ज्ञानेश्वरी / अध्याय सतरावा / संत ज्ञानेश्वर
॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ सप्तदशोऽध्यायः - अध्याय सतरावा,।
। श्रद्धात्रयविभागयोगः।
विश्वविकासित मुद्रा, जया सोडी तुझी योगमुद्रा,
तया नमोजी गणेंद्रा, श्रीगुरुराया ॥ १ ॥
त्रिगुणत्रिपुरीं वेढिला, जीवत्वदुर्गीं आडिला,
तो आत्मशंभूनें सोडविला, तुझिया स्मृती ॥ २ ॥
म्हणौनि शिवेंसीं कांटाळा, गुरुत्वें तूंचि आगळा,
तऱ्ही हळु मायाजळा-, माजीं तारूनि ॥ ३ ॥
जे तुझ्याविखीं मूढ, तयांलागीं तूं वक्रतुंड,
ज्ञानियांसी तरी अखंड, उजूचि आहासी ॥ ४ ॥
दैविकी दिठी पाहतां सानी, तऱ्ही मीलनोन्मीलनीं,
उत्पत्ति प्रळयो दोन्ही, लीलाचि करिसी ॥ ५ ॥
प्रवृत्तिकर्णाच्या चाळीं, उठली मदगंधानिळीं,
पूजीजसी नीलोत्पलीं, जीवभृंगांच्या ॥ ६ ॥
पाठीं निवृत्तिकर्णताळें, आहाळली ते पूजा विधुळे,
तेव्हां मिरविसी मोकळें, आंगाचें लेणें ॥ ७ ॥
वामांगीचा लास्यविलासु, जो हा जगद्रूप आभासु,
तो तांडवमिसें कळासु, दाविसी तूं ॥ ८ ॥
हें असो विस्मो दातारा, तूं होसी जयाचा सोयरा,
सोइरिकेचिया व्यवहारा, मुकेचि तो ॥ ९ ॥
फेडितां बंधनाचा ठावो, तूं जगद्बंधु ऐसा भावो,
धरूं वोळगे उवावो, तुझाचि आंगीं ॥ १० ॥
तंव दुजयाचेनि नांवें तया, देहही नुरेचि पैं देवराया,
जेणें तूं आपणपयां, केलासि दुजा ॥ ११ ॥
तूंतें करूनि पुढें, जे उपायें घेती दवडे,
तयां ठासी बहुवें पाडें, मागांचि तूं ॥ १२ ॥
जो ध्यानें सूये मानसीं, तयालागीं नाहीं तूं त्याचे देशीं,
ध्यानही विसरे तेणेंसीं, वालभ तुज ॥ १३ ॥
तूतें सिद्धचि जो नेणे, तो नांदे सर्वज्ञपणें,
वेदांही येवढें बोलणें, नेघसी कानीं ॥ १४ ॥
मौन गा तुझें राशिनांव, आतां स्तोत्रीं कें बांधों हाव,
दिसती तेतुली माव, भजों काई ॥ १५ ॥
दैविकें सेवकु हों पाहों, तरी भेदितां द्रोहोचि लाहों,
म्हणौनि आतां कांहीं नोहों, तुजलागीं जी ॥ १६ ॥
जैं सर्वथा सर्वही नोहिजे, तैं अद्वया तूतें लाहिजे,
हें जाणें मी वर्म तुझें, आराध्य लिंगा ॥ १७ ॥
तरी नुरोनि वेगळेंपण, रसीं भजिन्नलें लवण,
तैसें नमन माझें जाण, बहु काय बोलों ॥ १८ ॥
आतां रिता कुंभ समुद्रीं रिगे, तो उचंबळत भरोनि निगे,
कां दशीं दीपसंगें, दीपुचि होय ॥ १९ ॥
तैसा तुझिया प्रणितीं, मी पूर्णु जाहलों श्रीनिवृत्ती,
आतां आणीन व्यक्तीं, गीतार्थु तो ॥ २० ॥
तरी षोडशाध्यायशेखीं, तिये समाप्तीच्या श्लोकीं,
जो ऐसा निर्णयो निष्टंकीं, ठेविला देवें ॥ २१ ॥
जे कृत्याकृत्यव्यवस्था, अनुष्ठावया पार्था,
शास्त्रचि एक सर्वथा, प्रमाण तुज ॥ २२ ॥
तेथ अर्जुन मानसें, म्हणे हें ऐसें कैसें,
जे शास्त्रेंवीण नसे, सुटिका कर्मा ॥ २३ ॥
तरी तक्षकाची फडे, ठाकोनि कैं तो मणि काढे,
कैं नाकींचा केशु जोडे, सिंहाचिये ? ॥ २४ ॥
मग तेणें तो वोंविजे, तरीच लेणें पाविजे,
एऱ्हवीं काय असिजे, रिक्तकंठीं ? ॥ २५ ॥
तैसी शास्त्रांची मोकळी, यां कैं कोण पां वेंटाळी,
एकवाक्यतेच्या फळीं, पैसिजे कैं ? ॥ २६ ॥
जालयाही एकवाक्यता, कां लाभें वेळु अनुष्ठितां,
कैंचा पैसारु जीविता, येतुलालिया ॥ २७ ॥
आणि शास्त्रें अर्थें देशें काळें, या चहूंही जें एकफळे,
तो उपावो कें मिळे, आघवयांसी ? ॥ २८ ॥
म्हणौनि शास्त्राचें घडतें, नोहें प्रकारें बहुतें,
तरी मुर्खा मुमुक्षां येथें, काय गति पां ? ॥ २९ ॥
हा पुसावया अभिप्रावो, जो अर्जुन करी प्रस्तावो,
तो सतराविया ठावो, अध्याया येथ ॥ ३० ॥
तरी सर्वविषयीं वितृष्णु, जो सकळकळीं प्रवीणु,
कृष्णाही नवल कृष्णु, अर्जुनत्वें जो ॥ ३१ ॥
शौर्या जोडला आधारु, जो सोमवंशाचा शृंगारु,
सुखादि उपकारु, जयाची लीला ॥ ३२ ॥
जो प्रज्ञेचा प्रियोत्तमु, ब्रह्मविद्येचा विश्रामु,
सहचरु मनोधर्मु, देवाचा जो ॥ ३३ ॥
अर्जुन उवाच।
ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः।
तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः ॥ १॥
तो अर्जुन म्हणे गा तमालश्यामा, इंद्रियां फांवलिया ब्रह्मा,
तुझां बोलु आम्हा, साकांक्षु पैं जी ॥ ३४ ॥
जें शास्त्रेंवांचूनि आणिकें, प्राणिया स्वमोक्षु न देखे,
ऐसें कां कैंपखें, बोलिलासी ॥ ३५ ॥
तरी न मिळेचि तो देशु, नव्हेचि काळा अवकाशु,
जो करवी शास्त्राभ्यासु, तोही दुरी ॥ ३६ ॥
आणि अभ्यासीं विरजिया, होती जिया सामुग्रिया,
त्याही नाहीं आपैतिया, तिये वेळीं ॥ ३७ ॥
उजू नोहेचि प्राचीन, नेदीचि प्रज्ञा संवाहन,
ऐसें ठेलें आपादन, शास्त्राचें जया ॥ ३८ ॥
किंबहुना शास्त्रविखीं, एकही न लाहातीचि नखी,
म्हणौनि उखिविखी, सांडिली जिहीं ॥ ३९ ॥
परी निर्धारूनि शास्त्रें, अर्थानुष्ठानें पवित्रें,
नांदताति परत्रें, साचारें जे ॥ ४० ॥
तयां{ऐ}सें आम्हीं होआवें, ऐसी चाड बांधोनि जीवें,
घेती तयांचें मागावे, आचरावया ॥ ४१ ॥
धड्याचिया आखरां, तळीं बाळ लिहे दातारा,
कां पुढांसूनि पडिकरा, अक्षमु चाले ॥ ४२ ॥
तैसें सर्वशास्त्रनिपुण, तयाचें जें आचरण,
तेंचि करिती प्रमाण, आपलिये श्रद्धे ॥ ४३ ॥
मग शिवादिकें पूजनें, भूम्यादिकें महादानें,
आग्निहोत्रादि यजनें, करिती जे श्रद्धा ॥ ४४ ॥
तयां सत्त्वरजतमां-/, माजीं कोण पुरुषोत्तमा,
गति होय ते आम्हां, सांगिजो जी ॥ ४५ ॥
तंव वैकुंठपीठींचें लिंग, जो निगमपद्माचा पराग,
जिये जयाचेनि हें जग, अंगच्छाया ॥ ४६ ॥
काळ सावियाचि वाढु, लोकोत्तर प्रौढु,
आद्वितीय गूढु, आनंदघनु ॥ ४७ ॥
इयें श्लाघिजती जेणें बिकें, तें जयाचें आंगीं असिकें,
तो श्रीकृष्ण स्वमुखें, बोलत असे ॥ ४८ ॥
श्री भगवानुवाच।
त्रिविध भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा।
सात्त्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु ॥ २॥
म्हणे पार्था तुझा अतिसो, हेंही आम्ही जाणतसों,
जे शास्त्राभ्यासाचा आडसो, मानितोसि कीं ॥ ४९ ॥
नुसधियाची श्रद्धा, झोंबों पाहसी परमपदा,
तरी तैसें हें प्रबुद्धा, सोहोपें नोहे ॥ ५० ॥
श्रद्धा म्हणितलियासाठीं, पातेजों नये किरीटी,
काय द्विजु अंत्यजघृष्टीं, अंत्यजु नोहे ? ॥ ५१ ॥
गंगोदक जरी जालें, तरी मद्यभांडां आलें,
तें घेऊं नये कांहीं केलें, विचारीं पां ॥ ५२ ॥
चंदनु होय शीतळु, परी अग्नीसी पावे मेळु,
तैं हातीं धरितां जाळूं, न शके काई ? ॥ ५३ ॥
