ॥ १५१४ ॥
ज्ञानियां कर्मठां तापसां, यया खुणेचिया माणुसां\-,
माजीं तो येकु गा जैसा, पढिये मज ॥ १५१५ ॥
तैसा भूतळीं आघवा, आन न देखे पांडवा,
जो गीता सांगें मेळावा, भक्तजनांचा ॥ १५१६ ॥
मज ईश्वराचेनि लोभें, हे गीता पढतां अक्षोभें,
जो मंडन होय सभे, संतांचिये ॥ १५१७ ॥
नेत्रपल्लवीं रोमांचितु, मंदानिळें कांपवितु,
आमोदजळें वोलवितु, फुलांचे डोळें ॥ १५१८ ॥
कोकिळा कलरवाचेनि मिषें, सद्गद बोलवीत जैसें,
वसंत का प्रवेशे, मद्भक्त आरामीं ॥ १५१९ ॥
कां जन्माचें फळ चकोरां, होत जैं चंद्र ये अंबरा,
नाना नवघन मयूरां, वो देत पावे ॥ १५२० ॥
तैसा सज्जनांच्या मेळापीं, गीतापद्यरत्नीं उमपीं,
वर्षे जो माझ्या रूपीं, हेतु ठेऊनि ॥ १५२१ ॥
मग तयाचेनि पाडें, पढियंतें मज फुडें,
नाहींचि गा मागेंपुढें, न्याहाळितां ॥ १५२२ ॥
अर्जुना हा ठायवरी, मी तयातें सूयें जिव्हारीं,
जो गीतार्थाचें करी, परगुणें संतां ॥ १५२३ ॥


अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः।
ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टः स्यामिति मे मतिः ॥ ७०॥


पैं माझिया तुझिया मिळणीं, वाढिनली जे हे कहाणी,
मोक्षधर्म का जिणीं, आलासे जेथें ॥ १५२४ ॥
तो हा सकळार्थप्रबोधु, आम्हां दोघांचा संवादु,
न करितां पदभेदु, पाठेंचि जो पढे ॥ १५२५ ॥
तेणें ज्ञानानळीं प्रदीप्तीं, मूळ अविद्येचिया आहुती,
तोषविला होय सुमती, परमात्मा मी ॥ १५२६ ॥
घेऊनि गीतार्थ उगाणा, ज्ञानिये जें विचक्षणा,
ठाकती तें गाणावाणा, गीतेचा तो लाहे ॥ १५२७ ॥
गीता पाठकासि असे, फळ अर्थज्ञाचि सरिसें,
गीता माउलियेसि नसे, जाणें तान्हें ॥ १५२८ ॥


श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः।
सोऽपि मुक्तः शुभा.ण्ल्लोकान्प्राप्नुयात्पुण्यकर्मणाम् ॥ ७१॥


आणि सर्वमार्गीं निंदा, सांडूनि आस्था पैं शुद्धा,
गीताश्रवणीं श्रद्धा, उभारी जो ॥ १५२९ ॥
तयाच्या श्रवणपुटीं, गीतेचीं अक्षरें जंव पैठीं,
होतीना तंव उठाउठीं, पळेचि पाप ॥ १५३० ॥
अटवियेमाजीं जैसा, वन्हि रिघतां सहसा,
लंघिती का दिशा, वनौकें तियें ॥ १५३१ ॥
कां उदयाचळकुळीं, झळकतां अंशुमाळी,
तिमिरें अंतराळीं, हारपती ॥ १५३२ ॥
तैसा कानाच्या महाद्वारीं, गीता गजर जेथ करी,
तेथ सृष्टीचिये आदिवरी, जायचि पाप ॥ १५३३ ॥
ऐसी जन्मवेली धुवट, होय पुण्यरूप चोखट,
याहीवरी अचाट, लाहे फळ ॥ १५३४ ॥
जें इये गीतेचीं अक्षरें, जेतुलीं कां कर्णद्वारें,
रिघती तेतुले होती पुरे, अश्वमेध कीं ॥ १५३५ ॥
म्हणौनि श्रवणें पापें जाती, आणि धर्म धरी उन्नती,
तेणें स्वर्गराज संपत्ती, लाहेचि शेखीं ॥ १५३६ ॥
तो पैं मज यावयालागीं, पहिलें पेणें करी स्वर्गीं,
मग आवडे तंव भोगी, पाठीं मजचि मिळे ॥ १५३७ ॥
ऐसी गीता धनंजया, ऐकतया आणि पढतया,
फळे महानंदें मियां, बहु काय बोलों ॥ १५३८ ॥
याकारणें हें असो, परी जयालागीं शास्त्रातिसो,
केला तें तंव तुज पुसों, काज तुझें ॥ १५३९ ॥


कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा।
कच्चिदज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनञ्जय ॥ ७२॥


तरी सांग पां पांडवा, हा शास्त्रसिद्धांतु आघवा,
तुज एकचित्तें फावा, गेला आहे ? ॥ १५४० ॥
आम्हीं जैसें जया रीतीं, उगाणिलें कानांच्या हातीं,
येरीं तैसेंचि तुझ्या चित्तीं, पेठें केलें कीं ? ॥ १५४१ ॥
अथवा माझारीं, गेलें सांडीविखुरी,
किंवा उपेक्षेवरी, वाळूनि सांडिलें, ॥ १५४२ ॥
जैसें आम्हीं सांगितलें, तैसेंचि हृदयीं फावलें,
तरी सांग पां वहिलें, पुसेन तें मी ॥ १५४३ ॥
तरी स्वाज्ञानजनितें, मागिलें मोहें तूतें,
भुलविलें तो येथें, असे कीं नाहीं ? ॥ १५४४ ॥
हें बहु पुसों काई, सांगें तूं आपल्या ठायीं,
कर्माकर्म कांहीं, देखतासी ? ॥ १५४५ ॥
पार्थु स्वानंदैकरसें, विरेल ऐसा भेददशे,
आणिला येणें मिषें, प्रश्नाचेनि ॥ १५४६ ॥
पूर्णब्रह्म जाला पार्थु, तरी पुढील साधावया कार्यार्थु,
मर्यादा श्रीकृष्णनाथु, उल्लंघों नेदी ॥ १५४७ ॥
येऱ्हवीं आपुलें करणें, सर्वज्ञ काय तो नेणें ?,
परी केलें पुसणें, याचि लागीं ॥ १५४८ ॥
एवं करोनियां प्रश्न, नसतेंचि अर्जुनपण,
आणूनियां जालें पूर्णपण, तें बोलवी स्वयें ॥ १५४९ ॥
मग क्षीराब्धीतें सांडितु, गगनीं पुंजु मंडितु,
निवडे जैसा न निवडितु, पूर्णचंद्रु ॥ १५५० ॥
तैसा ब्रह्म मी हें विसरे, तेथ जगचि ब्रह्मत्वें भरे,
हेंही सांडी तरी विरे, ब्रह्मपणही ॥ १५५१ ॥
ऐसा मोडतु मांडतु ब्रह्में, तो दुःखें देहाचिये सीमे,
मी अर्जुन येणें नामें, उभा ठेला ॥ १५५२ ॥
मग कांपतां करतळीं, दडपूनि रोमावळी,
पुलिका स्वेदजळीं, जिरऊनियां ॥ १५५३ ॥
प्राणक्षोभें डोलतया, आंगा आंगचि टेंकया,
सूनि स्तंभु चाळया, भुलौनियां ॥ १५५४ ॥
नेत्रयुगुळाचेनि वोतें, आनंदामृताचें भरितें,
वोसंडत तें मागुतें, काढूनियां ॥ १५५५ ॥
विविधा औत्सुक्यांची दाटी, चीप दाटत होती कंठीं,
ते करूनियां पैठी, हृदयामाजीं ॥ १५५६ ॥
वाचेचें वितुळणें, सांवरूनि प्राणें,
अक्रमाचें श्वसणें, ठेऊनि ठायीं ॥ १५५७ ॥