कां किडाचिये आटतिये पुटीं, पडिलें सोळें किरीटी,
घेतलें चोखासाठीं, नागवीना ? ॥ ५४ ॥
तैसें श्रद्धेचें दळवाडें, अंगें कीर चोखडें,
परी प्राणियांच्या पडे, विभागीं जैं ॥ ५५ ॥
ते प्राणिये तंव स्वभावें, आनादिमायाप्रभावें,
त्रिगुणाचेचि आघवे, वळिले आहाती ॥ ५६ ॥
तेथही दोन गुण खांचती, मग एक धरी उन्नती,
तैं तैसियाचि होती वृत्ती, जीवांचिया ॥ ५७ ॥
वृत्ती{ऐ}सें मन धरिती, मना{ऐ}सी क्रिया करिती,
केलिया ऐसी वरीती, मरोनि देहें ॥ ५८ ॥
बीज मोडे झाड होये, झाड मोडे बीजीं सामाये,
ऐसेनि कल्पकोडी जाये, परी जाति न नशे ॥ ५९ ॥
तियापरीं यियें अपारें, होत जात जन्मांतरें,
परी त्रिगुणत्व न व्यभिचरें, प्राणियांचें ॥ ६० ॥
म्हणूनि प्राणियांच्या पैकीं, पडिली श्रद्धा अवलोकीं,
ते होय गुणासारिखी, तिहीं ययां ॥ ६१ ॥
विपायें वाढे सत्त्व शुद्ध, तेव्हां ज्ञानासी करी साद,
परी एका दोघे वोखद, येर आहाती ॥ ६२ ॥
सत्त्वाचेनि आंगलगें, ते श्रद्धा मोक्षफळा रिगे,
तंव रज तम उगे, कां पां राहाती ? ॥ ६३ ॥
मोडोनि सत्त्वाची त्राये, रजोगुण आकाशें जाये,
तेव्हां तेचि श्रद्धा होये, कर्मकेरसुणी ॥ ६४ ॥
मग तमाची उठी आगी, तेव्हां तेचि श्रद्धा भंगी,
हों लागे भोगालागीं, भलतेया ॥ ६५ ॥
सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत।
श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यछ्रद्धः स एव सः ॥ ३॥
एवं सत्त्वरजतमा-/, वेगळी श्रद्धा सुवर्मा,
नाहीं गा जीवग्रामा-/, माजीं यया ॥ ६६ ॥
म्हणौनि श्रद्धा स्वाभाविक, असे पैं त्रिगुणात्मक,
रजतमसात्त्विक, भेदीं इहीं ॥ ६७ ॥
जैसें जीवनचि उदक, परी विषीं होय मारक,
कां मिरयामाजीं तीख, उंसीं गोड ॥ ६८ ॥
तैसा बहुवसें तमें, जो सदाचि होय निमे,
तेथ श्रद्धा परीणमे, तेंचि होऊनि ॥ ६९ ॥
मग काजळा आणि मसी, न दिसे विवंचना जैसी,
तेवीं श्रद्धा तामसी, सिनी नाहीं ॥ ७० ॥
तैसीच राजसीं जीवीं, रजोमय जाणावी,
सात्त्विकीं आघवीं, सत्त्वाचीच ॥ ७१ ॥
ऐसेनि हा सकळु, जगडंबरु निखिळु,
श्रद्धेचाचि केवळु, वोतला असे ॥ ७२ ॥
परी गुणत्रयवशें, त्रिविधपणाचें लासें,
श्रद्धे जें उठिलें असे, तें वोळख तूं ॥ ७३ ॥
तरी जाणिजे झाड फुलें, कां मानस जाणिजे बोलें,
भोगें जाणिजे केलें, पूर्वजन्मींचें ॥ ७४ ॥
तैसीं जिहीं चिन्हीं, श्रद्धेचीं रूपें तीन्हीं,
देखिजती ते वानी, अवधारीं पां ॥ ७५ ॥
यजन्ते सात्त्विका देवान् यक्षरक्षांसि राजसाः।
प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः ॥ ४॥
तरी सात्त्विक श्रद्धा, जयांचा होय बांधा,
तयां बहुतकरूनि मेधा, स्वर्गीं आथी ॥ ७६ ॥
ते विद्याजात पढती, यज्ञक्रिये निवडती,
किंबहुना पडती, देवलोकीं ॥ ७७ ॥
आणि श्रद्धा राजसा, घडले जे वीरेशा,
ते भजती राक्षसां, खेचरां हन ॥ ७८ ॥
श्रद्धां जे कां तामसी, ते मी सांगेन तुजपाशीं,
जे कां केवळ पापराशी, आतिकर्कशी निर्दयत्वें ॥ ७९ ॥
जीववधें साधूनि बळी, भूतप्रेतकुळें मैळीं,
स्मशानीं संध्याकाळीं, पूजिती जे ॥ ८० ॥
ते तमोगुणाचें सार, काढूनि निर्मिले नर,
जाण तामसियेचें घर, श्रद्धेचें तें ॥ ८१ ॥
ऐसी इहीं तिहीं लिंगीं, त्रिविध श्रद्धा जगीं,
पैं हें ययालागीं, सांगतु असें ॥ ८२ ॥
जे हे सात्त्विक श्रद्धा, जतन करावी प्रबुद्धा,
येरी दोनी विरुद्धा, सांडाविया ॥ ८३ ॥
हे सात्त्विकमति जया, निर्वाहती होय धनंजया,
बागुल नोहे तया, कैवल्य तें ॥ ८४ ॥
तो न पढो कां ब्रह्मसूत्र, नालोढो सर्व शास्त्र,
सिद्धांत न होत स्वतंत्र, तयाच्या हातीं ॥ ८५ ॥
परी श्रुतिस्मृतींचे अर्थ, जे आपण होऊनि मूर्त,
अनुष्ठानें जगा देत, वडील जे हे ॥ ८६ ॥
तयांचीं आचरती पाउलें, पाऊनि सात्त्विकी श्रद्धा चाले,
तो तेंचि फळ ठेविलें, ऐसें लाहे ॥ ८७ ॥
पैं एक दीपु लावी सायासें, आणिक तेथें लाऊं बैसें,
तरी तो काय प्रकाशें, वंचिजे गा ? ॥ ८८ ॥
कां येकें मोल अपार, वेंचोनि केलें धवळार,
तो सुरवाडु वस्तीकर, न भोगी काई ? ॥ ८९ ॥
हें असो जो तळें करी, तें तयाचीच तृषा हरी,
कीं सुआरासीचि अन्न घरीं, येरां नोहे ? ॥ ९० ॥
बहुत काय बोलों पैं गा, येका गौतमासीचि गंगा,
येरां समस्तां काय जगां, वोहोळ जाली ? ॥ ९१ ॥
म्हणौनि आपुलियापरी, शास्त्र अनुष्ठीती कुसरी,
जाणे तयांते श्रद्धाळु जो वरी, तो मूर्खुही तरे ॥ ९२ ॥
अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः।
दंभाहङ्कारसंयुक्ताः कामरागबलान्विताः ॥ ५॥
ना शास्त्राचेनि कीर नांवें, खाकरोंही नेणती जीवें,
परी शास्त्रज्ञांही शिवें, टेंकों नेदिती ॥ ९३ ॥
वडिलांचिया क्रिया, देखोनि वाती वांकुलिया,
पंडितां डाकुलिया, वाजविती ॥ ९४ ॥
आपलेनीचि आटोपें, धनित्वाचेनि दर्पें,
साचचि पाखंडाचीं तपें, आदरिती ॥ ९५ ॥
आपुलिया पुढिलांचिया, आंगीं घालूनि कातिया,
रक्तमांसा प्रणीतया, भर भरु ॥ ९६ ॥
रिचविती जळतकुंडीं, लाविती चेड्याच्या तोंडीं,
नवसियां देती उंडी, बाळकांची ॥ ९७ ॥
आग्रहाचिया उजरिया, क्षुद्र देवतां वरीया,
अन्नत्यागें सातरीया, ठाकती एक ॥ ९८ ॥
अगा आत्मपरपीडा, बीज तमक्षेत्रीं सुहाडा,
पेरिती मग पुढां, तेंचि पिके ॥ ९९ ॥
बाहु नाहीं आपुलिया, आणि नावेतेंही धनंजया,
न धरी होय तया, समुद्रीं जैसें ॥ १०० ॥
कां वैद्यातें करी सळा, रसु सांडी पाय खोळां,
तो रोगिया जेवीं जिव्हाळा, सवता होय ॥ १०१ ॥
नाना पडिकराचेनि सळें, काढी आपुलेचि डोळे,
तें वानवसां आंधळें, जैसें ठाके ॥ १०२ ॥
तैसें तयां आसुरां होये, निंदूनि शास्त्रांची सोये,
सैंघ धांवताती मोहें, आडवीं जे कां ॥ १०३ ॥
कामु करवी तें करिती, क्रोधु मारवी ते मारिती,
किंबहुना मातें पुरिती, दुःखाचा गुंडां ॥ १०४ ॥
कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः।
मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्ध्यासुरनिश्चयान् ॥ ६॥
आपुलां परावां देहीं, दुःख देती जें जें कांहीं,
मज आत्मया तेतुलाही, होय शीणु ॥ १०५ ॥
पैं वाचेचेनिही पालवें, पापियां तयां नातळावें,
परी पडिलें सांगावें, त्यजावया ॥ १०६ ॥
प्रेत बाहिरें घालिजे, कां अंत्यजु संभाषणीं त्यजिजे,
हें असो हातें क्षाळिजे, कश्मलातें ? ॥ १०७ ॥
तेथ शुद्धीचिया आशा, तो लेपु न मनवे जैसा,
तयांतें सांडावया तैसा, अनुवादु हा ॥ १०८ ॥
परी अर्जुना तूं तयांतें, देखसी तैं स्मर हो मातें,
जे आन प्रायश्चित्त येथें, मानेल ना ॥ १०९ ॥
म्हणौनि जे श्रद्धा सात्त्विकी, पुढती तेचि पैं येकी,
जतन करावी निकी, सर्वांपरी ॥ ११० ॥
तरी धरावा तैसा संगु, जेणें पोखे सात्त्विक लागु,
सत्त्ववृद्धीचा भागु, आहारु घेपें ॥ १११ ॥
एऱ्हवीं तरी पाहीं, स्वभाववृद्धीच्या ठाईं,
आहारावांचूनि नाहीं, बळी हेतु ॥ ११२ ॥
प्रत्यक्ष पाहें पां वीरा, जो सावध घे मदिरा,
तो होऊनि ठाके माजिरा, तियेचि क्षणीं ॥ ११३ ॥
कां जो साविया अन्नरसु सेवी, तो व्यापिजे वातश्लेष्मस्वभावीं,
काय ज्वरु जालिया निववी, पयादिक ? ॥ ११४ ॥
नातरी अमृत जयापरी, घेतलिया मरण वारी,
कां आपुलिया{ऐ}सें करी, जैसें विष ॥ ११५ ॥
तेवीं जैसा घेपे आहारु, धातु तैसाचि होय आकारु,
आणि धातु ऐसा अंतरु, भावो पोखे ॥ ११६ ॥
जैसें भांडियाचेनि तापें, आंतुलें उदकही तापे,
तैसी धातुवशें आटोपे, चित्तवृत्ती ॥ ११७ ॥
म्हणौनि सात्त्विकु रसु सेविजे, तैं सत्त्वाची वाढी पाविजे,
राजसा तामसा होईजे, येरी रसीं ॥ ११८ ॥
तरी सात्त्विक कोण आहारु, राजसा तामसा कायी आकारु,
हें सांगों करीं आदरु, आकर्णनीं ॥ ११९ ॥
आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः।
यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिम शृणु ॥ ७॥
आणि एकसरें आहारा, कैसेनि तिनी मोहरा,
जालिया तेही वीरा, रोकडें दाऊं ॥ १२० ॥
तरी जेवणाराचिया रुची, निष्पत्ति कीं बोनियांची,
आणि जेवितां तंव गुणांची, दासी येथ ॥ १२१ ॥
जे जीव कर्ता भोक्ता, तो गुणास्तव स्वभावता,
पावोनियां त्रिविधता, चेष्टे त्रिधा ॥ १२२ ॥
म्हणौनि त्रिविधु आहारु, यज्ञुही त्रिप्रकारु,
तप दान हन व्यापारु, त्रिविधचि ते ॥ १२३ ॥
पैं आहार लक्षण पहिले?, सांगों जें म्हणितलें,
तें आईक गा भलें, रूप करूं ॥ १२४ ॥
आयुः सत्त्वबलारोग्यसुखप्रीतिवर्धनाः।
रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः ॥ ८॥
तरी सत्त्वगुणाकडे, जें दैवें भोक्ता पडे,
तैं मधुरीं रसीं वाढे, मेचु तया ॥ १२५ ॥
आंगेंचि द्रव्यें सुरसें, जे आंगेंचि पदार्थ गोडसे,
आंगेंचि स्नेहें बहुवसें, सुपक्वें जियें ॥ १२६ ॥
आकारें नव्हती डगळें, स्पर्शें अति मवाळें,
जिभेलागीं स्नेहाळें, स्वादें जियें ॥ १२७ ॥
रसें गाढीं वरी ढिलीं, द्रवभावीं आथिलीं,
ठायें ठावो सांडिलीं, अग्नितापें ॥ १२८ ॥
आंगें सानें परीणामें थोरु, जैसें गुरुमुखींचें अक्षरु,
तैशी अल्पीं जिहीं अपारु, तृप्ति राहे ॥ १२९ ॥
आणि मुखीं जैसीं गोडें, तैसीचिहि ते आंतुलेकडे,
तिये अन्नीं प्रीति वाढे, सात्त्विकांसी ॥ १३० ॥
एवं गुणलक्षण, सात्त्विक भोज्य जाण,
आयुष्याचें त्राण, नीच नवें हें ॥ १३१ ॥
येणें सात्त्विक रसें, जंव देहीं मेहो वरीषे,
तंव आयुष्यनदी उससे, दिहाचि दिहा ॥ १३२ ॥
सत्त्वाचिये कीर पाळती, कारण हाचि सुमती,
दिवसाचिये उन्नती, भानु जैसा ॥ १३३ ॥
आणि शरीरा हन मानसा, बळाचा पैं कुवासा,
हा आहारु तरी दशा, कैंची रोगां ॥ १३४ ॥
हा सात्त्विकु होय भोग्यु, तैं भोगावया आरोग्यु,
शरीरासी भाग्यु, उदयलें जाणो ॥ १३५ ॥
आणि सुखाचें घेणें देणें, निकें उवाया ये येणें,
हें असो वाढे साजणें, आनंदेंसीं ॥ १३६ ॥
ऐसा सात्त्विकु आहारु, परीणमला थोरु,
करी हा उपकारु, सबाह्यासी ॥ १३७ ॥
आतां राजसासि प्रीती, जिहीं रसीं आथी,
करूं तयाही व्यक्ती, प्रसंगें गा ॥ १३८ ॥
कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिनः।
आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः ॥ ९॥
तरी मारें उणें काळकुट, तेणें मानें जें कडुवट,
कां चुनियाहूनि दासट, आम्ल हन ॥ १३९ ॥
कणिकीतें जैसें पाणी, तैसेंचि मीठ बांधया आणी,
तेतुलीच मेळवणी, रसांतरांची ॥ १४० ॥
ऐसें खारट अपाडें, राजसा तया आवडे,
ऊन्हाचेनि मिषें तोंडें, आगीचि गिळी ॥ १४१ ॥
वाफेचिया सिगे, वातीही लाविल्या लागे,
तैसें उन्ह मागे, राजसु तो ॥ ११४२ ॥
वावदळ पाडूनि ठाये, साबळु डाहारला आहे,
तैसें तीख तो खाये, जें घायेविण रुपे ॥ १४३ ॥
आणि राखेहूनि कोरडें, आंत बाहेरी येके पाडें,
तो जिव्हादंशु आवडे, बहु तया ॥ १४४ ॥
परस्परें दांतां, आदळु होय खातां,
तो गा तोंडीं घेतां, तोषों लागे ॥ १४५ ॥
आधींच द्रव्यें चुरमुरीं, वरी परवडिजती मोहरी,
जियें घेतां होती धुवारी, नाकेंतोंडें ॥ १४६ ॥
हें असो उगें आगीतें, म्हणे तैसें राइतें,
पढियें प्राणापरौतें, राजसासि गा ॥ १४७ ॥
ऐसा न पुरोनि तोंडा, जिभा केला वेडा,
अन्नमिषें अग्नि भडभडां, पोटीं भरी ॥ १४८ ॥
तैसाचि लवंगा सुंठे, मग भुईं गा सेजे खाटे,
पाणियाचें न सुटे, तोंडोनि पात्र ॥ १४९ ॥
ते आहार नव्हती घेतले, व्याधिव्याळ जे सुतले,
ते चेववावया घातलें, माजवण पोटीं ॥ १५० ॥
तैसें एकमेकां सळें, रोग उठती एके वेळे,
ऐसा राजसु आहारु फळे, केवळ दुःखें ॥ १५१ ॥
एवं राजसा आहारा, रूप केलें धनुर्धरा,
परीणामाचाहि विसुरा, सांगितला ॥ १५२ ॥
आतां तया तामसा, आवडे आहारु जैसा,
तेंही सांगों चिळसा, झणें तुम्ही ॥ १५३ ॥
तरी कुहिलें उष्टें खातां, न मनिजे तेणें अनहिता,
जैसें कां उपहिता, म्हैसी खाय ॥ १५४ ॥
यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत्।
उच्छिष्टमपि चामेध्यम् भोजनं तामसप्रियम् ॥ १०॥
निपजलें अन्न तैसें, दुपाहरीं कां येरें दिवसें,
अतिकरें तैं तामसें, घेईजे तें ॥ १५५ ॥
नातरी अर्ध उकडिलें, कां निपट करपोनि गेलें,
तैसेंही खाय चुकलें, रसा जें येवों ॥ १५६ ॥
जया कां आथि पूर्ण निष्पत्ती, जेथ रसु धरी व्यक्ती,
तें अन्न ऐसी प्रतीती, तामसा नाहीं ॥ १५७ ॥
ऐसेनि कहीं विपायें, सदन्ना वरपडा होये,
तरी घाणी सुटे तंव राहे, व्याघ्रु जैसा ॥ १५८ ॥
कां बहुवें दिवशीं वोलांडिलें, स्वादपणें सांडिलें,
शुष्क अथवा सडलें, गाभिणेंही हो ॥ १५९ ॥
तेंही बाळाचे हातवरी, चिवडिलें जैसी राडी करी,
का सवें बैसोनि नारी, गोतांबील करी ॥ १६० ॥
ऐसेनि कश्मळें जैं खाय, तैं तया सुखभोजन ऐसें होय,
परी येणेंही न धाय, पापिया तो ॥ १६१ ॥
मग चमत्कारु देखा, निषेधाचा आंबुखा,
जया का सदोखा, कुद्रव्यासी ॥ १६२ ॥
तया अपेयांच्या पानीं, अखाद्यांच्या भोजनीं,