अर्जुन उवाच।
नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत।
स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ॥ ७३॥


मग अर्जुन म्हणे काय देवो, पुसताति आवडे मोहो,
तरी तो सकुटुंब गेला जी ठावो, घेऊनि आपला ॥ १५५८ ॥
पासीं येऊनि दिनकरें, डोळ्यातें अंधारें,
पुसिजे हें कायि सरे, कोणे गांवीं ? ॥ १५५९ ॥
तैसा तूं श्रीकृष्णराया, आमुचिया डोळयां,
गोचर हेंचि कायिसया, न पुरे तंव ॥ १५६० ॥
वरी लोभें मायेपासूनी, तें सांगसी तोंड भरूनी,
जें कायिसेनिही करूनी, जाणूं नये ॥ १५६१ ॥
आतां मोह असे कीं नाहीं, हें ऐसें जी पुससी काई,
कृतकृत्य जाहलों पाहीं, तुझेपणें ॥ १५६२ ॥
गुंतलों होतों अर्जुनगुणें, तो मुक्त जालों तुझेपणें,
आतां पुसणें सांगणें, दोन्ही नाहीं ॥ १५६३ ॥
मी तुझेनि प्रसादें, लाधलेनि आत्मबोधें,
मोहाचे तया कांदे, नेदीच उरों ॥ १५६४ ॥
आतां करणें कां न करणें, हें जेणें उठी दुजेपणें,
तें तूं वांचूनि नेणें, सर्वत्र गा ॥ १५६५ ॥
ये विषयीं माझ्या ठायीं, संदेहाचे नुरेचि कांहीं,
त्रिशुद्धि कर्म जेथ नाहीं, तें मी जालों ॥ १५६६ ॥
तुझेनि मज मी पावोनी, कर्तव्य गेलें निपटूनी,
परी आज्ञा तुझी वांचोनि, आन नाहीं प्रभो ॥ १५६७ ॥
कां जें दृश्य दृश्यातें नाशी, जें दुजें द्वैतातें ग्रासी,
जें एक परी सर्वदेशीं, वसवी सदा ॥ १५६८ ॥
जयाचेनि संबंधें बंधु फिटे, जयाचिया आशा आस तुटे,
जें भेटलया सर्व भेटे, आपणपांचि ॥ १५६९ ॥
तें तूं गुरुलिंग जी माझें, जें येकलेपणींचें विरजें,
जयालागीं वोलांडिजे, अद्वैतबोधु ॥ १५७० ॥
आपणचि होऊनि ब्रह्म, सारिजे कृत्याकृत्यांचें काम,
मग कीजे का निःसीम, सेवा जयाची ॥ १५७१ ॥
गंगा सिंधू सेवूं गेली, पावतांचि समुद्र जाली,
तेवीं भक्तां सेल दिधली, निजपदाची ॥ १५७२ ॥
तो तूं माझा जी निरुपचारु, श्रीकृष्णा सेव्य सद्गुरु,
मा ब्रह्मतेचा उपकारु, हाचि मानीं ॥ १५७३ ॥
जें मज तुम्हां आड, होतें भेदाचें कवाड,
तें फेडोनि केलें गोड, सेवासुख ॥ १५७४ ॥
तरी आतां तुझी आज्ञा, सकळ देवाधिदेवराज्ञा,
करीन देईं अनुज्ञा, भलतियेविषयीं ॥ १५७५ ॥
यया अर्जुनाचिया बोला, देवो नाचे सुखें भुलला,
म्हणे विश्वफळा जाला, फळ हा मज ॥ १५७६ ॥
उणेनि उमचला सुधाकरु, देखुनी आपला कुमरु,
मर्यादा क्षीरसागरु, विसरेचिना ? ॥ १५७७ ॥
ऐसे संवादाचिया बहुलां, लग्न दोघांचियां आंतुला,
लागलें देखोनि जाला, निर्भरु संजयो ॥ १५७८ ॥
तेणें म्हणतसे संजयो, बाप कृपानिधी रावो,
तो आपुला मनोभावो, अर्जुनेंसी केला ॥ १५७९ ॥
तेणें उचंबळलेपणें, संजय धृतराष्ट्रातें म्हणे,
जी कैसे बादरायणें, रक्षिलों दोघे ? ॥ १५८० ॥
आजि तुमतें अवधारा, नाहीं चर्मचक्षूही संसारा,
कीं ज्ञानदृष्टिव्यवहारा आणिलेती ॥ १५८१ ॥
आणि रथींचिये राहाटी, घेई जो घोडेयासाठीं,
तया आम्हां या गोष्टी, गोचरा होती ॥ १५८२ ॥
वरी जुंझाचें निर्वाण, मांडलें असे दारुण,
दोहीं हारीं आपण, हारपिजे जैसें ॥ १५८३ ॥
येवढा जिये सांकडां, कैसा अनुग्रहो पैं गाढा,
जे ब्रह्मानंदु उघडा, भोगवीतसे ॥ १५८४ ॥
ऐसें संजय बोलिला, परी न द्रवे येरु उगला,
चंद्रकिरणीं शिवतला, पाषाणु जैसा ॥ १५८५ ॥
हे देखोनि तयाची दशा, मग करीचिना सरिसा,
परी सुखें जाला पिसा, बोलतसे ॥ १५८६ ॥
भुलविला हर्षवेगें, म्हणौनि धृतराष्ट्रा सांगे,
येऱ्हवीं नव्हे तयाजोगें, हें कीर जाणें ॥ १५८७ ॥


सञ्जय उवाच।
इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः।
संवादमिममश्रौषमद्भुतं रोमहर्षणम् ॥ ७४॥