वाढविजे उतान्ही, तामसें तेणें ॥ १६३ ॥
एवं तामस जेवणारा, ऐसैसी मेचु हे वीरा,
तयाचें फल दुसरां, क्षणीं नाहीं ॥ १६४ ॥
जे जेव्हांचि हें अपवित्र, शिवे तयाचें वक्त्र,
तेव्हांचि पापा पात्र, जाला तो कीं ॥ १६५ ॥
यावरतें जें जेवीं, ते जेविती वोज न म्हणावी,
पोटभरती जाणावी, यातना ते ॥ १६६ ॥
शिरच्छेदें काय होये, का आगीं रिघतां कैसें आहे,
हें जाणावें काई पाहें, परी साहातुचि असे ॥ १६७ ॥
म्हणौनि तामसा अन्ना, परीणामु गा सिनाना,
न सांगोंचि गा अर्जुना, देवो म्हणे ॥ १६८ ॥
आतां ययावरी, आहाराचिया परी,
यज्ञुही अवधारीं, त्रिधा असे ॥ १६९ ॥
परी तिहींमाजीं प्रथम, सात्त्विक यज्ञाचें वर्म,
आईक पां सुमहिम -। शिरोमणी ॥ १७० ॥
अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते ॥
यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्त्विकः ॥ ११॥
तरी एकु प्रियोत्तमु-/, वांचोनि वाढों नेदी कामु,
जैसा का मनोधर्मु, पतिव्रतेचा ॥ १७१ ॥
नाना सिंधूतें ठाकोनि गंगा, पुढारां न करीचि रिगा,
का आत्मा देखोनि उगा, वेदु ठेला ॥ १७२ ॥
तैसें जे आपुल्या स्वहितीं, वेंचूनियां चित्तवृत्ती,
नुरवितीचि अहंकृती, फळालागीं ॥ १७३ ॥
पातलेया झाडाचें मूळ, मागुतें सरों नेणेंचि जळ,
जिरालें गां केवळ, तयाच्याचि आंगीं ॥ १७४ ॥
तैसें मनें देहीं, यजननिश्चयाच्या ठायीं,
हारपोनि जें कांहीं, वांछितीना ॥ १७५ ॥
तिहीं फळवांच्छात्यागीं, स्वधर्मावांचूनि विरागीं,
कीजे तो यज्ञु सर्वांगीं, अळंकृतु ॥ १७६ ॥
परी आरिसा आपणपें, डोळां जैसें घेपें,
कां तळहातींचें दीपें, रत्न पाहिजे ॥ १७७ ॥
नाना उदितें दिवाकरें, गमावा मार्गु दिठी भरे,
तैसा वेदु निर्धारें, देखोनियां ॥ १७८ ॥
तियें कुंडें मंडप वेदी, आणीकही संभारसमृद्धी,
ते मेळवणी जैसी विधी, आपणपां केली ॥ १७९ ॥
सकळावयव उचितें, लेणीं पातलीं जैसीं आंगातें,
तैसे पदार्थ जेथिंचे तेथें, विनियोगुनी ॥ १८० ॥
काय वानूं बहुतीं बोलीं, जैसी सर्वाभरणीं भरली,
ते यज्ञविद्याचि रूपा आली, यजनमिषें ॥ १८१ ॥
तैसा सांगोपांगु, निफजे जो यागु,
नुठऊनियां लागु, महत्त्वाचा ॥ १८२ ॥
प्रतिपाळु तरी पाटाचा, झाडीं कीजे तुळसीचा,
परी फळा फुला छायेचा, आश्रयो नाहीं ॥ १८३ ॥
किंबहुना फळाशेवीण, ऐसेया निगुती निर्माण,
होय तो यागु जाण, सात्त्विकु गा ॥ १८४ ॥
अभिसन्धाय तु फलं दंभार्थमपि चैव यत्।
इज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम् ॥ १२॥
आतां यज्ञु कीर वीरेशा, करी पैं याचि{ऐ}सा,
परी श्राद्धालागीं जैसा, अवंतिला रावो ॥ १८५ ॥
जरी राजा घरासि ये, तरी बहुत उपेगा जाये,
आणि कीर्तीही होये, श्राद्ध न ठके ॥ १८६ ॥
तैसा धरूनि आवांका, म्हणे स्वर्गु जोडेल असिका,
दीक्षितु होईन मान्यु लोकां, घडेल यागु ॥ १८७ ॥
ऐसी केवळ फळालागीं, महत्त्व फोकारावया जगीं,
पार्था निष्पत्ति जे यागीं, राजस पैं ते ॥ १८८ ॥
विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणम्।
श्रद्दाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते ॥ १३॥
आणि पशुपक्षिविवाहीं, जोशी कामापरौता नाहीं,
तैसा तामसा यज्ञा पाहीं, आग्रहोचि मूळ ॥ १८९ ॥
वारया वाट न वाहे, कीं मरण मुहूर्त पाहे,
निषिद्धांसीं बिहे, आगी जरी ॥ १९० ॥
तरी तामसाचिया आचारा, विधीचा आथी वोढावारा,
म्हणूनि तो धनुर्धरा, उत्सृंखळु ॥ १९१ ॥
नाहीं विधीची तेथ चाड, नये मंत्रादिक तयाकड,
अन्नजातां न सुये तोंड, मासिये जेवीं ॥ १९२ ॥
वैराचा बोधु ब्राह्मणा, तेथ कें रिगेल दक्षिणा,
अग्नि जाला वाउधाणा, वरपडा जैसा ॥ १९३ ॥
तैसें वायांचि सर्वस्व वेंचे, मुख न देखती श्रद्धेचें,
नागविलें निपुत्रिकाचें, जैसें घर ॥ १९४ ॥
ऐसा जो यज्ञाभासु, तया नाम यागु तामसु,
आइकें म्हणे निवासु, श्रियेचा तो ॥ १९५ ॥
आता गंगेचें एक पाणी, परी नेलें आनानीं वाहणीं,
एक मळीं एक आणी, शुद्धत्व जैसें ॥ १९६ ॥
तैसें तिहीं गुणीं तप, येथ जाहलें आहे त्रिरूप,
तें एक केलें दे पाप, उद्धरी एक ॥ १९७ ॥
तरी तेंचि तिहीं भेदीं, कैसेनि पां म्हणौनि सुबुद्धी,
जाणों पाहासी तरी आधीं, तपचि जाण ॥ १९८ ॥
येथ तप म्हणजे काई, तें स्वरूप दाऊं पाहीं,
मग भेदिलें गुणीं तिहीं, तें पाठीं बोलों ॥ १९९ ॥
तरी तप जें कां सम्यक्, तेंही त्रिविध आइक,
शारीर मानसिक, शाब्द गा ॥ २०० ॥
आतां गा तिहीं माझारीं, शारीर तंव अवधारीं,
तरी शंभु कां श्रीहरी, पढियंता होय ॥ २०१ ॥
देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम् ॥
ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते ॥ १४॥
तया प्रिया देवतालया, यात्रादिकें करावया,
आठही पाहार जैसें पायां, उळिग घापे ॥ २०२ ॥
देवांगणमिरवणियां, अंगोपचार पुरवणियां,
करावया म्हणियां, शोभती हात ॥ २०३ ॥
लिंग कां प्रतिमा दिठी, देखतखेंवों अंगेष्टी,
लोटिजे कां काठी, पडली जैसी ॥ २०४ ॥
आणि विधिविनयादिकीं, गुणीं वडील जे लोकीं,
तया ब्राह्मणाची निकी, पाइकी कीजे ॥ २०५ ॥
अथवा प्रवासें कां पीडा, का शिणले जे सांकडां,
ते जीव सुरवाडा, आणिजती ॥ २०६ ॥
सकल तीर्थांचिये धुरे, जियें कां मातापितरें,
तयां सेवेसी कीर शरीरें, लोण कीजे ॥ २०७ ॥
आणि संसारा{ऐ}सा दारुणु, जो भेटलाचि हरी शीणु,
तो ज्ञानदानीं सकरुणु, भजिजे गुरु ॥ २०८ ॥
आणि स्वधर्माचा आगिठां, देह जाड्याचिया किटा,
आवृत्तिपुटीं सुभटा, झाडी कीजे ॥ २०९ ॥
वस्तु भूतमात्रीं नमिजे, परोपकारीं भजिजे,
स्त्रीविषयीं नियमिजे, नांवें नांवें ॥ २१० ॥
जन्मतेनि प्रसंगे, स्त्रीदेह शिवणें आंगें,
तेथूनि जन्म आघवें, सोंवळें कीजे ॥ २११ ॥
भुतमात्राचेनि नांवें, तृणही नासुडावें,
किंबहुना सांडावे, छेद भेद ॥ २१२ ॥
ऐसैसी जैं शरीरीं, रहाटीची पडे उजरी,
तैं शारीर तप घुमरी, आलें जाण ॥ २१३ ॥
पार्था समस्तही हें करणें, देहाचेनि प्रधानपणें,
म्हणौनि ययातें मी म्हणें, शारीर तप ॥ २१४ ॥
एवं शारीर जें तप, तयाचें दाविलें रूप,
आतां आइक निष्पाप, वाङ्मय तें ॥ २१५ ॥
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्।
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते ॥ १५॥
तरी लोहाचें आंग तुक, न तोडितांचि कनक,
केलें जैसें देख, परीसें तेणें ॥ २१६ ॥
तैसें न दुखवितां सेजे, जावळिया सुख निपजे,
ऐसें साधुत्व कां देखिजे, बोलणां जिये ॥ २१७ ॥
पाणी मुदल झाडा जाये, तृण ते प्रसंगेंचि जियें,
तैसें एका बोलिलें होये, सर्वांहि हित ॥ २१८ ॥
जोडे अमृताची सुरसरी, तैं प्राणांतें अमर करी,
स्नानें पाप ताप वारी, गोडीही दे ॥ २१९ ॥
तैसा अविवेकुही फिटे, आपुलें अनादित्व भेटे,
आइकतां रुचि न विटे, पीयुषीं जैसी ॥ २२० ॥
जरी कोणी करी पुसणें, तरी होआवें ऐसें बोलणें,
नातरी अवर्तणें, निगमु का नाम ॥ २२१ ॥
ऋग्वेदादि तिन्ही, प्रतिष्ठीजती वाग्भुवनीं,
केली जैसी वदनीं, ब्रह्मशाळा ॥ २२२ ॥
नातरी एकाधें नांव, तेंचि शैव का वैष्णव,
वाचे वसे तें वाग्भव, तप जाणावें ॥ २२३ ॥
आतां तप जें मानसिक, तेंही सांगों आइक,
म्हणे लोकनाथनायक, नायकु तो ॥ २२४ ॥
मनः प्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः।
भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ॥ १६॥
तरी सरोवर तरंगीं, सांडिलें आकाश मेघीं,
का चंदनाचें उरगीं, उद्यान जैसें ॥ २२५ ॥
नाना कळावैषम्यें चंद्रु, कां सांडिला आधीं नरेंद्रु,
नातरी क्षीरसमुद्रु, मंदराचळें ॥ २२६ ॥
तैसीं नाना विकल्पजाळें, सांडुनि गेलिया सकळें,
मन राहे का केवळें, स्वरूपें जें ॥ २२७ ॥
तपनेंवीण प्रकाशु, जाड्येंवीण रसीं रसु,
पोकळीवीण अवकाशु, होय जैसा ॥ २२८ ॥
तैसी आपली सोय देखे, आणि आपलिया स्वभावा मुके,
हिंवली जैसी आंगिकें, हिवों नेदी निजांग ॥ २२९ ॥
तैसें न चलतें कळंकेंवीण, शशिबिंब जैसें परीपूर्ण,
तैसें चोखी शृंगारपण, मनाचें जें ॥ २३० ॥
बुजाली वैराग्याची वोरप, जिराली मनाची धांप कांप,
तेथ केवळ जाली वाफ, निजबोधाची ॥ २३१ ॥
म्हणौनि विचारावया शास्त्र, राहाटवावें जें वक्त्र,
तें वाचेचेंही सूत्र, हातीं न धरी ॥ २३२ ॥
तें स्वलाभ लाभलेपणें, मन मनपणाही धरूं नेणें,
शिवतलें जैसें लवणें, आपुलें निज ॥ २३३ ॥
तेथ कें उठिती ते भाव, जिहीं इंद्रियमार्गीं धांव,
घेऊनि ठाकावे गांव, विषयांचे ते ॥ २३४ ॥
म्हणौनि तिये मानसीं, भावशुद्धिचि असे अपैसी,
रोमशुचि जैसी, तळहातासी ॥ २३५ ॥
काय बहु बोलों अर्जुना, जैं हे दशा ये मना,
तैं मनोतपाभिधाना, पात्र होय ती ॥ २३६ ॥
परी ते असो हें जाण, मानस तपाचें लक्षण,
देवो म्हणे संपूर्ण, सांगितलें ॥ २३७ ॥
एवं देहवाचाचित्तें, जें पातलें त्रिविधत्वातें,
तें सामान्य तप तूतें, परीसविलें गा ॥ २३८ ॥
आतां गुणत्रयसंगें, हेंचि विशेषीं त्रिविधीं रिगे,
तेंही आइक चांगें, प्रज्ञाबळें ॥ २३९ ॥
श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः।
अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्त्विकं परिचक्षते ॥ १७॥
तरी हेंचि तप त्रिविधा, जें दाविलें तुज प्रबुद्धा,
तेंचि करीं पूर्णश्रद्धा, सांडूनि फळ ॥ २४० ॥
जैं पुरतिया सत्त्वशुद्धी, आचरिजे आस्तिक्यबुद्धी,
तैं तयातेंचि गा प्रबुद्धी, सात्त्विक म्हणिपे ॥ २४१ ॥
सत्कारमानपूजार्थं तपो दंभेन चैव यत्।
क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवं ॥ १८॥
नातरी तपस्थापनेलागीं, दुजेपण मांडूनि जगीं,
महत्त्वाच्या शृंगीं, बैसावया ॥ २४२ ॥
त्रिभुवनींचिया सन्माना, न वचावें ठाया आना,
धुरेचिया आसना, भोजनालागीं ॥ २४३ ॥
विश्वाचिया स्तोत्रा, आपण होआवया पात्रा,
विश्वें आपलिया यात्रा, कराविया यावें ॥ २४४ ॥
लोकांचिया विविधा पूजा, आश्रयो न धरावया दुजा,
भोग भोगावे वोजा, महत्त्वाचिया ॥ २४५ ॥
अंग बोल माखूनि तपें, विकावया आपणपें,
अंगहीन पडपे, जियापरी ॥ २४६ ॥
हें असो धनमानीं आस, वाढौनी तप कीजे सायास,
तैं तेंचि तप राजस, बोलिजे गा ॥ २४७ ॥
परी पहुरणी जें दुहिलें, तैं तें गुरूं न दुभेचि व्यालें,
का उभें शेत चारिलें, पिकावया नुरे ॥ २४८ ॥
तैसें फोकारितां तप, कीजे जें साक्षेप,
तें फळीं तंव सोप, निःशेष जाय ॥ २४९ ॥
ऐसें निर्फळ देखोनि करितां, माझारीं सांडी पंडुसुता,
म्हणौनि नाहीं स्थिरता, तपा तया ॥ २५० ॥
एऱ्हवीं तरी आकाश मांडी, जो गर्जोनि ब्रह्मांड फोडी,
तो अवकाळु मेघु काय घडी, राहात आहे ? ॥ २५१ ॥
तैसें राजस तप जें होये, तें फळीं कीर वांझ जाये,
परी आचरणींही नोहे, निर्वाहतें गा ॥ २५२ ॥
आतां तेंचि तप पुढती, तामसाचिये रीती,
पैं परत्रा आणि कीर्ती, मुकोनि कीजे ॥ २५३ ॥
मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः।
परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम् ॥ १९॥
केवळ मूर्खपणाचा वारा, जीवीं घेऊनि धनुर्धरा,
नाम ठेविजे शरीरा, वैरियाचें ॥ २५४ ॥
पंचाग्नीची दडगी, खोलवीजती शरीरालागीं,
का इंधन कीजे हें आगी, आंतु लावी ॥ २५५ ॥
माथां जाळिजती गुगुळु, पाठीं घालिजती गळु,
आंग जाळिती इंगळु, जळतभीतां ॥ २५६ ॥
दवडोनि श्वासोच्छ्वास, कीजती वायांचि उपवास,
कां घेपती धूमाचें घांस, अधोमुखें ॥ २५७ ॥
हिमोदकें आकंठें, खडकें सेविजती तटें,
जितया मांसाचे चिमुटे, तोडिती जेथ ॥ २५८ ॥
ऐसी नानापरी हे काया, घाय सूतां पैं धनंजया,
तप कीजे नाशावया, पुढिलातें ॥ २५९ ॥
आंगभारें सुटला धोंडा, आपण फुटोनि होय खंडखंडा,
कां आड जालियातें रगडा, करी जैसा ॥ २६० ॥
तेवीं आपलिया आटणिया, सुखें असतया प्राणिया,
जिणावया शिराणिया, कीजती गा ॥ २६१ ॥
किंबहुना हे वोखटी, घेऊनि क्लेशाची हातवटी,
तप निफजे तें किरीटी, तामस होय ॥ २६२ ॥
एवं सत्त्वादिकांच्या आंगीं, पाडिलें तप तिहीं भागीं,
जालें तेंही तुज चांगी, दाविलें व्यक्ती ॥ २६३ ॥
आतां बोलतां प्रसंगा, आलें म्हणौनि पैं गा,
करूं रूप दानलिंगा, त्रिविधा तया ॥ २६४ ॥
येथ गुणाचेनि बोलें, दानही त्रिविध असे जालें,
तेंचि आइक पहिलें, सात्त्विक ऐसें ॥ २६५ ॥
दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे ॥
देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम् ॥ २०॥
तरी स्वधर्मा आंतौतें, जें जें मिळे आपणयातें,
तें तें दीजे बहुतें, सन्मानयोगें ॥ २६६ ॥
जालया सुबीजप्रसंगु, पडे क्षेत्रवाफेचा पांगु,
तैसाचि दानाचा हा लागु, देखतसें ॥ २६७ ॥
अनर्घ्य रत्न हातां चढे, तैं भांगाराची वोढी पडे,
दोनी जालीं तरी न जोडे, लेतें आंग ॥ २६८ ॥
परी सण सुहृद संपत्ती, हे तिन्ही येकीं मिळती,