मग म्हणे पैं कुरुराजा, ऐसा बंधुपुत्र तो तुझा,
बोलिला तें अधोक्षजा, गोड जालें ॥ १५८८ ॥
अगा पूर्वापर सागर, ययां नामसीचि सिनार,
येर आघवें तें नीर, एक जैसें ॥ १५८९ ॥
तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसें, हें आंगाचिपासीं दिसे,
मग संवादीं जी नसे, कांहींचि भेदु ॥ १५९० ॥
पैं दर्पणाहूनि चोखें, दोन्ही होती सन्मुखें,
तेथ येरी येर देखे, आपणपें जैसें ॥ १५९१ ॥
तैसा देवेसीं पंडुसुतु, आपणपें देवीं देखतु,
पांडवेंसीं देखे अनंतु, आपणपें पार्थीं ॥ १५९२ ॥
देव देवो भक्तालागीं, जिये विवरूनि देखे आंगीं,
येरु तियेचेही भागीं, दोन्ही देखे ॥ १५९३ ॥
आणिक कांहींच नाहीं, म्हणौनि करिती काई,
दोघे येकपणें पाहीं, नांदताती ॥ १५९४ ॥
आतां भेदु जरी मोडे, तरी प्रश्नोत्तर कां घडे ?,
ना भेदुचि तरी जोडे, संवादसुख कां ? ॥ १५९५ ॥
ऐसें बोलतां दुजेपणें, संवादीं द्वैत गिळणें,
तें ऐकिलें बोलणें, दोघांचें मियां ॥ १५९६ ॥
उटूनि दोन्ही आरिसे, वोडविलीया सरिसे,
कोण कोणा पाहातसे, कल्पावें पां ? ॥ १५९७ ॥
कां दीपासन्मुखु, ठेविलया दीपकु,
कोण कोणा अर्थिकु, कोण जाणें ॥ १५९८ ॥
नाना अर्कापुढें अर्कु, उदयलिया आणिकु,
कोण म्हणे प्रकाशकु, प्रकाश्य कवण ? ॥ १५९९ ॥
हें निर्धारूं जातां फुडें, निर्धारासि ठक पडे,
ते दोघे जाले एवढे, संवादें सरिसे ॥ १६०० ॥
जी मिळतां दोन्ही उदकें, माजी लवण वारूं ठाके,
कीं तयासींही निमिखें, तेंचि होय ॥ १६०१ ॥
तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही, संवादले तें मनीं,
धरितां मजही वानी, तेंचि होतसे ॥ १६०२ ॥
ऐसें म्हणे ना मोटकें, तंव हिरोनि सात्विकें,
आठव नेला नेणों कें, संजयपणाचा ॥ १६०३ ॥
रोमांच जंव फरके, तंव तंव आंग सुरके,
स्तंभ स्वेदांतें जिंके, एकला कंपु ॥ १६०४ ॥
अद्वयानंदस्पर्शें, दिठी रसमय जाली असे,
ते अश्रु नव्हती जैसें, द्रवत्वचि ॥ १६०५ ॥
नेणों काय न माय पोटीं, नेणों काय गुंफे कंठीं,
वागर्था पडत मिठी, उससांचिया ॥ १६०६ ॥
किंबहुना सात्विकां आठां, चाचरु मांडतां उमेठा,
संजयो जालासे चोहटां, संवादसुखाचा ॥ १६०७ ॥
तया सुखाची ऐसी जाती, जे आपणचि धरी शांती,
मग पुढती देहस्मृती, लाधली तेणें ॥ १६०८ ॥


व्यासप्रसादाच्छ्रुतवानेतद्गुह्यमहं परम्।
योगं योगेश्वरात्कृष्णात्साक्षात्कथयतः स्वयम् ॥ ७५॥


तेव्हां बैसतेनि आनंदें, म्हणे जी जें उपनिषदें,
नेणती तें व्यासप्रसादें, ऐकिलें मियां ॥ १६०९ ॥
ऐकतांचि ते गोठी, ब्रह्मत्वाची पडिली मिठी,
मीतूंपणेंसीं दृष्टी, विरोनि गेली ॥ १६१० ॥
हे आघवेचि का योग, जया ठाया येती मार्ग,
तयाचें वाक्य सवंग, केलें मज व्यासें ॥ १६११ ॥
अहो अर्जुनाचेनि मिषें, आपणपेंचि दुजें ऐसें,
नटोनि आपणया उद्देशें, बोलिलें जें देव ॥ १६१२ ॥
तेथ कीं माझें श्रोत्र, पाटाचें जालें जी पात्र,
काय वानूं स्वतंत्र, सामर्थ्य श्रीगुरुचें ॥ १६१३ ॥


राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतम्।
केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः ॥ ७६॥


राया हें बोलतां विस्मित होये, तेणेंचि मोडावला ठाये,
रत्नीं कीं रत्नकिळा ये, झांकोळित जैसी ॥ १६१४ ॥
हिमवंतींचीं सरोवरें, चंद्रोदयीं होती काश्मीरें,
मग सूर्यागमीं माघारें, द्रवत्व ये ॥ १६१५ ॥
तैसा शरीराचिया स्मृती, तो संवादु संजय चित्तीं,
धरी आणि पुढती, तेंचि होय ॥ १६१६ ॥


तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः।
विस्मयो मे महान् राजन्हृष्यामि च पुनः पुनः ॥ ७७॥


मग उठोनि म्हणे नृपा, श्रीहरीचिया विश्वरूपा,
देखिलया उगा कां पां, असों लाहसी ? ॥ १६१७ ॥
न देखणेनि जें दिसे, नाहींपणेंचि जें असे,
विसरें आठवे तें कैसें, चुकऊं आतां, ॥ १६१८ ॥
देखोनि चमत्कारु, कीजे तो नाहीं पैसारु,
मजहीसकट महापूरु, नेत आहे ॥ १६१९ ॥
ऐसा श्रीकृष्णार्जुन-, संवाद संगमीं स्नान,
करूनि देतसे तिळदान, अहंतेचें ॥ १६२० ॥
तेथ असंवरें आनंदें, अलौकिकही कांहीं स्फुंदे,
श्रीकृष्ण म्हणे सद्गदें, वेळोवेळां ॥ १६२१ ॥
या अवस्थांची कांहीं, कौरवांतें परी नाहीं,
म्हणौनि रायें तें कांहीं, कल्पावें जंव ॥ १६२२ ॥
तंव जाला सुखलाभु, आपणया करूनि स्वयंभु,
बुझाविला अवष्टंभु, संजयें तेणें ॥ १६२३ ॥
तेथ कोणी येकी अवसरी, होआवी ते करूनि दुरी,
रावो म्हणे संजया परी, कैसी तुझी गा ? ॥ १६२४ ॥
तेणें तूंतें येथें व्यासें, बैसविलें कासया उद्देशें,
अप्रसंगामाजीं ऐसें, बोलसी काई ? ॥ १६२५ ॥
रानींचें राउळा नेलिया, दाही दिशा मानी सुनिया,
कां रात्री होय पाहलया, निशाचरां ॥ १६२६ ॥
जो जेथिंचें गौरव नेणें, तयासि तें भिंगुळवाणें,
म्हणौनि अप्रसंगु तेणें, म्हणावा कीं तो ॥ १६२७ ॥
मग म्हणे सांगें प्रस्तुत, उदयलेंसे जें उत्कळित,
तें कोणासि बा रे जैत, देईल शेखीं ? ॥ १६२८ ॥
येऱ्हवीं विशेषें बहुतेक, आमुचें ऐसें मानसिक,
जे दुर्योधनाचे अधिक, प्रताप सदा ॥ १६२९ ॥
आणि येरांचेनि पाडें, दळही याचें देव्हडें,
म्हणौनि जैत फुडें, आणील ना तें ? ॥ १६३० ॥
आम्हां तंव गमे ऐसें, मा तुझें ज्योतिष कैसें,
तें नेणों संजया असे, तैसें सांग पां ॥ १६३१ ॥


यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥ ७८॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे मोक्षसंन्यासयोगो नाम अष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥


यया बोला संजयो म्हणे, जी येरयेरांचें मी नेणें,
परी आयुष्य तेथें जिणें, हें फुडें कीं गा ॥ १६३२ ॥
चंद्रु तेथें चंद्रिका, शंभु तेथें अंबिका,
संत तेथें विवेका, असणें कीं जी ॥ १६३३ ॥
रावो तेथें कटक, सौजन्य तेथें सोयरीक,
वन्हि तेथें दाहक, सामर्थ्य कीं ॥ १६३४ ॥
दया तेथें धर्मु, धर्मु तेथें सुखागमु,
सुखीं पुरुषोत्तमु, असे जैसा ॥ १६३५ ॥
वसंत तेथें वनें, वन तेथें सुमनें,
सुमनीं पालिंगनें, सारंगांचीं ॥ १६३६ ॥
गुरु तेथ ज्ञान, ज्ञानीं आत्मदर्शन,
दर्शनीं समाधान, आथी जैसें ॥ १६३७ ॥
भाग्य तेथ विलासु, सुख तेथ उल्लासु,
हें असो तेथ प्रकाशु, सूर्य जेथें ॥ १६३८ ॥
तैसे सकल पुरुषार्थ, जेणें स्वामी कां सनाथ,
तो श्रीकृष्ण रावो जेथ, तेथ लक्ष्मी ॥ १६३९ ॥
आणि आपुलेनि कांतेंसीं, ते जगदंबा जयापासीं,
अणिमादिकीं काय दासी, नव्हती तयातें ? ॥ १६४० ॥
कृष्ण विजयस्वरूप निजांगें, तो राहिला असे जेणें भागें,
तैं जयो लागवेगें, तेथेंचि आहे ॥ १६४१ ॥
विजयो नामें अर्जुन विख्यातु, विजयस्वरूप श्रीकृष्णनाथु,
श्रियेसीं विजय निश्चितु, तेथेंचि असे ॥ १६४२ ॥
तयाचिये देशींच्या झाडीं, कल्पतरूतें होडी,
न जिणावें कां येवढीं, मायबापें असतां ? ॥ १६४३ ॥
ते पाषाणही आघवें, चिंतारत्‌नें कां नोहावे ?,
तिये भूमिके कां न यावें, सुवर्णत्व ? ॥ १६४४ ॥
तयाचिया गांवींचिया, नदी अमृतें वाहाविया,
नवल कायि राया, विचारीं पां ॥ १६४५ ॥
तयाचे बिसाट शब्द, सुखें म्हणों येती वेद,
सदेह सच्चिदानंद, कां न व्हावे ते ? ॥ १६४६ ॥
पैं स्वर्गापवर्ग दोन्ही, इयें पदें जया अधीनीं,
तो श्रीकृष्ण बाप जननी, कमळा जया ॥ १६४७ ॥
म्हणौनि जिया बाहीं उभा, तो लक्ष्मीयेचा वल्लभा,
तेथें सर्वसिद्धी स्वयंभा, येर मी नेणें ॥ १६४८ ॥
आणि समुद्राचा मेघु, उपयोगें तयाहूनि चांगु,
तैसा पार्थीं आजि लागु, आहे तये ॥ १६४९ ॥
कनकत्वदीक्षागुरू, लोहा परिसु होय कीरू,
परी जगा पोसिता व्यवहारु, तेंचि जाणें ॥ १६५० ॥
येथ गुरुत्वा येतसे उणें, ऐसें झणें कोण्ही म्हणे,
वन्हि प्रकाश दीपपणें, प्रकाशी आपुला ॥ १६५१ ॥
तैसा देवाचिया शक्ती, पार्थु देवासीचि बहुती,
परी माने इये स्तुती, गौरव असे ॥ १६५२ ॥
आणि पुत्रें मी सर्व गुणीं, जिणावा हे बापा शिराणी,
तरी ते शारङ्गपाणी, फळा आली ॥ १६५३ ॥
किंबहुना ऐसा नृपा, पार्थु जालासे कृष्णकृपा,
तो जयाकडे साक्षेपा, रीति आहे ॥ १६५४ ॥
तोचि गा विजयासि ठावो, येथ तुज कोण संदेहो ?,
तेथ न ये तरी वावो, विजयोचि होय ॥ १६५५ ॥
म्हणौनि जेथ श्री तेथें श्रीमंतु, जेथ तो पंडूचा सुतु,
तेथ विजय समस्तु, अभ्युदयो तेथ ॥ १६५६ ॥
जरी व्यासाचेनि साचें, धिरे मन तुमचें,
तरी या बोलाचें, ध्रुवचि माना ॥ १६५७ ॥
जेथ तो श्रीवल्लभु, जेथ भक्तकदंबु,
तेथ सुख आणि लाभु, मंगळाचा ॥ १६५८ ॥
या बोला आन होये, तरी व्यासाचा अंकु न वाहे,
ऐसें गाजोनि बाहें, उभिली तेणें ॥ १६५९ ॥
एवं भारताचा आवांका, आणूनि श्लोका येका,
संजयें कुरुनायका, दिधला हातीं ॥ १६६० ॥
जैसा नेणों केवढा वन्ही, परी गुणाग्रीं ठेऊनी,
आणिजे सूर्याची हानी, निस्तरावया ॥ १६६१ ॥
तैसें शब्दब्रह्म अनंत, जालें सवालक्ष भारत,
भारताचें शतें सात, सर्वस्व गीता ॥ १६६२ ॥
तयांही सातां शतांचा, इत्यर्थु हा श्लोक शेषींचा,
व्यासशिष्य संजयाचा, पूर्णोद्गारु जो ॥ १६६३ ॥
येणें येकेंचि श्लोकें, राहे तेणें असकें,
अविद्याजाताचें निकें, जिंतलें होय ॥ १६६४ ॥
ऐसें श्लोक शतें सात, गीतेचीं पदें आंगें वाहत,
पदें म्हणों कीं परमामृत, गीताकाशींचें ॥ १६६५ ॥
कीं आत्मराजाचिये सभे, गीते वोडवले हे खांबे,
मज श्लोक प्रतिभे, ऐसे येत ॥ १६६६ ॥
कीं गीता हे सप्तशती, मंत्रप्रतिपाद्य भगवती,
मोहमहिषा मुक्ति, आनंदली असे ॥ १६६७ ॥
म्हणौनि मनें कायें वाचा, जो सेवकु होईल इयेचा,
तो स्वानंदासाम्राज्याचा, चक्रवर्ती करी ॥ १६६८ ॥