जे भाग्य धरी उन्नती, आपुल्याविषयीं ॥ २६९ ॥
तैसें निफजावया दान, जैं सत्त्वासि ये संवाहन,
तैं देश काळ भाजन, द्रव्यही मिळे ॥ २७० ॥
तरी आधीं तंव प्रयत्नेंसीं, होआवें कुरुक्षेत्र का काशी,
नातरी तुके जो इहींसीं, तो देशुही हो ॥ २७१ ॥
तेथ रविचंद्रराहुमेळु, होतां पाहे पुण्यकाळु,
का तयासारिखा निर्मळु, आनुही जाला ॥ २७२ ॥
तैशा काळीं तिये देशीं, होआवी पात्र संपत्ती ऐसी,
मूर्ति आहे धरिली जैसी, शुचित्वेंचि कां ॥ २७३ ॥
आचाराचें मूळपीळ, वेदांची उतारपेठ,
तैसें द्विजरत्न चोखट, पावोनियां ॥ २७४ ॥
मग तयाच्या ठाईं वित्ता, निवर्तवावी स्वसत्ता,
परी प्रियापुढें कांता, रिगे जैसी ॥ २७५ ॥
का जयाचें ठेविलें तया, देऊनि होईजे उतराइया,
नाना हडपें विडा राया, दिधला जैसा ॥ २७६ ॥
तैसेनि निष्कामें जीवें, भूम्यादिक अर्पावें,
किंबहुना हांवे, नेदावें उठों ॥ २७७ ॥
आणि दान जया द्यावें, तयातें ऐसेया पाहावें,
जया घेतलें नुमचवे, कायसेंनही ॥ २७८ ॥
साद घातलिया आकाशा, नेदी प्रतिशब्दु जैसा,
का पाहिला आरसा, येरीकडे ॥ २७९ ॥
नातरी उदकाचिये भूमिके, आफळिलेनि कंदुकें,
उधळौनि कवतिकें, न येईजे हाता ॥ २८० ॥
नाना वसो घातला चारू, माथां तुरंबिला बुरू,
न करी प्रत्युपकारू, जियापरी ॥ २८१ ॥
तैसें दिधलें दातयाचें, जो कोणेही आंगें नुमचे,
अर्पिलया साम्य तयाचें, कीजे पैं गा ॥ २८२ ॥
ऐसिया जें सामग्रिया, दान निफजे वीरराया,
तें सात्त्विक दानवर्या, सर्वांही जाण ॥ २८३ ॥
आणि तोचि देशु काळु, घडे तैसाचि पात्रमेळु,
दानभागुही निर्मळु, न्यायगतु ॥ २८४ ॥
यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः।
दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम् ॥ २१॥
परी मनीं धरूनि दुभतें, चारिजे जेवीं गाईतें,
का पेंव करूनि आइतें, पेरूं जाइजे ॥ २८५ ॥
नाना दिठी घालुनि आहेरा, अवंतुं जाइजे सोयिरा,
का वाण धाडिजे घरा, वोवसीयाचे ॥ २८६ ॥
पैं कळांतर गांठीं बांधिजे, मग पुढिलांचें काज कीजे,
पूजा घेऊनि रसु दीजे, पीडितांसी ॥ २८७ ॥
तैसें जया जें दान देणें, तो तेणेंचि गा जीवनें,
पुढती भुंजावा भावें येणें, दीजे जें का ॥ २८८ ॥
अथवा कोणी वाटे जातां, घेतलें उमचों न शकता,
मिळे जैं पंडुसुता, द्विजोत्तमु ॥ २८९ ॥
तरी कवड्या एकासाठीं, अशेषां गोत्रांचींच किरीटी,
सर्व प्रायश्चित्तें सुयें मुठीं, तयाचिये ॥ २९० ॥
तेवींचि पारलौकिकें, फळें वांछिजती अनेकें,
आणि दीजे तरी भुके, येकाही नोहे ॥ २९१ ॥
तेंही ब्राह्मणु नेवो सरे, कीं हाणिचेनि शिणें झांसुरें,
सर्वस्व जैसें चोरें, नागऊनि नेलें ॥ २९२ ॥
बहु काय सांगों सुमती, जें दीजे या मनोवृत्ती,
तें दान गा त्रिजगतीं, राजस पैं ॥ २९३ ॥
अदेशकाले यद्दनमपात्रेभ्यश्च दीयते।
असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम् ॥ २२॥
मग म्लेंच्छांचे वसौटें, दांगाणे हन कैकटे,
का शिबिरें चोहटे, नगरींचे ते ॥ २९४ ॥
तेही ठाईं मिळणी, समयो सांजवेळु कां रजनी,
तेव्हां उदार होणें धनीं, चोरियेच्या ॥ २९५ ॥
पात्रें भाट नागारी, सामान्य स्त्रिया का जुवारी,
जिये मूर्तिमंते भुररीं, भुले तया ॥ २९६ ॥
रूपानृत्याची पुरवणी, ते पुढां डोळेभारणी,
गीत भाटीव तो श्रवणीं, कर्णजपु ॥ २९७ ॥
तयाहीवरी अळुमाळु, जैं घे फुलागंधाचा गुगुळु,
तंव भ्रमाचा तो वेताळु, अवतरे तैसा ॥ २९८ ॥
तेथ विभांडूनियां जग, आणिले पदार्थ अनेग,
तेणें घालूं लागे मातंग, गवादी जैसी ॥ २९९ ॥
एवं ऐसेनि जें देणें, तें तामस दान मी म्हणें,
आणि घडे दैवगुणें, आणिकही ऐक ॥ ३०० ॥
विपायें घुणाक्षर पडे, टाळिये काउळा सांपडे,
तैसे तामसां पर्व जोडे, पुण्यदेशीं ॥ ३०१ ॥
तेथ देखोनि तो आथिला, योग्यु मागोंही आला,
तोही दर्पा चढला, भांबावें जरी ॥ ३०२ ॥
तरी श्रद्धा न धरी जिवीं, तया माथाही न खालवी,
स्वयें न करी ना करवी, अर्घ्यादिक ॥ ३०३ ॥
आलिया न घली बैसों, तेथ गंधाक्षतांचा काय अतिसो,
हा अप्रसंगु कीर असो, तामसीं नरीं ॥ ३०४ ॥
पैं बोळविजे रिणाइतु, तैसा झकवी तयाचा हातु,
तूं करणें याचा बहुतु, प्रयोगु तेथ ॥ ३०५ ॥
आणि जया जें दे किरीटी, तयातें उमाणी तयासाठीं,
मग कुबोलें कां लोटी, अवज्ञेच्या ॥ ३०६ ॥
हें बहु असो यापरी, मोल वेंचणें जें अवधारीं,
तया नांव चराचरीं, तामस दान ॥ ३०७ ॥
ऐशीं आपुलाला चिन्हीं, अळंकृतें तिन्हीं,
दानें दाविलीं अभिधानीं, रजतमाचिया ॥ ३०८ ॥
तेथ मी जाणत असें, विपायें तूं गा ऐसें,
कल्पिसील मानसें, विचक्षणा ॥ ३०९ ॥
जें भवबंधमोचक, येकलें कर्म सात्त्विक,
तरी कां वेखासी सदोख, येर बोलावीं ? ॥ ३१० ॥
परी नोसंतितां विवसी, भेटी नाहीं निधीसी,
का धूं न साहतां जैसी, वाती न लगे ॥ ३११ ॥
तैसें शुद्धसत्त्वाआड, आहे रजतमाचें कवाड,
तें भेदणे यातें कीड, म्हणावें कां ? ॥ ३१२ ॥
आम्ही श्रद्धादि दानांत, जें समस्तही क्रियाजात,
सांगितलें कां व्याप्त, तिहीं गुणीं ॥ ३१३ ॥
तेथ भरंवसेनि तिन्ही, न सांगोंचि ऐसें मानीं,
परी सत्त्व दावावया दोन्ही, बोलिलों येरें ॥ ३१४ ॥
जें दोहींमाजीं तिजें असे, तें दोन्ही सांडितांचि दिसे,
अहोरात्रत्यागें जैसें, संध्यारूप ॥ ३१५ ॥
तैसें रजतमविनाशें, तिजें जें उत्तम दिसे,
तें सत्त्व हें आपैसें, फावासि ये ॥ ३१६ ॥
एवं दाखवावया सत्त्व तुज, निरूपिलें तम रज,
तें सांडूनि सत्त्वें काज, साधीं आपुलें ॥ ३१७ ॥
सत्त्वेंचि येणें चोखाळें, करीं यज्ञादिकें सकळें,
पावसी तैं करतळें, आपुलें निज ॥ ३१८ ॥
सूर्यें दाविलें सांतें, काय एक न दिसे तेथें,
तेवीं सत्त्वें केलें फळातें, काय नेदी ? ॥ ३१९ ॥
हे कीर आवडतांविखीं, शक्ति सत्त्वीं आथी निकी,
परी मोक्षेंसी एकीं, मिसळणें जें ॥ ३२० ॥
तें एक आनचि आहे, तयाचा सावावो जैं लाहे,
तैं मोक्षाचाही होये, गांवीं सरतें ॥ ३२१ ॥
पैं भांगार जऱ्हीं पंधरें, तऱ्ही राजावळींचीं अक्षरें,
लाहें तैंचि सरे, जियापरी ॥ ३२२ ॥
स्वच्छें शीतळें सुगंधें, जळें होती सुखप्रदें,
परी पवित्रत्व संबंधें, तीर्थाचेनि ॥ ३२३ ॥
नयी हो कां भलतैसी थोरी, परी गंगा जैं अंगीकारी,
तैंचि तिये सागरीं, प्रवेशु गा ॥ ३२४ ॥
तैसें सात्त्विका कर्मां किरीटी, येतां मोक्षाचिये भेटी,
न पडे आडकाठी, तें वेगळें आहे ॥ ३२५ ॥
हा बोलु आइकतखेवीं, अर्जुना आधि न माये जीवीं,
म्हणे देवें कृपा करावी, सांगावें तें ॥ ३२६ ॥
तेथ कृपाळुचक्रवर्ती, म्हणे आईक तयाची व्यक्ती,
जेणें सात्त्विक तें मुक्ती-, रत्न देखे ॥ ३२७ ॥
ॐतत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः।
ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा ॥ २३॥
तरी अनादि परब्रह्म, जें जगदादि विश्रामधाम,
तयाचें एक नाम, त्रिधा पैं असे ॥ ३२८ ॥
तें कीर अनाम अजाती, परी अविद्यावर्गाचिये राती-/,
माजी वोळखावया श्रुती, खूण केली ॥ ३२९ ॥
उपजलिया बाळकासी, नांव नाहीं तयापासीं,
ठेविलेनि नांवेंसी, ओ देत उठी ॥ ३३० ॥
कष्टले संसारशीणें, जे देवों येती गाऱ्हाणें,
तयां ओ दे नांवें जेणें, तो संकेतु हा ॥ ३३१ ॥
ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैततत्त्वें तो भेटावा,
ऐसा मंत्रु देखिला कणवा, वेदें बापें ॥ ३३२ ॥
मग दाविलेनि जेणें एकें, ब्रह्म आळविलें कवतिकें,
मागां असत ठाके, पुढां उभें ॥ ३३३ ॥
परी निगमाचळशिखरीं, उपनिषदार्थनगरीं,
आहाति जे ब्रह्माच्या येकाहारीं, तयांसीच कळे ॥ ३३४ ॥
हेंही असो प्रजापती, शक्ति जे सृष्टि करिती,
ते जया एका आवृत्ती, नामाचिये ॥ ३३५ ॥
पैं सृष्टीचिया उपक्रमा-/ पूर्वीं गा वीरोत्तमा,
वेडा ऐसा ब्रह्मा, एकला होता ॥ ३३६ ॥
मज ईश्वरातें नोळखे, ना सृष्टिही करूं न शके,
तो थोरु केला एकें, नामें जेणें ॥ ३३७ ॥
जयाचा अर्थु जीवीं ध्यातां, जें वर्णत्रयचि जपतां,
विश्वसृजनयोग्यता, आली तया ॥ ३३८ ॥
तेधवां रचिलें ब्रह्मजन, तयां वेद दिधलें शासन,
यज्ञा ऐसें वर्तन, जीविकें केलें ॥ ३३९ ॥
पाठीं नेणों किती येर, स्रजिले लोक अपार,
जाले ब्रह्मदत्त अग्रहार, तिन्हीं भुवनें ॥ ३४० ॥
ऐसें नाममंत्रें जेणें, धातया अढंच करणें,
तयाचें स्वरूप आइक म्हणे, श्रीकांतु तो ॥ ३४१ ॥
तरी सर्व मंत्रांचा राजा, तो प्रणवो आदिवर्णु बुझा,
आणि तत्कारु जो दुजा, तिजा सत्कारु ॥ ३४२ ॥
एवं ॐतत्सदाकारु, ब्रह्मनाम हें त्रिप्रकारु,
हें फूल तुरंबी सुंदरु, उपनिषदाचें ॥ ३४३ ॥
येणेंसीं गा होऊनि एक, जैं कर्म चाले सात्त्विक,
तैं कैवल्यातें पाइक, घरींचें करी ॥ ३४४ ॥
परी कापुराचें थळींव, आणून देईल दैव,
लेवों जाणणेंचि आडव, तेथ असे बापा ॥ ३४५ ॥
तैसें आदरिजेल सत्कर्म, उच्चरिजेल ब्रह्मनाम,
परी नेणिजेल जरी वर्म, विनियोगाचें ॥ ३४६ ॥
तरी महंताचिया कोडी, घरा आलियाही वोढी,
मानूं नेणतां परवडी, मुद्दल तुटे ॥ ३४७ ॥
कां ल्यावया चोखट, टीक भांगार एकवट,
घालूनि बांधिली मोट, गळा जेवीं ॥ ३४८ ॥
तैसें तोंडीं ब्रह्मनाम, हातीं तें सात्त्विक कर्म,
विनियोगेंवीण काम, विफळ होय ॥ ३४९ ॥
अगा अन्न आणि भूक, पासीं असे परी देख,
जेऊं नेणतां बालक, लंघनचि कीं ॥ ३५० ॥
का स्नेहसूत्र वैश्वानरा, जालियाही संसारा,
हातवटी नेणतां वीरा, प्रकाशु नोहे ॥ ३५१ ॥
तैसे वेळे कृत्य पावे, तेथिंचा मंत्रुही आठवे,
परी व्यर्थ तें आघवें, विनियोगेंवीण ॥ ३५२ ॥
म्हणौनि वर्णत्रयात्मक, जे हें परब्रह्मनाम एक,
विनियोगु तूं आइक, आतां याचा ॥ ३५३ ॥
तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः।
प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम् ॥ २४॥
तरी या नामींचीं अक्षरें तिन्हीं, कर्मा आदिमध्यनिदानीं,
प्रयोजावीं पैं स्थानीं, इहीं तिन्हीं ॥ ३५४ ॥
हेंचि एकी हातवटी, घेउनि हन किरीटी,
आले ब्रह्मविद भेटी, ब्रह्माचिये ॥ ३५५ ॥
ब्रह्मेंसीं होआवया एकी, ते न वंचती यज्ञादिकीं,
जे चावळलें वोळखीं, शास्त्रांचिया ॥ ३५६ ॥
तो आदि तंव ओंकारु, ध्यानें करिती गोचरु,
पाठीं आणिती उच्चारु, वाचेही तो ॥ ३५७ ॥
तेणें ध्यानें प्रकटें, प्रणवोच्चारें स्पष्टें,
लागती मग वाटे, क्रियांचिये ॥ ३५८ ॥
आंधारीं अभंगु दिवा, आडवीं समर्थु बोळावा,
तैसा प्रणवो जाणावा, कर्मारंभीं ॥ ३५९ ॥
उचितदेवोद्देशे, द्रव्यें धर्म्यें आणि बहुवसें,
द्विजद्वारां हन हुताशें, यजिती पैं ते ॥ ३६० ॥
आहवनीयादि वन्ही, निक्षेपरूपीं हवनीं,
यजिती पैं विधानीं, फुडे हौनी ॥ ३६१ ॥
किंबहुना नाना याग, निष्पत्तीचे घेउनि अंग,
करिती नावडतेया त्याग, उपाधीचा ॥ ३६२ ॥
कां न्यायें जोडला पवित्रीं, भूम्यादिकीं स्वतंत्रीं,
देशकाळशुद्ध पात्रीं, देती दानें ॥ ३६३ ॥
अथवा एकांतरां कृच्छ्रीं, चांद्रायणें मासोपवासीं,
शोषोनि गा धातुराशी, करिती तपें ॥ ३६४ ॥
एवं यज्ञदानतपें, जियें गाजती बंधरूपें,
तिहींच होय सोपें, मोक्षाचें तयां ॥ ३६५ ॥
स्थळीं नावा जिया दाटिजे, जळीं तियांचि जेवीं तरीजे,
तेवीं बंधकीं कर्मीं सुटिजे, नामें येणें ॥ ३६६ ॥
परी हें असो ऐसिया, या यज्ञदानादि क्रिया,
ओंकारें सावायिलिया, प्रवर्तती ॥ ३६७ ॥
तिया मोटकिया जेथ फळीं, रिगों पाहाती निहाळीं,
प्रयोजिती तिये काळीं, तच्छब्दु तो ॥ ३६८ ॥
तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपः क्रियाः।
दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभिः ॥ २५॥
जें सर्वांही जगापरौतें, जें एक सर्वही देखतें,
तें तच्छब्दें बोलिजे तें, पैल वस्तु ॥ ३६९ ॥
तें सर्वादिकत्वें चित्तीं, तद्रूप ध्यावूनियां सुमती,
उच्चारेंही व्यक्ती, आणिती पुढती ॥ ३७० ॥
म्हणती तद्रूपा ब्रह्मा तया, फळेंसीं क्रिया इयां,
तेंचि होतु आम्हां भोगावया, कांहींचि नुरो ॥ ३७१ ॥
ऐसेनि तदात्मकें ब्रह्में, तेथ उगाणूनि कर्में,
आंग झाडिती न ममें, येणें बोलें ॥ ३७२ ॥
आतां ओंकारें आदरिलें, तत्कारें समर्पिलें,
इया रिती जया आलें, ब्रह्मत्व कर्मा ॥ ३७३ ॥
तें कर्म कीर ब्रह्माकारें, जालें तेणेंही न सरे,
जे करी तेणेंसी दुसरें, आहे म्हणौनि ॥ ३७४ ॥
मीठ आंगें जळीं विरे, परी क्षारता वेगळी उरे,
तैसें कर्म ब्रह्माकारें, गमे तें द्वैत ॥ ३७५ ॥
आणि दुजे जंव जंव घडे, तंव तंव संसारभय जोडे,
हें देवो आपुलेनि तोंडें, बोलती वेद ॥ ३७६ ॥
म्हणौनि परत्वें ब्रह्म असे, तें आत्मत्वें परीयवसे,
सच्छब्द या रिणादोषें, ठेविला देवें ॥ ३७७ ॥
तरी ओंकार तत्कारीं, कर्म केलें जें ब्रह्मशरीरीं,
जें प्रशस्तादि बोलवरी, वाखाणिलें ॥ ३७८ ॥
प्रशस्तकर्मीं तिये, सच्छब्दा विनियोगु आहे,
तोचि आइका होये, तैसा सांगों ॥ ३७९ ॥