कीं अविद्यातिमिररोंखें, श्लोक सूर्यातें पैजा जिंकें,
ऐसे प्रकाशिले गीतामिषें, रायें श्रीकृष्णें ॥ १६६९ ॥
कीं श्लोकाक्षरद्राक्षलता, मांडव जाली आहे गीता,
संसारपथश्रांता, विसंवावया ॥ १६७० ॥
कीं सभाग्यसंतीं भ्रमरीं, केले ते श्लोककल्हारीं,
श्रीकृष्णाख्यसरोवरीं, सासिन्नली हे ॥ १६७१ ॥
कीं श्लोक नव्हती आन, गमे गीतेचें महिमान,
वाखाणिते बंदीजन, उदंड जैसे ॥ १६७२ ॥
कीं श्लोकांचिया आवारा, सात शतें करूनि सुंदरा,
सर्वागम गीतापुरा, वसों आले ॥ १६७३ ॥
कीं निजकांता आत्मया, आवडी गीता मिळावया,
श्लोक नव्हती बाह्या, पसरु का जो ॥ १६७४ ॥
कीं गीताकमळींचे भृंग, कीं हे गीतासागरतरंग,
कीं हरीचे हे तुरंग, गीतारथींचे ॥ १६७५ ॥
कीं श्लोक सर्वतीर्थ संघातु, आला श्रीगीतेगंगे आंतु,
जे अर्जुन नर सिंहस्थु, जाला म्हणौनि ॥ १६७६ ॥
कीं नोहे हे श्लोकश्रेणी, अचिंत्यचित्तचिंतामणी,
कीं निर्विकल्पां लावणी, कल्पतरूंची ॥ १६७७ ॥
ऐसिया शतें सात श्लोकां, परी आगळा येकयेका,
आतां कोण वेगळिका, वानावां पां, ॥ १६७८ ॥
तान्ही आणि पारठी, इया कामधेनूतें दिठी,
सूनि जैसिया गोठी, कीजती ना ॥ १६७९ ॥
दीपा आगिलु मागिलु, सूर्यु धाकुटा वडीलु,
अमृतसिंधु खोलु, उथळु कायसा, ॥ १६८० ॥
तैसे पहिले सरते, श्लोक न म्हणावे गीते,
जुनीं नवीं पारिजातें, आहाती काई ? ॥ १६८१ ॥
आणि श्लोका पाडु नाहीं, हें कीर समर्थु काई,
येथ वाच्य वाचकही, भागु न धरी ॥ १६८२ ॥
जे इये शास्त्रीं येकु, श्रीकृष्णचि वाच्य वाचकु,
हें प्रसिद्ध जाणे लोकु, भलताही ॥ १६८३ ॥
येथें अर्थें तेंचि पाठें, जोडे येवढेनि धटें,
वाच्यवाचक येकवटें, साधितें शास्त्र ॥ १६८४ ॥
म्हणौनि मज कांहीं, समर्थनीं आतां विषय नाहीं,
गीता जाणा हे वाङ्ग्मयी, श्रीमूर्ति प्रभूचि ॥ १६८५ ॥
शास्त्र वाच्यें अर्थें फळे, मग आपण मावळे,
तैसें नव्हें हें सगळें, परब्रह्मचि ॥ १६८६ ॥
कैसा विश्वाचिया कृपा, करूनि महानंद सोपा,
अर्जुनव्याजें रूपा, आणिला देवें ॥ १६८७ ॥
चकोराचेनि निमित्तें, तिन्ही भुवनें संतप्तें,
निवविलीं कळांवतें, चंद्रें जेवीं ॥ १६८८ ॥
कां गौतमाचेनि मिषें, कळिकाळज्वरीतोद्देशें,
पाणिढाळु गिरीशें, गंगेंचा केला ॥ १६८९ ॥
तैसें गीतेचें हें दुभतें, वत्स करूनि पार्थातें,
दुभिन्नली जगापुरतें, श्रीकृष्ण गाय ॥ १६९० ॥
येथे जीवें जरी नाहाल, तरी हेंचि कीर होआल,
नातरी पाठमिषें तिंबाल, जीभचि जरी ॥ १६९१ ॥
तरी लोह एकें अंशें, झगटलिया परीसें,
येरीकडे अपैसें, सुवर्ण होय ॥ १६९२ ॥
तैसी पाठाची ते वाटी, श्लोकपाद लावा ना जंव वोठीं,
तंव ब्रह्मतेची पुष्टी, येईल आंगा ॥ १६९३ ॥
ना येणेसीं मुख वांकडें, करूनि ठाकाल कानवडें,
तरी कानींही घेतां पडे, तेचि लेख ॥ १६९४ ॥
जे हे श्रवणें पाठें अर्थें, गीता नेदी मोक्षाआरौतें,
जैसा समर्थु दाता कोण्हातें, नास्ति न म्हणे ॥ १६९५ ॥
म्हणौनि जाणतया सवा, गीताचि येकी सेवा,
काय कराल आघवां, शास्त्रीं येरीं ॥ १६९६ ॥
आणि कृष्णार्जुनीं मोकळी, गोठी चावळिली जे निराळी,
ते श्रीव्यासें केली करतळीं, घेवों ये ऐसी ॥ १६९७ ॥
बाळकातें वोरसें, माय जैं जेवऊं बैसे,
तैं तया ठाकती तैसे, घांस करी ॥ १६९८ ॥
कां अफाटा समीरणा, आपैतेंपण शाहाणा,
केलें जैसें विंजणा, निर्मूनियां ॥ १६९९ ॥
तैसें शब्दें जें न लभे, तें घडूनिया अनुष्टुभें,
स्त्रीशूद्रादि प्रतिभे, सामाविलें ॥ १७०० ॥
स्वातीचेनि पाणियें, न होती जरी मोतियें,
तरी अंगीं सुंदरांचिये, कां शोभिती तियें ? ॥ १७०१ ॥
नादु वाद्या न येतां, तरी कां गोचरु होता,
फुलें न होतां घेपता, आमोदु केवीं ? ॥ १७०२ ॥
गोडीं न होती पक्वान्नें, तरी कां फावती रसनें ?,
दर्पणावीण नयनें, नयनु कां दिसे ? ॥ १७०३ ॥
द्रष्टा श्रीगुरुमूर्ती, न रिगता दृश्यपंथीं,
तरी कां ह्या उपास्ती, आकळता तो ? ॥ १७०४ ॥
तैसें वस्तु जें असंख्यात, तया संख्या शतें सात,
न होती तरी कोणा येथ, फावों शकतें ? ॥ १७०५ ॥
मेघ सिंधूचें पाणी वाहे, तरी जग तयातेंचि पाहे,
कां जे उमप ते नोहें, ठाकतें कोण्हा ॥ १७०६ ॥
आणि वाचा जें न पवे, तें हे श्लोक न होते बरवे,
तरी कानें मुखें फावे, ऐसें कां होतें ? ॥ १७०७ ॥
म्हणौनि श्रीव्यासाचा हा थोरु, विश्वा जाला उपकारु,
जे श्रीकृष्ण उक्ती आकारु, ग्रंथाचा केला ॥ १७०८ ॥
आणि तोचि हा मी आतां, श्रीव्यासाचीं पदें पाहतां पाहतां,
आणिला श्रवणपथा, मऱ्हाठिया ॥ १७०९ ॥
व्यासादिकांचे उन्मेख, राहाटती जेथ साशंक,
तेथ मीही रंक येक, चावळी करीं ॥ १७१० ॥
परी गीता ईश्वरु भोळा, ले व्यासोक्तिकुसुममाळा,
तरी माझिया दुर्वादळा, ना न म्हणे कीं ॥ १७११ ॥
आणि क्षीरसिंधूचिया तटा, पाणिया येती गजघटा,
तेथ काय मुरकुटा, वारिजत असे ? ॥ १७१२ ॥
पांख फुटे पांखिरूं, नुडे तरी नभींच स्थिरू,
गगन आक्रमी सत्वरू, तो गरुडही तेथ ॥ १७१३ ॥
राजहंसाचें चालणें, भूतळीं जालिया शाहाणें,
आणिकें काय कोणें, चालावेचिना ? ॥ १७१४ ॥
जी आपुलेनि अवकाशें, अगाध जळ घेपे कलशें,
चुळीं चूळपण ऐसें, भरूनि न निघे ? ॥ १७१५ ॥
दिवटीच्या आंगीं थोरी, तरी ते बहु तेज धरी,
वाती आपुलिया परी, आणीच कीं ना ? ॥ १७१६ ॥
जी समुद्राचेनि पैसें, समुद्रीं आकाश आभासे,
थिल्लरीं थिल्लरा{ऐ}सें, बिंबेचि पैं ॥ १७१७ ॥
तेवीं व्यासादिक महामती, वावरों येती इये ग्रंथीं,
मा आम्ही ठाकों हे युक्ति, न मिळे कीर ? ॥ १७१८ ॥
जिये सागरीं जळचरें, संचरती मंदराकारें,
तेथ देखोनि शफरें येरें, पोहों न लाहती ? ॥ १७१९ ॥
अरुण आंगाजवळिके, म्हणौनि सूर्यातें देखें,
मा भूतळींची न देखे, मुंगी काई ? ॥ १७२० ॥
यालागीं आम्हां प्राकृतां, देशिकारें बंधें गीता,
म्हणणें हें अनुचिता, कारण नोहे ॥ १७२१ ॥
आणि बापु पुढां जाये, ते घेत पाउलाची सोये,
बाळ ये तरी न लाहे, पावों कायी ? ॥ १७२२ ॥
तैसा व्यासाचा मागोवा घेतु, भाष्यकारातें वाट पुसतु,
अयोग्यही मी न पवतु, कें जाईन ? ॥ १७२३ ॥
आणि पृथ्वी जयाचिया क्षमा, नुबगे स्थावर जंगमा,
जयाचेनि अमृतें चंद्रमा, निववी जग ॥ १७२४ ॥
जयाचें आंगिक असिकें, तेज लाहोनि अर्कें,
आंधाराचें सावाइकें, लोटिजत आहे ॥ १७२५ ॥
समुद्रा जयाचें तोय, तोया जयाचें माधुर्य,
माधुर्या सौंदर्य, जयाचेनि ॥ १७२६ ॥
पवना जयाचें बळ, आकाश जेणें पघळ,
ज्ञान जेणें उज्वळ, चक्रवर्ती ॥ १७२७ ॥
वेद जेणें सुभाष, सुख जेणें सोल्लास,
हें असो रूपस, विश्व जेणें ॥ १७२८ ॥
तो सर्वोपकारी समर्थु, सद्गुरु श्रीनिवृत्तिनाथु,
राहाटत असे मजही आंतु, रिघोनियां ॥ १७२९ ॥
आतां आयती गीता जगीं, मी सांगें मऱ्हाठिया भंगीं,
येथ कें विस्मयालागीं, ठावो आहे ॥ १७३० ॥
श्रीगुरुचेनि नांवें माती, डोंगरीं जयापासीं होती,
तेणें कोळियें त्रिजगतीं, येकवद केली ॥ १७३१ ॥
चंदनें वेधलीं झाडें, जालीं चंदनाचेनि पाडें,
वसिष्ठें मांनिली कीं भांडे, भानूसीं शाटी ॥ १७३२ ॥
मा मी तव चित्ताथिला, आणि श्रीगुरु ऐसा दादुला,
जो दिठीवेनि आपुला, बैसवी पदीं ॥ १७३३ ॥
आधींचि देखणी दिठी, वरी सूर्य पुरवी पाठी,
तैं न दिसे ऐसी गोठी, केंही आहे ? ॥ १७३४ ॥
म्हणौनि माझें नित्य नवे, श्वासोश्वासही प्रबंध होआवे,
श्रीगुरुकृपा काय नोहे, ज्ञानदेवो म्हणे ॥ १७३५ ॥
याकारणें मियां, श्रीगीतार्थु मऱ्हाठिया,
केला लोकां यया, दिठीचा विषो ॥ १७३६ ॥
परी मऱ्हाठे बोलरंगें, कवळितां पैं गीतांगें,
तैं गातयाचेनि पांगें, येकाढतां नोहे ॥ १७३७ ॥
म्हणौनि गीता गावों म्हणे, तें गाणिवें होती लेणें,
ना मोकळे तरी उणें, गीताही आणित ॥ १७३८ ॥
सुंदर आंगीं लेणें न सूये, तैं तो मोकळा शृंगारु होये,
ना लेइलें तरी आहे, तैसें कें उचित ? ॥ १७३९ ॥
कां मोतियांची जैसी जाती, सोनयाही मान देती,
नातरी मानविती, अंगेंचि सडीं ॥ १७४० ॥
नाना गुंफिलीं कां मोकळीं, उणीं न होती परीमळीं,
वसंतागमींचीं वाटोळीं, मोगरीं जैसीं ॥ १७४१ ॥
तैसा गाणिवेतें मिरवी, गीतेवीणही रंगु दावीं,
तो लाभाचा प्रबंधु ओंवी, केला मियां ॥ १७४२ ॥
तेणें आबालसुबोधें, ओवीयेचेनि प्रबंधें,
ब्रह्मरससुस्वादें, अक्षरें गुंथिलीं ॥ १७४३ ॥
आतां चंदनाच्या तरुवरीं, परीमळालागीं फुलवरीं,
पारुखणें जियापरी, लागेना कीं ॥ १७४४ ॥
तैसा प्रबंधु हा श्रवणीं, लागतखेंवो समाधि आणी,