सद्भावे साधुभावे च सदित्येतत्प्रयुज्यते।
प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थ युज्यते ॥ २६॥
तरी सच्छब्दें येणें, आटूनि असताचें नाणें,
दाविजे अव्यंगवाणें, सत्तेचें रूप ॥ ३८० ॥
जें सत् तेंचि काळें देशें, होऊं नेणेचि अनारिसे,
आपणपां आपण असे, अखंडित ॥ ३८१ ॥
हें दिसतें जेतुलें आहे, तें असतपणें जें नोहे,
देखतां रूपीं सोये, लाभे जयाची ॥ ३८२ ॥
तेणेंसीं प्रशस्त तें कर्म, जें जालें सर्वात्मक ब्रह्म,
देखिजे करूनि सम, ऐक्यबोधें ॥ ३८३ ॥
तरी ओंकार तत्कारें, जें कर्म दाविलें ब्रह्माकारें,
तें गिळूनि होईजे एकसरें, सन्मात्रचि ॥ ३८४ ॥
ऐसा हा अंतरंगु, सच्छब्दाचा विनियोगु,
जाणा म्हणे श्रीरंगु, मी ना म्हणें हो ॥ ३८५ ॥
ना मीचि जरी हो म्हणें, तरी श्रीरंगीं दुजें हेंचि उणें,
म्हणौनि हें बोलणें, देवाचेंचि ॥ ३८६ ॥
आतां आणिकीही परी, सच्छब्दु हा अवधारीं,
सात्त्विक कर्मा करी, उपकारु जो ॥ ३८७ ॥
तरी सत्कर्में चांगें, चालिलीं अधिकारबगें,
परी एकाधें कां आंगें, हिणावती जैं ॥ ३८८ ॥
तैं उणें एकें अवयवें, शरीर ठाके आघवें,
कां अंगहीन भांडावें, रथाची गती ॥ ३८९ ॥
तैसें एकेंचि गुणेंवीण, सतचि परी असतपण,
कर्म धरी गा जाण, जिये वेळे ॥ ३९० ॥
तेव्हां ओंकार तत्कारीं, सावायिला हा चांगी परी,
सच्छब्दु कर्मा करी, जीर्णोद्धारु ॥ ३९१ ॥
तें असतपण फेडी, आणी सद्भावाचिये रूढी,
निजसत्त्वाचिये प्रौढी, सच्छब्दु हा ॥ ३९२ ॥
दिव्यौषध जैसें रोगिया, कां सावावो ये भंगलिया,
सच्छब्दु कर्मा व्यंगलिया, तैसा जाण ॥ ३९३ ॥
अथवा कांहीं प्रमादें, कर्म आपुलिये मर्यादे,
चुकोनि पडे निषिद्धे, वाटे हन ॥ ३९४ ॥
चालतयाही मार्गु सांडे, पारखियाचि अखरें पडे,
राहाटीमाजीं न घडे, काइ काइ ? ॥ ३९५ ॥
म्हणौनि तैसी कर्मा, राभस्यें सांडे सीमा,
असाधुत्वाचिया दुर्नामा, येवों पाहे जें ॥ ३९६ ॥
तेथ गा हा सच्छब्दु, येरां दोहींपरीस प्रबुद्धु,
प्रयोजिला करी साधु, कर्मातें यया ॥ ३९७ ॥
लोहा परीसाची घृष्टी, वोहळा गंगेची भेटी,
कां मृता जैसी वृष्टी, पीयूषाची ॥ ३९८ ॥
पैं असाधुकर्मा तैसा, सच्छब्दुप्रयोगु वीरेशा,
हें असो गौरवुचि ऐसा, नामाचा यया ॥ ३९९ ॥
घेऊनि येथिंचें वर्म, जैं विचारिसी हें नाम,
तैं केवळ हेंचि ब्रह्म, जाणसी तूं ॥ ४०० ॥
पाहें पां ॐतत्सत् ऐसें, हें बोलणें तेथ नेतसे,
जेथूनि कां हें प्रकाशे, दृश्यजात ॥ ४०१ ॥
तें तंव निर्विशिष्ट, परब्रह्म चोखट,
तयाचें हें आंतुवट, व्यंजक नाम ॥ ४०२ ॥
परी आश्रयो आकाशा, आकाशचि का जैसा,
या नामानामी आश्रयो तैसा, अभेदु असे ॥ ४०३ ॥
उदयिला आकाशीं, रवीचि रवीतें प्रकाशी,
हे नामव्यक्ती तैसी, ब्रह्मचि करी ॥ ४०४ ॥
म्हणौनि त्र्यक्षर हें नाम, नव्हे जाण केवळ ब्रह्म,
ययालागीं कर्म, जें जें कीजे ॥ ४०५ ॥
यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते।
कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते ॥ २७॥
तें याग अथवा दानें, तपादिकेंही गहनें,
तियें निफजतु कां न्यूनें, होऊनि ठातु ॥ ४०६ ॥
परी परीसाचा वरकली, नाहीं चोखाकिडाची बोली,
तैसी ब्रह्मीं अर्पितां केलीं, ब्रह्मचि होती ॥ ४०७ ॥
उणिया पुरियाची परी, नुरेचि तेथ अवधारीं,
निवडूं न येती सागरीं, जैसिया नदी ॥ ४०८ ॥
एवं पार्था तुजप्रती, ब्रह्मनामाची हे शक्ती,
सांगितली उपपत्ती, डोळसा गा ॥ ४०९ ॥
आणि येकेकाही अक्षरा, वेगळवेगळा वीरा,
विनियोगु नागरा, बोलिलों रीती ॥ ४१० ॥
एवं ऐसें सुमहिम, म्हणौनि हें ब्रह्मनाम,
आतां जाणितलें कीं सुवर्म, राया तुवां ? ॥ ४११ ॥
तरी येथूनि याचि श्रद्धा, उपलविली हो सर्वदा,
जयाचें जालें बंधा, उरों नेदी ॥ ४१२ ॥
जिये कर्मीं हा प्रयोगु, अनुष्ठिजे सद्विनियोगु,
तेथ अनुष्ठिला सांगु, वेदुचि तो ॥ ४१३ ॥
अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत्।
असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह ॥ २८॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥
ना सांडूनि हे सोये, मोडूनि श्रद्धेची बाहे,
दुराग्रहाची त्राये, वाढऊनियां ॥ ४१४ ॥
मग अश्वमेध कोडी कीजे, रत्नें भरोनि पृथ्वी दीजे,
एकांगुष्ठींही तपिजे, तपसाहस्रीं ॥ ४१५ ॥
जळाशयाचेनि नांवें, समुद्रही कीजती नवे,
परी किंबहुना आघवें, वृथाचि तें ॥ ४१६ ॥
खडकावरी वर्षले, जैसें भस्मीं हवन केलें,
कां खेंव दिधलें, साउलिये ॥ ४१७ ॥
नातरी जैसें चडकणा, गगना हाणितलें अर्जुना,
तैसा समारंभु सुना, गेलाचि तो ॥ ४१८ ॥
घाणां गाळिले गुंडे, तेथ तेल ना पेंडी जोडे,
तैसें दरिद्र तेवढें, ठेलेंचि आंगीं ॥ ४१९ ॥
गांठीं बांधली खापरी, येथ अथवा पैलतीरीं,
न सरोनि जैसी मारी, उपवासीं गा ॥ ४२० ॥
तैसें कर्मजातें तेणें, नाहीं ऐहिकीचें भोगणें,
तेथ परत्र तें कवणें, अपेक्षावें ॥ ४२१ ॥
म्हणौनि ब्रह्मनामश्रद्धा, सांडूनि कीजे जो धांदा,
हें असो सिणु नुसधा, दृष्टादृष्टीं तो ॥ ४२२ ॥
ऐसें कलुषकरिकेसरी, त्रितापतिमिरतमारी,
श्रीवर वीर नरहरी, बोलिलें तेणें ॥ ४२३ ॥
तेथ निजानंदा बहुवसा-/। माजीं अर्जुन तो सहसा,
हरपला चंद्रु जैसा, चांदिणेनि ॥ ४२४ ॥
अहो संग्रामु हा वाणिया, मापें नाराचांचिया आणिया,
सूनि माप घे मवणिया, जीवितेंसी ॥ ४२५ ॥
ऐसिया समयीं कर्कशें, भोगीजत स्वानंदराज्य कैसें,
आजि भाग्योदयो हा नसे, आनी ठाईं ॥ ४२६ ॥
संजयो म्हणे कौरवराया, गुणा रिझों ये रिपूचिया,
आणि गुरुही हा आमुचिया, सुखाचा येथ ॥ ४२७ ॥
हा न पुसता हे गोठी, तरी देवो कां सोडिते गांठी,
तरी कैसेंनि आम्हां भेटी, परमार्थेंसीं ॥ ४२८ ॥
होतों अज्ञानाच्या आंधारां, वोसंतीत जन्मवाहरा,
तों आत्मप्रकाशमंदिरा-/। आंतु आणिलें ॥ ४२९ ॥
एवढा आम्हां तुम्हां थोरु, केला येणें उपकारु,
म्हणौनि हा व्याससहोदरु, गुरुत्वें होय ॥ ४३० ॥
तेवींचि संजयो म्हणे चित्तीं, हा अतिशयो या नृपती,
खुपेल म्हणौनि किती, बोलत असों ॥ ४३१ ॥
ऐसी हे बोली सांडिली, मग येरीचि गोठी आदरिली,
जे पार्थें कां पुसिली, श्रीकृष्णातें ॥ ४३२ ॥
याचें जैसें कां करणें, तैसें मीही करीन बोलणें,
ऐकिजो ज्ञानदेवो म्हणे, निवृत्तीचा ॥ ४३३ ॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां सप्तदशोऽध्यायः ॥