ऐकिलियाही वाखाणी, काय व्यसन न लवी ? ॥ १७४५ ॥
पाठ करितां व्याजें, पांडित्यें येती वेषजे,
तैं अमृतातें नेणिजे, फावलिया ॥ १७४६ ॥
तैसेंनि आइतेपणें, कवित्व जालें हें उपेणें,
मनन निदिध्यास श्रवणें, जिंतिलें आतां ॥ १७४७ ॥
हे स्वानंदभोगाची सेल, भलतयसीचि देईल,
सर्वेंद्रियां पोषवील, श्रवणाकरवीं ॥ १७४८ ॥
चंद्रातें आंगवणें, भोगूनि चकोर शाहाणे,
परी फावे जैसें चांदिणें, भलतयाही ॥ १७४९ ॥
तैसें अध्यात्मशास्त्रीं यिये, अंतरंगचि अधिकारिये,
परी लोकु वाक्चातुर्यें, होईल सुखिया ॥ १७५० ॥
ऐसें श्रीनिवृत्तिनाथाचें, गौरव आहे जी साचें,
ग्रंथु नोहे हें कृपेचें, वैभव तिये ॥ १७५१ ॥
क्षीरसिंधु परिसरीं, शक्तीच्या कर्णकुहरीं,
नेणों कैं श्रीत्रिपुरारीं, सांगितलें जें ॥ १७५२ ॥
तें क्षीरकल्लोळाआंतु, मकरोदरीं गुप्तु,
होता तयाचा हातु, पैठें जालें ॥ १७५३ ॥
तो मत्स्येंद्र सप्तशृंगीं, भग्नावयवा चौरंगी,
भेटला कीं तो सर्वांगीं, संपूर्ण जाला ॥ १७५४ ॥
मग समाधि अव्युत्थया, भोगावी वासना यया,
ते मुद्रा श्रीगोरक्षराया, दिधली मीनीं ॥ १७५५ ॥
तेणें योगाब्जिनीसरोवरु, विषयविध्वंसैकवीरु,
तिये पदीं कां सर्वेश्वरु, अभिषेकिला ॥ १७५६ ॥
मग तिहीं तें शांभव, अद्वयानंदवैभव,
संपादिलें सप्रभव, श्रीगहिनीनाथा ॥ १७५७ ॥
तेणें कळिकळितु भूतां, आला देखोनि निरुता,
ते आज्ञा श्रीनिवृत्तिनाथा, दिधली ऐसी ॥ १७५८ ॥
ना आदिगुरु शंकरा\-, लागोनि शिष्यपरंपरा,
बोधाचा हा संसरा, जाला जो आमुतें ॥ १७५९ ॥
तो हा तूं घेऊनि आघवा, कळीं गिळितयां जीवां,
सर्व प्रकारीं धांवा, करीं पां वेगीं ॥ १७६० ॥
आधींच तंव तो कृपाळु, वरी गुरुआज्ञेचा बोलू,
जाला जैसा वर्षाकाळू, खवळणें मेघां ॥ १७६१ ॥
मग आर्ताचेनि वोरसें, गीतार्थग्रंथनमिसें,
वर्षला शांतरसें, तो हा ग्रंथु ॥ १७६२ ॥
तेथ पुढां मी बापिया, मांडला आर्ती आपुलिया,
कीं यासाठीं येवढिया, आणिलों यशा ॥ १७६३ ॥
एवं गुरुक्रमें लाधलें, समाधिधन जें आपुलें,
तें ग्रंथें बोधौनि दिधलें, गोसावी मज ॥ १७६४ ॥
वांचूनि पढे ना वाची, ना सेवाही जाणें स्वामीची,
ऐशिया मज ग्रंथाची, योग्यता कें असे ? ॥ १७६५ ॥
परी साचचि गुरुनाथें, निमित्त करूनि मातें,
प्रबंधव्याजें जगातें, रक्षिलें जाणा ॥ १७६६ ॥
तऱ्ही पुरोहितगुणें, मी बोलिलों पुरें उणें,
तें तुम्हीं माउलीपणें, उपसाहिजो जी ॥ १७६७ ॥
शब्द कैसा घडिजे, प्रमेयीं कैसें पां चढिजें,
अळंकारु म्हणिजे, काय तें नेणें ॥ १७६८ ॥
सायिखडेयाचें बाहुलें, चालवित्या सूत्राचेनि चाले,
तैसा मातें दावीत बोले, स्वामी तो माझा ॥ १७६९ ॥
यालागीं मी गुणदोष\-, विषीं क्षमाविना विशेष,
जे मी संजात ग्रंथलों देख, आचार्यें कीं ॥ १७७० ॥
आणि तुम्हां संतांचिये सभे, जें उणीवेंसी ठाके उभें,
तें पूर्ण नोहे तरी तैं लोभें, तुम्हांसीचि कोपें ॥ १७७१ ॥
सिवतलियाही परीसें, लोहत्वाचिये अवदसे,
न मुकिजे आयसें, तैं कवणा बोलु, ॥ १७७२ ॥
वोहळें हेंचि करावें, जे गंगेचें आंग ठाकावें,
मगही गंगा जरी नोहावें, तैं तो काय करी ? ॥ १७७३ ॥
म्हणौनि भाग्ययोगें बहुवें, तुम्हां संतांचें मी पाये,
पातलों आतां कें लाहे, उणें जगीं, ॥ १७७४ ॥
अहो जी माझेनि स्वामी, मज संत जोडुनि तुम्हीं,
दिधलेति तेणें सर्वकामीं, परीपूर्ण जालों ॥ १७७५ ॥
पाहा पां मातें तुम्हां सांगडें, माहेर तेणें सुरवाडें,
ग्रंथाचें आळियाडें, सिद्धी गेलें ॥ १७७६ ॥
जी कनकाचें निखळ, वोतूं येईल भूमंडळ,
चिंतारत्‌नीं कुळाचळ, निर्मूं येती ॥ १७७७ ॥
सातांही हो सागरांतें, सोपें भरितां अमृतें,
दुवाड नोहे तारांतें, चंद्र करितां ॥ १७७८ ॥
कल्पतरूचे आराम, लावितां नाहीं विषम,
परी गीतार्थाचें वर्म, निवडूं न ये ॥ १७७९ ॥
तो मी येकु सर्व मुका, बोलोनि मऱ्हाठिया भाखा,
करी डोळेवरी लोकां, घेवों ये ऐसें जें ॥ १७८० ॥
हा ग्रंथसागरु येव्हढा, उतरोनि पैलीकडा,
कीर्तिविजयाचा धेंडा, नाचे जो कां ॥ १७८१ ॥
गीतार्थाचा आवारु, कलशेंसीं महामेरु,
रचूनि माजीं श्रीगुरु\-, लिंग जें पूजीं ॥ १७८२ ॥
गीता निष्कपट माय, चुकोनि तान्हें हिंडे जें वाय,
तें मायपूता भेटी होय, हा धर्म तुमचा ॥ १७८३ ॥
तुम्हां सज्जनांचें केलें, आकळुनी जी मी बोलें,
ज्ञानदेव म्हणे थेंकुलें, तैसें नोहें ॥ १७८४ ॥
काय बहु बोलों सकळां, मेळविलों जन्मफळा,
ग्रंथसिद्धीचा सोहळा, दाविला जो हा ॥ १७८५ ॥
मियां जैसजैसिया आशा, केला तुमचा भरंवसा,
ते पुरवूनि जी बहुवसा, आणिलों सुखा ॥ १७८६ ॥
मजलागीं ग्रंथाची स्वामी, दुजीं सृष्टी जे हे केली तुम्ही,
तें पाहोनि हांसों आम्हीं, विश्वामित्रातेंही ॥ १७८७ ॥
जे असोनि त्रिशंकुदोषें, धातयाही आणावें वोसें,
तें नासतें कीजे कीं ऐसें, निर्मावें नाहीं ॥ १७८८ ॥
शंभू उपमन्युचेनि मोहें, क्षीरसागरूही केला आहे,
येथ तोही उपमे सरी नोहे, जे विषगर्भ कीं ॥ १७८९ ॥
अंधकारु निशाचरां, गिळितां सूर्यें चराचरां,
धांवा केला तरी खरा, ताउनी कीं तो ॥ १७९० ॥
तातलियाही जगाकारणें, चंद्रें वेंचिलें चांदणें,
तया सदोषा केवीं म्हणे, सारिखें हें ॥ १७९१ ॥
म्हणौनि तुम्हीं मज संतीं, ग्रंथरूप जो हा त्रिजगतीं,
उपयोग केला तो पुढती, निरुपम जी ॥ १७९२ ॥
किंबहुना तुमचें केलें, धर्मकीर्तन हें सिद्धी नेलें,
येथ माझें जी उरलें, पाईकपण ॥ १७९३ ॥
आतां विश्वात्मकें देवें, येणें वाग्यज्ञें तोषावें,
तोषोनि मज द्यावें, पसायदान हें ॥ १७९४ ॥
जे खळांची व्यंकटी सांडो, तयां सत्कर्मीं रती वाढो,
भूतां परस्परें पडो, मैत्र जीवाचें ॥ १७९५ ॥
दुरिताचें तिमिर जावो, विश्व स्वधर्मसूर्यें पाहो,
जो जें वांछील तो तें लाहो, प्राणिजात ॥ १७९६ ॥
वर्षत सकळमंगळीं, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळीं, भेटतु भूतां ॥ १७९७ ॥
चलां कल्पतरूंचे अरव, चेतना चिंतामणीचें गांव,
बोलते जे अर्णव, पीयूषाचे ॥ १७९८ ॥
चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन,
ते सर्वांही सदा सज्जन, सोयरे होतु ॥ १७९९ ॥
किंबहुना सर्वसुखीं, पूर्ण होऊनि तिहीं लोकीं,
भजिजो आदिपुरुखीं, अखंडित ॥ १८०० ॥
आणि ग्रंथोपजीविये, विशेषीं लोकींयें,
दृष्टादृष्ट विजयें, होआवें जी ॥ १८०१ ॥
तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो, हा होईल दानपसावो,
येणें वरें ज्ञानदेवो, सुखिया झाला ॥ १८०२ ॥
ऐसें युगीं परी कळीं, आणि महाराष्ट्रमंडळीं,
श्रीगोदावरीच्या कूलीं, दक्षिणलिंगीं ॥ १८०३ ॥
त्रिभुवनैकपवित्र, अनादि पंचक्रोश क्षेत्र,
जेथ जगाचें जीवनसूत्र, श्रीमहालया असे ॥ १८०४ ॥
तेथ यदुवंशविलासु, जो सकळकळानिवासु,
न्यायातें पोषी क्षितीशु, श्रीरामचंद्रु ॥ १८०५ ॥
तेथ महेशान्वयसंभूतें, श्रीनिवृत्तिनाथसुतें,
केलें ज्ञानदेवें गीते, देशीकार लेणें ॥ १८०६ ॥
एवं भारताच्या गांवीं, भीष्मनाम प्रसिद्ध पर्वीं,
श्रीकृष्णार्जुनीं बरवी, गोठी जे केली ॥ १८०७ ॥
जें उपनिषदांचें सार, सर्व शास्त्रांचें माहेर,
परमहंसीं सरोवर, सेविजे जें ॥ १८०८ ॥
तियें गीतेचा कलशु, संपूर्ण हा अष्टादशु,
म्हणे निवृत्तिदासु, ज्ञानदेवो ॥ १८०९ ॥
पुढती पुढती पुढती, इया ग्रंथपुण्यसंपत्ती,
सर्वसुखीं सर्वभूतीं, संपूर्ण होईजे ॥ १८१० ॥
शके बाराशतें बारोत्तरें, तैं टीका केली ज्ञानेश्वरें,
सच्चिदानंदबाबा आदरें, लेखकु जाहला ॥ १८११ ॥
इति श्री ज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां अष्टादशोध्यायः ॥

श्रीशके पंधराशें साहोत्तरीं, तारणनामसंवत्सरीं,
एकाजनार्दनें अत्यादरीं, गीता\-ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली ॥ १ ॥
ग्रंथ पूर्वींच अतिशुद्ध, परी पाठांतरीं शुद्ध अबद्ध,
तो शोधूनियां एवंविध, प्रतिशुद्ध सिद्धज्ञानेश्वरी ॥ २ ॥
नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचितां टीका,
ज्ञान होय लोकां, अतिभाविकां ग्रंथार्थियां ॥ ३ ॥
बहुकाळपर्वणी गोमटी, भाद्रपदमास कपिलाषष्ठी,
प्रतिष्ठानीं गोदातटीं, लेखनकामाठी संपूर्ण जाली ॥ ४ ॥
ज्ञानेश्वरीपाठीं, जो ओंवी करील मऱ्हाटी,
तेणें अमृताचे ताटीं, जाण नरोटी ठेविली ॥ ५ ॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

॥ शुभं भवतु ॥

॥ श्री परमात्मने नमः ॥

॥ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ॥